April 19, 2024
True Love Or Attraction Article By Sunetra Joshi
Home » आकर्षण की प्रेम ?
मुक्त संवाद

आकर्षण की प्रेम ?

मनाचे आणि बुद्धीचे एकमत झाले की जो निर्णय घेऊ तो शंभर टक्के नाही तरी जवळपास बरोबर असतो. शक्यतोवर पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. पण तुम्हाला तसे जमायला मात्र हवे. आणि मग घेतलेल्या निर्णयावर ठाम राहता पण आले पाहिजे.. तेव्हा आकर्षण आणि प्रेम यातला फरक समजून घ्या

सुनेत्रा विजय जोशी

रत्नागिरी


नुकताच प्रेमदिवस होऊन गेलाय. कितीतरी प्रेमवीरांनी आपले प्रेम व्यक्त केले असणार..तिला बघताक्षणी तिच्या प्रेमात पडलो. पण आता तिचा हेकट स्वभाव रोज वात आणतो. किंवा त्याची स्टाईल भारी आहे ना.. पण आता त्या नाटकीपणाचाच कंटाळा आला. असे आपण नेहमीच ऐकतो. कधी कुणाचे रूप आवडते. कधी कुणाचा आवाज तर कधी कुणाचा अभिनय तर कधी काही. आणि मग बेभान मन सगळे काही बाकीचे न बघता गुंग होऊन लोहचुंबकासारखे ओढल्या जाते. कुणी इतर काही सांगितले समजावले तरी मनावर घेत नाही. एखाद्याचा किंवा एखादीचा बेफिकीर असलेला स्वभाव आवडतो पण लग्न झाले की संसार करतांना नेमका खटकतो आणि खटके उडतात.

खूप नीटनेटकी राहणी असलेली काॅलेजमधली फॅशनेबल मुलगी बघून प्रेमात पडता, पण लग्न झाल्यावर तोच प्रसाधनांचा किंवा कपड्यांचा किंवा दागिन्याचा खर्च अनावश्यक वाटतो. मग वाद होतात. आधी तर हेच आवडत होते ना ? मग आताच काय झाले ? आपले आपल्यालाच कळत नाही. आणि कधी साधी राहणारी आवडत असेल तर नंतर इतर जणींच्या तुलनेत लगेच गबाळी वाटते. आणि या सगळ्यातून कधी कधी मग बाहेर अफेअर्स पण सुरू होऊन पर्यावसान नको त्यात होते.
माझ्या एका मैत्रिणीच्या मुलाचा किस्सा. मुलगी बघायला गेले. मुलगी दिसायला खूप सुंदर होती. नखशिखांत मॅचिंग केलेले होते. बघण्याचा प्रोग्राम झाला. ते सगळे घरी आले. मुलगी पसंत असणारच असे वाटले. पण मुलाने चक्क नकार दिला. कारण विचारले तर म्हणाला आमच्या घरात ती मॅच नाही होणार. आम्ही साधी माणसे. येणारा जाणारा सतत असतो. कामाला बाई आहे पण कधीतरी काही करायची वेळ आली तर… उद्या हिचे एवढे नखरे काही सांभाळले जाणार नाहीत. मला खरच खूप कौतूक वाटले त्याचे.

तरुण वयात भिन्नलिंगी आकर्षण असणे खूप स्वाभाविक आहे. पण प्रेम करतांना आणि लग्न करताना तुम्हाला ते क्षणिक आकर्षण आहे की प्रेम आहे यातला फरक कळला पाहिजे.. कारण काॅलेज किंवा आॅफिसमधे तुम्ही त्या व्यक्तीला थोडा वेळ भेटता बोलता. त्यामुळे त्यातील इतर गुण किंवा दुर्गुण कळत नाहीत आणि खटकतही नाही. पण रोजचे चोवीस तास जेव्हा एकत्र राहण्याची वेळ लग्नानंतर येते तेव्हा तुझ्या अशाही सवयी आहेत हे माहित नव्हतं असे होते आणि मग भांडाभांडी. बदल केला तर जमतेही पण बदल कुणी करायचा? यावरही वादावादी ठरलेलीच.

म्हणूनच तुम्हाला प्रेम आणि आकर्षण यातला फरक कळला पाहिजे. मनाचा निर्णय हा बुध्दीच्या कसोटीवर घासून बघितला पाहिजे. मैत्री झाली तरी लगेच स्वतःच्या मनाशी पण प्रेमाची कबुली देऊ नये. कधी कधी कालांतराने दुसरी व्यक्ती आवडू शकते. त्यामुळे निर्णय घेण्यात घाई नको. स्वतःचे मन पुन्हा पुन्हा तपासून पहा. आणि आवड आणि निवड यात खूप फरक आहे. आवडायला काय सारेच आवडते पण निवड करायची वेळ येते तेव्हाच कस लागतो. साधे साडीच्या दुकानात गेलो तर आपल्याला कितीतरी साड्या आवडतातच ना? कुणाचे पोत मऊ तर कुणाचा रंग छान. पण घेतांना आपण टिकाऊ आणि बजेटला परवडणारी घेतो.

आपल्याला लाडू आवडतो श्रीखंड आवडते. पण रोज नाही. रोज वरण भात भाजी पोळी असेल तरच पोट भरते. तसेच आवडीचे असते.  मनाचे आणि बुद्धीचे एकमत झाले की जो निर्णय घेऊ तो शंभर टक्के नाही तरी जवळपास बरोबर असतो. शक्यतोवर पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. पण तुम्हाला तसे जमायला मात्र हवे. आणि मग घेतलेल्या निर्णयावर ठाम राहता पण आले पाहिजे.. तेव्हा आकर्षण आणि प्रेम यातला फरक समजून घ्या एवढेच.. 😊

Related posts

मुंबईत रंगलेल्या मुशायऱ्यात गझलकारांनी भरले रंग

किंमत…

मेंटेनन्स…

Leave a Comment