March 29, 2024
Memories of P Savalaram by Mahadev Pandit
Home » सांगतो गुज अंतरीचे…
मुक्त संवाद

सांगतो गुज अंतरीचे…

दादांनी कधी अगदी तीळभर तरी स्वार्थाचा विचार केला असता तर त्यांच्या नावे मुंबईपासून ठाण्यापर्यंत शेकडो एकर जमीन आज दिसली असती. दादांनी आपली तुलना कधीही कोणाशीही केली नाही. दादांची मैत्री भल्या मोठ्या मोठ्या दिग्गज नेत्याशी होती. तसेच त्यांचे सौदार्याचे संबंध साहित्यीकांशी होते.

महादेव ई. पंडीत

मी जून 1991 ला मुंबई येथे मे. पोर्ट कन्सलटंट लि. मध्ये संकल्प अभियंता या पदावर रुजू झालो. माझे कार्यालय 41 सुयोग इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये होते. कंपनीमध्ये जवळजवळ सर्वजण मराठी लोक होते. त्यामुळे पहिल्याच आठवड्यात सर्वांच्या ओळखी झाल्या. त्याचप्रमाणे मी कोल्हापूरचा असल्यामुळे ओळखी होण्यासाठी काही वेळच लागला नाही. माझ्या कंपनीच्या वेगवेगळ्या शाखा होत्या त्यापैकी विद्युत विभागामध्ये संजय सावळाराम पाटील हे जनकवी पी. सावळारामांचे सुपूत्र सिनीयर पदावर काम करत होते. मी कोल्हापूरी असल्यामुळे माझी आणि संजय यांची दोस्ती चांगलीच जमली. संजय हे फारच चाणाक्ष, बोलक्या स्वभावाचे, गमतीदार तसेच रंगेल व्यक्तीमत्त्व आणि अशा माणसाची स्नेहल नजर माझ्यावर पडली नाही तर नवलच ! आम्ही कधी कधी ऑफीस सुटल्यानंतर स्टेशनपर्यंत एकत्र पायी जात होतो. बरोबर संजय हेअसतील तर ती मजा काही औरच असायची. संपूर्ण दिवसभराचा क्षीण त्वरीत पळायचा.

मी शाळेत असताना क्रिकेट समालोचन रेडीओवर ऐकत असे. त्यावर कधी कधी मराठी गाणी पण ऐकायला मिळत होती. मी मराठी गाण्याचा फारसा शौकीन नव्हतो, पण घरी रेडीओ असल्यामुळे पी सावळाराम हे नाव कानावर आले होते. माझ्या मुंबईतील पहिल्याच जॉबच्या वेळी माझी आणि संजय यांची चांगली दोस्ती जमली. हा एक विलक्षण योगायोगच मानावा लागेल. कारण त्या दोस्तीमुळे मला त्या ऋषीतुल्य प्रतिभासंपन्न कवीला कधीतरी भेटायला व बोलायला मिळेल, अशी माझी पक्की खात्री झाली. खरेतर खेडेगांवातील किंवा शहरातील मुलांना प्रतिभासंपन्न ऋषीतुल्य व्यक्तीमत्वाना भेटण्याचा योग मिळतच नाही. पण मला तो योग मिळणार आणि तो फक्त चांगल्या दोस्तीमुळेच. बघा दोस्ती जीवनात किती आनंद देते.

संजय पी. सावळारामांना दादा म्हणायचे. मी त्यावेळी अविवाहीत असल्यामुळे मला काही वेळेचे बंधन नव्हते. त्यामुळे त्यांच्याबरोबर मी बराच वेळ गप्पा मारत असे. मग मी एक दिवस संजय यांना विचारले – मला दादांना भेटायचे आहे. ते त्वरीत उत्तरले अरे ही काय विचारायची गोष्ट आहे का ? चल आत्ताच घरी चल. मग मी त्यांच्याबरोबर घरी गेलो. पण जाताना दादा कसे असतील ? त्यांचे घर केवढे असेल ? आणि भेटल्यानंतर त्यांच्यासोबत काय बोलायचे असे नाना प्रश्न माझ्या डोक्यात भरभरत होते. एक मात्र नक्की होते की मी कोल्हापूरचा असल्यामुळे ते माझ्यावर प्रेम करणार आणि पाठ थोपटणार त्यामुळे मी एकदम बिनधास्त आणि आनंदीत होतो. एका असामान्य प्रतिभासंपन्न कवीना भेटणे ह्यापेक्षा जीवनात कोणताच क्षण मोठा भाग्याचा असू शकणार!

दादांच्या घरी प्रवेश केल्या केल्या बाहेरील पहिल्याच खोलीमध्ये बसलेले ते प्रतिभावंत मिस्कील व्यक्तीमत्त्व माझ्या कोवळ्या नजरेत कायमचे कोरले गेले आणि त्याचक्षणी दादांच्या शीतल स्नेहल नजरेने मी एकदम पवित्र आणि धन्य झालो. गोऱ्या गोमट्या, एकदम सरळ नाकाच्या त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या अंतरंगाचे वेध घेणाऱ्या मार्गदर्शक डोळे असणाऱ्या आणि उंच्यापुऱ्या व मानेभोवती केशरी रंगाची मफलर गुंडाळलेल्या दादांची ओळख संजय यांनी करून दिली. ओळख करून देताना माझ्या नावाबरोबर हा कोल्हापूरचा आहे हे ऐकल्याबरोबर दादांचा आनंद द्विगुणीत झाला. त्याचे कारण म्हणजे दादांचे सर्व शिक्षण कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या परिसरात झाले होते. दादा आणि कोल्हापूर ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या असे म्हणणे येथे एकदम सार्थ ठरेल.

ऋषीतुल्य दादांना मी वाकून नमस्कार केला. प्रतिभावंत दादांच्या पायांना माझ्या हाताचा स्पर्श होतो न होतो त्याचक्षणी दादांचा उजवा हात माझ्या पाठीवर स्थिरावला आणि त्यांनी माझी पाठ थोपटली. तो क्षण माझ्यासारख्या ठेंगण्या माणसाला प्रगती करण्यासाठी पुरेसा होता. त्याचप्रमाणे अत्यावश्यक होता आणि त्यांच्या गोड व स्नेहल आशिर्वादाने मी ठाणे शहरात माझ्या घराला शोभेल अशी प्रगती करू शकलो.

माझ्या सारख्या शाळेत हुशार असणाऱ्या विद्यार्थ्याला परीक्षकाला आवडेल असा 10 ते 15 ओळींचा निबंध लिहिणे म्हणजे सुध्दा केवढे अवघड वाटायचे आणि मी ज्या प्रतिभासंपन्न ऋषीतुल्य दादांना भेटलो त्यांची शे-पाचशे अजरामर गाणी आजसुध्दा मराठी मनावर राज्य करत आहेत. मग सांगा बघू मी त्यांच्यासमोर ठेंगणाच की नाही ? आणि अशा ह्या जनकवींची थाप पाठीवर पडणे माझ्यासाठी सुवर्ण क्षणच म्हणावा लागेल. पुढे पुढे दादांच्याकडे जाणे वाढत गेले, त्यामुळे संजय यांच्या घरातील इतर मंडळीसोबत एकदम गोड आणि घरोब्याचे नाते तयार झाले.

कोल्हापुरी चप्पलची आवड

दादांना कोल्हापूरी चप्पल खुप आवडत असे आणि ते आवडणारच याचे कारण म्हणजे कोल्हापुरवरचे अपार प्रेम. सहजच एक दिवस दादा मला म्हणाले माझ्यासाठी कोल्हापूरी चप्पल घेऊन येशील कारे ? बघा ह्या वाक्यामध्ये किती विनय आहे. एक प्रतिभावंत कवी एका कोवळ्या आणि लहान कोल्हापूरकरला पायातील चपलासाठी सुद्धा किती आदराने आणि विनयपणे सांगत होते. पुढे मी दिवाळीच्या वेळी माझ्या गावी आलो होतो. त्यावेळी मी माझ्या गावाशेजारील महादेव चव्हाण ह्या चर्मकाराकडून दादांसाठी एक चांगला आणि वजनाने हलका असा चप्पल जोड तयार करून घेतला आणि तो दादांना वापरण्यास दिला. आमच्या चर्मकाराने पण तो चप्पल जोड मन लाऊन बनविला होता. तो चप्पल जोड उक्ता नसल्यामुळे तो दादांना खुप आवडला.

दादांनी मागितला दुरध्वनी…!

संजय यांनी दादांच्या मोठेपणाविषयी एकदा एक प्रसंग सांगितला होता. दादा आणि तत्कालीन मुख्यमंत्री वाय. बी. चव्हाण एका कार्यक्रमा दरम्यान ठाण्यात भेटले होते. दादांचे मुळ गाव सांगली जिल्ह्यातील असल्यामुळे दादांच्या आणि वायबींच्या चांगल्याच गप्पा रंगल्या. गप्पा गप्पामध्येच वायबींनी दादांना विचारले, दादा ! आपणास काय पाहीजे ते मला सांगा लगेचच त्याची कार्यवाही करण्याची माझी जबाबदारी. मुख्यमंत्री साहेबांनी असे इतर कोणाला विचारले असते तर त्यांनी पेडर रोडचा एखादा भुखंड बंगल्यासाठी मागितला असता. पण आपल्या दादांनी त्यांच्याकडे फक्त दूरध्वनी मागितला. अहो ही काय मागायची वस्तू झाली का ? एवढी साधी बाब हा ऋषीतुल्य कवी कशा करीता माझ्याकडे मागत असेल असा जटील प्रश्न मुख्यमंत्र्यांना पडला. पण मित्रहो बघा आपले दादा फार दुरदृष्टीचे आणि समाजाचे अंतर्मन जाणणारे होते. पुढे आपले वय झाल्यानंतर (दादांना) आपल्याला समाजकारणासाठी सचिवालयापर्यंत लोकलने प्रवास करणे जमणार नाही त्याचप्रमाणे तळागळातील गोरगरिबांना आपल्यापर्यंत पोहचता येणार नाही हा थोर विचार करूणच दादांनी साधारणपणे सन १९६३ मध्ये दुरध्वनीची मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे केली.

समाजकारणासाठीच वापर

दादांच्या घरी दुरध्वनी देणे ही एकदम मुख्यमंत्री महोदयासाठी अगदी शुल्लक बाब पण आपल्या दादांसाठी ती अनमोल बाब आणि तो दुरध्वनी वापरून पी. सावळाराम जनमाणसांची अगदी अत्यावश्यक कामे किंवा गाऱ्हाणी सचिवालयापर्यंत पोहोचवतिल हा अनमोल विचार करूण मुख्यमंत्री महोदयांनी पण त्वरीत दादांची मागणी पूर्ण केली. बाब अगदी साधी पण त्याचा उपयोग दादांनी अनमोल समाजकारणासाठीच केला आणि असा विचार फक्त एक ऋषीतुल्य सच्छिल दादांसारखा माणूसच करू शकतो.

दादांची दिग्गजांशी मैत्री

दादांनी कधी अगदी तीळभर तरी स्वार्थाचा विचार केला असता तर त्यांच्या नावे मुंबईपासून ठाण्यापर्यंत शेकडो एकर जमीन आज दिसली असती. दादांनी आपली तुलना कधीही कोणाशीही केली नाही. दादांची मैत्री भल्या मोठ्या मोठ्या दिग्गज नेत्याशी होती. तसेच त्यांचे सौदार्याचे संबंध साहित्यीकांशी होते. दादांची दोस्ती माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, माजी महसुल मंत्री बाळासाहेब देसाई, साहित्यातील दिग्गज गदीमा, प्रल्हाद केशव अत्रे, संगीतकार वसंत प्रभू, विश्वाची गाणकोकीळा लता मंगेशकर अशा अनेक एकापेक्षा एक, दिग्गज आणि अमृततुल्य व्यक्तीशी होती त्याचप्रमाणे त्यांच्या आजूबाजूला असणारे पण वयाने लहान डॉ. बेडेकर, वसंत डावखरे, सतीश प्रधान यांच्याशी ही दादांचे संबंध मैत्रीपूर्ण होते. पण ना आपल्या दादांनी वरीष्ठ लोकांशी त्याचप्रमाणे ज्यूनिअर लोकांशी कधीही तुलना किंवा स्पर्धा केली नाही. आज बघाल तर आपण रस्त्याने चालताना सुद्धा बरोबरच्या माणसांची तुलना करत असतो. त्याचबरोबर संपत्तीची सुद्धा तुलना करत असतो. पण आपले दादा आणि तुलना किंवा स्पर्धा यांचे कधीही जमले नाही.

शेवटपर्यंत 280 स्केअर फुटाच्या घरात

दादा अगदी शेवटपर्यंत 280 स्केअर फुटाच्या घरातच राहिले. असे हे साधे रहाणे त्याचप्रमाणे अत्यंत साधे वागणे व साधे खाणे कदाचित परमेश्वरालासुध्दा जमले नसते, पण माझ्या दादांनी ते अगदी शेवटपर्यंत लिलया जमविले आणि शेवटच्या श्वासापर्यंत समाजकारण करत राहीले आणि म्हणूनच आपले लाडके दादा जनकवी बरोबरच सामान्य जनांचे देव होते आणि ते अखंड देवच राहतील.

Related posts

पगारावर निष्ठा समर्पित करणारे पगारी अर्थशास्त्री

नैसर्गिक क्रियेतूनच आत्मज्ञानाचा प्रकाश

सीमेवरील जवानाप्रमाणे साधनेतही जागरूकता, दक्षता हवी

8 comments

श्रीमती उज्वला देशपांडे, ठाणे June 1, 2021 at 10:06 PM

मी तु लिहिलेला लेख वाचला .तुझी भाषा साधी सरळ व ओघवती आहे .पी सावळाराम हे ग्रेट कवी होते .त्यांच्याशी तुझा असलेला संपर्क हा विलक्षण योगायोग आहे.त्यामुळेच तुला लिहावेसे वाटले .या लेखातून कृतज्ञता व्यक्त करण्यात यश मिळविलेस . यशस्वी भव शुभेच्छा.शुभाशीर्वाद.

Reply
Anonymous May 30, 2021 at 9:58 PM

दादांबद्दल काय सांगणार खुप ऐकलयं त्यांच्या बदल प्रतिभावान व अगदी साध व्यक्तीमत्व, माझ्या सारखी व्यक्ती त्यांच्याबद्दल काय लिहिणार …..
परमेश्वराने प्रुथ्वीवर पाठवलेली ही देवतुल्य व्यक्तीमत्व……………. खरतर यांच स्थान मंदिरात…
ठाण्याचं भुषण असलेल्या या व्यक्तीचं ठाण्याच्या अनेक सांस्कृतिक वास्तुपैकी एका वास्तुवर नामकरण करण्याची एकाही राजकारण्याला कल्पना सुचली नाही याची खंत वाटते.

Reply
Anonymous May 30, 2021 at 9:57 PM

Atta vachle.आम्हीही लोकेश्वरीला आलो होतो.खरंच या लोकाना देवच मानले पाहिजे.नाहीतर बघा ना आताचे राजकारणी काही न करता करोडो कमावतात.आम्ही भाग्यवान त्यांचे पाय आमच्या घराला लागले.तेव्हा विडीयो कँमेरे नवते.

Reply
Sindhu Patil May 30, 2021 at 1:39 PM

दादा खूप मोठ्या मनाचे प्रतिभासंपन्न कवी होते.त्यांंचे रहाणीमान साधे व विचार उच्च होते.त्यांच्याविषयी तुझ्याकडून नेहमी ऐकायचे पण आज प्रत्यक्ष तुझ्या लेखणीतून ते वाचायला मिळाले.खूप छान वाटले.दादांंसारख्या देवमाणसाचा सहवास तुला प्रत्यक्ष जवळून अनुभवता आला हे केवढं भाग्य!

Reply
Anonymous May 30, 2021 at 1:10 PM

दादा खूप मोठ्या मनाचे प्रतिभासंपन्न कवी होते.त्यांंचे रहाणीमान साधे व विचार उच्च होते.त्यांच्याविषयी तुझ्याकडून नेहमी ऐकायचे पण आज प्रत्यक्ष तुझ्या लेखणीतून ते वाचायला मिळाले.खूप छान वाटले.दादांंसारख्या देवमाणसाचा सहवास तुला प्रत्यक्ष जवळून अनुभवता आला हे केवढं भाग्य.

Reply
B.D. More, Gadhinglaj, Kolhapur May 30, 2021 at 12:35 PM

खुप छान. पी सावळाराम बद्दल छान माहिती. अशी माणसं मिळणं फार कठीण. त्यांचा प्रत्येक श्वास समाजाच्या कल्याणासाठी घेतला. 🙏

Reply
Adv. Sarita Patil May 25, 2021 at 11:20 PM

खरच खूप मोठ्या मनाचे दादा होते . खूप काही मिळत असताना ते मिळवून घेण्याची त्यानी तिळमात्र देखील हाव दाखवली नाही. दादा खूप साधे व मोठ्या मनाचे प्रतिभावंत गीतकार व कवी होते.साधी राहणी उच्च विचार होते त्यांचे. मलापण ठाण्यात राहायला आल्यानंतर त्यांना भेटण्याचा बर्‍याच वेळा योग आला होता. मी लग्नाआधी १९९४ते १९९७ खूप वेळा त्यांच्या घरी जात होते. संजयदादा व वहीनी दोघेही खूप अगत्यशील आहेत. वहीनी मी ठाण्यात नवीन असताना मला काही घ्यायचे झाल्यास माझ्याबरोबर बाजारात येत असत.त्यावेळी दादांचे वय झाले होते. ते त्यांच्या खोलीत असत. त्यांच्यासोबतच्या जुन्या आठवणीना माझे भाऊ महादेव प॔ङीत यानी ऊजाळा दिला आहे. खूप छान लेखन केले आहे. दादांच्यावर कीतीही लिहीले तरी थोङेच आहे. अशा प्रतिभावंत कवींना माझा मानाचा मुजरा.

Reply
Anonymous May 30, 2021 at 1:08 PM

दादा खूप मोठ्या मनाचे प्रतिभासंपन्न कवी होते.त्यांंचे रहाणीमान साधे व विचार उच्च होते.त्यांच्याविषयी तुझ्याकडून नेहमी ऐकायचे पण आज प्रत्यक्ष तुझ्या लेखणीतून ते वाचायला मिळाले.खूप छान वाटले.दादांंसारख्या देवमाणसाचा सहवास तुला प्रत्यक्ष जवळून अनुभवता आला हे केवढं भाग्य.

Reply

Leave a Comment