What is Real Dharma article by Rajendra Ghorpade on Dnyneshwari
Home » खरा धर्म कोणता ?…
विश्वाचे आर्त

खरा धर्म कोणता ?…

दुसऱ्याविषयी दया, माया, प्रेम, जिव्हाळा वाटणे हा धर्म आहे. प्राण्यांनाही हा धर्म समजतो, पण मनुष्यास समजत नाही. गाईजवळ मेलेले वासरू जरी नेऊन सोडले तरी तिच्यासाठी तिचा पान्हा फुटतो. वासरू जिवंत आहे की मृत याचा ती विचार करत नाही, इतके प्रेम, माया गायीमध्ये असते.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल 9011087406

पैं वासरूवाचा भोंकसा । गाईपुढे ठेवू जैसा ।
उगाणा घेती क्षीररसा । बुद्धिवंत ।। 386 ।। अध्याय 16 वा

ओवीचा अर्थ – ज्या प्रमाणे हिकमती लोक वासरू मेलेल्या दुभत्या गायीच्या पुढे मेलेल्या वासराचा भोत ठेवून तिच्या कासेंत असेल नसेल तेवढ्या दुधाचा झाडा घेतात.

हुशार मंडळी ही एखादे आमिष दाखवून आपला कार्यभाग साधण्यात पटाईत असतात. युद्धात शत्रूची चाल जाणून घेण्यासाठी हेरांना आमिषे देऊन बातम्या काढून घेतल्या जातात. सुरक्षा अधिकाऱ्यांनाही लाच देऊन फितूर केले जाते; पण हे कार्य सर्वांनाच साधता येते, असे नाही. ही एक कला आहे. बोलण्याची ही पद्धत अवगत करून घ्यावी लागते. तसे अशी कामे करणारी माणसे ही वेगळ्याच पद्धतीची असतात. सर्वांनाच हे जमत नाही. काही माणसे ही सरळ मार्गी असतात.

काही माणसे वाकड्या चालीची असतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. सरळ मार्गाने सर्वच गोष्टी साध्य करता येतात, असे नाही. जीवनात काही गोष्टी साध्य करण्यासाठी वाकडे मार्ग सुद्धा स्वीकारावे लागतातच. लोण्याच्या गोळ्यातून लोणी काढताना बोट सरळ ठेवून चालत नाही. ते वाकडे करावेच लागते. सरळ बोट ठेवून लोणी काढण्याचा प्रयत्न असफलच होणार. बोट वाकडे केले तरच लोणी मिळू शकेल. यासाठीच वाकड्या वाटांचा वापर योग्य कामासाठी करायला हवा. तसे सर्वच वाकडे मार्ग योग्य असतात, असे नाही; पण एखादे चांगले काम यशस्वी करण्यासाठी वाकड्या वाटेचा अवलंब केला, तर तो अधर्म होत नाही.

खरे तर प्राप्त परिस्थितीत जे आवश्‍यक कर्म केले जाते यालाच धर्म असे म्हटले जाते. चांगल्या गोष्टीसाठी एखादे वाईट कर्म करावे लागले तर तो अधर्म होत नाही. माणसाने परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करायला हवेत. हाच त्याचा धर्म आहे. एकदा एक शाकाहारी मनुष्य जंगलात वाट चुकला. त्याला रस्ता सापडेना. तो भटकत राहिला. खायला काहीही मिळाले नाही. शेवटी त्याला एक झोपडी दिसली एक म्हातारी त्यामध्ये राहात होती. भुकेने व्याकुळ झालेला हा शाकाहारी मनुष्य या म्हातारीच्या झोपडीत गेला आणि त्याने ह्या म्हातारीकडे भोजनासाठी याचना केली. ही म्हातारी कोंबड्या पाळत होती व कोंबड्यांची अंडी खाऊन ती जीवन जगत होती. त्या मनुष्याला अंडी देण्याशिवाय तिच्याकडे काहीच नव्हते. वेळ रात्रीची होती, त्यामुळे शेतात जाऊन भाजी तोडून आणणेही शक्‍य नव्हते. भुकेने व्याकुळ झालेल्या, थकलेल्या मनुष्यास काही तरी खाणे आवश्‍यक होते. उपाशीपोटी राहून शरीराला त्रास देणे योग्य नव्हते, पण या परिस्थितीत उपाशी तरी किती दिवस राहणार? अशा परिस्थितीत त्याने त्याचे शाकाहारी व्रत तोडणे आवश्‍यक आहे. यामुळे त्याचा धर्म भ्रष्ट होत नाही. प्राप्त परिस्थितीत त्याने भोजन करणे हे महत्त्वाचे आहे. ते शाकाहारी आहे, की मांसाहारी हे महत्त्वाचे नाही. स्वतःचे जीवन संपविण्याऐवजी त्याने अंडी खाऊन स्वतःचे प्राण वाचविणे हाच त्याचा खरा धर्म आहे. ही हिंसा नाही. परिस्थितीनुसार स्वीकारलेला तो मार्ग आहे. पर्याय आहे.

दुसऱ्याविषयी दया, माया, प्रेम, जिव्हाळा वाटणे हा धर्म आहे. प्राण्यांनाही हा धर्म समजतो, पण मनुष्यास समजत नाही. गाईजवळ मेलेले वासरू जरी नेऊन सोडले तरी तिच्यासाठी तिचा पान्हा फुटतो. वासरू जिवंत आहे की मृत याचा ती विचार करत नाही, इतके प्रेम, माया गायीमध्ये असते. तिला त्या वासरूची काळजी वाटते. त्याला पाजविणे, त्याची भूक शमविणे यातच त्या गायीला आनंद वाटतो. हिंदू धर्मात गायीला देवता माणले जाते. कारण त्या गायीपासून घेण्यासारखे काही गुण आहेत. ते दैवीगुण मानव जातीने आत्मसात करावेत, हा त्या मागचा उद्देश आहे; पण तसे होत नाही. दयेचा, मायेचा गुण हा जनावरामध्ये आहे, पण माणसाला त्याची दया, माया वाटत नाही. जनावरांवर प्रेम केले तर ती सुद्धा कठीण प्रसंगी आधार देतात. मानवता धर्म मनुष्याने पाळायला हवा. प्रेमाने जग जिंकता येते. यासाठी दुसऱ्यावर प्रेमाचा वर्षाव करायला हवा. प्रेमाने दुखावलेले अनेक जण राग विसरून जाऊ शकतात. मनुष्य मात्र काही विचित्र नियमात अडकून स्वतःच त्रागा करत बसतो. हे योग्य नाही. खरा धर्म माणसाने ओळखायला हवा. अहिंसेचा खरा धर्म ओळखायला हवा.

Related posts

तुकोबा हे एकमेवाद्वितीय…

Atharv Prakashan

धनाचा अहंकार…

Atharv Prakashan

म्हणोनि माझां स्वरुपी । मनबुद्धि इये निक्षेपीं ।

Atharv Prakashan

Leave a Comment