March 29, 2024
Book Review of Aathawanichya Hindoyavar Ashwini Vhatkar
Home » आठवणींच्या रसाने ओतप्रोत भरलेले लेख
मुक्त संवाद

आठवणींच्या रसाने ओतप्रोत भरलेले लेख

आठवणींच्या हिंदोळ्यावर (ललित लेख संग्रह )

भरलेला रसाळ आंबा पाहिल्यावर मन भरते ना तसेच सारे लेख आठवणींच्या रसाने ओतप्रोत भरलेले आहेत. खरोखर ज्यावेळी मन उदास असेल अशा वेळी उंच डोंगरावर, निसर्गाच्या सान्निध्यात बसुन वाचताना यातील एकेक लेख नक्की प्रसन्नता देईल.

महेश कांबळे

उत्तुर, ता. आजरा, जि. कोल्हापूर

अश्विनी व्हरकट यांचा “आठवणींचा हिंदोळ्यावर”हा ललित लेख संग्रह मला आजरा व गारगोटीच्या एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन गेला. लहानपणीच्या आठवणीना जागृत करून गेला. एक एक लेख झाडाला येणाऱ्या मोहरा प्रमाणे फुलला आहे. सर्व लेखांची मांडणी अतिशय उत्कृष्ट केली आहे. भरलेला रसाळ आंबा पाहिल्यावर मन भरते ना तसेच सारे लेख आठवणींच्या रसाने ओतप्रोत भरलेले आहेत.

सर्वात उत्कृष्ट बांधणीचा लेख” रम्य ती स्वर्गाहून सुंदर शाळा” हा लेख खूपच आवडला. लहानपणीच्या शाळेतल्या आठवणींचा एकापाठोपाठ एक चालत आलेल्या, बारीक सारीक घटनांचा उहापोह मनाला खूपच भावला. खास म्हणजे या वयात शाळेत आपल्याला जाऊन काय काय शिकायला आवडेल. याची अप्रतिम कल्पना मनपटलावर जास्तच खेळते. जे आपल्याला शाळेत त्यावेळी उमगले नाही, याचा मागोवा तर अतिशय अभ्यासपूर्ण व बारकावा ठेवून केलेला आहे म्हणून हा लेख मला विशेष आवडला. मुखपृष्ठ आहे खूपच भावुक..

भूतकालीन आठवाना देते उजाळा..!!
स्वत्वाचा परिचय देऊन..
मलपृष्ठाचा साज नामा निराळा..!!

आठवणीच्या हिंदोळ्यावर या ललित लेखसंग्रहाचा इथून पुढचा अभिप्राय 18 ओवी आणि 8 चारोळी रुपात…

पहिली माझी ओवी ग ..!
मनोगतातील नम्रपणाला !
प्रवासात जोडलेल्या . !
अनमोल हिऱ्याना..!!1!!

दुसरी माझी ओवी ग ..!
भाग्यवान त्या लेकीला..!
बापच लेखक लाभला..!
रसाळला हिंदोळा…!!2!!

तिसरी माझी ओवी गं ..!
गावाकडच्या आठवणीला..!
पावसासारख्या बरसल्या त्या..!
चिंब चिंब भिजल्या.!!3!!

चौथी माझी ओवी ग..!
निरागस त्या बालपणाला..!
ठेवा हा जपला …!
प्रेमळ धाग्यांनी ग बांधला.!!4!!

पाचव्या ओवीच गाणं ग..!
पावसाच्या रूपाचं ..!
मंथन करा लेखाचं.. !
रांजन भरल मनाच…!!5!!

सहावी माझी ओवी ग..!
नागरपंचमीच्या उत्सवाला..!
लेखणीतून अवतरला..!
अणू- रेणूं चा उलगडा..!!6!!

सातवी माझी ओवी ग ..!
पाच दिवसाच्या पाहुण्याला ..!
मनातल्या उत्साहाला..!
तोटा नाही आनंदाला .!!7!!

आठवी माझी ओवी ग…!
हादग्याच्या सणाला…!
संस्कृतीचा वारसा हा ..!
हवा जपायला…!!8!!

नववी माझी ओवी ग…!
पाचूच्या त्या बनाला..!
साद घाली जीवाला…!
हरवलेल्या त्या दिवाळीला…!!9!!

दहावी माझी ओवी ग.!
गाठोड्यातील सुगीला..!
माणुसकीच्या थाटाला..,!
हौस भारी दानाला…!!10!!

अकरावी माझी ओवी ग ..!
पेरणोलीच्या राजाला…!
जत्रेमधल्या खाणाखुणा..!
पिंगा घालतात मनाला…!!11!!

बारावी माझी ओवी ग..!
संक्रातीच्या गोडव्याला..!
भोगी-घारीच्या खमंगाला..!
आजच्या अनोख्या वाणाला.!12!!

तेरावी माझी ओवी ग..!
मनातल्या अबोलीची ..!
जिच्या फुलण्यासाठी ग..!
जिवाची घालमेल झालेली…!!13!!

चौदावी माझी ओवी ग..!
तळीतल्या वनभोजनाला..!
थरारक कड्याच्या चढणीला…!
नि कुपीतल्या आनंदाला..!!14!!

पंधरावी माझी ओवी ग..!
रामाच्या तीर्थाला ..!
यात्रेतल्या धिंगाण्याला…!
नि पांडवकालीन लेण्याला…!!15!!

सोळावी ओवी गाईली ग..!
तुकारामाच्या बीजाला..!
भक्तिरसाचा सोहळ्याला..!
माती मधल्या परंपरेला…!!16!!

सतरावी माझी ओवी ग..!
पापडाच्या नवलाईची…!
तारांबळ वाळवणाची ..!
एकमेकींना मदतीची.. !!17!!

अठरावी ओवी गेली ग..!
मामाच्या गावास..!
रेखाटूनी रेघ नि रेघ ..!
लेख बनवलाय खास..!!18!!

रम्य ती स्वर्गाहुन शाळा ..!
लाविते सर्वांनाहि लळा ..!!
घडतो मनुष्य इथे सर्वांगा ..!
ओढ लावी तिचा जिव्हाळा..!! 19!!…

कॉलेजचे जीवन आगळेवेगळे ..!
जिथे घातला पाया आयुष्याचा ..!!
बांधली गेली संस्काराची शिदोरी ..!
लेख सजलाय ओलाव्यानी, चंदेरी त्या दिवसांचा..!! 20!!

गुऱ्हाळ घर तुमचं कुटुंब निराळे..!
घाणेकर सारे जीवन जगले ..!
गप्पाटप्पा आणि ममतेने नटलेले..!
संपुष्टात येऊनही नाते जपलेले…!!21!!

घरामागचे अनमोल परडे ..!
जणू अख्ख्या गल्लीचे मैदान..!!
बालमैत्रिणींच्या गुजगोष्टीनी ..!
लेख बहरलाय छान…!!22!

अंधश्रद्धेला मातीत गाढून…!
अध्यात्मिकतेचा धडा गिरवून..!
विज्ञानवादी दृष्टी घेऊन ..!
नटलाय लागीर झालं जी..!!23!!

वरदहस्त तुम्हांवर आई काकवा देवीचा..!
घनदाट झाडीचा निर्जन विसावा..!!
माहेरहुन येता-जाता बरं का..!
क्षणभर विश्रांती घेत जावा…!!24!

मन भरून येते खूप ..@
परतता पाऊले होतात जड..!!
निराश मन होते प्रसन्न ..!
अशाच वर्णनाने नटवलाय भुदरगड..!!25!!

मार्मिक शब्दांचे अलंकार नेसून ..!
सजले आहेत अभिप्राय सारे..!!
प्रेमरुपी शुभेच्छांचा वर्षाव करून …!
भिजवले चिंब “आठवणींचे हिंदोळे.”.!!26!!

खरोखर ज्यावेळी मन उदास असेल अशा वेळी उंच डोंगरावर, निसर्गाच्या सान्निध्यात बसुन वाचताना यातील एकेक लेख नक्की प्रसन्नता देईल…

पुस्तकाचे नाव – आठवणींच्या हिंदोळ्यावर (ललित लेख संग्रह )
लेखिका – सौ. अश्विनी बजरंग व्हरकट
प्रकाशन – विनय पब्लिकेशन, मोबाईल – ९५२७६२१७२८

Related posts

मराठवाडा साहित्य परिषदेचे ग्रंथपुरस्कार जाहीर 

मन साधनेत रमण्यासाठी हे करा

गुरु पौर्णिमा

Leave a Comment