March 29, 2024
Book Review of Sandeep Wakchoure Shikshanache Pasaydan
Home » शिक्षणाचे पसायदान: शैक्षिक यज्ञ !
मुक्त संवाद

शिक्षणाचे पसायदान: शैक्षिक यज्ञ !

आजवर शिक्षणक्षेत्रात नानाविध प्रयोग करुनही, अनेकानेक योजनांची अंमलबजावणी होऊनही मुले मात्र अंधारात चाचपडत असल्याचे वास्तव मुखपृष्ठावर फळ्याच्या खाली चितारले आहे. शिक्षण क्षेत्राशी निगडित कुणीही हे वास्तव नाकारणार नाही हे कटूसत्य आहे. त्यामुळे या पुस्तकात लिहिलेला मजकूर किती तळमळीने लिहिलेला असेल याची जाणीव होते.

नागेश सू. शेवाळकर, पुणे
९४२३१३९०७१

कौन कहता है
आसमाँ को छेदा नही जा सकता
तबियत से पत्थर तो
उछालो यारो।
अशा काहीशा ओळी शिक्षक असताना शिक्षकांच्या प्रशिक्षणात ऐकायला मिळत असत. ह्या ओळी आठवण्याचे कारण म्हणजे ‘शिक्षणाचे पसायदान’ हे पुस्तक वाचण्यात आले. पसायदान म्हटलं की, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या अजरामर अशा ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथाची आठवण येते. सोबतच महाराजांनी लिहिलेली ‘पसायदान’ ही प्रार्थनाही जीभेवर येते. आपण माणसे आरंभशूर असतो. कोणताही संकल्प आपण भावनेच्या आहारी जाऊन करतो परंतु अंमलबजावणीची वेळ आली की मात्र आपण केलेला संकल्प विसरून जातो, पळवाटा शोधतो. परंतु दृढ संकल्प करुन त्यावर तितक्याच निर्भयपणे मार्गक्रमण करणाऱ्या व्यक्तीही आहेत.

‘शिक्षणाचे पसायदान’ हे पुस्तक लिहिणारे लेखक संदीप वाकचौरे हे शिक्षण क्षेत्रातील एक ठळक नाव ! ते अनेक वर्षे विविध शैक्षणिक समित्यांवर काम करीत आहेत. शिक्षण या विषयावर त्यांची आतापर्यंत नऊ पुस्तके प्रकाशित आहेत. यावरुन त्यांचा शिक्षण क्षेत्राचा अभ्यास, तळमळ, व्यासंग, अधिकार लक्षात येतो. मागील महिन्यात त्यांचा ‘शिक्षणाचे दिवास्वप्न’ हे पुस्तक प्रकाशित झाले. त्यांनी दर महिन्याला एक अशी बारा पुस्तके प्रकाशित करण्याचा संकल्प केला. त्या संकल्प मालिकेतील हे दुसरे पुष्प! हे दोन्ही पुष्प घनश्याम पाटील प्रकाशक, चपराक प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केली असून उर्वरित पुस्तके पुढील दहा महिन्यात प्रकाशित करण्याचा संकल्प, निर्धार या पुस्तकाचे लेखक आणि प्रकाशक यांनी केला आहे. एक लेखक म्हणून मला एक पुस्तक प्रकाशित करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात याची जाणीव आहे म्हणून मला या निर्धाराचे कौतुक वाटते. लेखकाने मोठ्या उत्साहाने एखादे पुस्तक लिहिले तरी त्या पुस्तकासाठी तसा धडाडीचा प्रकाशक मिळणेही अत्यंत आवश्यक आहे. प्रकाशक पाटील हे धडाडीचे प्रकाशक म्हणून परिचित आहेत. जेव्हा दोन संकल्पपटू एकत्र येतात तेव्हा बारा पुस्तकांचा मैलाचा दगड ठराविक काळात पार करणे अवघड नाही कारण श्री वाकचौरे आणि श्री पाटील साथ है तो सबकुछ मुमकीन है। दोघांनाही खूप खूप शुभेच्छा!

नेहमीप्रमाणे चपराक प्रकाशनाने हे पुस्तक अत्यंत देखणे नि आकर्षक स्वरुपात प्रकाशित केले आहे. विषय शिक्षणाचा म्हणून ‘खडूफळा’ असणारे मुखपृष्ठ अत्यंत विचारपूर्वक आणि सुसंगत असेच आहे. आजवर शिक्षणक्षेत्रात नानाविध प्रयोग करुनही, अनेकानेक योजनांची अंमलबजावणी होऊनही मुले मात्र अंधारात चाचपडत असल्याचे वास्तव मुखपृष्ठावर फळ्याच्या खाली चितारले आहे. शिक्षण क्षेत्राशी निगडित कुणीही हे वास्तव नाकारणार नाही हे कटूसत्य आहे. त्यामुळे या पुस्तकात लिहिलेला मजकूर किती तळमळीने लिहिलेला असेल याची जाणीव होते.

या पुस्तकाला घनश्याम पाटील यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि संत साहित्याचा दाखला देऊन वाचनीय, उद्बोधक अशी प्रस्तावना लिहिली आहे. श्री पाटील लिहितात, ‘खरंतर ‘ज्ञानेश्वरी’ हे एक विद्यापीठच आहे. त्यातील शब्द न शब्द आपल्याला शिकवत असतो, प्रेरणा देत असतो. त्यामुळं त्यातून काही ओव्या निवडणं आणि सुसंगतपणे पालक आणि पाल्य यांच्यासाठी वाङ्मय निर्माण करणे हे अतिशय जिकरीचं काम आहे. वारकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या आणि कायम ‘विद्यार्थीमय’ जीवन जगणाऱ्या वाकचौरे सरांनी हे शिवधनुष्य पूर्ण सामर्थ्यासह पेललं आहे.’ या वाक्यांमधून पुस्तकाची महती किती मोठी आहे हे लक्षात येते.

लेखकांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथातील अनेक ओव्या उद्धृत करताना त्या ओव्या आजच्या काळातही किती महत्त्वाच्या आहेत हे साध्या, सरळ, सोप्या भाषेत मांडले आहे. पुस्तकाचे शीर्षक याबद्दल लेखक मनोगतात लिहितात, ‘ज्ञानेश्वरांनी जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागितले आहे. त्यातून जगाचे कल्याण अपेक्षित आहे. शिक्षणही जगाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आहे. त्यामुळे पुस्तकाला ‘शिक्षणाचे पसायदान’ असे नाव देऊ.’ या वाक्यातून शीर्षकासाठीही किती खोलवर विचार केला आहे हे लक्षात येते. मनोगतानंतर लेखक ‘इतुकेच मागतो’ ही कविता सादर करतात. ही कविता सर्वांसाठी विचारप्रवर्तक अशी आहे. कवी या कवितेत स्वतःसाठी काही मागत नाही तर शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, देशासाठी आणि सोबतच जगासाठीही काहीतरी मागत आहेत. ही मागणी ‘विश्वची माझे घर’ प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज यांच्या विचारांशी सुसंगत अशी आहे. कवितेच्या शेवटी कवी म्हणतात,
‘बालकास शिक्षणाचा हक्क मिळू दे
युद्ध थांबू दे, शांती येऊ दे
शिक्षणातून माझे भाग्य उजळू दे
मज हातून काही राष्ट्रकार्य घडू दे
शिक्षणाने आता अवघे जग बदलू दे’
असे उच्च दर्जाचे उच्चार आणि विचार या पुस्तकात व्यक्त झाले आहेत. एका अर्थाने हे पुस्तक केवळ पसायदान न राहता ती शिक्षणाची ज्ञानेश्वरी झाली असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरु नये. या ग्रंथात तीसपेक्षा अधिक अध्याय आहेत. हे पुस्तक वाचताना ज्ञानेश्वर महाराज यांचे त्या काळातील परिस्थितीसोबतच भविष्याकडेही बारीक लक्ष होते हे लक्षात येते कारण त्या काळात लिहिलेल्या ओव्या केवळ शिक्षण क्षेत्राला आजही मार्गदर्शक ठरतात असे नाही तर त्या समाजालाही दिशादर्शक आहेत. म्हणून त्या ओव्या, ते विचार अजरामर आहेत.

आज समाजात संयम फार कमी आढळून येत असतो. कुणी काही विचार व्यक्त केले की, त्यावर अभ्यास तर सोडा परंतु योग्य विचार न करता ताबडतोब व्यक्त होण्याची परंपरा सुरु आहे. योग्य विचार करण्यासाठी योग्य श्रवण होणे तितकेच महत्त्वाचे आहे परंतु आजकाल कुणी पूर्ण ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. वास्तविक पाहता ‘श्रवण’ हे एक महत्वपूर्ण असे उद्दिष्ट शिक्षण क्षेत्राने निश्चित केले आहे परंतु अंमलबजावणीचे काय? आजकाल शाळांमध्ये भरपूर विद्यार्थी संख्या आहे हे समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटले याचे द्योतक असले तरीही समाजाच्या शिक्षणाकडून काय अपेक्षा आहेत किंवा शिक्षणतज्ज्ञांनी बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा ही दृष्टी समोर ठेवून जी उद्दिष्टे निश्चित केली आहेत त्या पर्यंत आपण पोहोचतो आहोत का? आणि या पार्श्वभूमीवर शेकडो वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरांनी लक्षपूर्वक ऐकण्याची आवश्यकता मांडली आहे. ती महत्त्वाची आहे.

ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
तरी अवधान एकले देईजे। मग सर्व सुखासी पात्र होईजे ।
हे प्रतिज्ञोत्तर माझे। उघड आईक।।
ऐकण्याची सवय विकसित करण्यासाठी किती समर्पक अशी ओवी आहे. तद्वतच लेखक वाकचौरे यांनीही ज्ञानेश्वरीतील आजच्या शिक्षणक्षेत्राला दिशादर्शक ठरतील अशा ओव्या निवडून त्यावर मुक्त चिंतन केले आहे. मुळात ज्ञानेश्वरीचा आधार घेऊन त्यावर लिहिण्यासाठी तितकाच सिद्धहस्त लेखक हवा असतो त्यामुळे संदीप वाकचौरे ह्यांची अभ्यासूवृत्ती, समन्वय साधण्याची कला लक्षात येते.

माणूस शिक्षित असला म्हणजे माणूसपण अंगी येते का? हा खरेतर संशोधनाचा आणि तसा डोळ्यात अंजन घालणारा प्रश्न आहे कारण लेखक वाकचौरे मर्मावर बोट ठेवताना लिहितात, ‘कधीकाळी या देशात अल्पशिक्षित असलेल्या माणसाची उंची आकाशाला गवसणी घालणारी होती. आज पदव्यांची सर्वोच्च उंची प्राप्त करणारी माणसंही त्या अल्पशिक्षित माणसांच्या शहाणपणाची उंची गाठू शकत नसल्याचे अधोरेखित होत आहे.’ या वाक्यातून एक धगधगते वास्तव लेखक मांडतात. माणसे शिकली परंतु गावापासूनच नाहीतर परिवारापासूनही दूर जात असताना एकत्र कुटुंबाचे महत्त्व विसरले आणि त्यामुळे एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोबतच जी काही मूल्यं शिक्षणातून मिळतात त्या मुल्यांना नंतर सोयीस्कररीत्या विसरून जातात.

आई ही पहिली गुरू असते असे आपण नेहमीच ऐकतो, वाचतो आणि लिहितो परंतु ज्यावेळेस बालक शाळेत जाते तेव्हा वातावरण बदलते. या वातावरणाशी जुळवून घेताना बालकांना पराकोटीचा संघर्ष करावा लागतो. अशावेळी या बालकांना आईच्या ममतेने सांभाळणारे शिक्षक अत्यंत आवश्यक आहेत. शिक्षक- विद्यार्थी या दोघांमध्ये प्रेमाचे, मायेचे संबंध निर्माण झाले तर शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल निश्चित होतील. मुलांची पावले शाळेकडे वळविण्यासाठी, मन शाळेत लावण्यासाठी शाळेत जातानाच जर त्याला घरातून शाळा- शिक्षकाविषयी धाक, भीती घातली तर ती आईची ममता त्याला मिळणार कशी? मनावर असा ताण घेऊन जाणारे बालक शाळेत रमणारच नाही. भुंगा आणि कमळाच्या कळीमध्ये वेगळेच ममत्व असते, लाकडाला छिद्र पाडून आरपार जाऊ शकतो परंतु तोच भुंगा जेव्हा कमळाच्या कळीच्या आगोशात जातो तेव्हा ती त्याला कैद वाटत नाही, लाकडाप्रमाणे शत्रू वाटत नाही तर त्या बंदिस्त जीवाला तिथे एक आधार मिळतो, मायेच्या पंखाखाली तो गुरफटून जातो.

संयमासोबतच आपण अविवेक यात स्वतःला गुंतून घेतले आहे. खरेतर आज विवेकाने, विचारपूर्वक वागणे समाजहितासाठी आवश्यक आहे. हा विवेक आपल्याला शिक्षणातून मिळायला हवा, परंतु तो मिळतोय का यावर बारकाईने विचार करायला हवा. लेखक याबाबत गांभीर्याने लिहितात, ‘शिक्षणाचे अंतिम ध्येय माणूस निर्माण करणे आहे. तो माणूस निर्माण करताना त्याची विवेकशील भूमिका महत्त्वाची आहे. समाजात जे काही घडते आहे त्या संदर्भाने विचार करत असताना आणि मांडणी करत असताना विवेकाने मांडणी होते आहे का?’ असा प्रश्न लेखक विचारतात. त्याचे उत्तर प्रत्येकाने शोधणे गरजेचे आहे.

सद्य स्थितीवर विचार करताना असेही लक्षात येते की, माणूस जशी विचारसरणी अंगिकारतो तशीच फळे त्याला मिळतात. उद्याचा नागरिक आजच्या शाळा घडवतात त्यामुळे भविष्यातील हा नागरिक उच्च विचारसरणीचा घडवायचा असेल तर त्याला तसे विचार, आचार देण्याची जबाबदारी ही शाळा, शिक्षक, सरकार यासोबतच समाजाचीही आहे कारण मुले अनुकरणप्रिय असतात. त्यांच्या आसपास ज्या क्रिया, घटना घडतात त्याचा नकळत त्यांच्या मनावर परिणाम होतो आणि मग ही मुले ते सारे आचरणात आणतात. त्यामुळे पालकांसोबत समाजानेही सजग होणे अपेक्षित आहे परंतु तसे घडताना दिसत नाही.

हा मुद्दा समजावून सांगताना लेखक ज्ञानेश्वर महाराजांच्या एका ओवीचा आधार घेतात…
जैसें क्षेत्री पेरिजे। तें वांचू़नि आन न निपजे।
का पाहिजे तेंचि देखिजे। दर्पणाधारें।।
आपण दरवर्षी वर्तमानपत्रात वाचतो की, एखाद्या शिक्षकाची बदली झाली की, विद्यार्थ्यांच्या भावना अनावर होतात. ते शिक्षकांनी आम्हाला सोडून जाऊ नये असा हट्ट करतात, रडतात. प्रसंगी शिक्षण कार्यालयात शाळा भरवतात. हे कशाचे द्योतक आहे? इथे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जो एक जिव्हाळा निर्माण झालेला असतो त्याचे बोलके उदाहरण आहे. बालकाची आई काही तासांसाठी, एखाद्या दिवसासाठी बालकाला ठेवून जाते तेव्हा ते बालक हिरमुसले होते, रडवेले होते. आईसम प्रेम अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना लावतात त्यामुळे अशा शिक्षकांचा दुरावा बालकांना मानवत नाही, सहन होत नाही. अशा आईचे काळीज असणाऱ्या शिक्षकांचे महत्त्वही अधोरेखित करताना लेखक गाय आणि वासरु यांच्या प्रेमाचे समर्पक उदाहरण देतात.

असे म्हणतात की, सुटलेला बाण आणि गेलेला शब्द पुन्हा वापस घेता येत नाहीत. शब्दांमुळे मनाला होणाऱ्या जखमा, वेदना कायम राहतात, त्या विसरल्या जात नाहीत. शब्दांची महती, शब्दफेक यावर लेखक संदीप वाकचौरे यांनी ‘शब्दाचिया मोल जाणू आता…’ या लेखात उत्तमरीत्या स्पष्ट केले आहे. लेखकाचा शिक्षणक्षेत्राचा अभ्यास दांडगा, खोलवर आहे हे पानोपानी जाणवते. लेखकांनी पुस्तकात ज्ञानेश्वरीतील ओव्यांचा आधार घेतला आहे परंतु प्रसंगोपात इतर संतांच्या, महात्म्यांच्या शिकवणीचाही उहापोह आपला मुद्दा अधिक स्पष्ट व्हावा यासाठी केला आहे.

शब्दांची महती स्पष्ट करताना त्यांनी ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने…’ ही ओवी मांडली आहे.
आपणास मोल म्हटलं की व्यवहार आठवतो. व्यवहार म्हटलं की, आर्थिक बाब येते. आज अनेक मार्गांनी शिक्षण क्षेत्रात पैशाने प्रवेश केला असून तिथे व्यवहार सुरु झाला आहे. हा व्यवहार शिक्षण क्षेत्राला तळाशी नेण्याचा प्रयत्न करतो आहे. व्यवहार सुरू होताच शब्दांची महती, मोल कमी झाले आहे नि नाण्याला महत्त्व प्राप्त झाले की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे.

शिक्षणाची प्रक्रिया म्हणजे एक प्रकारचा यज्ञ आहे हा एक मंत्र लेखक देतात. यज्ञ ही संकल्पना मुळात आपल्याकडे धार्मिक आहे परंतु लेखक जेव्हा या एकूण शैक्षिक प्रकियेला यज्ञ संबोधतात तेव्हा लेखकाबद्दलचा आदर दुणावल्या जातो. यज्ञ म्हटलं की, धार्मिक साहित्य आले, ते जमविण्याची धावपळ आली परंतु लेखक या शैक्षिक यज्ञासाठीही आहुती देण्याची गरज प्रतिपादित करतात ह्या आहुत्या कोणत्या ते ‘स्वधर्माचा यज्ञ पेटवूया…’ या लेखात वाचणे अधिक चांगले.

आपण सातत्याने म्हणतो की, हा माणूस चांगला, तो वाईट! परंतु खरेच असे असते का? अनेक संत- महात्मे यांनी वाईट ठरविलेल्या लोकांचे वैचारिक उद्बोधन करुन त्यांना सन्मार्गावर आणले आहे. एखादा बालक, नागरिक चांगला रस्ता सोडून बाजूला जात असेल तर त्याला योग्य रस्त्यावर आणण्याची जबाबदारी ही केवळ शाळा नि शिक्षकांचीच नाही तर समाजाचीही आहे. परंतु समाज अशा वृत्तीकडे केवळ दुर्लक्ष करत नाही तर प्रसंगी खतपाणीही घालतो. अशा वागणुकीमुळे समाजात वाईट प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळून त्या गाजरगवताप्रमाणे फोफावत असल्याचे दुष्टचक्र आपण गरगर फिरवत आहोत.

अभ्यास! शाळेतील एक आवश्यक बाब परंतु शिक्षण झाल्यावरही व्यक्ती सातत्याने शिकत राहते. वही- पुस्तक यातून मिळणारे ज्ञान हे पुरेसे नाही व्यक्ती वेळोवेळी नवीन गोष्टीचे ज्ञान मिळवितो. या अर्थाने व्यक्ती आजीवन विद्यार्थी असतो. दुसऱ्या अर्थाने अभ्यास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. जो सातत्याने अभ्यास करतो तोच जीवनात यशस्वी होतो. आपण जिथे कुठे काम करतो, त्यासाठी त्या क्षेत्रातील बारीकसारीक बाबींची माहिती ही अभ्यासातून मिळते ह्या बाबीचा उल्लेख करताना लेखक समर्थ रामदास स्वामी यांच्या ‘अभ्यासोनी प्रगटावे…’ आणि संत तुकाराम महाराजांच्या ‘असाध्य ते साध्य करती सायास…’ अशा ओव्या प्रमाण मानतात.

आपला प्रत्येक विचार सुस्पष्टपणे मांडताना लेखक ज्ञानेश्वर महाराज, समर्थ रामदास, संत तुकाराम, संत नामदेव, गाडगे बाबा यांच्यासह महात्मा फुले, आंबेडकर, शाहू महाराज आणि लेखकांचे विचार व्यक्त करतात. ज्यातून लेखकाचे वाचन विश्व किती अफाट, समृद्ध आहे याची जाणीव होते. लेखक एका ठिकाणी खूप छान व्यक्त होतात, ‘शिक्षण आणि जगणे यांचे एक नाते आहे. शिकणे जितके जीवनाभिमुख असेल तितकी गुणवत्ता अधिक असते. शिक्षणाचा अर्थ जगण्यातूनच उलगडत जातो. श्रमाचे मोल केवळ शब्दाने नाही तर जगण्यातून कळते…’ केवढा भावार्थ यात दडला आहे.

शिक्षणाची गुणवत्ता वाढवायची असेल तर शिक्षण जीवनाशी जोडले जाणे महत्त्वाचे आहे.
आपल्या वाट्याला आलेले कर्म मग ते नावडते असले तरीही ते आवडीने करत गेलो की, मिळणारा संतोष, आनंद, समाधान काही वेगळेच असते. कर्माची वाट खडतर असते कारण ती एक साधना असते, तपश्चर्या असते. असे कर्म पार पाडले की मिळणारे फळही तितकेच रसरशीत असते. ‘कर्माचिया वाटे संतोषिया लाभे..’ या लेखात हा मुद्दा अत्यंत प्रभावीपणे लेखकांनी स्पष्ट केला आहे. ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन…’ श्रीमद् गीतेतील वचनाची आठवण हा लेख वाचताना नक्कीच होते.

शिक्षकांचे बालकांच्या जीवनातील महत्त्व सांगताना लेखक एक अत्यंत सुंदर वाक्य पेरतात, ‘खरेतर बालकाच्या आयुष्यात येणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना बालक निश्चित करू शकत नाहीत. मात्र त्याच्या आयुष्यातील शिक्षक निवडण्याचे स्वातंत्र्य त्यांच्या पालकांना मात्र निश्चित असते…’ असे सांगताना लेखक शिक्षकाला थेट परीसाची उपमा देतात.

अखिल भारतीय शिक्षण परिषदेचे अधिवेशन नांदेड येथे सुरु असताना एका शिक्षकाचा सत्कार उच्च शिक्षित अधिकारी करतात आणि पटकन त्या शिक्षकाचा पदस्पर्श करतात. उपस्थित लोक आश्चर्याने ती घटना पाहतात. नंतर समजते की, ते शिक्षक त्या दोन्ही अधिकाऱ्यांचे शिक्षक होते. शिक्षकाबद्दलची अशी व्यासपीठावर व्यक्त झालेली कृतज्ञता ही कोणत्याही पुरस्कारापेक्षा मौलिक आहे.

एकंदरीत ‘शिक्षणाचे पसायदान’ हा ग्रंथ वाचनीय, मार्गदर्शन करणारा, मौलिक असा आहे. अत्यंत सोप्या भाषेत अनेकानेक अत्यंत चांगले विचार, सिद्धांत मांडले आहेत. लेखकाचा अभ्यास आणि शिक्षण क्षेत्रासाठीची त्यांची तळमळ जाणवल्याशिवाय राहत नाही. आपले विचार व्यक्त करण्याची त्यांची हातोटी अवर्णनीय अशीच आहे. लेखक संदीप वाकचौरे यांनी आणि प्रकाशक घनश्याम पाटील यांनी बारा पुस्तके प्रकाशित करण्याचा जो संकल्प केला आहे तो निश्चितच तडीस जाणार आहे परंतु महत्त्वाचे म्हणजे ती सारी पुस्तके शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येकाला मार्गदर्शक तर ठरतीलच परंतु आज शिक्षण क्षेत्राबद्दल झालेल्या नकारात्मक विचारसरणीलाही दूर करण्यासाठी मदतगार ठरु शकतील. या शिक्षण प्रकियेच्या यज्ञामध्ये लेखकाचे अभ्यासयुक्त विचार एकप्रकारे आहुती असणार आहे. त्यांच्या या शैक्षिक महायज्ञाला अनंत शुभेच्छा !

पुस्तकाचे नाव – शिक्षणाचे पसायदान
लेखक: संदीप वाकचौरे, संगमनेर (मोबाईल –
प्रकाशक: घनश्याम पाटील मोबाईल – 70572 92092
चपराक प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठ: राजेश कदम, पुणे
पृष्ठसंख्याः १३६
किंमतः ₹२५०/-

Related posts

उन्नीस बीस मधला फरक

एम्सच्या धर्तीवर लवकरच अखिल भारतीय आयुर्वेद संस्था – पंतप्रधान

व्यापक अधिकार देणारा नवा टपाल कायदा !

2 comments

Shashikant Shinde September 28, 2022 at 9:18 AM

मा. नागेश शेवाळकर
स. नमस्कार
शिक्षणाचे पसायदान या महत्वाच्या पुस्तकावर आपण ज्या नेमकेपणाने लिहून पुस्तकाचे आणि लेखकाचेही अंतरंग उकलून दाखवले त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. शिक्षणाची नवी वाट शोधण्याचा संदीप सरांचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. शिक्षण हा त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग झालेला आहे. त्याचं विश्लेषण आपण फारच सुंदर पद्धतीने केले आहे. आपल्या उद्दिष्टांशी प्रामाणिक राहून प्रयत्न केले की आपोआपच पसायदानासारखी उत्कृष्ट निर्मिती होते. संदीप सरांचा हा प्रयत्न यशस्वी झाला आहे. म्हणून दोघांनाही मन:पूर्वक शुभेच्छा. सुंदर लेखासाठी हार्दिक आभार.

शशिकांत शिंदे
9860909179

Reply
Nagesh S Shewalkar September 27, 2022 at 9:53 AM

माझा लेख प्रकाशित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!

Reply

Leave a Comment