March 29, 2024
Shivrajoyday Before Torana New Research by Ramesh Chandankar
Home » शिवराज्योदय तोरणापूर्वीच…!
संशोधन आणि तंत्रज्ञान

शिवराज्योदय तोरणापूर्वीच…!

शिवाजी महाराज यांनी तोरणा गड प्रथम घेतला आणि स्वराज्याचे तोरण बांधले असे सांगितले जाते. पण त्यांच्या आधी शिवाजी महाराज यांनी शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांच्या मार्गदर्शनात काही किल्ले घेतले होते. म्हणजेच शिवराज्योदय आधी झाला होता हे सिद्ध होते. ते किल्ले कोणते ? त्या संदर्भातील पुरावे कोणते ? हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. या संदर्भात झालेले संशोधन आपल्यासाठी….

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

शिवाजी महाराज यांनी तोरणागडावर स्वराज्याचे तोरण बांधून राज्यकारभाराची सुरुवात आधी केली असा इतिहास सांगण्यात येतो. पण यापूर्वी शिवाजी महाराज यांनी शहाजी राजे आणि राजमाता जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली काही किल्ले घेतले होते. यामध्ये सातारा जिल्ह्यातील चंदन, वंदन हे किल्ले घेतल्याच्या नोंदीही समोर येत आहेत. यावरून शिवराज्योदय हा आधी झाला असल्याचे स्पष्ट होते. या संदर्भात इंदापूर येथे 2014 मध्ये झालेल्या अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेमध्ये तसेच जुलै 2015 ते एप्रिल 2016 या भारत इतिहास संशोधन मंडळाच्या त्रैमासिकात रमेश चंद्रकांत चंदनकर यांचा चंदनगड आणि शिवराज्योदय हा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.

1636 च्या तहानंतर मोगल आणि आदिलशाहा यांनी बंगळूरुच्या भागात शहाजीराजे यांना राहण्यास भाग पाडले. तशा परिस्थितीतही शहाजी महाराज यांनी कंपीली, कणकगीरी आणि बंगळूरू येथे आदिलशाहीस मदत करता करता स्थानिक पाळेगार यांचे संबंध मित्रत्वाचे राहीले यामुळे त्यांची ताकद वाढत गेली आणि शहाजी राज्यांच्या हालचालीवर त्यांचा अविश्वास निर्माण झाला. म्हणून आदिलशाहाने त्यांची पुण्यातील जहागिर त्र्यबंक भोसले यांना दिली. वाईचा भाग हा घोरपड्यांना बदलून दिला. त्यामुळे शहाजीराज्यांचा पुण्यातला सर्व कारभार संपूष्टात आणण्याचा हा घाट होता.

शहाजीराज्यांनी 1638 मध्ये बंगळूरु हा प्रांत ताब्यात घेतला. त्यानंतर शहाजीराजे 1639 मध्ये विजापुरास आले. कंपोली येथे त्यांचे निवास होते. त्यानंतर झालेल्या बसवपट्टणची लढाई शहाजीराजे यांनी रणदुल्लहखान सोबत जिंकली. 1640 मध्ये रणदुल्लहखानाने शहाजीराज्यांवर खूष होऊन बंगळूरु शहर बक्षीस दिले. याच दरम्यान शिवाजी महाराज यांचा विवाह फलटणच्या सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला. बंगळूरू ही आता शहाजीराजे यांची राजधानी झाली होती.

पण मुधोळकर घोरपडे यांच्याशी असलेल्या वाटणीच्या वादातून जावळी, सुपे, फलटण भागातील पकड शहाजीराजे यांनी ढिली होत गेली. बाजीराव घोरपडे आदिलशाहीत आल्याने त्यात अधिकच अडचणी वाटू लागल्या. जावळी, सुपे, फलटण आदी महाराष्ट्रातील प्रांत आपल्या ताब्यातून निसटेल असे राजमाता जिजाऊ यांना वाटू लागले. यासाठीच त्यांनी शिवाजीराजे यांच्या नावाने या प्रांतात राज्यकारभार सुरु करण्याचा सल्ला शहाजीराजे यांना दिला. त्यानुसार शहाजीराजे यांनी शिवाजीराजे यांच्या नावाची मुद्रा तयार करून सातारा- पुनवडी भागात राज्य स्थापनेसाठी पाठवले.

शिवमुद्रा
|| प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ||
अर्थ : प्रतिपदेचा चंद्र जसा वाढत जातो, आणि सारे विश्व त्याला जसे वंदन करते, तशीच शहाजीपुत्र शिवाजीची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल…!!!

शिवराज्योदय हा मुख्यतः यामुळे 1642 मध्येच झाला असे म्हणावे लागेल. शिवाजी महाराज यांच्या नावे बारा मावळ खेरीज वाई, जावळी, फलटण आणि सुपे भागात पकड मजबूत केली. रोहिड्या खोऱ्यात मावळांची जमवाजमव करण्यात आली. सर्व प्रथम चंदनगड ताब्यात घेण्यात आला. ही लढाई आदिलशाहितील तत्कालीन मध्यस्त हुसैन सय्यद ( सय्यद बंडाचा मुलगा), तत्कालिन किल्लेदार सय्यद अब्दुल बिन मुहम्मद यांच्याशी झाली.

या घटनेचे पडसाद शहाजीराजे यांच्या विरोधात उटले. रणदुल्लाखानने इथे बध्याची भुमिका घेतली. त्याने शहाजी राजे यांची रदबदली केली. इतके होऊन विरोधक गप्प बसले नाहीत त्यांनी शहाजींचा मुतालिक ( तज्ज्ञांच्या मते दादाजी कोंडदेव) याचा हात कापण्यात आला.

शिवराज्योदय चंदनगड लढाईतून झाला. या संदर्भातील उल्लेख असणारे ऐतिहासिक ग्रंथ असे…

  1. श्री भिमराव कुलकर्णी संपादित श्री मल्हार रामराव चिटणीस विरचीत शिवछत्रपतींचे सप्त प्रकरणात्मक चरित्र पान क्र. 210
  2. श्री केळुसकर कृत छत्रपती शिवाजी पान क्र. 95
  3. श्री खाकी खान भाग 2 पान क्र. 115
  4. श्री सरकार कृत शिवाजी अॅन्ड हीज टाईम्स पान क्र. 33
  5. मुंतखाब-अल-लुबाब-श्री मुहम्मद हाशीम खान (खफिखान)(इंग्लिश ट्रांसलेशन) पान क्र. 60
  6. आलमगीरनामा पा. क्र. 576
  7. इस्लामिक कल्चर व्हाल्यूम 12 पान क्र. 43 इंटरनेट व्हर्जन
  8. एलियट अॅन्ड डाॅवसन हिस्ट्री आॅफ इंडिया अॅज टोल्ड बाय इटस् ओन हिस्टाॅरियन पान क्र. 17

शिवराज्योदय चंदनगड जिंकून झाल्याचा संदर्भ…

श्री भिमराव कुलकर्णी यांनी दिलेले या संदर्भातील संदर्भ असा –
दुरजा देवीचा डोंगर रोहीडखोऱ्यांच्या तोंडावर असलेला डोंगर. राजधानीस योग्य करून राजगड किल्लावर 1645 मध्ये राजधानी स्थापिली. इ. स. 1669 पर्यंत राजधानी याच ठिकाणी होती. शिवाजी महाराज यांनी राजगड घेतल्यानंतर 1646 मध्ये तोरणा घेतला. प्रतिपचंद्ररेखेव ही मुद्रा 1645 मध्ये केल्याचे आढळते. तोरणा किल्ला घेतल्याचे सभासद सांगत नाहीत. फारशी बखरी वरून शिवाजी महाराजांनी चंदन किल्ला अगोदर हस्तगत केला ( सरकार कृत शिवाजी पृ. 104) हे विधान हे खाफिखानाच्या बखरीवरून आल्याचे दिसते.

तोरणागड ताब्यात घेण्यापूर्वीच्या काही घटना (संदर्भ – करवीर रियासत ग. गो. देसाई)
1644 शिवाजी राज्यांनी पुणे परगणा बाजी घोरपडे यांच्या सहकार्याने जिंकला
1645 दसऱ्याच्या मुहूर्तावर आॅक्टोंबरमध्ये सोन्याचा नांगर पुण्यात फिरवला

शिवप्रताप बखरीत दुजारा –

श. ना. जोशी (वाई) यांनी शिवचरित्र प्रदीप या ग्रंथात बखरीतील कालदर्शीत प्रसंग 8 या लेखात पान क्र. 208 वर विजापुरकरांशी शिवाजी राज्यांची पहिली लढाई ही वाई प्रांतातीलच असे सांगितले आहे.

Related posts

झेंडूच्या फुलांचे औषधी गुणधर्म जाणून घ्या…

डॉ. आरिफ शेख यांचे जपानच्या परिषदेत कॅन्सर उपचारावर व्याख्यान

हृषीकेश: द सेलिब्रिटी

Leave a Comment