महाराष्ट्रात सुमारे 750 वृक्ष प्रजातींची नोंद केली आहे. यापैकी 460 वृक्ष प्रजाती या स्वदेशी आहेत तर सुमारे 290 वृक्ष प्रजाती विदेशी आहेत. राज्यात सुमारे ४५०० हून अधिक सपुष्प वनस्पती प्रजातींची नोंद आहे. पण ही सर्व नोंद विद्यापीठातील पुस्तकातच असतात आणि तिथेच राहतात. सर्व सामान्य आणि स्थानिकांना याची माहिती होत नाही. अशाने या प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे. या वनस्पतींची ओळख स्थानिकांना असणे फार गरजेचे आहे. यासाठी हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरू शकते. स्थानिकांना या वनस्पतींची माहिती झाली तर त्यांचे संवर्धन होण्यास यातून निश्चितच चालना मिळेल. जैवविविधतेची स्थानिक भाषेतील शास्त्रीय माहिती होणे हे यासाठीच गरजेचे आहे. तसेच जैवविविधता दस्तावेज तयार करताना, वृक्षांची शास्त्रीय सुची तयार करताना हे पुस्तक निश्चितच मार्गदर्शक ठरणारे असे आहे.
वृक्षांची सविस्तर शास्त्रीय माहिती
महाराष्ट्राचे समृद्ध वृक्षवैभव या पुस्तकात महाराष्ट्रातील ६४ देशी विदेशी वृक्षांची सविस्तर शास्त्रीय माहिती देण्यात आली आहे. वृक्षांची शास्त्रीय नावे व विविध भाषेतील नावे, त्यांचे मूळस्थान त्यांची विविध देशांतील व विविध प्रदेशांतील विभागणी, त्यांचे शास्त्रीय गुणधर्म, फुले-फळे येण्याचा हंगाम, औषधी व इतर पारंपारिक उपयोग, त्यांची लागवड पद्धती अशी सर्व परिपूर्ण माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.
विविध धर्मात वृक्षांचे महत्त्व
अनेक पौराणिक ग्रंथात देवदेवतांना प्रिय असणाऱ्या वृक्षांची माहिती आढळते. वृक्षांमध्ये देवतांचा वास असतो, अशी धार्मिक भावना आहे. औदुंबर श्रीदत्ताचे, तर बेल वृक्षात श्रीशंकराचे वास्तव्य असते, असे मानले जाते. पिंपळाचा वृक्ष श्रीविष्णूंना, तर कदंब हा वृक्ष श्रीकृष्णांना प्रिय असे मानले जाते. जैनधर्मात सातवीण, नागकेशर, प्रियंगू, कवठ, देवदार असे वृक्ष पूजनीय मानले जातात. इस्लाम धर्मात पिलू तर ख्रिश्चन धर्मात अॅरुकॅरिया या वृक्षांना महत्त्व आहे. गौतम बुद्धांना बोधी वृक्षाच्या छायेत तर संत ज्ञानेश्वरांना अजान वृक्षाच्या छायेत दिव्यज्ञानप्राप्ती झाली असे मानतात. गुढीपाडव्याला कडूलिंब, दसऱ्याला आपट्याच्या पानांना महत्त्व आहे. शास्त्रोक्त विचार करता या वृक्षांचे संवर्धन यातून होत आले आहे.
वृक्षांच्या पर्यावरणीय महत्त्वावर प्रकाश
वाढत्या प्रदुषणावर मात करण्यासाठी वृक्षांचे पर्यावरणीय महत्त्व सर्वांना माहीत असणे गरजेचे आहे. या पुस्तकातून महाराष्ट्रातील जंगला, वनात आढळणाऱ्या वृक्षांची ओळख होते. वृक्षाबाबत अनेकांना आस्था असते पण कोणता वृक्ष कोठे लावणे आवश्यक आहे याबाबतची माहिती नसते. या पुस्तकांत या बद्दल मार्गदर्शन करण्यात आले आहे. वृक्षांचे पर्यावरणीय मुल्य यावरही या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे. एका वृक्षापासून साधारणतः एक टन प्राणवायूची निर्मिती होते. याची तुलनात्मक मांडणी यात केली आहे. पन्नास वर्षात एक वृक्ष आपणास काय देतो याचे मुल्यांकनही करण्यात आले आहे. वायू, प्रदुषण मुक्ती, जमिनीची धूप थांबवणे, आर्द्रता नियंत्रण, पाण्याचे चलनवलन, पशुपक्षी, जीवजंतूना आश्रय, प्रथिने अशा सर्व गोष्टींचे मुल्यमापन करून वृक्षाचे पर्यावरणीय महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
पुस्तकाचे नाव – महाराष्ट्राचे समृद्ध वृक्षवैभव
लेखक – डॉ मधुकर बाचूळकर-चोळेकर, डॉ. अशोक वाली
प्रकाशक – अंकुर पब्लिकेशन, कोल्हापूर
पृष्ठे- 200
किंमत – 250 रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
1 comment
फारच छान पण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत