March 29, 2024
Book Review Of Antrarichya Garbhi Dr Sangeeta Barve selected Poems
Home » चिंतन करायला लावणाऱ्या कविता…
काय चाललयं अवतीभवती

चिंतन करायला लावणाऱ्या कविता…

डॉ. संगीता बर्वे यांनी कविता, गीतलेखन, अनुवाद आणि बालसाहित्य लेखन करून मराठी साहित्य विश्वात चांगली ओळख निर्माण केलेली आहे. त्यांची कविता ही चिंतन करायला लावणारी तर आहेच पण जगण्याच्या नव्या वाटा, नवा मार्ग शोधत ताठ मानेने जगायला शिकवणारी आहे.

प्रा. रामदास केदार

उदगीर

अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. संगीता बर्वे यांचा ‘अंतरीच्या गर्भी ‘हा निवडक कवितांचा संग्रह अनंत ताकवले यांनी संपादित केला आहे. संगीता बर्वे ह्या समकालीन कवयित्री असून त्या आयुर्वेद शास्त्राच्या पदवीधर आहेत. त्यांच्या लेखनास महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड:मय पुरस्कार मिळाला आहे.

मारुंजी (ता. मुळशी, जि. पुणे) येथे झालेल्या २६व्या अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. त्यांच्या काही निवडक कविता या संग्रहात आहेत. शांन्ता शेळके, डॉ. अनुराधा पोतदार, मंगेश पाडगावकर, शंकर वैद्य अशा अनेक साहित्यिक मान्यवरांनी संगीता बर्वे यांच्या कवितेचा परिचय करून दिला आहे. सामाजिक विषयावर त्यांनी कविता लिहिलेल्या असल्या तरी माणसांच्या मनाचा तळ शोधत अवतीभोवतीचे सखोल असे वास्तविक दर्शन घडवून आणलेले आहे. डॉक्टरकीचा अभ्यास करताना मनावर उमटलेले वेगवेगळे ठसे कवितेत उमटलेले आहेत. आकाशातील इंद्रधनुला जशा वेगवेगळ्या रंगाच्या छटा असतात तशाच प्रकारे सुख, दुःख, आनंद, भाव भावना, वेदना, निसर्गाचा अविष्कार, कर्म यांच्या छटा कवितेत उमटलेल्या दिसतात.

कवयित्रीच्या अंतरंगातील भावना, समाजातील संगती विसंगती, दाहकता, गावाकडची आजी, फेसबुकवरची टेक्नॉलॉजी, कारुण्य आणि संवेदनशीलता कवितेतून शब्दबद्ध झालेल्या आहेत. अंतरीच्या गर्भी काळोखाचा डोह
त्याचा मज मोह कासया गा
निबीड बनात धावले धावले
किती रक्ताळले काय सांगू
जीवाचा आकांत साहूनी बुडाले
विर्घळोनी गेले कवितेत ….

कवितेशी नाते जोडत स्व – भोवतालचे सूक्ष्म अवलोकन करत काव्यनिर्मीती कशी होत गेली हे सहज शब्दात सांगतात.

‘मनाच्या तळाशी’ या कवितेत त्या लिहितात.
मनाच्या तळाशी उतरले खोल
अंतरीचा तोल सावराया
सारले बाजूस लाघवी शेवाळ
विकारांचा गाळ स्वच्छ केला

मनाने मनाशीच संवाद साधून मनातील विकारांचा गाळ काढल्यास शांतता आणि सत्वगुण भेटू शकतो. असे कदाचित कवयित्रीला सांगायचे आहे. या कविता तुकोबांच्या विचारांशी समरस होताना दिसतात. चिंतनशील अशी ही कविता आहे. कवयित्री मना बरोबरच शेतीमाती, गुरढोरं, गावगाडाही कवितेतून उभी करते आहे. दुष्काळ पडला की जिवाला घोर लागतो. काळ्याआईच्या कपाळावरचं हिरवं गोंदण पुसट होते. ओसाड माळरान आणि बोडकी झाडे पाहून पाखरांनाही घरटं सोडाव लागतं. ‘घोर’ या कवितेत लिहितात –

किती खंगूनिया गेली
पाण्याविना गुरंढोरं
त्यात धाकल्या पोराचा
लागे जिवाला ग घोर

आला दुष्काळ हा बाई
माझ्या हिरव्या गावात
तडकले रान सारे
अश्रू बोडक्या झाडात

गावाकडच्या फुफाट्या मातीचे चटके सहन करत पोटासाठी घामाच्या धारा वाहत कष्ट करणारी माणसं कवयित्री कवितेतून टिपते आहे.
तप्त उन्हाच्या झळा लागुनी
मातीचे फुटले अंग
झाडे झाली केविलवाणी
त्यांचेही उडले रंग

पाण्यावाचून इथे पाखरु
चोच वासुनि पडलेले
शुष्क नदीच्या पात्रामध्ये
प्रेत म्हशीचे सडलेले

गाव आणि शिवारमातीचे वर्णन करताना कवयित्री आम्ही कसे घडलो हेही सांगते. जुन्या गावच्या आठवणी त्या जाग्या करतात. प्रत्येकांचेच आपल्या गावावरती ओतप्रोत प्रेम असतेच. बालपण कसे घडत गेले. भूतकाळ आणि वर्तमान यातील झालेला बदल. आताचे परिवर्तन झपाट्याने वाढत असल्याचे ही कविता वाचल्यानंतर कळते.

गावाकडच्या बालपणातील ह्या सुंदर आठवणी वाचतांना प्रत्येकालाच आपला गाव डोळ्यासमोर उभा राहतो. दिवस, रात्र आणि पहाटेचे वर्णन सुंदर अशा शब्दांत कवयित्री करते.
नदीकाठची शाळा आमची
होती जरी पडकी
शाळेत जाण्यासाठी कधी
भरत नसे धडकी

दप्तर कधी पाठीवरचे
वाटले नव्हते ओझे
नव्हती रिक्षा, नव्हता गणवेश
नव्हते बुटमोजे

वीज नसे, पाणी नसे
कंदील मात्र जळत
झुंजूमुंजू होताच बायका
जात्यावरती दळत

हसत खेळत झेलल्या
अनेक अडचणींच्या झळा
असे घडलो आम्ही
आमची भिंतीबाहेर शाळा !


गाव बदलावा तशीच माणसं आणि माणसांची वृत्ती बदलत गेली. त्यांच्या रक्तात विष भिनत गेले. आता आपण दुःख उगाळायचे किती ? हे प्रश्न ती आपल्याच मनाला विचारते. असे वैशाखाचे ऊन ही कविता मनाला चटका लावणारी आहे. या देशाचे अठरा विश्व दारिद्रय काही केल्या जात नाही. घाम गाळून चटके शोषत लेकराला घास भरवणारी आई संसारातलं दारिद्रय उभे करते.

घाम पुसून तरीही
खडी फोडते माऊली
तान्हे झोपले झोळीत
झाड धरते सावली

माय कासावीस होई
तिचा भरलेला पान्हा
टाहो फोडून फोडून
पुन्हा निजलेला तान्हा

हे दुःख, ही यातना जेंव्हा डोळ्यासमोर उभी राहते तेंव्हा विजेसारखी ही वेदना काळजात चमकून जाते आणि मग अशा कवितेचा जन्म होतो असे कवयित्री लिहिते. सोसलेल्या, पाहिलेल्या दुःखाचे अनेक कंगोरे अनेकांच्या वाट्याला येतात तेंव्हा डोक्यात गडगडणाऱ्या ढगांसारखी अवस्था होऊन जाते. आणि मग कवितेचा जन्म होतो असे कवयित्री म्हणते.

चमकून जाते हृदयामध्ये
ओळ अचानक विजेसारखी
झिरपत येते रक्तातुन
मग कविता झुळझुळ झऱ्यासारखी
डॉ. संगीता बर्वे यांनी कविता, गीतलेखन, अनुवाद आणि बालसाहित्य लेखन करून मराठी साहित्य विश्वात चांगली ओळख निर्माण केलेली आहे. त्यांची कविता ही चिंतन करायला लावणारी तर आहेच पण जगण्याच्या नव्या वाटा, नवा मार्ग शोधत ताठ मानेने जगायला शिकवणारी आहे. मिलिंद मुळीक यांनी सुंदर मुखपृष्ठ रेखाटले आहे.

पुस्तकाचे नाव – अंतरीच्या गर्भी डॉ. संगीता बर्वे यांच्या निवडक कविता
संपादन : अनंत ताकवले
प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
पृष्ठे – २०६, मूल्य – ३५०

Related posts

चंदगड बोलीभाषा, माती अन् माणसाचं मार्मिक चित्रण करणारे पुस्तकः उंबळट

ग्रामीण साहित्याची वस्तूनिष्ठ मांडणी

श्वासाच्या अनुभूतीतूनच दूर होतो मीपणाचा अहंकार

Leave a Comment