April 25, 2024
Home » येवा कोकण आपलाच असां…!
पर्यटन

येवा कोकण आपलाच असां…!

नजिकच्या गोवा राज्याची ओळख आणि संपूर्ण अर्थकारण तेथील पर्यटनावर अवलंबून आहे आणि गोव्यापेक्षा अधिक सुंदर आणि स्वच्छ सागरी किनारे कोकणात आहेत. याला पर्यटकांच्या गरजेनुसार विकसीत करण्याची योजना यावी यासाठी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी हाती घेतली आणि केवळ एक वर्षाच्या आत यातून असणारी मोठी संधी कोकणवासीयांना उपलब्ध होणार आहे.

– प्रशांत दैठणकर       

कोकण म्हणजे निसर्गाने भरभरुन दिलेलं दान असणारी भूमी कोकण भूमी जशी इथल्या जैवविविधतेसाठी प्रसिध्द आहे. तशीच ती येथील सागरी किनाऱ्यांसाठी देखील प्रसिध्द आहे. 720 किलोमीटर लांबीच्या या किनारपट्टीच्या भागात सागरी संपन्नता असून देखील त्याचा पर्यटनाच्या दृष्टिकोणातून मोठया प्रमाणावर विचार झाला नाही आणि वापर देखील झाला नाही.

स्वच्छ आणि भूरळ घालणाऱ्या  इथल्या सागरी किनाऱ्यांना पर्यटनाची जोड देण्याची आवश्यकता आहे आणि यातून स्थानिकांना मोठया प्रमाणावर रोजगाराची संधी मिळणे आणि पर्यायाने या भागातील अर्थकारणास गती मिळणे ही मोठी सुसंधी उपलब्ध आहे.

नजिकच्या गोवा राज्याची ओळख आणि संपूर्ण अर्थकारण तेथील पर्यटनावर अवलंबून आहे आणि गोव्यापेक्षा अधिक सुंदर आणि स्वच्छ सागरी किनारे कोकणात आहेत. याला पर्यटकांच्या गरजेनुसार विकसीत करण्याची योजना यावी यासाठी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी हाती घेतली आणि केवळ एक वर्षाच्या आत यातून असणारी मोठी संधी कोकणवासीयांना उपलब्ध होणार आहे.

पहिल्या टप्प्यात पर्यटक अनुकुल व्यवस्था निर्मिती

सध्या महामारीमुळे सर्व उद्योग ठप्प असले तरी यानंतरच्या काळात कोकणची ही भूमी देशाचे एक मोठे पर्यटन केंद्र म्हणून जगासमोर येईल हे आताच स्पष्ट जाणवत आहे. याचा पहिला टप्पा पर्यटक अनुकूल व्यवस्था निर्माण करण्याचा आहे. यासाठी बिचशॅक ची संकल्पना मांडली गेली आणि याचे कामही सुरु झाले आहे. रत्नागिरी जिल्हयात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून  गुहागर आणि आरे-वारे समुद्र किनाऱ्यावर प्रत्येकी 10 शॅक सुरु करण्यात येणार आहेत. सागर किनाऱ्यावर कायमस्वरुपी बांधकाम करता येत नाही हे लक्षात घेऊन तात्पुरते बांधकाम असणारे असे शॅक (कुटीर) पर्यटकांसाठी उभारण्यात येणार आहेत. या शॅकसाठी 70 टक्क्यांहून अधिक शॅक हे स्थानिकांना देण्याचे निश्चित करण्यात आले आहे याचा उद्देश स्थानिक युवकांना रोजगार मिळावा हाच आहे.

सिंधुदूर्ग, रायगड तसेच पालघरलाही शॅक

याच स्वरुपाचे शॅक संपूर्ण किनारपट्टीवर सिंधुदूर्ग, रायगड तसचे पालघरच्या सागरी किनाऱ्यांवर पर्यटकांसाठी यापुढील काळात उपलब्ध  होतील. कोकण पदार्थाची लज्जत येथे पर्यटकांना घेणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे इतरही खाद्य व्यवस्था असेल, पर्यटकांची आवड ही याच्या निर्मितीत महत्वाची ठरणार आहे.

पंचतारांकित हॉटेलची उभारणी 

कोकण रेल्वेच्या माध्यमातून  कोकणात प्रवास करण्याची सोय आहे. सोबतच पहिला पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदूर्ग जिल्हयात ताजच्या  सहकार्याने पंचतारांकित हॉटेलची उभारणी येत्या 3 वर्षांमध्ये  करण्याचा करारही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. याने या जिल्हयातील पर्यटनाला चालना मिळणार आहे.

आतिथ्यासाठी कोकणी माणूसही सज्ज

सिंधुदूर्गात चिपी येथील विमानतळ लवकरच कार्यान्वीत होणार आहे आणि दुसऱ्या बाजूस सागरी महामार्गाच्या कामालाही गती देण्यात येत आहे. हवाई मार्ग, सागर मार्ग तसेच गोवा मुंबई महामार्ग आणि कोकणरेल्वे यांच्या सहाय्याने कोकण आता रिचेबल झालाय आणि आतिथ्यासाठी कोकणी माणूसही सज्ज होवून  साद घालत आहे….येवा कोंकण आपलाच असां..!

औद्योगिक नवप्रवर्तनाचे पाऊल

रोजगार निर्मितीच उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून मोठ्याप्रमाणात नियोजन व्हावे या दृष्टीकोनातून रत्नागिरी जिल्हा हा संपूर्ण राज्यासाठी इनोव्हेशन अर्थात नवप्रवर्तन जिल्हा म्हणून निवडण्यात आला आहे.  या माध्यमातून पर्यावरण पूरक उद्योग जिल्ह्यात आणण्याची सुरुवात होणार आहे.  या स्वरुपाचा हा राज्यातील एकमेव प्रकल्प असून याची आरंभिक तयारी पूर्ण झाली आहे.  येत्या चार महिन्यात याबाबतच बृहदआराखडा तयार होणे अपेक्षित आहे. याला नवप्रवर्तन जिल्हा या स्वरुपात रत्नागिरी जिल्ह्याची नवी ओळख राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात होणार आहे.

इनोव्हेशन सेंटरमधून स्थानिकांना रोजगार संधी 

येथे विकसित होणाऱ्या इनोव्हेशन सेंटरचे स्वरुप केवळ स्थानिकांना रोजगार संधी उपलब्ध करुन देणे इतकेच मर्यादित नसून या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर संशोधन कार्य सुरु होणार आहे.  यात जागतिक पातळीवरुन येणाऱ्या संशोधकांचा सहभाग अपेक्षित आहे. अशा प्रकारचे इनोव्हेशन केंद्र उभारल्यानंतर प्रथम प्राधान्य पर्यावरण पुरक उद्योगांना राज्यात असणारी संधी आणि त्यासाठी लागणाऱ्या मुलभूत साधन सुविधा यांचाही अभ्यास या निमित्ताने केला जाणार आहे.

अधिक प्रमाणात उद्योगाच्या संधी

रत्नागिरीलगत असणारा सिंधुदूर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून यापूर्वीच घोषित झालेला आहे.  पर्यटन जिल्हा असल्याने सिंधुदूर्ग जिल्ह्यात पर्यटन व्यवसायाला बळकटी देणारे प्रकल्प वाढविणे शक्य आहे. हा भाग इतर उद्योगांच्या वाढीवर मर्यादा आहेत आणि यामुळेच रत्नागिरीत अधिक प्रमाणात उद्योगाच्या संधी आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या ज्या औद्योगिक वसाहती आहेत त्या औद्योगिक वसाहतींमध्ये अद्यापही वाढीची संधी आहे. यासाठीच सध्या उपलब्ध जागांचा पूर्ण क्षमतेने वापर करण्यासोबत इतरत्र उपलब्ध जागांचा शोध घेणे व त्या जागांचे अधिग्रहण करुन त्या सर्व जागा उद्योग विस्तारासाठी आणि नव्या उद्योगांसाठी देणे या माध्यमातून नव्या रोजगार संधी निर्माण होतील या सर्व प्रयत्नांना संशोधन कार्याची जोड मिळाली तर एक प्रगत औद्योगिक जिल्हा आणि पर्यावरण यांची सांगड येथे घालणे शक्य होणार आहे.

पर्यावरण पूरक कारखानदारी 

सध्या रत्नागिरी जिल्ह्यात शेती आधारित प्रक्रिया उद्योग आहेत. यात स्थानिक स्तरावर होणारे हापूस आंब्याचे आणि काजूचे उत्पादन यावर आधारित कृषि प्रक्रिया उद्योग आहेत.  जिल्ह्यात सर्वाधिक उत्पन्न भातशेतीतून येते. सोबतच नारळ आणि मसाले यांचेही उत्पादन येथे होत असल्याने कृषी प्रक्रिया आणि संलग्न उद्योगांना कच्चा माल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. या सर्वांचे स्थानिक स्तरावर उद्योगात रुपांतर केल्यास असे उद्योग निश्चितपणे पर्यावरण पूरक कारखानदारी जिल्ह्यात वाढणार आहे.

मोठे औद्योगिक केंद्र बनेल

चिपळूण तालुक्यात असणाऱ्या औद्योगिक वसाहतींमध्ये मुख्यत्वेकरुन केमिकल्स झोन आहे याच्या जोडीला येथे औषध उत्पादक कारखानदारीला देखील संधी आहेत.  याचा विस्तार केल्यानंतर रोजगाराच्या संधीतही वाढ होणार आहे. एका बाजूला पर्यटन क्षेत्रात असणाऱ्या व्यवसाय आणि रोजगाराच्या संधीला औद्योगिक इनोव्हेशनची जोड प्राप्त झाली तर रत्नागिरी जिल्हा येणाऱ्या काळात मोठे औद्योगिक केंद्र बनेल हे नक्की आणि यालाच गती देण्याचे काम या नवप्रवर्तन च्या रुपाने होणार आहे.
 

Related posts

माझं गाव …माझं घर…” गोकुळ “

कुंभार्ली घाट, ओझर्डे धबधबा अन् कोयनेचे साैंदर्य…(व्हिडिओ)

झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सासरच्या मुळगावाची अशीही ओळख

Leave a Comment