March 29, 2024
Need To Find God in Human being Mahadev Pandit article
Home » माणसात देव शोधला पाहिजे
मुक्त संवाद

माणसात देव शोधला पाहिजे

कोरोना महामारीतून मुक्त झाल्यानंतर सुध्दा डॉक्टर, पोलीस, नर्स, वॉर्ड बॉय सर्व प्रशासकीय कर्मचारी, अधिकारी, सेवाभावी लोक,सफाई कामगार आणि शेतकरी या सर्वांचे स्थान अढळ राहण्यासाठी सर्वांनी नियतीचा आदर राखला पाहिजेत नाहीतर भविष्यात अशा भयंकर महामारींना तोंड देणे मानवाच्या आवाक्याबाहेरचे जाईल आणि सर्वश्रेष्ठ असा “मानवी जन्म” खरोखरच वाया जाईल.

महादेव पंडित

स्थापत्य अभियंता
९८२००२९६४६

पृथ्वीतलावर मानवाचा जन्म सर्वश्रेष्ठ मानला जातो खरोखरच मानव जात कुटूंबप्रेमी तसेच समाजप्रेमी असल्यामुळे तो समुदायाने वाडीमध्ये, गावागावात, शहरातील चाळीमध्ये तसेच गगनचुंबी इमारतीमध्ये राहातो. अख्ख्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत “श्री गणेशाला” निसर्गाने 14 विद्याबरोबरच 64 कला दिलेल्या आहेत. पण निसर्गाने प्रत्येक मानवाला श्री गणेशाच्या विद्या व कला विभागून देऊन निसर्गात समतोल राखलेला आहे. पृथ्वी तलावर जन्म घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जन्माच्यावेळी वेगवेगळ्या प्रमाणात प्रेम, आनंद, दुःख, राग, मत्सर, विविध कौशल्ये तसेच सेवाभावीवृती रूजविलेल्या आहेत. वेगवेगळ्या कौशल्याच्या मदतीनेच प्रत्येकजण आपल्या संपूर्ण जीवन यात्रेची नौका वल्हवित असतो.

वैद्यांचे ऋण मानायला हवेत

मानवाला आपली जीवनयात्रा चालविण्यासाठी शेती, नोकरी त्याचप्रमाणे अनेक उद्योग करावे लागतात. नोकरीतील माणूस वरिष्ठांच्या सततच्या त्रासामुळे रक्तदाब व मधुमेहासारख्या रोगाचा बळी बनतो. मोटार अति वेगाने चालविल्यामुळे अनेक अपघात घडतात. मुलांना अपेक्षित यश न मिळाल्यामुळे आई वडील व्यथित व चिडचिडे बनतात. निसर्गाच्या अनियमितपणामुळे शेतकरी हतबल होतो आणि सततच्या अपयशामुळे व्यसनाधीन बनतो. अनेक छोटे मोठे उद्योगपती कर्जाच्या डोंगरामुळे हृदयविकारासारख्या रोगाचे बळी बनतात. रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, संधीवात अशा अनेक समस्यावर उपाय शोधण्यासाठी आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टरांच्या दवा पाण्यामुळे आपण सर्वजण पारंपारिक किंवा व्हायरल आजारातून बरे होतो आणि पुन्हा नव्या उमेदीने आपले जीवन जगतो. बरीच माणसे मोठाल्या शस्त्रक्रियेतून चमत्कारिकरित्या पुन्हा पूर्वीचे जीवन जगत आहेत, पण त्यावेळी बरेच लोक डॉक्टरांना आपले “हिरो” मानत नाहीत कारण त्यावेळी डॉक्टरने त्याचा योग्य तो मोबदला घेतलेला असतो. काहीजण तर रुग्णालयातून डिसचार्ज घेतेवेळी बिलांसंबंधी बरीच हुज्जत घालत असतात. मोठाल्या शस्त्र क्रिया झालेले रुग्ण बऱ्याच कालावधीसाठी रुग्णालयात ॲडमिट झालेले असतात त्यावेळी तासा-तासाला वॉर्ड बॉय, नर्सेस त्यांची योग्य ती विचारपूस करून त्या रुग्णाची अहोरात्र सेवा करत असतात, पण त्यावेळी त्या सेवेची सर्वांनाच किंमत नसते कारण ते त्यांचे कामच आहे आणि ते काय फुकट करतात का ? हे शेरे मारले जातात.

संरक्षणकरणाऱ्यांना धन्यवाद द्यायलाच हवेत

काही माणसे जन्मजात रागीष्ट असतात, तर काही भांडखोर असतात. लग्नानंतर पती पत्नीचे स्वभाव जुळत नाहीत आणि त्यांचे रूपांतर नंतर घटास्फोटात होते. भाऊ बंदकीमध्ये मालमत्तेसाठी तसेच शेतीवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात हाणामाऱ्या करून कधी कधी आपल्याच माणसांचा जीव घेतात. काही गावात तसेच शहरात चोऱ्यामाऱ्या होतात. प्रतिष्ठेच्या प्रश्नावरून चाळीमध्ये सुध्दा जोरदार मारपीट होते. चोऱ्यामाऱ्या, भांडणतंटे अतिक्रमण अशा प्रकारच्या त्रासातून शांतता मिळविण्यासाठी आपण पोलिसांची मदत घेतो. पोलीस बांधवांनी योग्य न्याय दिल्यानंतर पोलिस बांधवांना आपण कधीच धन्यवाद देत नाही. चोरीचा माल पकडून दिल्यानंतर सुध्दा त्यांना आपण साधी गिफ्ट सुध्दा देत नाही, उलट बऱ्याच वेळा आपण सर्वजण त्यांना शिव्या – शाप देतो. ‘पोलिसांचे ते कामच आहे’ हा शेरा मारून आपण पुढे जातो. मोठमोठ्या गुन्हेगारीमध्ये आपण नेहमीच पोलीसांची मदत घेतो. त्याचप्रमाणे शहरातील मोर्चे, सणासुदीच्या मिरवणुक, अतिक्रमण हटावाच्या मोहिमा, महत्वाच्या सरकारी केसेसच्या निकालाच्या वेळी, इमारत पडली, आग लागली, महापूर आला अशा अनेक मानवनिर्मित तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आपण पोलिसांची, जवानांची तसेच अग्निशामक दलाची नेहमीच मदत घेतो. या सर्वांच्या मदतीमुळे संकटातील माणसे जेव्हा सही सलामत बाहेर पडतात त्यावेळी आपण पोलीसांना व जवानांना कधीच धन्यवाद देत नाही कारण ते त्यांचे कामच आहे आणि त्यासाठी सरकार त्यांना पगार व भत्ते देते, आणि नागरिकासाठी एवढे काम त्यांनी करायलाच पाहिजे असा सरसकट शेरा मारतो आणि पुढील कामाकडे लगेच वळतो.

सरकारी यंत्रणेतील माणसे शाबासकी विना उपेक्षित

प्रत्येक जन्माला येणाऱ्या माणसाला आपले सरकार व प्रशासन आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी, वीज, शहरी वाहतुक इत्यादी सेवा त्याच्या योग्य मोबदल्यात अहोरात्र पुरवत असते, आणि ह्या सर्व सेवा पुरवण्याचे प्रशासनाचेच काम आहे असे सर्वसामान्यांचे मत आहे. प्रत्येकाला जन्मतारखेचा दाखला, मृत्यू दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, सातबारा उतारा, विवाह नोंदणी दाखला, घराचे मालमत्ता कार्ड इत्यादी अनेक प्रकारचे दाखले व उतारे प्रशासनाकडून घ्यावे लागतात. दाखल्यांसाठी लागणारे सर्व सरकारी शुल्क भरल्यानंतर व इतर सर्व विहित नमुन्यातील कागदपत्रे पुर्ण केल्यानंतर आपणास योग्य तो मागणीचा दाखला प्राप्त होतो. काही वेळा सरकारी शुल्कासोबत काही इतर सोपस्कार सुध्दा पूर्ण करावे लागतात म्हणून कोणताही नागरिक आपले काम शासन दरबारी पुर्ण झाल्यानंतर आपण त्यांचे कधीही आभार मानत नाही आणि अश्याप्रकारे ही सर्व सरकारी यंत्रणेतील माणसे शाबासकी विना नेहमीच उपेक्षित रहातात.

निसर्ग आपत्तीतही मदत

निसर्ग नेहमीच समतोल रहाण्याच्या प्रयत्नात असतो. निसर्गात प्रत्येक गोष्टीस किंवा घटकास समान महत्त्व प्राप्त झालेले आहे. ऑगस्ट 2019 ला पश्चिम महाराष्ट्रात महापूराने थैमान घातले होते. महापूर ही नैसर्गीक आपत्ती आहे. महापूराच्या थैमाणाच्या वेळी आर्मी, नेव्ही व वायुदलाच्या जवानांनी, डॉक्टर्स, प्रशासन व काही सेवाभावी संस्थांनी पुराचा फटका बसलेल्या लोकांना मदतीचा हात देऊन त्यांचे जीवन सुरळीत केले. ‘महापूर’ ह्या नैसर्गिक आपत्तीला सहा महिने पुर्ण होण्याच्या आतच मार्च 2020 मध्ये कोरोना ही महामारी गर्भश्रीमंतांच्या परदेशवारीमुळे व आपल्या बांधवांच्या बेशिस्त व बेदरकार वागणुकीमुळे आपल्या देशात अवतरली आणि अगदी आजपर्यंत थैमान घालत आहे. कोरोना हा मानवी संसर्गजन्य रोग असल्यामुळे खबरदारी म्हणून भारत सरकारने 22 मार्च 2020 पासून पुर्ण देशाला टाळेबंदी लावुन संसर्ग रोखण्यास सुरवात केली होती आणि त्यामुळे आपण पहिली लाट यशस्वीपणे रोखली होती पण आता एप्रिल २१ मध्ये नागरिकांच्या व राजकारण्याच्या बेशिस्त व फाजील आत्मविश्वासांमुळे पुन्हा दुसरी कोरोना लाट आलेली आहे. इलेक्ट्रॉनिक्सच्या तसेच दुरदर्शनच्या माध्यमातून कोरोना महामारीच्या भयानक स्थितीची माहिती असूनसुद्धा आपले लोक अगदी नगन्य वस्तूसांठी सुध्दा घराबाहेर पडतात. आम्हाला काहीच होणार नाही, घरात बसवत नाही, कंटाळा येतो, भाजीपाला पाहिजे, वजन वाढते तसेच घरी बसून चीडचीड होते अशी नानाविध कारणे काढून लोक घराबाहेर पडत आहेत आणि कोरोना महामारी वाढविण्यास हातभार लावत आहेत. पण आपल्या पोलीस बांधवांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याचप्रमाणे त्यांच्या कुटूंबातील लहानग्यांचा मायेचा झरा तोडून ते बांधव घराबाहेर पडणाऱ्या लोकांना अहोरात्र विनंती करत आहेत की “मित्रहो घराबाहेर पडू नका” तसेच “घरीच थांबा” पण आपले महाभाग लोक त्यांची विनंती डावलून रस्त्यावर निवांत भटकत आहेत, किरकोळ वस्तूंसाठी मैलोन मैल गाडी चालवीत आहेत.

कोरोनाकाळातही योद्धे

खरोखरच कोरोना महामारीत गेले वर्षभर आपले पोलीस बांधव सर्व रस्ते, खेळांची मैदाने, बाग बगीचे तसेच सार्वजनिक ठिकाणे निरमनुष्य करत आहेत. आपल्या नागरिकांच्या जिवाची तसेच त्यांच्यावर आधारित असलेल्या कुटूंबाच्या काळजीपोटी नाईलाजाने लाठीमाराचा वापर करत आहेत. दररोज सकाळच्या प्रहरी पोलीस व्हॅनमधून “घराबाहेर येऊ नका आणि प्रशासनाला मदत करा” असे रोज स्पिकरच्या माध्यमातून सर्व जनतेला कळकळीचे आवाहन करत आहे. रोज ड्युटीवर हजर रहावे असा आदेश प्रशासनाने पोलीस खात्याला दिलेला आहे. सर्वत्र टाळेबंदी असल्यामुळे पोलीस बांधवांना साधा चहा सुध्दा मिळत नाही, जेवणाचा तर कधी कधी पत्ताच नसतो आणि मग अशा युध्दजणिक परिस्थितीमध्ये आपल्या देशातील प्रत्येक नागरिक सुरक्षित रहावा ह्यासाठी पोलीस बांधव डोळयात तेल घालून अहोरात्र प्रयत्न करत आहेत मग सांगा बरे आजचे “हिरो” कोण आहेत ? कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात आपल्या पोलीस बांधवांचा मोलाचा वाटा आहे आणि म्हणूनच ते अभिनंदनास पात्र आहेत आणि ते पोलीस बांधव “हिरो नंबर वन” आहेत.

सरकारी कर्मचारी आजचे “जिवलग मित्रच”

आपले परदेशी वाऱ्या करणारे नागरिक व कोरोनातुन नुकतेच मुक्त झालेले म्हणजे आजचे कोरोनावाहक “होम क्वॅारंटाईन” असा 14 दिवसांचा अज्ञात वासाचा आदेश झुगारूण आपली कामुक वृत्ती जगाला दाखविण्यासाठी घराबाहेर पडले आणि अनेक गोरगरिबांचा जीव टांगणीला लावून प्रशासनाला कामाला लाऊन मोकळे झाले. कोरोनावाहकाच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाला डोळ्यात तेल घालून सर्वत्र धावावे लागत आहे. काही कोरोना वाहकांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. कोरोना हा रोग खुप महाभयंकर आहे. कोरोना झालेल्या रुग्णाला नातेवाईक व मित्रमंडळी भेटायला तसेच उपचार चालु असताना दुर्देवाने मृत्यू झालातर घाबरुन अंत्यविधीला व सांत्वनाला सुध्दा जाऊ शकत नाहीत म्हणजे बघा किती महाभयंकर आहे हा कोरोना ! पण आपल्या कोणत्याही नागरिकाचा कोरोनामुळे जीव जाऊ नये यासाठी आपले आरोग्य अधिकारी, डॉक्टर्स, वॉर्ड बॉय तसेच नर्सेस आणि इतर साफसफाई कामगार अहोरात्र प्रयत्न करत आहेत. आपले डॉक्टर, नर्सेस तसेच वॉर्ड बॉय व आरोग्य कर्मचारी त्यांच्या स्वतःच्या घरी सुध्दा जात नाहीत. कोरोना बाधीतांची तसेच त्यांच्या कुटूंबाची अगदी योग्य व प्रामाणिकपणे सेवा करणारे आपले डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय तसेच आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी आजचे “जिवलग मित्रच” आहेत आणि भविष्यात त्यांच्या नंबर वन ह्या सिहांसनाला कोणीही हात लाऊ शकत नाही.

प्रशासन खरोखरच आपले “मायबापच”

आपले सरकार तर कोरोना हद्दपार करण्यासाठी पुर्ण कंबर कसून अहोरात्र झटत आहे. आपले आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री महोदय, महानगरपालिका कर्मचारी, पुर्ण आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग इत्यादी प्रशासकीय विभाग आज परदेशी वाऱ्या करणाऱ्या नागरिकांच्या संपर्कात कोण कोण आले आहेत त्यांच्या शोध मोहिमा घेत आहेत त्याचप्रमाणे कोरोना बधितांच्या इमारती तसेच तो पूर्ण वार्ड किंवा इलाखा सील करूण त्यांच्या सर्वांच्या चाचण्या करून त्यामधील कोरोना बाधीतांच्या आयसोलेशन रूममध्ये दाखल करत आहेत त्याचप्रमाणे त्यांच्यावर बरे होण्यासाठी डॉक्टरांचे पॅनल नेमत आहेत. सर्व कोरोना बाधीतांना अगदी त्यांच्या घरच्या लोकांसारखे सहाय्य करुन आधार देत आहेत. आपले प्रशासन आपल्या सर्व नागरिकांना अत्यावश्यक सेवा अगदी सुरळीत व नियमितपणे पुरवत आहेत. बऱ्याच ठिकाणी मदत केंद्रे उभारली जात आहेत. प्रत्येक जिल्हाधिकारी प्रत्येक गावागावांत दक्षता पथक तैनात करून गावात येणाऱ्या पाहुण्यांची तसेच गावी आलेल्या मुंबई – पुणे स्थित रहिवाश्यांची योग्य ती चाचणी करून त्यांना होम क्वॅारनटाईनचा शिक्का मारून 14 ते 21 दिवसांचा अज्ञात वासात रहाण्याची शिफारस करत आहेत. मग सांगा बरे आपले सर्व प्रशासन आपल्या सर्वांच्या जिविताची किती प्रकारे काळजी करत आहेत आणि आज कोरोना महामारीत तर आपले प्रशासन खरोखरच आपले “मायबापच” आहेत.

उद्योगपतीही मदतीला

कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी आपल्या देशातील सेवाभावी लोक त्यांच्या कुवतीप्रमाणे मुख्यमंत्री व प्रधानमंत्री सहायता निधीसाठी सढळ हस्ते मदत करत आहेत. उद्योगपती रतन टाटांनी तर प्रत्येक भारतीय कोरोनापासून सुरक्षित रहावा यासाठी भरपुर निधी तसेच रुग्नांना ॲाक्सीजन, डॅाक्टरांना व प्रशासनाला रहाण्याची व जेवनाची व्यवस्था पुरविन्याची घोषणा केलेली आहे. “सर सलामत तो पगडी पचास” ह्या पारंपारिक म्हणीचा रतन टाटांनी अगदी खोलवर विचार करून आपल्या देशातील प्रत्येक नागरिकांच्या प्रेमापोटी टाटा साम्राज्य सतत सर्वोत्परी मदतीची घोषणा करीत आहे. टाटांप्रमाणे अनेक उद्योगपती मदतीला धावले आहेत. तेही देवच आहेत.

शेतकरी हा जगाचा “पोशिंदा”

आज देशातल्या अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व उद्योगांना टाळे लागलेले असताना सुद्धा फक्त आपला सर्वांचा लाडका बळीराज्यांचा शेती उद्योग मात्र अहोरात्र चालू आहे. वाहतुक बंद, मॉल बंद, दुकाने बंद, खाजगी कार्यालये बंद पण माझा शेतकरी राजा सर्व पिके, भाजीपाला पिकवतोच आहे. शेतात उन्हातान्हात व पावसाळ्यात काबाड कष्ट करत आहे. शेतकरी राजाला कोणतीच टाळेबंदी नसते. शेतीला टाळेबंदी लागली तर सर्व जगच बंद पडेल, कारण संगणक किंवा कोणतीच कारखानदारी नैसर्गिक भाजीपाला फळ फळावळे तसेच कडधान्ये देऊ शकत नाही. वर्षाचे 12 ही महिने शेतकरी धान्य पिकवतो आणि शेतात येणारे अतिरिक्त धान्य, भाजीपाला बाजारात विकून आपल्या कुटूंबाचा चरितार्थ चालवितो शहरी जनता शेतीवरच अवलंबून चालते. शेतकऱ्याकडून धान्य किंवा भाजीपाला विकत घेताना प्रत्येक ग्राहक आपले शत प्रतिशत मार्केटींग स्कील वापरून त्यांच्या मालाचा सुमार दर्जा ठरवून अगदी मोजकाच भाव देतात, एकही रुपया जादा देत नाहीत आणि अगदी पैशविणा उपलब्ध असणारा “आशिर्वाद” सुध्दा देत नाहीत. बघा किती काटकसरी आहे आपला शहरी माणूस ! पण आज कोरोना महामारीमध्ये भाजीपाल्याचे महत्त्व शहरवासियांना समजले आहे. आज शेतकरी बांधव आहेत म्हणूनच शहरी लोक आनंदाने जीवन जगत आहेत नाहीतर कोरोनापेक्षाही उपासमारीची बिकट परिस्थिती शहरात उद्भवली असती. आज स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक परवाने घेऊन काही शेतकरी आपला सर्व भाजीपाला टेंपोतून वहातुक करून शहरवसियांना वाजवी भावानेच विकत आहेत आणि म्हणूनच शेतकरी हा जगाचा “पोशिंदा” आहे त्यांच्याशिवाय आज आपण जगाचा विचारच करू शकत नाही. पृथ्वीतलावर जोपर्यंत मानव जात आहे तोपर्यंत त्याचे स्थान कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.

“साष्टांग दंडवतच”

पूर्ण निसर्ग एका शक्तीवर चालतो आणि ती शक्ती म्हणजे “परमेश्वर” पण “प्रयत्नाअंती परमेश्वर” हया पारंपारिक म्हणीप्रमाणे आजच्या कोरोनासारख्या महाभयंकर महामारीतून सही सलामत बाहेर येण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे शेतकरी, सेवाभावी व्यक्ती, प्रशासन, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस बांधव, सफाई कामगार तसेच जवान ह्या सर्वांना “साष्टांग दंडवतच” घातला पाहिजेत कारण ते सर्व “प्रति परमेश्वरच” आहेत. आराध्य दैवतांना तसेच आई वडीलांना व गुरुजनांना ज्या आपुलकीने ‘साष्टांग दंडवतच’ घालतो अगदी त्यांचाच बरोबरीने वरील सर्व विभागात काम करणाऱ्या जनतेच्या सेवकांना सुध्दा आपण नेहमीच प्रेमाची व उच्च कोटीची वागणूक दिली पाहिजेत. कोरोना महामारीतून मुक्त झाल्यानंतर सुध्दा डॉक्टर, पोलीस, नर्स, वॉर्ड बॉय सर्व प्रशासकीय कर्मचारी, अधिकारी, सेवाभावी लोक,सफाई कामगार आणि शेतकरी या सर्वांचे स्थान अढळ राहण्यासाठी सर्वांनी नियतीचा आदर राखला पाहिजेत नाहीतर भविष्यात अशा भयंकर महामारींना तोंड देणे मानवाच्या आवाक्याबाहेरचे जाईल आणि सर्वश्रेष्ठ असा “मानवी जन्म” खरोखरच वाया जाईल.

Related posts

भूमार्ग, जलमार्ग हेच उन्नतमार्ग…

आंब्यासोबत राजेशाही बालपण

महामार्गावर शुन्य अपघाताचे ध्येय कधी साध्य होणार ?

8 comments

आशा पाटील , मुंबई June 16, 2021 at 10:13 AM

खूप छान,मी स्वतः हा अनुभव घेतला आहे.जेव्हा मी positive झाली ,ऑक्सिजन लागला तेव्हा डॉक्टर नी प्रयत्न केले पण देवाने साथ दिली,आणि देव रुपी डॉक्टर नी वाचवले.खरच ही महामारी आली आहे ही एवढ्यासाठीच की, माणसाने माणसाची माणुसकीने रहावे म्हणून. आस मला वाटतं.खूप छान लेख आहे.माणसाला माणसात ला देव ओळखण्याची आजच्या काळात खूप गरज आहे.

Reply
B. D.More, Gadhinglaj , Kolhapur May 21, 2021 at 9:53 AM

खुपचं छान वस्तुस्थिती चे वर्णन केले आहे. मानवी जीवन व निसर्ग एकमेकांना कसे पूरक आहेत हे वाचून समजते. तसेच प्रत्येक मानसाला स्वताच्या जबाबदारी ची जाणीव होते. छान!👍

Reply
Sindhu Patil May 18, 2021 at 2:25 PM

डॉक्टर,नर्स,पोलिस,शिपाई,सफाई कामगार,सर्व प्रशासकीय कर्मचारी,अधिकारी,शेतकरी या सर्वांनी कोरोना महामारीत आपला जीव धोक्यात घालून वरील सर्वांनी आपापल्या जबाबदार्या अजूनही पार पाडताहेत.यांच्यातच देव आहे. हेच सर्वजण वेळोवेळी धावून आले आहेत.देवासाठी मंदिरात जाण्याऐवजी सर्वांनी जर माणसांतच देवाचे रुप बघितलं तर किती समाजातील सर्व घटकांची प्रगती किती वेगानं होईल.हे सगळ्यांनी समजून घ्यायला हवे.खूप छान लेख आहे.हे वाचल्यावरच लक्षात येते.🙏🙏🙏👌👌

Reply
Prof. Prakash D. Toraskar May 17, 2021 at 8:59 AM

‘ माणसात देव शोधला पाहिजे’ : साधं सत्य सुंदरपणे मांडणारा लेख या शब्दात या लेखाचे वर्णन करावसं वाटतं .
हे सत्य आहे की ‘ तुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी ‘ या जगत मान्य सत्याची जाणीव पुन्हा एकदा समाज मनाला करून देणे किती निकडीचा आहे याची जाणीव करून देणारा लेख असेच मी म्हणेन. देव कुठे पहावा कुठे शोधावा की शोधावा लागतच नाही इतका तो जवळ आहे फक्त देवाच्या निरागस मनाने बघण्याची वृत्ती जोपासणे आज मानवाला गरजेचे आहे आणि हेच या लेखातून मांडले आहे .माणसाने माणसातला देव शोधणे’ सांभाळने गरजेचा आहे हा विचार सद्यस्थितीमध्ये सोप्या पद्धतीने मांडून समाजाला एक वेगळ्या विचाराची दिशा दिलात , अभिनंदन आणि आभार.

Reply
P.B.JOSHILKAR- QA/QC Manager ( HEISCO - Kuwait) May 16, 2021 at 6:52 PM

Dear Mahadev,

Wonderful – Great Article !!

As usual , Article presents current situation in this Pandemic . We should not forget all the Medical staffs – Doctors, Nurses , Healthcare and front line workers.

Government Department employees – Police , Hospitals staffs ,Medicines manufacturers& suppliers are doing their responsibility very honestly without any complaints.

Really at the same time you point out that irresponsible peoples in society and the some politicians.

Last but least we don’t forget our ‘POSHINDA / BALIRAJA’

Best wishes for the Next Articles

Reply
Surekha khot.. Mumbai May 16, 2021 at 4:58 PM

Nice article. 👌👌👌👌👌The current situation is well presented in this article. It is true that all the medical staff are doing a really good job in this pandemic, they are our angels. … Also, employees of other government departments. We should be forever grateful to them, not just now.🙏🙏🙏

Reply
संजय बारकुंड May 16, 2021 at 4:35 PM

महादेव 🙏

खूप चांगले लिहिले आहेस. तू पोलीस, वैद्यकीय अधिकारी ,प्रशासन उद्योग मित्र व शेतकरी त्यांची भूमिका व बाजू चांगल्या पद्धतीने मांडली आहेस.👏👏

त्याचबरोबर राजकारणी व असमंजस नागरिक यांची चांगलीच कानउघडणी केली आहेस .

तुझी लेखणी अशीच तळपत राहो.👍

तुझ्या माध्यमातून आमचे विचार सर्व समाजाला प्रसारित होवो हीच माझी इच्छा👍

तुला खूप खूप शुभेच्छा 💐💐

धन्यवाद👍

Reply
Col Ravi Ghodake May 16, 2021 at 9:38 AM

सद्य परिस्थिति ची जाणीव करून देणारा आलेख…

Reply

Leave a Comment