April 19, 2024
Who restricted women Special Story on women day
Home » महिला दिनः स्त्रियांना बंधने घातली कोणी ?
मुक्त संवाद

महिला दिनः स्त्रियांना बंधने घातली कोणी ?

स्त्रियांना जी बंधने आज समाजात घातलेली दिसतात, ती कुणा पुरूषांनी घातलेली नसून घरातल्या जेष्ठ स्त्रियांनी स्वतःचे वर्चस्व टिकण्यासाठी आपल्या घरातील लहान असलेल्या स्त्रियांवर घातलेली असावीत. तेव्हा स्त्रिया नृत्य आणि गायन जसे शिकत तसेच घोड्यावर बसणे किंवा तलवार चालवणे सुध्दा बरोबरीने शिकत असत.  म्हणजे कुठलेच क्षेत्र तिला वर्ज्य नव्हते.

सौ. सुनेत्रा विजय जोशी

रत्नागिरी.
मोबाईल 9860049826


आज आठ मार्च. जिकडे तिकडे महिला दिनानिमित्त स्पर्धा आणि उत्सव. खरेच महिलांना बंधने कुणी घातली? आपण जर पौराणिक किंवा ऐतिहासिक कथा पोथीपुराणे वाचलीत तर तेव्हाही महिलांना किती स्वातंत्र्य होते हे दिसून येईल. त्यांना शिक्षणाचे तसेच कलेचे तर पूर्ण स्वातंत्र्य होतेच पण स्वतःचा जोडीदार निवडण्याचे पण स्वातंत्र्य होते. स्वयंवर सारख्या पध्दतीने त्या आपला जोडीदार स्वतः निवडत असत.

स्त्रियांना जी बंधने आज समाजात घातलेली दिसतात, ती कुणा पुरूषांनी घातलेली नसून घरातल्या जेष्ठ स्त्रियांनी स्वतःचे वर्चस्व टिकण्यासाठी आपल्या घरातील लहान असलेल्या स्त्रियांवर घातलेली असावीत. तेव्हा स्त्रिया नृत्य आणि गायन जसे शिकत तसेच घोड्यावर बसणे किंवा तलवार चालवणे सुध्दा बरोबरीने शिकत असत.  म्हणजे कुठलेच क्षेत्र तिला वर्ज्य नव्हते. आणि नेमबाजी वगैरे पण. अर्थात हे स्वरक्षणासाठी तर उपयोगी होतेच पण प्रसंगी इतरांचे रक्षण करण्यासाठी पण त्याचा उपयोग होत असे. तसेच युध्दामध्ये सुद्धा त्याची मदत होत असे. मधल्या काळात मग हे चुलमूल आणि बाई असे समीकरण आले आहे. पण आता स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने वावरताना दिसतात.

तरी कुठेतरी काहीतरी नक्कीच चुकतेय. ते काय हे थोडे समजून घ्यायला हवे. आपण उपभोग्य वस्तू नाही असे एकीकडे म्हणतांना तोकडे कपडे घालून काय साध्य करायचे असते? . एकीकडे बरोबरीने वावरायचे असते तर दुसरीकडे आपण स्त्री असल्याचे राजकारण पण करायचे असते. पुरुषांनी कसे वागावे हा इथे मुद्दा नाही. तो स्वतंत्र वेगळा विषय आहे.

एखादी स्त्री दुःखातून सावरून नेहमीसारखी वागली तरी याच स्त्रिया तिला टोमणे मारतील की बघा अहो या परिस्थितीत पण कशी नटते मुरडते. हिला काही वाटतच नाही अशा प्रकारचे. आपण म्हणतो आता काळ बदलला. पण नाही अजुनही स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला नाही. कारण घरातल्या स्त्रियाच याला बहुतांशी कारणीभूत  असतात.

आजही बाहेर समाजकार्य करणारी किंवा इतर कलागुणांनी तळपणारी बाई असेल तर पुरुष तिचे कौतूक करतील पण बायका… अहो घरात काही बघत नसणार. सगळ्या कामाला कामवाली आहे मग न करायला काय झाले? असे उद्गार आजुबाजुला ऐकायला  हमखास मिळतात.

शिवाय एखादीच काही गृहछिद्र दिसण्याचा फक्त अवकाश.. तिला मदत किंवा सहानुभूती सोडाच उलट ती गोष्ट किती तिखठमसाला लावून सांगता येईल तितकी गावभर पसरेल. सांगणारी मन हलके करावे या उद्देशाने सांगते पण तिचा ताप कमी होण्याऐवजी वाढतोच. नोकरी करणारी असो की गृहिणी यातून कुणाचीही सुटका नाही. नोकरीत पण एखादीला जास्त काम असेल तर दुसरी क्वचित मदत करेल. एकमेका सहाय्य करू हे सुचणार नाही.

या छोट्या छोट्या गोष्टीतून इतकेच लक्षात आणून द्यायचे आहे की जोपर्यंत स्त्रिया स्वतःची मानसिकता बदलत नाहीत तोपर्यंत असे एक दिवसाचे महिला दिन साजरे होत राहणार. जसा दिड दिवसाचा गणपती किंवा नऊ दिवसांचे नवरात्र असते तसेच महिला दिन जवळ आला की कार्यक्रमाचे, उपक्रमांचे भरगच्च आयोजन केले जाणार. भाषणे होणार. एक दिवस कर्तुत्ववान महिलांचे सन्मान होणार. आणि दुसर्‍या दिवशी पुन्हा पहिले पाढे पंचावन्न.

आपणच एकमेकींना ओरबाडतोय मग पुरूषांना तर काय आयतेच पथ्यावर पडते. वरती मी कुठे असे म्हणालो आई असे म्हणतेय असे म्हणून हातही झटकता येतातच. अर्थात सगळे पुरूष असे मुळीच नाहीत. पण आधी बायकांनी बायकांना समजून घ्यावे. म्हणजे नव्वद टक्के तरी समस्या नक्कीच सुटतील. बाकी मग बघता येईल.  माझ्या सर्व मैत्रिणींना महिला दिनाच्या शुभेच्छा देतांना मी इतकेच म्हणेन की प्रत्येक घराघरातील महिलांनी आप आपल्या घरातल्या महिलांना तरी समजून घेण्यासाठी एक पाऊल पुढे या. मग आजुबाजुला किंवा गावातल्या आणि मग देशातल्या. अर्थात हे माझे विचार आहेत पण विचार केलात तर तुम्हालाही पटतील. तर मग… महिला दिन चिरायू होवो. आणि आजचा दिवस तरी आनंदात जावो.

Related posts

गेले ते मैत्रीचे क्षण, छे !…

गीतगोविंदमध्ये कृष्णकृपेचा वरदहस्त अन् राधेच्या विरहाची व्याकुळता

समुपदेशन काळाची गरज…

Leave a Comment