March 29, 2024
Marathwada Sahitya Parishad Grant Awards Decleared
Home » मराठवाडा साहित्य परिषदेचे ग्रंथपुरस्कार जाहीर 
काय चाललयं अवतीभवती

मराठवाडा साहित्य परिषदेचे ग्रंथपुरस्कार जाहीर 

विजय जावळे (बीड), प्रमोद मनुघाटे (नागपूर), देवा झिंजाड (पुणे), संतोष जगताप (लोणविरे), अनंत कडेठाणकर ( औरंगाबाद) यांचा सन्मान.

औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या विविध वाङ्मय प्रकारांतील उत्कृष्ट ग्रंथांना पुरस्कार दिले जातात. २०२० मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांतून पुरस्कार निवड समितीने शिफारस केलेले २०२१ चे ग्रंथपुरस्कार मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी जाहीर केले. 

नरहर कुरुंदकर वाङ्मयपुरस्कार अॅड. विजय जावळे (बीड) यांच्या ‘लेकमात ह्या कादंबरीस देण्यात आला आहे. रोख तीन हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. हा पुरस्कार फक्त मराठवाड्यातील कवी, लेखक, समीक्षक, अभ्यासक यांच्या कोणत्याही वाङ्मय प्रकारातील उत्कृष्ट ग्रंथाला देण्यात येतो. श्री. जावळे हे व्यवसायाने वकील असून त्यांची या कादंबरी शिवाय पाच पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या ‘चारखणी’ या कादंबरीने चोखंदळ वाचकांचे लक्ष वेधून घेतले होते. 

प्राचार्य म. भि. चिटणीस वाङ्मयपुरस्कार डॉ. प्रमोद मुनघाटे (नागपूर) यांच्या ‘अठराशे सत्तावन आणि मराठी कादंबरी या समीक्षा ग्रंथास देण्यात आला आहे. तीन हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. चिटणीस पुरस्कार मराठीतील समीक्षा किंवा वैचारिक लेखनासाठी देण्यात येतो. डॉ. मुनघाटे हे मराठीतील ज्येष्ठ समीक्षक असून सध्या नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख आहेत. 

कै. कुसुमताई देशमुख काव्यपुरस्कार देवा झिंजाड (पुणे) यांच्या ‘सगळं उलथवून टाकलं पाहिजे’ या कवितासंग्रहास देण्यात आला आहे. तीन हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप असून मराठीतील कविता लेखनासाठी हा पुरस्कार दिला जातो. श्री. झिंजाड हे व्यवसायाने इलेक्ट्रिकल इंजिनिअर असून यापूर्वी या संग्रहाला अन्य तीन संस्थांचे पुरस्कार मिळालेले आहेत. 

बी. रघुनाथ कथा / कादंबरी पुरस्कार संतोष जगताप (लोणविरे, जि. सोलापूर) यांच्या ‘विजेने चोरलेले दिवस’ या कादंबरीस देण्यात आला आहे. तीन हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप असून मराठीतील उत्कृष्ट कथासंग्रहाला किंवा उत्कृष्ट कादंबरीला हा पुरस्कार देण्यात येतो. संतोष जगताप हे लोणविरे येथे शिक्षक असून ‘साप्ताहिक साधना’ मध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. 

कुमार देशमुख नाट्यपुरस्कार डॉ. अनंत कडेठाणकर (औरंगाबाद) यांच्या ‘साल्मन’ या नाटकास देण्यात आला आहे. तीन हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप असून मराठीतील उत्कृष्ट नाटकाला किंवा नाट्यसमीक्षेला हा पुरस्कार देण्यात येतो. डॉ. अनंतराव कडेठाणकर हे व्यवसायाने डॉक्टर असून त्यांना उपजतच सैन्यदलाचे आकर्षण असल्यामुळे सैन्यदलाच्या मेडिकल कोअरमध्ये मेजर म्हणून त्यांनी सेवा केलेली आहे. कलेच्या विविध क्षेत्रांत त्यांना रस असून ‘वेरूळ महोत्सवा’त त्यांनी आपली कला सादर केलेली आहे. सेवा निवृत्तीनंतर गेली सत्तावीस वर्षे ते छावणीमधील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये मोफत वैद्यकीय सेवा देतात. 

रा. ज. देशमुख स्मृतिपुरस्कारासाठी मुंबईच्या ग्रंथाली वाचक चळवळ या संस्थेची निवड केली आहे. दोन हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप असून मराठी पुस्तक व्यवहारात हयातभर लक्षणीय स्वरूपाचे कार्य करणाऱ्या व्यक्तीस किंवा संस्थेस हा पुरस्कार दिला जातो. ग्रंथाली वाचक चळवळ संस्थेत आजपर्यंत विजय तेंडुलकर, दिनकर गांगल, अशोक जैन, कुमार केतकर व त्यांच्या पिढीतील मातब्बर व्यक्तींनी काम केलेले आहे. ग्रंथाली’ ही केवळ संस्था नसून एक मोठी वाचक चळवळ आहे. या संस्थेने वाचन संस्कृतीसाठी भरीव स्वरूपाचे काम केलेले आहे. त्या कामाची नोंद घेऊन मराठवाडा साहित्य परिषदेने या पुरस्कारासाठी ग्रंथाली या संस्थेची निवड केली आहे. सध्या श्री. सुदेश हिंगलासपूरकर हे ‘ग्रंथाली’चे प्रमुख आहेत. 

मराठवाडा साहित्य परिषदेने प्रा. शेषराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीने ही ग्रंथनिवड केली असून या समितीत प्रा. शेषराव मोहिते यांच्याशिवाय डॉ. सुरेश सावंत आणि डॉ. ज्ञानदेव राऊत हे अन्य दोन सदस्य होते. रा. ज. देशमुख स्मृतिपुरस्काराची निवड ज्येष्ठ प्रकाशक श्री. के. एस. अतकरे, श्री. जीवन कुलकर्णी आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ऋषीकेश कांबळे यांच्या समितीने केली. 

मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी हे पुरस्कार जाहीर केले. हे पुरस्कार लवकरच समारंभपूर्वक देण्यात येतील. त्यात काही अडथळे आल्यास हे सर्व पुरस्कार पोस्टाने घरपोच पाठविण्यात येतील असेही श्री. ठाले पाटील यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. किरण सगर, कार्यवाह डॉ. दादा गोरे व कोषाध्यक्ष श्री. कुंडलिक अतकरे आणि कार्यक्रम समितीचे डॉ. रामचंद्र काळुखे आणि डॉ. कैलास इंगळे हे उपस्थित होते. 

Related posts

Saloni Art : असे रेखाटा खरेखुरे नयन

Neettu Talks : उष्माघातापासून असे मिळवा संरक्षण..

विश्वासास पात्र होण्यासाठी ‘सेबी’ची आता परीक्षा !

Leave a Comment