March 29, 2024
Universal Mind like a sea Dnyneshwari by Rajendra Ghorpade
Home » वर्षियेंवीण सागरू । जैसा जळे नित्य निर्भरु । (एकतरी ओवी अनुभवावी)
विश्वाचे आर्त

वर्षियेंवीण सागरू । जैसा जळे नित्य निर्भरु । (एकतरी ओवी अनुभवावी)

अमर्याद रुप सर्वांना सामावून घेण्याचे सामर्थ्य ठेवते. असे आपले अमर्याद अंतःकरण ठेवायला हवे. कितीही सुख-दुःखे आली तरी त्याचा समतोल ढळता कामा नये. अशा मनाच्या, अंतःकरणाच्या स्थितीने जीवन हे सुखी समाधानी होते.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल 9011087406

वर्षियेंवीण सागरू । जैसा जळे नित्य निर्भरु ।
तैसा निरुपचारू । संतोषी जो ।। 151 ।। अध्याय 12 वा

ओवीचा अर्थ – वर्षाऋतूशिवाय जसा समुद्र पाण्याने नेहमीपूर्ण भरलेला असतो तसा जो कोणत्याही बाह्य उपचाराशिवाय संतोषाने नेहमी पूर्ण भरलेला असतो.

अथांग पसरलेला सागर नेहमी तृप्त असतो. सर्वांची सुख – दुःख तो पोटात घेतो. सगळ्या नद्या शेवटी समुद्राला मिळतात. नद्यांना कितीही मोठा पुर आला. तरी समुद्राच्या पाण्याच्या पातळीत काहीही फरक पडत नाही. कितीही पाणी सामावून घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. उन्हाळ्यात उन्हाचा तडाखा वाढतो. नद्या आटतात पण समुद्र आटत नाही. त्याच्यावर काहीच फरक पडत नाही. तो अथांग पसरलेला आहे. तो सदैव तृप्त आहे. पावसाच्या पुराने त्याला आनंद होत नाही, तर उन्हाच्या तडाख्याने त्याला दुःखही होत नाही. दोन्ही ठिकाणी त्याची दृष्टी सम असते. असे साम्य आपण आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. सागरासारखे अमर्याद असे अंतःकरण करायचे आहे.

सागरासारखे अमर्याद मन, अंतःकरण

अति सुख मिळाले तरी मनावर, अंतःकरणावर त्याचा काहीही परिणाम होता कामा नये व अति दुःख झाले तरी मनाची, अंतःकरणाची स्थिरता ढळता कामा नये. सदैव सम पातळीत असणारे हे मन सदैव तृप्त व समाधानी असते. ही साम्यावस्था आपण आपल्या जीवनात साधायची आहे. जीवनात कितीही उन्हाळे, पावसाळे आले तरी आपले सागरासारखे अमर्याद मन, अंतःकरण नित्य तृप्त ठेवायचे आहे. अशा या विचारांनी आपले आरोग्यही कायम उत्तम राहाते. सदैव मनाची तृप्ती आपले जीवन सुखी-समाधानी करते. आनंदाने समाधान मिळते. सुख मिळते. पण तृप्त मन सुख-दुःखात दोन्हीवेळीही समाधान देते. कारण ते नित्य समाधानी असते. त्या सुख-दुःखाचा त्याच्यावर परिणाम होत नाही. ही मनाची तृप्ती साधायची आहे. ही साम्यावस्था प्राप्त झाल्यास सदैव सुख-समाधान जीवनात नांदते.

सागरासारखी जीवनपद्धती ठेवा

सागर कसा आहे ? अमर्याद सागराचे मनही मोठे आहे. पण तो खवळला तर काठावरच्या लोकांना त्याचा धोका वाटतो. समुद्रात जाणाऱ्या किंवा गेलेल्या जहाजांना बुडण्याची भिती वाटते. बेटांना असुरक्षितता वाटते. पण समुद्रामध्ये राहणाऱ्या जीवांना मात्र त्याचे कधीच भय वाटत नाही. समुद्राचा धोका त्यांना कधीच वाटत नाही. कारण त्याच्यामध्येच ते सामावलेले असतात. या जीवांची संख्या अमर्याद वाढली तरी समुद्राला त्यांची चिंता वाटत नाही. कारण समुद्रात त्याच्यासाठी अमर्याद जागा आहे. अमर्याद खाद्य आहे. मानवाचे मात्र तसे नाही. लोकसंख्या वाढल्यानंतर शहरात राहायचे कोठे असा प्रश्न सध्या भेडसावत आहे. यावर अनेकांनी पर्याय शोधले आहेत. वेगवेगळ्या जीवनपद्धती विकसित झाल्या आहेत. शिफ्टमध्ये काम करणारे कामगार मुंबईत कसे राहातात याचे उत्तम उदाहरण येथे सांगता येण्यासारखे आहे. पण ही वाढती लोकसंख्या आपणासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. पण समुद्राला त्याच्यामध्ये वाढणाऱ्या जीवांची चिंता नाही. कारण त्या अमर्याद रुप सर्वांना सामावून घेण्याचे सामर्थ्य ठेवते. असे आपले अमर्याद अंतःकरण ठेवायला हवे. कितीही सुख-दुःखे आली तरी त्याचा समतोल ढळता कामा नये. अशा मनाच्या, अंतःकरणाच्या स्थितीने जीवन हे सुखी समाधानी होते.

संतोषी जीवन जगण्याचा संकल्प

घरामध्ये सर्वांची सुख-दुःखे जाणून घेऊन त्यांना सांभाळणारी स्त्री असेल तर निश्चितच त्या घरात सदैव आनंद नांदतो. कितीही पाहूणे, अनोळखी व्यक्ती घरी आल्या तरी त्यांच्या आदरतिथ्यात काही कमतरता त्या ठेवत नाहीत. त्यांच्या या अशा प्रेमळ स्वभावामुळे, सागरासारख्या अमर्याद प्रेमाने निश्चितच आनंद मिळतो. असे अंतःकरण स्वतः सुखी असते व ते दुसऱ्यांनाही सुखी करते. अनेकांना सुखी करण्याचे सामर्थ्य त्यांच्या व्यक्तीमत्वात असते. सर्वांच्या सुखातच त्यांना स्वतःचे सुख-समाधान वाटते. असे संतोषी जीवन जगण्याचा संकल्प आपण करायला हवा. तसे आपले अंतःकरण अमर्याद ठेवयला हवे म्हणजे आपले जीवन सुखी-समाधानी होईल.

Related posts

शेणाला सुद्धा आता सोन्याचा भाव

भिक मागून कोणी राजा होत नाही तर….

श्रेष्ठ भक्त कोणास म्हणावे ?

Leave a Comment