March 29, 2024
Home » श्री ज्ञानेश्वरीतील पाणी व्यवस्थापन विचार…वाचा सविस्तर
विश्वाचे आर्त

श्री ज्ञानेश्वरीतील पाणी व्यवस्थापन विचार…वाचा सविस्तर

पाण्याची उपलब्धता कमी असेल अशा ठिकाणी एक सरी आड पाणी देण्याची पद्धतही आहे. कमी पाण्यात जास्तीत जास्त शेत भिजवले जाते. मिश्र शेती करून पाण्याचा जास्तीत जास्त लाभ शेतकरी घेतात. एका पिकातच दुसरे पीक घेऊन अधिक उत्पन्नही मिळवतात. 

– राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

पाणी मुदल झाडा जाये । तृण तें प्रसंगेचि जिये । 
तैसें एका बोलिलें होये । सर्वांहि हित ।। 218 ।। अध्याय 17 वा 

ओवीचा अर्थ – पाणी मुख्य झाडाला जातें आणि पाटाच्या काठावर असणारें गवत सहजच जगते, त्याप्रमाणें कोणा एकाला उद्देशून बोललेले असतां ( त्या बोलण्यांत ) सर्वांचे हित होतें. 

पूर्वी मोटेच्या, रहाटाच्या साहाय्याने पाणी खेचले जायचे. ते पाणी पाटाने शेतीला दिले जात होते. आजही शेतीला पाटाने पाणी दिले जाते. पण पूर्वीच्या काळी पंप नव्हते. पाणी खेचण्याचा वेग कमी होता. यामुळे वाट्टेल तसे पिकाला पाणी देऊन चालत नव्हते. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा विचार तेव्हा केला जात होता. खेचलेल्या पाण्याचा अधिकाधिक लाभ घेण्याचा प्रयत्न होता. मुख्य पिकाला पाणी देताना वाया जाणाऱ्या पाण्यावर अन्य काही पिके घेण्याचेही प्रयत्न केले जात होते. पाटाच्या काठावरील गवताला याचा लाभ होत असे. तेथे हिरव्यागार गवताची वाढ झाली. हे गवत जनावरांना चारा म्हणून वापरता येऊ लागले. जनावरांना हिरवा चारा झाला. मुख्य पिकाला पाणी देताना इतर वनस्पतींनाही या पाण्याचा लाभ होतो. हाच विचार करून पुढे मिश्र शेतीची पद्धत विकसित झाली. 

वाया जाणारे पाणी कसे वापरता येईल याचा विचार शेतकरी करत असत. हे केले तर काय होईल. ते केले तर काय होईल. असा विचार ते प्रत्यक्षात करून पाहात. वाया जाणारे श्रम, वेळ, पाणी याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचा प्रयत्न केला जात होता. पिकाला पाटाने पाणी देताना पाणी वाया जाते. त्या पाण्यावर इतरही पिके येऊ शकतात हे विचारातच घेतले जात नाही. सरीत पाणी सोडले की बंद करायलाच शेतकरी पुन्हा शेतात येतो. 

मौनी महाराज शिवाजी महाराज यांचे गुरु…वेबसाईट पाहाण्यासाठी लिंकवर क्लिक करा
https://www.freewebs.com/mounimaharaj/

अशाने पिकाला योग्य प्रमाणात पाणी दिलेच जात नाही. पिकाच्या वाढीवर याचा परिणाम होतो. उत्पादनात घट होते. याकडे लक्ष दिले जात नाही. सध्या मनापासून शेती केलीच जात नाही. मनापासून शेती केली जात असती तर असे नुकसान झाले नसते. पाण्याच्या मुबलकतेमुळे हे सर्व घडत आहे. पाण्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे व्हावे. याबाबत आता शेतकऱ्यामध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. जमिनीच्या प्रकारानुसार पाण्याचे प्रमाणही कमी जास्त ठेवावे लागते. मध्यम जमिनीत प्रत्येक पाळीत आठ सेंटीमीटर खोलीपर्यंत पाणी द्यावे लागते. खोल काळ्या जमिनीत प्रत्येक पाळीत दहा सेंटीमीटर, तर उथळ जमिनीत सहा सेंटीमीटर खोलीपर्यंत पाणी देणे आवश्‍यक असते. उथळ जमिनीत जलसंधारणशक्ती पेक्षा जास्त झालेले पाणी गुरुत्वाकर्षणाच्या दाबाने निघून जाते. पिकांना पाणी देण्याची खोली ठरविताना जमिनीची उपलब्ध जलधारणाशक्ती तसेच पिकाची अवस्था विचारात घ्यावी लागते. 

पाण्याची उपलब्धता कमी असेल अशा ठिकाणी एक सरी आड पाणी देण्याची पद्धतही आहे. कमी पाण्यात जास्तीत जास्त शेत भिजवले जाते. मिश्र शेती करून पाण्याचा जास्तीत जास्त लाभ शेतकरी घेतात. एका पिकातच दुसरे पीक घेऊन अधिक उत्पन्नही  मिळवतात. पाण्याचे योग्य व्यवस्थापन ठेवून कमीत कमी पाण्यावर जास्तीत जास्त पिके घेण्याचे तंत्र शेतकऱ्यांनी अवलंबले पाहिजे. पण हे करताना पर्यावरणाचा विचारही हवा. नेमके याच प्रश्‍नाकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. 

जवळपास इसवीसन पूर्व 8000 वर्षांपूर्वी शेतीचा उदय झाला असे समजले जाते. गेल्या सुमारे पाच हजार वर्षांमध्ये शेतीचा विकास झाला आहे. असे संशोधकांचे मत आहे. पिकांना पाणी देण्याच्या विविध पद्धती विकसित झाल्यानंतर शेतीत मोठा बदल झाला. पाणी हेच जीवसृष्टीचे अस्तित्वाचे प्रमुख कारण आहे. पाणी नसते तर ही जीवसृष्टीच अस्तित्वात आली नसती. इतर कोणत्याही ग्रहावर पाणी नाही. त्यामुळे तेथे सचिवाचे अस्तित्वच नाही. याचा विचार करून पाण्याचा वापर कसा करायला हवा याचा विचार व्हायला हवा. पिकांना पाणी देण्याच्या पद्धती विकसित झाल्या पण यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. हे विचारात घ्यायला हवे. याकडे दुर्लक्ष झाल्याने पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. प्रत्येक मिनीटाला 50 टन सुपीक जमीनीची धूप होत आहे. प्रत्येक तासाला 1692 एकर जमीन नापिक होत आहे. सध्या शेतीसमोर हेच मोठे आव्हान आहे. जमीनीची धूप होणार नाही असे तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे. 

पिकांना पाणी देताना ठिबक किंवा तुषार सिंचनाचा मार्ग अवलंबला पाहिजे. तरच जमिनीची होत असलेली धूप थांबवता येईल. पिकांना पाणी देताना याचा विचार व्हायला हवा. पिकांना पाटाने पाणी देताना पाटामध्ये वाढणारे गवत किती उपयोगी आहे याचा विचार बाराव्या शतकात ज्ञानेश्‍वरांनी सांगितला आहे. पाणी वाहताना वाहून जाणारी माती गवतामुळे रोखली जाऊ शकते. जमिनीची होणारी धूप यामुळे रोखता येऊ शकते. मुख्य पिकाला पाणी देताना गवतालाही पाटात पाणी मिळते. गवताची वाढ होते. पण सध्या शेती करताना इतका बारीक विचार केला जात नाही. अशाने शेतीचे नुकसान वाढत चालले आहे. शेती करताना नुकसान होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा बारीक विचार करायला हवा. तरच भावी काळात शेती टिकवून ठेवता येईल. 

सुपीक जमिनीचे क्षेत्र घटत आहे. अशा काळात शेतीतील तोटे विचारात घ्यायलाच हवेत. गांभीर्याने याकडे पाहायला हवे. पाटाने पाणी देण्याऐवजी ठिबक सिंचनाने पाणी दिल्यास पाणी पिकाच्या मुळाशी दिले जाते. पाण्याची बचत होते. पाण्याचा योग्य वापर होतो. पिकांची वाढ उत्तम होते. जमिनीची धूपही होत नाही. तणांचा प्रादुर्भाव रोखता येतो. उत्पादनात वाढ होते. असे असताना आजही देशात पाटानेच पाणी दिले जाते. यावर आता शेतकऱ्यांनीच विचार करायला हवा. पाण्याचे महत्त्व ओळखून पाण्याचे घटते प्रमाण विचारात घेऊन आता शेतकऱ्यांनी योग्य तंत्रज्ञान आत्मसात करायला हवे. 

आज हरितगृहाचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी हे तंत्र वापरणे शक्‍य नाही. तितकी त्या शेतकऱ्यांची कुवतही नाही. देशात आज 80 टक्के शेतकरी हे अल्प भूधारक आहेत. अशावेळी शासनाच्या योजना कोणत्या शेतकऱ्यांसाठी आहेत. याचाही विचार आता व्हायला हवा. अल्पभूधारक शेतकऱ्यांचा विचार करून शासनाने नियोजन आखायला हवे. आज 20 टक्के शेतकऱ्यांचा विचार करून शेतीच्या योजना आखल्या जातात. अशाने शेतीची प्रगती झालेली दिसते पण त्याबरोबरच अल्पभूधारक शेतकरी शेती सोडून इतर उद्योगाकडे वळताना पाहायला मिळत आहे. शेती करणे आता त्याच्या कुवतीबाहेरचे झाले आहे. देशात शेती सोडणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. आकडे वाढत असल्याने भावीकाळात शेती हा व्यवसाय धोक्‍यात येऊ शकतो. याचाही विचार शासनाने करायला हवा. शासनाची योजना दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यासाठी असायला हवी. योजना एकच हवी पण त्याचा लाभ दोघांनाही व्हायला हवी. असा व्यवस्थापनाची गरज आहे.

संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा अभ्यास एक तरी ओवी अनुभवावी असा या ग्रुपचा उद्देश आहे. मग होताय ना सहभागी..त्यासाठी लिंकवर क्लिक करा.
https://www.facebook.com/groups/ShriDnyneshwariStudy

Related posts

नीळिमा अंबरी । कां मृगतृष्णालहरी । (एकतरी ओवी अनुभवावी)

नित्य प्रयत्नामुळेच यशाची सापडते वाट

स्वधर्म कोणता ?

Leave a Comment