March 28, 2024
The need for coastal conservation on the occasion of turtles
Home » कासवांच्या निमित्ताने किनारपट्टी संवर्धनाचीही गरज
काय चाललयं अवतीभवती

कासवांच्या निमित्ताने किनारपट्टी संवर्धनाचीही गरज

कासवांच्या संवर्धनाला शास्त्रीय जोड मिळाल्यास संपूर्ण किनारपट्टीचेही संवर्धन होण्यास हातभार लागेल. लोकचळवळीतून किनारपट्टी संवर्धनाचीही चळवळ उभी राहू शकेल. मग यामध्ये किनारपट्टीवर साठणारा कचरा असो किंवा किनारपट्टीची धूप अशा विविध प्रश्नांना यामुळे वाचा फुटेल. आता कासव चळवळ किनारपट्टी संवर्धन चळवळ म्हणून पुढे येण्याची गरज आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल 9011087406

२००३ पासून कासवांचे संवर्धन ही चळवळ कोकण किनारपट्टीवर राबवली जात आहे. निसर्गमित्र भाऊ काटदरे आणि त्यांच्या सहकार्यांनी सुरु केलेल्या या उपक्रमाला उत्तम प्रतिसादही मिळत आहे. वेळास या ठिकाणी कासवांचे संवर्धन सुरु झाले आणि याच ठिकाणी कासव महोत्सवही आयोजित केला जाऊ लागला. यातून कासवांच्या संवर्धनाबाबत जागृती निर्माण झाली.

यंदाच्यावर्षी कासवांचे संवर्धन दुप्पट झाल्याचे निदर्शनास आले आहे. २००३ मध्ये सुरु झालेल्या या चळवळीमुळे आता किनारपट्टीच्या संवर्धनासही चालना मिळत आहे. ही पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाची गोष्ट आहे. गेल्या दोन दशकात स्थानिक ग्रामपंचायती आणि वनविभागाने पुढे येत ही संवर्धन मोहीम हाती घेतली. विशेष म्हणजे ही आता लोकचळवळ होत आहे. यातून जैवविविधतेबाबत जागृतीसह जोपासणाही केली जात आहे. अशा लोकचळवळींना आता प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

कोकण किनारपट्टीवर महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर आणि मारळ या चार ठिकाणी, तर रत्नागिरी जिल्ह्यात वेळास, केळशी, आंजर्ले, कर्दे, मुरुड, दाभोळ, कोळथरे, लाडघर, वेळास, गुहागर, तवसाळ, गावखडी, माडबन, व्येत्ये या १४ ठिकाणी, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वायंगणी, तांबळडेग, आचरा, कालवी बंदर, शिरोडा, देवबाग अशी वेंगुर्ला, देवगड, मालवण या तालुक्यातील १३ ठिकाणी कासवांचे संवर्धन केले जात आहे.

यंदाच्या वर्षी सुमारे २३ हजार ७०६ कासवाची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. सुमारे ४७५ ठिकाणी घरटी आढळली होती. रायगडात २९ घरटी, रत्नागिरीत २८२ घरटी तर सिंधुदुर्गात १६४ घरटी संवर्धित केली होती. या सर्व घरट्यात ५० हजार ७९९ अंडी उबवण्यात आली. त्यातून २३ हजार ७०६ पिल्ले जन्मली. यंदा जन्मदर ५७ टक्के राहीला. गतवर्षी जन्मदर मात्र ३५ टक्के होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा अधिक जन्मदर पाहायला मिळाला. असे कांदळवन कक्षाकडून सांगण्यात आले आहे.

कांदळवन कक्षाने वनविभागातर्फे किनारपट्टीभागात कासव संवर्धनासाठी कासवमित्रांची नेमणूक केली आहे. कासवमित्र कासवांची अंडी शोधतात, त्यांचा सांभाळ करतात व घरट्यातून बाहेर पडलेल्या पिल्लांना समुद्रात सोडतात. या सर्व कार्याची जबाबदारी कासवमित्रांची असते. कासव संवर्धनाची लोकचळवळ आता निश्चितच वाढत आहे. हे यातून स्पष्ट होत आहे.

समुद्री कासवातील तज्ज्ञ सुमेधा कोरगांवकर यांच्या मते कासवांची अंडी घालण्याचा कालावधी दर तीन वर्षांनी सर्वाधिक झालेला पाहायला मिळतो. यंदाच्या वर्षी सर्वाधिक आढळली असतील तर पुढील दोन वर्षे यामध्ये घट झालेली पाहायला मिळेल व पुन्हा तिसऱ्यावर्षी अधिक झालेली पाहायला मिळेल. हे एक चक्र आहे. ओरिसामध्ये हे चक्र अभ्यासले गेले आहे. आपल्याकडेही असा अभ्यास केल्यास हे निश्चितच अनुभवास येईल. एक वर्षाआड कासव अडी घालतात. याचा अभ्यास पॅसिफिक महासागरामध्ये केला गेला आहे. कोकण किनारपट्टीवरही याचा अभ्यास होण्याची गरज आहे.

कोकणात काही भागात कासवाची अंडी खाण्याचे प्रकारही घडत आहेत. त्यातच वादळ वाऱ्याचाही फटका या संवर्धन मोहीमेला बसतो आहे. लाटांच्या माऱ्यामुळे किनारपट्टीचे नुकसान होते. अशा भागात कासवांच्या घरट्यांची संख्या घटते. किनाऱ्याची रचना बदलल्यामुळेही गावखडी, माडबनमध्ये घरट्यांची संख्या घटल्याचे प्रकार यंदा पाहायला मिळाले. यासाठी कासवांबरोबर आता किनारपट्टीचेही संवर्धन करण्याची गरज प्रकर्षाने जाणवते आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे संवर्धित काही घरटी नष्ट झाली होती. पण कांदळवन फाउंडेशनने पुढे येत संवर्धनासाठी निधीही उपलब्ध करून दिला.

समुद्री कासवांचे संवर्धनामध्ये मच्छिमारांचाही अडथळा होतो. मच्छिमारीच्या जाळ्यात अनेक कासवे अडकून जखमी होण्याचाही घटना वारंवार घडताना पाहायला मिळतात. कासवमित्रांच्या जागरुकतेमुळे जखमी कासवावर उपचार केले जाऊन त्यांना पुन्हा समुद्रात सोडण्याचेही कार्य केले जात आहे. जाळ्यात कासवे अडकल्याने मच्छिमाऱ्यांच्या जाळ्याचेही नुकसान होते. यासाठी मच्छिमारी आणि कासव संवर्धन यावर शास्त्रशुद्ध अभ्यास होणे आता गरजेचे आहे. कासवांच्या संवर्धनाला शास्त्रीय जोड मिळाल्यास संपूर्ण किनारपट्टीचेही संवर्धन होण्यास हातभार लागेल. लोकचळवळीतून किनारपट्टी संवर्धनाचीही चळवळ उभी राहू शकेल. मग यामध्ये किनारपट्टीवर साठणारा कचरा असो किंवा किनारपट्टीची धूप अशा विविध प्रश्नांना यामुळे वाचा फुटेल. आता कासव चळवळ किनारपट्टी संवर्धन चळवळ म्हणून पुढे येण्याची गरज आहे.

जैवविविधतेच्या संवर्धनासाठी याची गरजही आहे. समुद्री कासव हे मुख्यतः शार्क माशांचे खाद्य त्यामुळे सागरी जैवविविधता जोपासण्यात मोलाचा वाटा म्हणावे लागेल. कासव हे पाण्यातही राहाते व जमिनीवरही येते. अंडी घालण्यासाठी येणारी कासवे साहजिकच मानवाच्या नजरेत येतात. यामुळे मानवासोबत त्यांचे नाते निर्माण होते. अन्य सागरी जीवांच्याबाबतीत असे घडत नाही. कासवासोबत मानवाचे भावनिक नाते जोडले जाते. साहजिकच कासवांच्या किनारपट्टीतील वावरामुळे त्या भागात मानवाचा हस्तक्षेप रोखला जात आहे. त्या परिसरात वाळू उत्खनन करण्यास आळा बसतो. अडी घालण्याच्या क्षेत्रात हॉटेल्सला परवानगी दिली जात नाही. लाईटनिंग तसेच वसाहतीला परवानगी दिली जात नाही. मच्छिमारीलाही या भागात बंदी केली जाते. साहजिकच यातून किनारपट्टीच्या संवर्धनाला चालना मिळते आहे. यासह मरिन इकोसिस्टिमचेही संरक्षण केले जाते. कासव जेली फिश खात असल्याने मरिन इकोसिस्टिममध्ये याचा महत्त्वपूर्ण भाग आहे. जंगलामध्ये जसे वाघाचे संवर्धन केल्यानंतर जंगलातील इकोसिस्टिमचेही संवर्धन होते. तसेच मरिन इकोसिस्टिमच्या संवर्धनासाठी कासवांचे संवर्धनही महत्त्वाचे आहे.

Related posts

हे विश्वचि माझे घर विचारातून देश होईल महासत्ताक 

सूर्य ग्रहण – सावल्यांचा खेळ

रामसर स्थळांच्या यादीत भारतातील आणखी पाच स्थळांचा समावेश

Leave a Comment