March 29, 2024
Arjunas Eklavayana a path to success for goal setting for present Generation
Home » ध्येयनिश्चितीसाठी यशोमार्ग दाखवणारे – अर्जुनाचे एकलव्यायन
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

ध्येयनिश्चितीसाठी यशोमार्ग दाखवणारे – अर्जुनाचे एकलव्यायन

गारगोटी येथील लेखक, प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांचे अर्जुनाचे एकलव्यायन हे आत्मचरित्र वर्तमान पिढीला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी उर्जा मिळवून देणारे पुस्तक आहे. शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर इंग्रजी विषयाने केलेले मानसिक आघात सोसत असताना त्याच विषयात डाॅक्टरेट मिळवून केल्याने होत आहे रे…या वचनाची साक्ष लेखकांने या पुस्तकातून दिली आहे.

बा. स. जठार


मोबाईल – 9850393996

इंग्रजी या परकीय भाषेची नुसती तोंडओळख मुलांची हुशारी ओळखण्यात पुरेशी असायची असा एक जमाना होता. त्या जमान्याचे बालसाक्षीदार लेखक अर्जुन कुंभार अकोळकर गुरूजींमुळे आदर्शवादी बनल्याचे मान्य करतात. मुळचा ग्रामीण पिंड असला तरी काही सामाजिक प्रथांना त्यांनी विवेकवादाची झालर लावत आपल्या मनाला अनुकरणीय बनवले नाही. संजूच्या घरातील बोचरा प्रसंग, चुलत्याच्या घरातील जनावरांचा दवाखाना, इंग्रजी अध्यापनातील शिक्षकाची तत्कालिन अनास्था, रात्र शिकवणीतील करतूती, बालवयातील खेळ, अल्लड वयातील उचापती या साऱ्या घटनांतून त्यांचे बालपण समजून येते.

इंग्रजीत नापास !

हायस्कूलच्या शिक्षणातही ते सर्व विषयात पहिले असले तरी इंग्रजीत ढोकच राहीले. या विषयामुळे त्यांचा हिरमोड झाल्यानं शिक्षणापासून दुरावत जाणाऱ्या त्यांच्या मनाला आईच्या भावनिक सादामुळे पुन्हा तरतरी आली. अपयशातून यशाची चव चाखण्याच्या त्यांच्या निर्धाराने कमी गुणांसह मॅट्रिक पासचा शिक्का घेऊन ते पुढील शिक्षणाची दारे धुंडाळत होते. मॅट्रीकनंतरच्या शिक्षणातील वाटा याविषयी काहीच माहीती नसूनही केवळ आपापसातील अर्धवट चर्चेतून अकरावी काॅमर्सची वाट धरणारे लेखक इंग्रजीच्या माऱ्यामुळे बारावीला आर्ट्स शाखेकडे वळले. केवळ इंग्रजीमुळे त्यांची मानसिकता दोलायमान बनल्याचे जाणवते. त्यातच बारावी बोर्ड परिक्षेत फक्त इंग्रजीनं नापासचा शिक्का मारून त्यांना भविष्यातील अंधःकारमय जीवनात ढकलून दिल्याचे जाणवतं.

नकारात्मक परिस्थितीला केले सकारात्मक

फाटक्या आजोळाकडून फारशा आशा न ठेवता मोडक्या संसाराला आईच्या कुंभारकामाचा आधार, थोरल्या बहिणीचा सासरजाच, धाकट्या बहिणीचं लग्न, भाऊबंदकी, चोरांची भीती, कुंभारकामाची गावकी या सर्व घडामोडीतून बालमनाला सावरत लेखक परिस्थितीने घडत गेले. आपल्या अंतर्मनातील सकारात्मक उर्जा एकवटून कठोर परिश्रमाने पुरवणी परिक्षेत बारावी पास होऊन लेखकानी नावडत्या इंग्रजीवर पहिला घणाघात केला आणि स्पेशल बी. ए. बी. एड्. पदवीद्वारे ते इंग्रजी विषयाचे शिक्षक बनले. तेथून पुढे इंग्रजीच्या परीपूर्णतेसाठी त्यांचे एकलव्यायन सुरू झाले. त्यातच अवतीभवतीच्या नकारात्मक परिस्थितीला सकारात्मक करत विविध मार्गाद्वारे मिळणारे शैक्षणिक पोषण प्राप्त करत लेखक ध्येयाकडे झेपावत होते. लेखकांची ही जिद्द आज कित्येक तरूणांना गतिमान केल्यावाचून राहणार नाही यात शंकाच नाही. सभोवतालचं सारं वातावरण इंग्रजीमय करत निरपेक्ष भावनेने सुरू केलेली शिकवणी, भावनिक, मानसिक गदारोळ, प्रलोभने यातून वाट काढत पुढे जाणारे आणि इंग्रजीच्या ध्यासापोटी साहित्य लेखनाकडे पाठ फिरवणारे लेखक आज याच पुस्तकाद्वारे साहित्यिकांच्या पंक्तित बसल्याचे जाणवून येते.

स्वतः एक फिरते वाचनालय

सरांचे नावडते इंग्रजी इतके प्रगल्भ होत गेले की त्यांनी शिकवणाऱ्या शिक्षकालाही अवाक व्हायची वेळ आणली. बी. ए. बी. एड्.च्या प्रात्यक्षिकाद्वारे शिक्षकीपेशातील एकेक पैलू उलगडत जाणारे लेखक शिकवणाऱ्या शिक्षकांना इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी वाटावेत ही अभिमानास्पद बाब केवळ ध्येयवेड्या कुंभार सरांनाच जमली होती. रद्दीमोल ढिगातून निवडक पुस्तके घेऊन जाणाऱ्या सरांना अवांतर वाचनाचा वैचारिक खुराक भरपूर मिळाल्याने ते स्वतः एक फिरते वाचनालय होते. असे असले तरीही गावातील वाचनालयाच्या निधीसाठी अनेक कामे करत वाचनसंस्कृतीला त्यांनी पाठबळ देण्याचं काम केले.

संमेलनातून साहित्यिकांना प्रोत्साहन

आर्थिक ओढाताण कमी करण्याकरिता नोकरीचा प्रयत्न करताना संस्था चालकांचा जातीभेद, ठरलेले दर, आधीच केलेली नियुक्ती यातून ज्ञानाच्या जोरावर लेखक हायस्कूलच्या नोकरीतही स्थिरस्थावर झाले. त्या ठिकाणीही त्यांचे इंग्रजीचं ज्ञान त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. हायस्कूलची नोकरी सोडून काॅलेजवर रुजू होणाऱ्या लेखकांनी वेदसागर साहित्यमंच स्थापून साहित्यसंमेलन भरवायला सुरवात केली. साहित्य संमेलनामागची त्यांची दूरदृष्टी सफल झाल्याचे जाणवते. त्याच संमेलनातून आज तालुक्यात बरेच साहित्यिक निर्माण झालेत हे केवळ त्यांच्या त्यावेळेच्या कृतीमुळेच. अशाप्रकारे जीवनप्रवासात धावणारा लेखकरुपी वारू लग्नबेडीत अडकूनही जास्त गतीने धावत होता. शेवटी इंग्रजी विषयात डाॅक्टरेट मिळवून लेखकाने आयुष्यातील पहिला रंगमंच थांबवलेला आहे.

उत्स्फुर्तपणे लेखन

जीवनपटातील सर्वच बाबी खुलेपणाने मांडत लेखकांच्या राजहंसरूपी लेखनीतून प्रकाशित झालेले अर्जुनाचे एकलव्यायन अगदी सुसंगत पुस्तक आहे. लेखनातील बडेजाव, पोषक लेखन, या बाबींना फाटा देत उत्स्फुर्तपणे लेखन करत प्रकाशित झालेले हे आकर्षक पुस्तक वाचताना स्टार्ट टू एंड हीच मनस्थिती निर्माण करते. आकर्षक छपाई, उत्कृष्ट बांधणी, उत्तम दर्जा, आणि सारा सार प्रतिबिंबित करणारे मुखपृष्ठ याद्वारे नजर स्थिरावणारे हे पुस्तक मनातील नकारात्मकरुपी अंधार बाजूला सारत सकारात्मकतेची ज्योत पेटवेल हे निश्चित. !

‘अर्जुनाचे एकलव्यायन’ आत्मकथन खूप भावले . हिरे कॉलेजपर्यंतचा प्रवास डॉ. अर्जुन कुंभार यांनी अतिशय प्रामाणिकपणे कथन केला आहे. आदर्शवादी असण्याच्या नादात बॅडमिंटनचा खेळ त्यांनी लपवला नाही. डॉ. कुंभार यांच्या निव्वळ धाडसी आणि प्रामाणिक बाण्यामूळं. पुस्तक वाचकाला कुठेही थांबवत नाही. ते त्याला पुढे पुढे घेऊन जाते. तसेच, पुस्तकात ग्रामीण जीवनाचे चांगले दर्शन घडते. एका अर्जुनातील एकलव्याची जिद्द, कष्ट, निर्धार यांच्या जोरावर आयुष्य यात्रा अनेक वळणावरून पुढे मागे होते पण ती पुढे सरकण्यासाठी. फोंड्या मधील नोकरीचा पहिला प्रयत्न मनाला फार वेदना देतो.ज्याला जात -धर्म याचं खरं स्वरूप माहीत आहे त्याला फार छळणारं आहे. पुस्तक म्हणजेच तुमचं जीवन, जगणं आणि इंग्रजी यांच्यातील एक विलक्षण चढाओढ आहे,अन हे थांबतं जेव्हा तुम्ही हिरो सारखे हिरे कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून प्रवेश करता….

प्रा. रघुनाथ ढमकले

प्रमुख, इंग्रजी विभाग ,
न्यु काॅलेज, कोल्हापूर
माजी अध्यक्ष व कार्यवाह ,सुटा(कोल्हापूर जिल्हा )

पुस्तकाचे नाव – अर्जुनाचे एकलव्यायन

लेखक – अर्जुन कुंभार (9890156911)

प्रकाशक – तेजश्री प्रकाशन (8275638396)

पृष्ठे – 186 किंमत – 250 रु.

Related posts

अक्षरसागरचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

त्या दिवशी सर गाडी घेऊन आले नसते तर…

मळमळ

Leave a Comment