April 20, 2024
Home » मनमोकळे…
मुक्त संवाद

मनमोकळे…

आणि हो सकारात्मक विचारासाठी आपली आध्यात्मिक बैठक मात्र पक्की हवी. म्हणजे मग त्या जगंनियत्यावर सोपवून दिले की थोडा मनावरचा भार कमी होतो.

सौ सुनेत्रा विजय जोशी रत्नागिरी

हल्ली रोज कुणाच्या ना कुणाच्या आत्महत्येची बातमी जवळपास रोज असते. त्याला वयाचेही बंधन नाही. अगदी शाळकरी मुलापासून ते वृध्द व्यक्ती पर्यंत. गरीबापासून कोट्याधीशापर्यंत आणि परीक्षेत नापास होऊ या भितीपासून लोक काय म्हणतील इतपर्यंत असंख्य कारणे. 

खरे तर मनुष्य जन्म हा एकदाच मिळतो. आणि मरण तर प्रत्येकाला येणार असतेच. मग इतकी घाई का? जशी प्रत्येक गोष्टीत घाई आहे तशीच. एखादे संकट आले तर जास्तीत जास्त काय होईल? आपण मरू. मग त्यासाठी आधीच कशाला मरायचे? 
आपण अगदी बालवाडीपासून बघा मित्रमैत्रिणींना आपले प्रतिस्पर्धी धरूनच चालतो. म्हणजे मुल लहान असते तेव्हा त्याला सगळे मित्र वाटतात पण मग पालकच त्याला बघ तो कसा तुझ्या पुढे गेला. तू त्याला मागे टाक असे सांगतात आणि मग मनात तिथेच नको ती भावना रुजत जाते. कधी कळतेपणी तर कधी नकळत त्याला खतपाणी मिळत जाते. 

आणि मग आपल्याला येते ते कुणाला सांगायचे नाही. असे सुरू होते. मग हळूहळू कुणाचाच भरवसा वाटेनासा होतो. माझे चांगले चालले आहे ते त्याला कळले तर तो त्यात विघ्न आणेल असे वाटते. असतात काही विघ्नसंतोषी पण सगळे नसतात ना. पण आजकाल स्पर्धेच्या या युगात खरा मित्र मिळणेच अवघड वाटते. पण तसे नाही. आरशात जसे आपलेच प्रतिबिंब दिसते तसेच आपण जसा विचार करतो तसेच सगळे करत असतील असे आपल्याला वाटत असते. खरे तर तुम्ही नापास झाले तर आईवडील तुम्हाला फार तर रागावतील क्वचित मारतील अगदी एकवेळ उपाशी ठेवतील यापेक्षा जास्त काय? पण तेवढ्या कारणावरून जीव देणे हा पर्याय नाही.

सौ सुनेत्रा विजय जोशी रत्नागिरी 

पैशाची चणचण आहे मग जास्त काम करावे घरातल्या लोकांना जर तुमची अडचण सांगितली तर ते पण काही कमावण्यात हातभार लावू शकतात. पण नाही आपण आपल्या अपेक्षा इतक्या वाढवत राहतो की समाधान नाहीच. मला आठवते एकदा माझ्या घरी एक ओळखीचे नवदाम्पत्य आले. मी चहा करण्यासाठी आत आले ती पण आत आली. माझे अद्यावयत सजलेले घर बघून म्हणाली काकू आमचे असे घर कधी होणार कुणा. ठाऊक? मला हसूच आलं. अग हे सुरवातीला असे नव्हते. आम्ही दोघांनी कमवून बचत करुन आता कुठे लग्न झाल्यावर पंचवीस वर्षे झाली तेव्हा हे जमले. तुमचे पण होईल की. तर असे हे सगळ्यांना इन्स्टंट हवे असते. आणि उगाचच स्वतःला काल्पनिक दुःखात बुडवून घेतात काही जण. 

आणि हो सकारात्मक विचारासाठी आपली आध्यात्मिक बैठक मात्र पक्की हवी. म्हणजे मग त्या जगंनियत्यावर सोपवून दिले की थोडा मनावरचा भार कमी होतो. प्रत्येक जण म्हणतो की एक तरी मित्र अ आ हवा की ज्याच्या जवळ आपण आपले मन मोकळे करु शकू. इतक्या मोठय़ा जगात खरच का असा एक मिळणे अवघड आहे? आपल्याला जर वाटते असा मित्र हवा तर आधी आपण कुणाचे तरी असा मित्र व्हा. मग तोच तुमचा पण जिवाभावाचा होईलच ना. आपण कुणाचे एखादे नाजूक दुखणे कळले तर ती गोष्ट गुप्त ठेवण्याऐवजी अजून तिखटमीठ लावून ज्याला त्याला सांगत सुटतो. पण आपल्या वर तशी वेळ आली की मग मात्र आपल्याला वाटते की कुणी असे करू नये. इथे मला एक गाणे आठवते “तुम बेसहारा हो तो किसी का सहारा बनो. तुमको अपने आपही सहारा मिल जायेगा.” 

तसेच आहे हे आधी तुम्ही कुणाचे छान मित्र व्हा तुम्हाला आपोआपच चांगला मित्र मिळेल. पुर्वी एका घरात पाचसहा बहिणभावंड असायचे त्यामुळे त्यांना हा प्रश्न फारसा पडला नाही. पण आता एकच मुल असल्याने त्याला हा प्रश्न नक्कीच आहे. पालकांनी सुध्दा मुलांच्या चांगल्या मैत्रीत प्रतिस्पर्धी भावना मनात भरवू नये. आणि शेवटी प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतेच. कधी काळ हेच. पण  आत्मघाताने तुमचा प्रश्न तर सुटत नाहीच पण इतरांना अनेक अनुत्तरीत प्रश्न देतात. 

एखाद्या व्यक्तीच्या प्रेमाखातर जीव देतांना तुमच्यावर प्रेम करणार्या इतर व्यक्तिंचा तरी विचार करा. एकासाठी अनेकांचे प्रेम विसरण्याचा विचार तरी कसा येतो. आईवडील आठवा. त्यांनी तुम्हाला जन्म दिला त्यांना दुःखात टाकू नका. तुमच्या असण्यात त्यांचा आनंद आहे. ते तुमचे खरे मित्र असतात. तुमचे वाईट व्हावे असे त्यांना कधीच वाटत नसते. तेव्हा छान आनंदाने जगा आणि इतरांच्या जिवनातही आनंद पेरा. मित्रमैत्रिणींनो मनमोकळ्या गप्पा मारा. मनमोकळे जगा. प्रेम द्यावे प्रेम घ्यावे. अवघ्या जगास सुखवावे.. 

Related posts

दुखभरे दिन बीते रे भैय्या…

अग्निपरीक्षा नेहमी सितेलाच का ?

प्रेम.. अडिच अक्षरांची जादू

Leave a Comment