March 29, 2024
Book Review of Mi Mahamad Khan Shapathewar Sangto ki
Home » एक विलक्षण सुन्न करणारं आत्मकथन…
मुक्त संवाद

एक विलक्षण सुन्न करणारं आत्मकथन…

निरपराधाचे आत्मकथन
एका बाजूने ही कहाणी कमालीची हृदयद्रावक आहे. ती वाचताना डोळे पाणावतात, मन भयकंपित होते. मनाचा सुन्नपणा किती तरी वेळा कमी होत नाही. मनावर गडद मळभ दाटून येते आणि ते बराच काळ टिकून राहते. इंग्रजीतून मराठीत येताना हा परिणाम उणावत नाही, हे आवर्जून नमूद करायला हवे.

– डॉ. चंद्रशेखर बर्वे

कथेचा सारांश ऐका सुनिता लोहोकरे यांच्याकडून…

पहीला भाग ऑडिओ…आवाज – सुनिता लोहोकरे

‘फ्रेम्ड अॅज अ टेररिस्ट’ या मूळच्या इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद आहे. पुस्तक मूळचेच वाटावे इतका अनुवाद अस्सल आहे; पण या दृष्टीने त्याची दखल घेण्याऐवजी आशयदृष्ट्या दखल घेणे अधिक योग्य ठरेल. कारण तो अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण करणारा आहे. याची नेमकी पूर्ण जाणीव होण्यासाठी सगळे पुस्तकच काळजीपूर्वक वाचले पाहिजे. येथे त्याची जुजबी ओळख करून देणेच शक्य आहे.

प्रथमदर्शनी मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या सर्जनशील कुंचल्यातून साकारलेले कमालीचे बोलके व सूचक दहशतीच्या सावटातील निरागस डोळे एकदम वेधक. खरे खोलवर वेध घेणारे काय, याची कल्पना मलपृष्ठाखाली ‘ब्लर्ब’मधील मजकुरावरून येते. जुन्या दिल्लीतील एका गरीब कुटुंबातील सालस मुलगा कराचीत राहणाऱ्या बहिणीला भेटायला एकटाच निघतो. गुप्तहेरखात्याचे अधिकारी त्याला गाठतात. पाकिस्तानातून एक महत्त्वाचे पाकीट आणण्याचे काम त्याच्यावर सोपवतात. अजाणतेपणी तो ते करायला तयारही होतो. मात्र, परत येताना तपासणीत पाकिटासह आपण पकडले जाऊ या भीतीपोटी तो ते फेकून देतो आणि आपल्याच देशात त्याची दुर्देवी, भयानक ससेहोलपट सुरू होते. पोलिसांकडून अपहरण, गुप्तहेरांकडून अतोनात छळ, खोट्या साक्षींच्या आधारे दहशतवादी म्हणून तुरुंगात रवानगी, बेदम मारझोड आणि १४ वर्षे एकांत कोठडीत डांबणूक.

कथेचा सारांश ऐका सुनिता लोहोकरे यांच्याकडून…

दुसरा भाग ऑडिओ..आवाज सुनिता लोहोकरे

एका बाजूने ही कहाणी कमालीची हृदयद्रावक आहे. ती वाचताना डोळे पाणावतात, मन भयकंपित होते. मनाचा सुन्नपणा किती तरी वेळा कमी होत नाही. मनावर गडद मळभ दाटून येते आणि ते बराच काळ टिकून राहते. इंग्रजीतून मराठीत येताना हा परिणाम उणावत नाही, हे आवर्जून नमूद करायला हवे.

विलक्षण परिणामकारक अशा या कहाणीला दुसरीही एक उजळ बाजू आहे. तिथे काळ्या कभिन्न काळोखामध्ये देखील, सत्प्रवृत्ती, सुसंस्कृतता, उज्ज्वल भविष्यासाठी झेपावणारी जिद्द, एक उदात्त धडपड, हे सगळे रोमांचकारी आशादायक रूपात पाहायला मिळते. आई-वडील विशेषत: वडिलांच्या शोचनीय मृत्यूनंतर वृद्ध, जराजर्जर आई, काळ्या कोटात धवल अंत:करण सांभाळणारे काही दृढनिश्चयी वकील आणि मुख्य आमिरवर जीवेभावे उत्कट प्रेम करणारी त्याची १४ वर्षे वाट पाहणारी अन् त्याच्याबरोबर निर्धाराने शादी करणारी आलिया. या सगळ्या घनघोर मेघांना उजळून टाकणाऱ्या सुवर्णरेखांमुळे हृदयद्रावक असूनसुद्धा कहाणी सुसह्य तर होतेच, शिवाय ती उन्मळून टाकत नाही.

एकूण निरपराध आमिरचे उद्विग्न करणारे, तरीही भलेपणावरील श्रद्धा शाबूत ठेवणारे असे हे महंमद खानचे सत्त्वसंपन्न आत्मकथन. मराठीत आजवर असे आलेले ऐकिवात नाही. या दृष्टीने किंवा अर्थाने सदर पुस्तक निराळे आहे.

असे असले तरी याचे महत्त्व किंवा मोल आणखी काही महत्त्वाच्या पैलूंकरिता आहे, हे स्पष्ट व्हावे म्हणून तीन गोष्टींकडे बारकाईने पाहणे अत्यावश्यक आहे. ‘पूर्वपिठिका’, ‘न्यायालयीन निकालाचा गोषवारा’ व ‘देशभर क्षोभ’ या तीन छोटेखानी प्रकरणातून संबंधित गोष्टी व पैलू लख्खपणे दिसून येतात.

‘पूर्वपपीठिका’मध्ये प्रथम सामाजिक व कौटुंबिक पृष्ठभूमी सांगितलेली आहे आणि नंतर सगळ्या प्रकरणाची थोडक्यात क्रमवार हकीकत सांगितलेली आहे. यामुळे पुढे येणाऱ्या आत्मकथनाचे आकलन नीट होण्यासाठी आवश्यक ते दर्शन तारतम्य (perspective) प्राप्त होते. बरोबर दर्शनबिंदू (point of focus) सापडल्यामुळे आकलन चुकीचे होण्याचा संभव राहतच नाही. आत्मकथन म्हणून आत्मकथनाचे आकलन व्हावे हे पूर्वपीठिका लिहिणाऱ्या नंदिता हक्सर यांना अपुरे वाटत असावे. म्हणूनच पोलिस, न्यायालये, तुरुंग या सर्व यंत्रणांविषयी त्यांनी सडेतोड लिहून वाचकांचा कल ‘मानवी हक्क संरक्षणा’कडे व्हावा, असा रोख ठेवलेला आहे. ‘भ्रष्ट यंत्रणेचा बळी ठरलेल्या निष्पाप जीवाची कथा’ सादर करण्यात त्यांचा हेतू केवळ वाङ्मयीन नाही, तर कधी ना कधी सगळ्या देशवासीयांच्या मनात अन्यायाप्रती प्रक्षोभ जागृत व्हावा असा शुद्ध सामाजिक आहे.

‘न्यायालयीन निकालाचा गोषवारा’ या शीर्षकाखाली सन २००७ मधील निकालपत्रातील न्यायाधीशांची जी निरीक्षणे नोंदवली आहेत आणि जे निष्कर्ष पेश केले आहेत त्यांमागील हेतूही वरील हेतूस पूरक व पोषक असाच आहे. प्रकरणाची कायदेशीर बाजू कळावी आणि तटस्थ विचारांती संघटित लोकमानस तयार व्हावे, असाच तो दिसतो. ‘आरोप सिद्ध होण्यासाठी ठोस पुरावे सादर करण्यास सरकारी पक्षाला पूर्ण अपयश आले आहे.’ हे निकालपत्रातील अखरेचे वाक्य! निरपराधी असून दोषारोप सहन करणाऱ्यांना हा मोठा आशादायक दिलासाच.

‘देशभर क्षोभ’मध्ये ‘एनडीटीव्ही’ या वृत्तवाहिनीवरील ‘बक स्टॉप्स हिअर’ या कार्यक्रमाचा खास उल्लेख आहे. त्यात बरखा दत्त यांनी एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला विचारलेल्या प्रश्नाचा व त्या अधिकाऱ्याने दिलेल्या उत्तराचा निर्देश आहे. यावरील ‘देशाच्या घटनेअंतर्गत मिळालेल्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवण्यासाठी कायद्यातील आणखी किती पळवाटा ते काढणार आहेत?’ हा तळतळून केला गेलेला रोकडा सवाल तथाकथित न्यायावरही झणझणीत प्रकाश टाकतो. मानवी हक्कांच्या दृष्टीने व्यापक प्रबोधन व जागरण झाले पाहिजे. हाच सूर उपरोक्त तीन गोष्टी व पैलू यांतून ध्यानात येतो.

प्रस्तुत अनुवादाच्या योगे अनुवादिकेने (अर्थात प्रकाशकांनीही) वाङ्मयीन व सामाजिक अशा दोन्ही बाबतीत महत्त्वाची व मोलाची भर मराठी वाङ्मयात घातली आहे. यातून प्रेरणा, स्फूर्ती, ताकद घेऊन न्यायरक्षणासाठी भक्कम, मजबूत, अभेद्य फळी उभी राहिली, तर तिचे खरे सार्थक!

पुस्तकाचे नाव – मी महंमद खान शपथेवर सांगतो की…
लेखक : महंमद आमिर खान, नंदिता हक्सर
अनुवाद : सुनीता लोहोकरे
प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे
पृष्ठं : १५६ किंमत : १८० रु.

एक विलक्षण सुन्न करणारं आत्मकथन…

महंमद आमिर खान जुन्या दिल्लीतील गरीब कुटुंबातील मुलगा. दहावीच्या परीक्षेनंतर कराचीत राहणार्‍या आपल्या मोठया बहिणीला भेटायला गेला. दिल्लीतील गुप्तहेर यंत्रणेचे अधिकारी त्याच्यावर पाकिस्तानातून एक पाकीट आणण्याची कामगिरी सोपवतात. देशप्रेमापोटी अजाणतेपणे तो होकार देतो. कराचीत तिथल्या पोलीसांच्या भीतीपोटी तो ते पाकीट फेकून देऊन रिकाम्या हातानं दिल्लीला परततो. दिल्ली पोलीस त्याचं अपहरण करतात. गुप्तहेर यंत्रणा त्याचा अतोनात छळ करतात.

त्याच्यावर तब्बल 19 खोटे खटले भरले जातात. त्याला अतिरेकी ठरवले जाते. खोटे साक्षीदार उभे केले जातात. बनावट पुरावे तयार केले जातात. चौदा वर्षे त्याला कच्च्या कैदेत तुरूंगात काढावे लागतात. त्याचे वडील कोर्टात हेलपाटे मारून थकतात. मरून जातात. आईही थकते. अर्धांगवायूनं आजारी पडते. मरते. अखेर त्याची 17 केसेसमधून निर्दोष सुटका होते. दोन खटले अद्यापही रेंगाळलेत.

पुस्तकाच्या शेवटी तो म्हणतो, “मी पुर्णपणे मुक्त नसलो, तरी तुरुंगातही नाहीये. अन्यायाविरूद्ध लढतोय आणि आपल्यापैकी आणखी काही लोक लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या या लढ्यात सहभागी झाले, तर आपण समाज बदलू शकतो.”

एक निरपराध तरूणाची वयाच्या अवघ्या 20 वर्षांपासून तुरुंगवासानं सुरू होणारी ही लढत आज पस्तीशीच्या टप्प्यावर पोचलीय. एक विलक्षण सुन्न करणारं आत्मकथन.
– प्रा. हरी नरके

Related posts

आंबा आठवणीतला

भारतातील 2000 वर्षे जुना पुरातत्व, वनस्पतीशास्त्रविषयक आणि समस्थानिक डेटा देतो भविष्यातील हवामान बदलाचे संकेत

“दुर्गांच्या देशातून : वैविध्याने नटलेला दिवाळी अंक नव्हे, संदर्भ ग्रंथ”

Leave a Comment