April 19, 2024
Mind Concentration in Meditation
Home » साधनेत मन रमण्यासाठी…
विश्वाचे आर्त

साधनेत मन रमण्यासाठी…

बाह्य गोष्टीचाही ध्यानावर परिणाम होतो. मन साधनेत रमण्यासाठी या बाह्य गोष्टी गरजेच्या आहेत. पण नसल्यातरी मनाची तयारी करणेही तितकेच गरजेचे आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल 9011087406

आशेचे लाग तोडिले । अधैर्याचे कडे झाडिले ।
निद्रेचें शोधिले । काळवखें ।। ४९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा

ओवीचा अर्थ : आशेचे संबंध तोडून टाकले भित्रेपणाचे कडे ढासळून दिले आणि निद्रारुपी अंधार नाहीसा करून टाकला.

ध्यान व्यवस्थित होण्यासाठी काही पूर्वतयारी करावी लागते. आसन कसे असावे. परिसर कसा असावा. स्वच्छतेचे ठिकाण असणे गरजेचे आहे. परिसर शांत असावा. स्वच्छ हवा खेळती असावी. या सर्व गोष्टी ध्यान करताना विचारात घेतल्या जातात. मात्र या सर्व बाह्य गोष्टी आहेत. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम आपल्या ध्यानावर होतो. हेही तिकचेच खरे आहे. ध्यानामध्ये मन गुंतण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत. पण अत्यावश्यक आहेत असेही नाही. साधनेत अडथळा होऊ नये यासाठी घ्यावयाची ही काळजी आहे. बाह्य गोष्टीचाही ध्यानावर परिणाम होतो. मन साधनेत रमण्यासाठी या बाह्य गोष्टी गरजेच्या आहेत. पण नसल्यातरी मनाची तयारी करणेही तितकेच गरजेचे आहे.

मनाची तयारी महत्त्वाची

बाह्य आणि अंतरंग दोन्हीही गोष्टी उत्कृष्ट साधनेसाठी महत्त्वाच्या आहेत. बाह्य वातावरण ठिक नसले तर अंतरंगात मन रमणार नाही. मारून मुरकुटून साधना करण्यात काहीच अर्थ नाही. अशाने आवश्यक ध्येय आपणास गाठता येणार नाही. यासाठी मनाची तयारी ही आवश्यक आहे. कधी कधी बाह्य गोष्टी उपलब्ध असूनही ध्यान लागत नाही. कारण अंतरंगात काही वेगळेच सुरु असते. बाह्य गोष्टी असोत वा नसोत पण अंतरंगातून आपले मन सोहममध्ये गुंतलेले असावे.

मनाची तृप्ती आवश्यक

जसे बाह्य गोष्टी ध्यानासाठी आवश्यक आहेत तसेच अंतरंगातीलही गोष्टी ध्यानासाठी महत्त्वाच्या आहेत. ध्यानासाठी मनाची तयारी महत्त्वाची आहे. मन साधनेत रमण्यासाठी मनात अन्य कोणते विचार घोळणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. मन एकाग्र करण्यासाठी मन शांत, तृप्त असणे आवश्यक आहे. ध्यान करायला लागला आणि बाहेर जेवणाचा सुटला तर मन साहजिकच जेवणाकडे वळेल. पण पोटभरलेले असेल तर मन जेवणाकडे वळणार नाही. यासाठी तृप्ती ही महत्त्वाची आहे. भरपेट खालेले असेल तर जेवणाचा वास ध्यानामध्ये अडथळा ठरत नाही. यासाठी आशा कशाचीही ठेवायची नाही. मनसोक्त खेळ खेळल्यानंतर आनंदी मनामुळे अभ्यासातही मन रमते. यासाठी मनाची तृप्ती आवश्यक आहे. मारून मुरगुटून कोणतीही गोष्ट होत नाही.

मनातील भीती जाणे आवश्यक

मन साधनेत रमले तरी मनातील भिती बऱ्याचदा जात नाही. ध्यान व्यवस्थित लागल्यानंतर अंग जड होते. जीभ जड होते. शरीराच्या या अवस्थेने मनात भिती उत्पन्न होणे हे स्वाभाविक आहे. पण धैर्याने याकडे पाहीले पाहीजे. मनातील ही भिती नष्ट करून साधनेवर मन केंद्रित कसे राहील हे पाहायला हवे. भितीमुळे साधनेत व्यत्यय होणार नाही यासाठी मनाची तयारी करायला हवी. धैर्याने याला सामोरे जायला हवे.

साधनेत जागृती आवश्यक

साधना करताना बरेचजण झोपी जातात. साधनेत आहेत की झोपेत आहेत हेच समजत नाही. कधी कधी झोपही लागते. आपण साधना करताना साधनेला बसले आहोत याची जागृती, जाणिव ठेवायला हवी. यासाठीच अवधानाचे महत्त्व आहे. निद्रारुपी अंधार हा नष्ट करायला हवा. तरच साधनेत मन रमेल. साधनेत मन रमण्यासाठी या गोष्टी निश्चितच विचारात घ्यायला हव्यात. तरच साधनेतून फलश्रुती होईल.

Related posts

सावधान ! बायजुसकडून होत आहे फसवणूक

आत्महत्येपेक्षा कधीही वीरमरण श्रेष्ठ

निसर्गाच्या चमत्कारातून जाणावे खरे अध्यात्म

Leave a Comment