March 29, 2024
Know Difference Between Body and Soul article by Rajendra Ghorpade
Home » क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातें । जाणणे जे निरुते । (एकतरी ओवी अनुभवावी)
विश्वाचे आर्त

क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातें । जाणणे जे निरुते । (एकतरी ओवी अनुभवावी)

शरीर आणि आत्मा हे वेगवेगळे आहेत. हे जाणणे यालाच आत्मज्ञान असे म्हटले आहे. या ज्ञानाचे नित्य स्मरण ठेवण्याने आपण आत्मज्ञानी होतो. हे ज्ञान आत्मसात करणे म्हणजेच अध्यात्म आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातें । जाणणे जे निरुते ।
ज्ञान ऐसे तयाते । मांनू आम्ही ।। ९ ।।
श्री ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा

ओवीचा अर्थ – क्षेत्राला आणि क्षेत्रज्ञाला जे यथार्थ जाणणे, त्याला ज्ञान असे आम्ही समजतो.

क्षेत्र म्हणजे शरीर. पंचमहाभुतांनी तयार झालेली ही रचना. विविध रासायनिक घटकांचा त्यात समावेश आहे. या रासायनिक मुलद्रव्यांनी हा मृत सांगाडा उभा राहीला आहे. मृत यासाठी कारण त्यात आत्मा आहे तो पर्यंत तो जीवंत भासतो. आत्मा शरीरातून निघून गेल्यानंतर तो मृतच होतो.

शरीर हे नाशवंत आहे. शरीराची वाढ एका ठराविक मर्यादेपर्यंत होते. ठराविक मर्यादेनंतर त्याची वाढ थांबते व हळूहळू ते शरीर जुणं व्हायला लागते. शेवटी ते आत्मा निघून गेल्यानंतर मृत होते. या शरीराचे विघटन सेंद्रिय पदार्थात होते. म्हणजेच ते पुन्हा पंचमहाभूतात मिसळते. म्हणजेच या पंचमहाभूताच्या शरीरात जेव्हा आत्मा प्रवेश करतो तेव्हा त्या शरीराला जीवंतपणा प्राप्त होतो. ते शरीर सजिव वाटू लागते. पण आत्मा निघून गेल्यानंतर ते निर्जिव होते.

म्हणजेच शरीर आणि आत्मा हे वेगवेगळे आहेत. हे जाणणे यालाच आत्मज्ञान असे म्हटले आहे. या ज्ञानाचे नित्य स्मरण ठेवण्याने आपण आत्मज्ञानी होतो. हे ज्ञान आत्मसात करणे म्हणजेच अध्यात्म आहे. हे ज्ञान जाणण्यासाठीच साधना करावी लागते. साधना म्हणजे तरी काय ? सोहम साधना म्हणजे तरी काय ? आत्मा आणि शरीर वेगळे आहे याचे स्मरण नित्य ठेवणे.

सोहम हा स्वर आहे. श्वास आत घेताना आणि बाहेर सोडताना जो स्वर निर्माण होतो तो सोहम. त्यावर मन केंद्रित करायचे आणि आत्मा आणि शरीराचा फरक जाणायचे. हे ज्ञान नित्य राहण्यासाठी नित्य साधना सांगितली जाते. या ज्ञान मनामध्ये नित्य राहील तेव्हा या ज्ञानाचा जीवनात प्रकाश पडेल. मग ज्ञानाच्या प्रकाशात चाचपडतण्याची गरज भासत नाही.

सूर्याच्या प्रकाशात राहील्यावर अंधार कोठे असेल का ? जो नित्य प्रकाशमान आहे तेथे अंधार कसा असेल ? हा प्रकाश स्वतःला प्रकाशीत करतोच तसेच इतरांसाठीही मार्गदर्शक ठरतो. या प्रकाशाच्या वाटेवर चालताना चाचपडतण्याची काहीच गरज नाही. अशा या ज्ञानप्रकाशाची ओळख करून घेऊन स्वतः प्रकाशमान व्हायला शिकले पाहीजे म्हणजे मग आपण इतरांनाही मार्गदर्शक ठरू.

Related posts

मध्ययुगीन मराठी संत कवयित्रींची काव्यधारा

ध्यानरुप संपत्ती

सुखी जीवनशैलीसाठी साधना आवश्यक

Leave a Comment