April 16, 2024
Bandopant Bodekar Harishchandrachi Factory Book Review by Shrikant Dhote
Home » हरिश्चंद्राची फॅक्टरीः झाडीबोली साहित्य चळवळ समृद्ध करणाऱ्या जीवनयोध्याचा प्रवास
मुक्त संवाद

हरिश्चंद्राची फॅक्टरीः झाडीबोली साहित्य चळवळ समृद्ध करणाऱ्या जीवनयोध्याचा प्रवास

सृजन चंद्रपूर या संस्थेच्या वतीने ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी डॉ. हरिश्चंद्र बोरकरांची प्रकट दीर्घ मुलाखत घेतली असून ती मुलाखत “हरिश्चंद्राची फॅक्टरी ” म्हणून पुस्तकरूपाने प्रकाशित झाली आहे.

✍️ श्रीकांत दि. धोटे

टाकळी (चनाजी) जि. वर्धा

“हरिश्चंद्राची फॅक्टरी ” हे नाव ऐकले तर आपल्याला आठवतात ते भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके , ज्यांनी पहिला भारतीय चित्रपट तयार केला व त्याचे नाव होते “हरिश्चंद्राची फॅक्टरी “. मात्र मी त्या हरिश्चंद्राच्या फॅक्टरी बाबत बोलत नसून विदर्भाच्या मातीत जन्मलेल्या व आपल्या बोलीभाषेस मायेचा दर्जा देणाऱ्या, आपली बोलीभाषा समृद्ध व्हावी, आपल्या परंपरागत कला जगाव्या, त्यांचा उद्धार व्हावा यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या डॉ. हरिश्चंद्र बोरकरांबाबत.
सृजन चंद्रपूर या संस्थेच्या वतीने ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी डॉ. हरिश्चंद्र बोरकरांची प्रकट दीर्घ मुलाखत घेतली असून ती मुलाखत “हरिश्चंद्राची फॅक्टरी ” म्हणून पुस्तकरूपाने प्रकाशित झाली आहे.

आज फेसबुक, व्हॉट्सअपच्या जमान्यात अनेक साहित्य चळवळी महाराष्ट्रात आहे . प्रत्येक साहित्यिकानिहाय मंडळ आहे. स्वतःचे बॅनर तयार करून साहित्य मंडळ स्थापन करणे ही आता सामान्य बाब झाली आहे. एक साहित्यिक म्हणून मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी हि बाब चांगलीच आहे. मात्र मला झाडीबोली चळवळीचे कायमच आकर्षण वाटत आले आहे.

मी मूळचा वर्धा जिल्ह्याचा असल्याने येथे मुख्यतः वऱ्हाडीचा प्रभाव असून थोड्याफार प्रमाणात झाडीचाही प्रभाव जाणवतो. झाडी ही मराठीच आहे त्यामुळे ते ओघाने आलेच. मात्र जे झाडीतील अस्सल शब्द आहेत, त्यातील काही शब्द आणि भाषेचा लहेजा काहीकाही शब्दांमध्ये स्पष्टपणे जाणवतो. झाडी म्हणजे जंगल व जंगलव्याप्त दुर्गम भाग. मात्र अशाही परिस्थितीत तिथले लोक आपली बोलीभाषा जगविण्याकरिता, तिला समृद्ध करण्याकरिता प्रयत्न करतात, याचे आकर्षण मला होते.

मात्र झाडीबोली साहित्याशी प्रथम संपर्क आला तो ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्यामुळे. राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे सहावे राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन सन २००८ साली आमच्या टाकळी (जि.वर्धा ) गावात झाले . तेव्हापासून या झाडीबोलीची ओळख व्हायला लागली आणि योगायोगाने तीन वर्षापूर्वी या भागात नोकरी निमित्याने काम करण्याची संधी मिळाली . झाडीपट्टी, झाडीबोलीभाषेशी संपर्क आला.

राका ( सौदंड) येथे झालेल्या राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनात हरिश्चंद्र बोरकर या अवलियास प्रत्यक्ष बघण्याचा योग्य आला. ज्या व्यक्तीबाबत आपण विचार करीत होतो . त्या व्यक्तीचे भाषण जवळपास तासभर मनभरून ऐकले . त्यामुळे हा व्यक्ती साधी नसून प्रकाड पंडित असल्याचे लक्षात आले. अमोघ वक्तृत्व, प्रमाणभाषा, व्याकरण वरील उत्तम पकड तरीही बोलीभाषेचा आग्रह आणि तिच्या संवर्धनासाठी केलेले प्रयत्न हे विलक्षण होतं. आणि मग अजून या व्यक्तीविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा मनात जागृत झाली आणि हातात पडले ते बंडोपंत बोढेकर यांचे ” हरिश्चंद्राची फॅक्टरी ” हे पुस्तक. या पुस्तकामुळे झाडीवूडच्या या अमिताभ बच्चनचा परिचय झाला.

या मुलाखतीत बंडोपंतांनी डॉ. बोरकरांच्या जीवनकार्यापासून ते झाडीबोली साहित्य चळवळ, झाडीपट्टी रंगभूमी, लोककला, दंडार, संशोधन इत्यादी सर्व विषयांवर डॉ. बोरकरांना बोलते केले असून डॉ . बोरकरांचा जीवनपटच उभा केलेला आहे. या पुस्तकात बंडोपंत बोढेकर हे या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच डॉ. बोरकरांविषयी असे लिहितात, कि कोणताही कवी हा आपली एकतरी कविता हि आपल्या आई वर लिहीत असतो तसाच झाडीपट्टीतील कवी आपली दुसरी कविता हि बोरकरांवर लिहिल्याशिवाय राहत नाही . एवढे मोठे वर्णन केले गेले आहे. तर अश्या कवितांचा “झाडीचा राजा – हरिश्चंद्र ” हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह सुद्धा प्रकाशित झालेला आहे. तर खडीगंमत हे लोकनाट्य असून हे ‘लीळाचरित्र ‘ व इतर ग्रंथांचे पुरावे देऊन सिद्ध केले आहे. यावरून डॉ. बोरकरांचे थोरपण आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही.

मुलाखतीच्या सुरवातीच्या भागात मुलाखतकाराने डॉ . बोरकरांना त्याच्या सुरवातीच्या जीवनावर बोलते केले. भंडारा जिल्हा साकोली तालुक्यातील रेंगेपार कोहळी हे त्यांचे जन्मगाव. आपल्या गावाबद्दल बोलताना डॉ. बोरकर म्हणतात,
“प्रातःकाळी सृष्टी सतीला स्वप्न पडे साकार,
खेडे रेंगेपार, माझे खेडे रेंगेपार … “
आपल्या गावाविषयी मुलाखतीत डॉ. बोरकर हे भरभरून व्यक्त झाले आहे. तर ईश्वराने मला जर पुन्हा पृथ्वीवर पाठवायचे ठरवले तर ‘ याच गावात मला जन्म द्यावा’ अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे.

दंडार हे विदर्भाचे लोकनाट्य . मी माझ्या आजोबांकडून दंडारी विषयी खूप ऐकले होते. म्हणजे आता जी दंडार फक्त झाडीपट्टीपुरती आहे ती अगोदर वर्धा जिल्ह्यातही केली जात होती. मात्र ती वर्धा जिल्ह्यातून मोठ्या वेगाने बाद झाली आणि झाडीपट्टीत ती टिकून राहिली. डॉ. बोरकरांनी तिला नवसंजीवनी दिली व तिला जागृत केले. तिच्यामध्ये काही बदल करून तिला वेगळा आयाम प्राप्त करून दिला. त्या दंडारीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेली, राजस्थानात सुद्धा तिचे प्रयोग घडवून आणले. दंडारी प्रमाणेच डॉ. बोरकरांनी नाटकाचे लेखन, दिग्दर्शन व अनेक भूमिका, गीतलेखन केलेले आहे. शहरातील फिरत्या रंगमंचाला पर्याय म्हणून नाटकाकरिता डॉ. बोरकरांनी जुळ्या रंगमंचाची निर्मिती करून तिचा उपयोग झाडीपट्टीच्या नाटकांमध्ये केला आहे.

झाडीपट्टीतील नाटकांमध्ये स्त्री ची भूमिका हे पुरुषच करायचे मात्र झाडीपट्टीतील नाटकांमध्ये महिलांना पहिल्यांदा प्रवेश मिळवून दिलेला आहे. नाटक, दंडारीप्रती डॉ.बोरकर एवढे एकरूप झाले होते कि ते त्याच गावात उपस्थित असूनही त्यांना स्वतःला पुत्ररत्न झाल्याची बातमी तीन दिवसानंतर मिळणं यावरून कुणी त्यांना वेडे म्हटले असेलही कदाचित.‌ मात्र यावरून त्यांचे कलेप्रती समर्पण दिसून येते.

जसजशी मुलाखत पुढे पुढे सरकत जाते तसतसे डॉ. बोरकरांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडत जाते. डॉ. बोरकर हे उत्तम कवी, गीतकार आहेत त्यांनी अभंग, लावण्या, देशभक्तीपर गिते रचलेली आहेत. त्याकाळी इयत्ता नववीत असताना त्यांनी इंग्रजी कवितांचा मराठी अनुवाद करण्याचे शिवधनुष्य पेलले आहे. या मुलाखतीत तत्कालीन राजकारण्यांविषयी एक प्रसंग वर्णन करतांना त्यावेळचे तत्कालिन आमदारांनी स्वतः थांबून स्वतः च्या सायकलवर लिफ्ट दिली तर एका आमदाराच्या घरी जेव्हा ते गेले तेव्हा तो आमदार स्वतः लाकडे फोडीत होता यावरून तत्कालीन राजकीय परिस्थिती कशी होती याचे भान येते. व आज राजकारण कुठे चालले आहे याची प्रचिती येते.

त्याअर्थानेही ही मुलाखत फार महत्वाची व राजकीय – सामाजिक परिस्थितीचा वेध घेणारी ठरते. जेव्हा एखाद्या लेखकाला आपले पुस्तक प्रकाशित करायचे असेल तर प्रकाशनाचा संपूर्ण खर्च हा त्याला स्वतःला करावा लागतो हे सर्वश्रृत असताना डॉ. बोरकरांची पुस्तके पुण्या- मुंबईचे प्रकाशक त्यांना भरघोस मानधन देऊन कशी प्रकाशित करतात याचाही वेध घेतला आहे. डॉ. बोरकरांनी झाडीबोलीवरच पीएचडी केली असून डॉ. बोरकरांच्या साहित्यावर नरेंद्र आरेकर यांनी पीएचडी केलेली आहे. झाडीबोलीचा शब्दकोश त्यांनी निर्मिलेला आहे. आद्यकवी मुकुंदराज यांच्या जन्मस्थळासंबंधी अंभोरा ते खेडले (अंबेजोगाई ) अशी यात्रा काढली व सप्रमाण मुकुंदराज हे अंभो-याचेच हे सिद्ध करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

डॉ .बोरकर आपल्या मुलाखतीत सांगतात कि मी लोकसाहित्य म्हणजे काय? त्याच्या अध्ययनाच्या पद्धती कोणत्या? मुलतत्वे कोणती ? अश्या बौद्धिक व सहेतुक चर्चा करण्याचे टाळले. कारण त्यापेक्षा सभोवताल मरणासन्न असलेल्या लोककला पूनर्जीवित करणे व त्यांचे ज्ञान लोकांपर्यंत पोहचविणे हे माझ्या संशोधनाचे मूळ उद्दिष्ट आहे. डॉ. बोरकरांची अनेक पुस्तके ही विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेली आहे.

बोली चळवळीबाबत बंडोपंत बोढेकरांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना सुरवातीलाच डॉ. बोरकर म्हणतात कि, प्रमाण व बोलीभाषा यामधील फरक मला सुरवातीपासूनच जाणवू लागला. पीएचडी करताना “झाडीबोलीचे भाषाशास्त्रीय अध्ययन ” हा विषय फक्त पीएचडी पुरता मर्यादित न ठेवता “झाडीबोली साहित्य चळवळ ” हा प्रकल्प म्हणून मनात साकारला व त्यातूनच “झाडीबोली साहित्य व मार्गदर्शन केंद्राची ” निर्मिती झाल्याचे ते सांगतात. आजपर्यंत झालेल्या संमेलनावर प्रकाश टाकताना तसेच संमेलनाचे स्वरूप, वैशिट्य व या चळवळीने आज काय मिळवले यावर खुलेपणाने ते बोलताना दिसतात. तर हि चळवळ उभी करताना झाडीबोली चळवळीवरील काही आक्षेपही ते इथे मोकळेपणाने नमूद करतात. सुरवातीच्या काळात लोक असे म्हणत होते कि, ” तुम्ही आम्हाला झाडीबोली बोलण्याचा आग्रह करून मागे नेत आहात ” , ” तुम्हाला शुद्ध मराठी बोलता येत नाही म्हणून तुम्ही झाडीबोली नावाची दुकानदारी सुरु केली आहे.” यावर उत्तर देतांना डॉ. बोरकर म्हणतात कि मी प्रमाण मराठी भाषा बोलू नका असे म्हणत नाही तर , आपल्या बोलीला मारू नका. बोरकरांनी फक्त झाडीबोलीचेच कार्य केले नाही तर, मराठीच्या विविध बोलींकरिता त्यांनी आजवर आठ संमेलने घेतलेली आहे.

ग्रामगीताचार्य बोढेकर यांनी डॉ. बोरकरांची घेतलेली हि प्रकट मुलाखत फक्त डॉ. बोरकरांचा जीवनपटच उलगडत नाही तर लोकसाहित्याचे, बोलीभाषेचे, लोककलेचे महत्व काय आहे ? ती आपण का जतन करावी ? , लोककला ही कशाकरिता जगली पाहिजे?, हे स्पष्ट करते. या पुस्तकातून लोकसाहित्याचे व ग्रामीण बोलीभाषेचे महत्व अधोरेखित होते . एक दोन वर्षांपूर्वी टीव्हीवर एका मोठ्या साहित्यिकांचे भाषण ऐकण्यात आले होते. त्या भाषणात त्यांनी असे म्हटले होते कि ,आज भाषा जीवंत आहे ती बोलीभाषेमुळे, ग्रामीण लोकांमुळे. बोलीभाषेत निर्माण होणारे साहित्य हे अनुभवावर आधारित असते. त्या विधानाचा प्रत्यय डॉ. बोरकरांच्या कार्याचा आढावा घेतला की चटकन लक्षात येते.

मुलाखतकाराने डॉ. बोरकरांना बोलते करण्याचा केलेला प्रयत्न हा एखाद्या विद्यापीठास बोलते करण्यासारखे आहे व ती जबाबदारी बंडोपंत बोढेकर यांनी लीलया पेलली आहे. मराठी साहित्याच्या प्रांतात डॉ. हरिश्चंद्र बोरकर हे त्यामानाने उपेक्षित असले तरी डॉ. बोरकरांचे कार्य, त्याची ग्रामीण बोलीभाषा जगविण्याची तगमग, लोककला, लोकसाहित्य रुजविण्यासाठी केलेले प्रयत्न हे मराठी साहित्यावर केलेल्या उपकारासमान असून बंडोपंत बोढेकरांनी मुलाखत घेऊन ती पुस्तकरूपाने प्रकाशित केली. मराठी साहित्य विश्वातील डॉ. बोरकर याची खरी पारख केली आहे. येणाऱ्या काळात हे पुस्तक व डॉ. हरिश्चंद्र बोरकर हि व्यक्ती समस्त साहित्यिक वाचक यांचेसाठी मार्गदर्शक ठरेल यात अजिबात शंका नाही.बोलीभाषा, ग्रामीण साहित्यावर प्रेम असणारे, लोककलेवर प्रेम असणारे, लोकसाहित्यावर प्रेम असणाऱ्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे.

पुस्तकाचे नाव – हरिश्चंद्राची फॅक्टरी (मुलाखत)-
लेखक – ग्रामगीताचार्य बंडोपंत राजेश्वर
प्रकाशक – तारा प्रकाशन साकोली
प्रथमावृत्ती – २०१८
मूल्य – २५० रू.पृष्ठे – १५५
पुस्तकासाठी संपर्क – 9975321682

Related posts

स्त्रियांवरील विनोद आणि सामाजिक मानसिकता

वाचनकट्टा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवा

खरीप विपणन हंगामात सुमारे 18.17 लाख शेतकऱ्यांना लाभ

Leave a Comment