April 25, 2024
increase in land-slice-incidence in western ghat
Home » पश्चिम घाटास भूस्खलनाचा वाढता धोका
काय चाललयं अवतीभवती

पश्चिम घाटास भूस्खलनाचा वाढता धोका

भूस्खलन म्हणजे जमिनीचा मोठा भाग (ज्यामध्ये दगडगोटे, माती व पाणी याचे मिश्रण) डोंगर उताराच्या दिशेने घसरणे होय. यालाच दरडी कोसळणे असेही म्हटले जाते. साधारणतः भूस्खलन ही एक भूरूपे विकास प्रक्रियेतील महत्वाची नैसर्गिक घटना आहे.

प्रा. अभिजित पाटील

(भूस्खलन संशोधक)
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर

सह्याद्री म्हणजे एक जैविविधतेने नटलेली अतुल्य पर्वतरांग कि ज्यास पश्चिम घाट असेही म्हटले जाते. पश्चिम घाट हा उंच सखोल दऱ्याखोऱ्यांचा अन पर्वत रांगांचा प्रदेश. तीव्र उतार, उंचच उंच डोंगरकडे, जंगले, जलद वाहणाऱ्या छोट्या पण पावसाळ्यात रुद्रावतार धारण करणाऱ्या पूर्व व पश्चिम वाहिनी नद्या, ग्रामीण लोकवस्त्या, घाट रस्ते असे एकंदरीत पश्चिम घाटाचे प्राथमिक चित्र दिसते. डोंगराच्या पायथ्याशी तसेच एखाद्या छोट्या नदीप्रवाहालगत अनेक छोट्या मोठ्या लोकवस्ती पहावयास मिळतात. काही घरे तर अगदी डोंगर पायथ्याशी लागून आहेत.

साधारणतः जून ते सप्टेंबर या मान्सून काळात या भागास पर्जन्य प्राप्ती होते. याच दरम्यानच्या काळात पूर व भूस्खलन अशा आणि अनेक आपत्तींना या भागाला सामोरे जावे लागते. अलीकडच्या संशोधनानुसार पश्चिम घाटात होणाऱ्या भूस्खलनामध्ये या दशकात मोठ्या प्रमाणात वाढ पहावयास मिळाली आहे. पश्चिम घाटात २०१४ साली झालेली माळीन या गावातील भूस्खलन दुर्घटना सर्वात मोठ्या दुर्घटनांपैकी एक मानली जाते. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये अशा विध्वंसक भूस्खालानांचे प्रमाण सातत्याने वाढताना दिसून येते. जगभरात सध्या हवामान बदलाचे परिणाम सर्वत्र दिसून येत आहेत. भारतातही याचा परिणाम मान्सूनवर दिसून येत आहेत. कमी कालावधीत अधिक पर्जन्यमान म्हणजे ढगफुटी सदृश पाऊस महाराष्ट्रसह अनेक राज्यात पहावयास मिळत आहे. याचाच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम भूस्खलनावरदेखील होत आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या भूस्खलन दुर्घटनेत तळीये (महाड), पाटण (कराड), पासरे (रत्नागिरी), आंबेघर, कोंडावळे (सातारा), खडीकोळवण, सुतारवाडी तसेच मुंबई उपनगर अशा आणि अनेक नागरी वस्त्यांना याचा फटका बसला. तळीये गावात तर काही मोजकी घरे वगळता संपूर्ण गावं जमिनीखाली गाडले गेले. यंदाच्या चालू मान्सूनमध्ये सुमारे १०० पेक्षा जास्त लोकांचा बळी भूस्खलनाने घेतला. या आपत्तीची इतकी अतीव भीषणता यंदाच्या मान्सून काळात संपूर्ण महाराष्ट्रास दुर्दैवाने पहावयास मिळाली. यापूर्वीही पश्चिम घाटात भूस्खलन होतच होते परंतु याची तीव्रता व वारंवारता गेल्या काही वर्षात अधिक जाणवत आहे. मुळात भूस्खलन होते कसे ? त्यामागची प्रमुख कारणे कोणती ? त्यावरील उपाययोजना कोणत्या ? हे सद्य स्थितीत जाणून घेणे आवश्यक बनले आहे.

भूस्खलन म्हणजे जमिनीचा मोठा भाग (ज्यामध्ये दगडगोटे, माती व पाणी याचे मिश्रण) डोंगर उताराच्या दिशेने घसरणे होय. यालाच दरडी कोसळणे असेही म्हटले जाते. साधारणतः भूस्खलन हि एक भूरूपे विकास प्रक्रियेतील महत्वाची नैसर्गिक घटना आहे. भूस्खलनादरम्यान वहन होणाऱ्या जमिनीवरील झाडे किंवा सर्व वनस्पतीदेखील वाहून पायथ्यापर्यंत येतात. पश्चिम घाटात नैसर्गिकरीत्या अनेक भूस्खलन घटना आढळून येतात. यात प्रत्येक भूस्खलनाने जीवित किंवा वित्त हानी होतेच असे नाही. परंतु होणाऱ्या भूस्खालानाचा परिणाम जर डोंगरउतारावर असणाऱ्या लोकवस्त्या किवा मानवनिर्मित कोणत्याही घटकास होत असेल तर त्यास आपण भूस्खलन आपत्ती असे संबोधतो.

भूस्खलनासाठी अनेक नैसर्गिक व मानवी घटक जबाबदार असतात. यामध्ये नैसर्गिक उतार, भूगर्भातील अंतर्गत रचना, खडकाचे प्रकार व त्यातील कमकुवतपणा, भूकंप, अतिवृष्टी इ. नैसर्गिक घटक भूस्खलनासाठी कारणीभूत ठरतात. तर नैसर्गिक उतारावरील अशास्त्रीय बदल, डोंगर उतारावर किंवा पायथ्याशी अवैध खाणकाम, बेसुमार वृक्षतोड, उतारावरील अशास्त्रीय शेती, डोंगरउतारावरील बेकायदेशीर बाधकाम, घाट रस्त्यालगत अशास्त्रीय पाणी निचरा पद्धत, पायथ्याशी किंवा उतारावर विस्फोटकाचा वापर, दऱ्याखोऱ्यातील अवाजवी पर्यटन तसेच डोंगर उतारावरील विविध कारणांसाठी वाढता मानवी हस्तक्षेप आदी मानवनिर्मित घटक भूस्खलनासाठी कारणीभूत ठरतात.

आज मान्सून काळात वर्षापर्यटन खूप मोठ्या प्रमाणात पश्चिम घाटात पहावयास मिळते. महाबळेश्वर, आंबोली, गगनबावडा, माथेरान अशा अनेक ठिकाणी नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी हजारो पर्यटक दरवर्षी गर्दी करतात. परंतु अशा ठिकाणी भूस्खलनाचा धोका अधिक संभवतो. आणि जर भूस्खलनासारखी घटना अशा ठिकाणी घडली तर जीवितहानी मोठ्या प्रमाणात होईल यात शंका नाही. खरंतरं भूस्खलन हा विषय फक्त भूस्खलन झाल्यानंतरच काही काळ चर्चेत असतो तेही जीवित किवा वित्त हानी झाली असेल तरच अन्यथा या आपत्तीकडे सर्वच स्थरावरून दुर्लक्षित केले जाते आणि त्यानंतर पुढच्या मान्सूनमध्ये पुन्हा हा विषय चर्चेत येतो. परंतु या चर्चेतून कोणतेही ठोस फलित मात्र पहावयास मिळत नाही. सद्यस्थितीत भूस्खलन थांबविण्यासाठी केल्या गेलेल्या ज्या उपाययोजना आहेत त्या किती तोकड्या आहेत हे घाटातील लोकवस्त्यांना व घाट रस्त्यांना सदिच्छ्या भेट दिल्यावरच लक्षात येते. भूस्खलन पूर्णतः थांबवणे जरी मानवास शक्य नसले तरी त्याची तीव्रता व वारंवारता कमी करून पुढील संभाव्य जीवितहानी टाळणे हे मात्र शक्य आहे. परंतु त्यासाठी शाश्वत उपाययोजना प्रत्येक स्थरावरून करणे आवश्यक आहे. सामाजिक, आर्थिक व शास्त्रीय दृष्ट्या यावर गांभीर्याने विचारमंथन होणे गरजेचे आहे.

भूस्खलन प्रतिबंध उपाययोजना अवलंबण्यापुर्वी भूस्खलन संदर्भात संपूर्ण पश्चिम घाटाचे भूगर्भीय व भौगोलिक सर्वेक्षण होणे तसेच पश्चिम घाटातील प्रत्येक गावांना अति, मध्यम व कमी भूस्खलन धोका पातळीमध्ये शास्त्रीय पद्धतीने विभागणी करणे अत्यंत महत्वाचे आहे. यानंतर उपाययोजनेसाठी गावनिहाय अग्रक्रम ठरविणे सोयीस्कर होईल. प्रामुखाने घाट रस्त्यालगत गरजेच्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधणे, योग्य पाणी निचरा पद्धत वापरणे, डोंगर उतारावरती वनीकरण करणे तसेच वृक्षतोड थांबविणे, डोंगर पायथ्यानजीकच्या अति धोकादायक घरांचे विस्थापन करणे, पर्यटनाचे योग्य व्यवस्थापन करणे, बेकायदेशीर बांधकामांना आळा घालणे, भूस्खलना संदर्भात लोकांमध्ये जनजागृती करणे हे काही सामान्य परंतु अतिप्रभावी प्रतिबंधित उपाय आहेत. भूस्खलन होण्याआधी सूचना देणारी यंत्रणा (अर्ली वार्निंग सिस्टीम) मानवी जीवितहानी संभाव्य क्षेत्रात स्थापित करणे (सद्या अशी एक यंत्रणा कोंकण रेल्वे रुळावरती कार्यरत आहे. त्याचबरोबर उपग्रहीय छायाचित्रांचा वापर, भौगोलिक माहिती प्रणालीचा वापर, विविध ठिकाणच्या भूगर्भीय नमुन्यांचे परीक्षण, अशा विविध विषयांवर भूस्खलन अभ्यासासाठी अधिक संशोधन होणे आवश्यक आहे. शेवटी येवढेच म्हणावे लागेल कि मानव विकास केला जात असताना निसर्गाच्या नैसर्गिक क्रियेमध्ये अडथळा न आणता विकास साधला तर नक्कीच तो एक शाश्वत विकास ठरेल आणि हेच भूस्खलनाच्या बाबतीतही लागू आहे.

Related posts

जलसंवर्धन चळवळीतून पाणी प्रश्नावर तोडगा

माझ्या संपत्तीत भर कधीच का नाही पडली?

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारताची कृषी निर्यात 53.1 अब्ज डॉलर्स

Leave a Comment