April 16, 2024
Book Review of Yusuf Shekh Novel by Ashok Bendkhale
Home » गावातील वास्तवाचे दर्शन घडवणारी कादंबरी
मुक्त संवाद

गावातील वास्तवाचे दर्शन घडवणारी कादंबरी

केवळ पाच मुस्लीम कुटुंब बहुसंख्याक हिंदू असलेल्या गावात ज्या पद्धतीने मिळून मिसळून राहतात. त्यांची भाषा, राहणीमान, आचारविचार घेतात, त्याचे चांगले दर्शन कादंबरीत घडते.

अशोक बेंडखळे

खेडेगावातील हिंदू-मुस्लीम समाजातील माणसांचे एकमेकांमधील संबंध हा अनेक वर्षांपासून चालत आलेला आणि वाचकांना वाचनासाठी खाद्य देणारा विषय आहे. मात्र, अशा काहीशा स्फोटक विषयावरील कादंबरी एखादा मुस्लीम लेखक लिहितो, तेव्हा साहजिक तो आपल्या समाजाला झुकतं माप देईल, असा कयास केला जातो. युसुफ शेख लिखित ‘हुसेन भाईचा कुणी नाद न्हाय करायचा’ या कादंबरीतील छोट्या गावात फक्त पाच मुस्लीम कुटुंब आहेत. म्हणजेच ते अल्पसंख्य आहेत. गावातला हुसेन नावाचा मुस्लीम तरुण सोनू या मराठी मुलीच्या प्रेमात बुडालेला आहे. अशी पार्श्वभूमी असूनही लेखकानं कुठल्याही समाजाची बाजू न घेता त्रयस्थपणे लेखन केले आहे. त्याबद्दल लेखकाचे कौतुक करायला हवे.

कादंबरीचा नायक मुस्लीम तरुण हुसेन हा आहे. त्याचबरोबर हुसेनचे वडील चाँदभाई, आई गुलशन, लग्न झालेली बहीण सायरा, तिचा मुंबईच्या पोलीस खात्यात असलेला नवरा सादिक, बाबू नांगरेची मुलगी सोनू, त्याचा टारगट मुलगा मारुती, गावचे पुढारी तात्यासाहेब आणि त्यांचा मुलगा सयाजी ही इतर पात्रे आहेत. तशी कादंबरीत मुख्य घटना एकच आहे आणि ती म्हणजे हुसेन या मुस्लीम तरुणाचे सोनू नांगरे या मराठी मुलीवर प्रेम जडते. त्यावरून दोन्ही समाजात एक तेढ निर्माण होते. गावचे वातावरण दूषित होऊ पाहते. त्याला हुसेनचे वडील चांदभाई आणि गावातले बेरकी पुढारी तात्यासाहेब कसे सामोरे जातात आणि त्यातून मार्ग काढतात, हे दाखवले आहे.

सुरुवातीला हुसेनच्या वागण्यातला बेधडकपणा, करारीपणा दाखवला आहे. हुसेनभाईच्या मर्दुमुकीचे दोन प्रसंग येतात. हुसेन तेटयेवाडीवर बकरी कापायला सुरी घेऊन निघाला होता. रस्त्यात त्याला सराईत गुंड म्हादू नांगरे भेटतो. म्हादूला अंगातली रग हुसेनवर काढायची होती. तो हुसेनच्या हातातली धारदार सुरी ताकदीने काढून घ्यायचा प्रयत्न करतो; पण तेव्हा हुसेन म्हादूला भारी पडला होता. हुसेन काही नमला नाही. हातातली सुरी सोडली नाही. म्हादू गुपचूप हात सोडून घेतो आणि गावाकडे निघतो. मात्र, या मुसलमान पोराच्या अंगातली चरबी खरवडण्याची रग त्याला होतीच.

तेटयेवाडीवर मुक्काम केलेला हुसेन सकाळी निघाला, तर त्याला रस्त्यात एका वाघाच्या बच्चाने गाठले. वाकडी वाट करून तो पाऊल वाटेवर येई तर ते वाघरू वाटेवर आडवं यायचं. हुसेन माडावर चढला तर झाडाखाली येऊन डरकाळ्या फोडून वर बघू लागलं होतं. शेवटी त्यानं चांभारवाड्यातल्या गणप्याला हाक दिली. तो भाला घेऊन आला तसं ते वाघरू निघून गेलं. हुसेन घाबरला नाही. म्हणून गणप्यानं त्याचं कौतुक केलं. गावातील काही टारगट पोरं हुसेनचे चांगले मित्र होते. त्यात तात्यासाहेब पाटलांचा सयाजी प्रमुख. शिवाय लक्ष्मीकांत शिवाजी राजाराम भिकू, गोविंदा, रंगा हेही दोस्तांमध्ये होते. ही पोरं दोन दिवसांनी रानात शिकारीला जायचे. सात-आठ वाघांच्या शिकारी त्यांनी केल्या होत्या. डुकरं, भेकरं, ससे यांची गणतीच नव्हती. शिकारीमध्ये गोविंदा हुसेनचा खास भिडू होता. हुसेनला शिकारीचा नाद एवढा चढला की, एकदा दोन वाघांची त्यांनी एकदम शिकार केली आणि गावकऱ्यांनी शिकार केलेल्या या पोरांना मिरवणुकीने गावात आणले. हुसेन आता पट्टीचा शिकारी बनला होता.

हुसेनचा बाप चाँदभाई हुशार होता. शेतीत त्याला रस होता. तसेच, धंद्याचीही त्याला आवड होती. त्याचं भुसारी मालाचं दुकान होतं आणि तो आठवड्याच्या बाजारात माल घेऊन जात असे. ठेबेवाडीचा बाजार तो सांभाळून होता, तर तांबचा आरळपाच्या बाजाराला हुसेन जात असे. हुसेन बापाला कामधंद्यात मदत करायचा; मात्र त्याचं तरुणरक्त त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं. बाळू नांगरेची तरुण मुलगी सोनू हिच्या तो प्रेमात पडला होता आणि रानातल्या कपारीत भेटून हौस भागवून घ्यायचा. ही बाब छोट्या गावात लपून राहणं शक्य नव्हतं. ती गोष्ट बाबू नांगरेपर्यंत गेली. त्याचा थोरला मुलगा मारुती भडकला. त्याने आपल्या टारगट पोरांसह हुसेनवर एकदा हल्ला केला. शिकारी असलेल्या हुसेनला धोका कळला होता आणि त्याने आपल्या मित्रांना सावध केले. मुसलमानांची पोरं भारी पडली आणि त्यांनी नागऱ्यांच्या पोरांना पळवून लावले. या गावाची ओळख बारा वाड्या आणि तेरावं गाव, अशी होती. गावात चाँदभाई, बापूभाई, रसूलभाई, दगडूभाई आणि गुलाबभाई अशी फक्त पाच मुसलमान घरे होती आणि त्यांना मराठ्यांच्या गावात बलुतेदार म्हणून आपण राहतो, याची जाणीव होती. त्यामुळे हुसेनच्या प्रेमप्रकरणामुळे काही आफत येऊ नये म्हणून काही दिवसांकरिता चाँदभाईने त्याला त्याची थोरली बहीण सायराच्या गावी गुपचूपपणे तांबव्याला धाडले.

गावातील तात्यासाहेब हेव पाटील यांचे पंचक्रोशीत मोठे प्रस्थ होते. आज तात्यासाहेबांना एकमुखी नेत्याचा मान मिळू द्यायचा नाही, यात गावातला आकाराम आघाडीवर होता आणि त्याला भाकरवाडीतला मिलिटरीतून निवृत्त झालेला जालिंदर मस्कर मिळाला होता. पंचायत समितीच्या आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या होत्या. त्यामुळे गावातले तापलेले राजकारण इथं आलेले आहे. एकदा बाहेरून आलेली काही लोकं मुसलमान आळीत येऊन पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देऊ लागले होते. त्यात मुख्य मुस्लीमद्वेष होता. मात्र, पाच मुस्लीम कुटुंबातील म्हाताऱ्यांनी हिमतीने त्यांचा सामना केला. तात्यासाहेबांच्या राजकारणातील तो उमेदीचा काळ होता. ते आपले लोक घेऊन तत्काळ मुसलमान आळीत आले आणि तो वाद मिटवला.

गावात अनंतराव महिपतराव कुलकर्णी या गृहस्थाचा वाडा होता. त्यांनी अनेक कुळांना मिळले होते. अशा पीडित कुळांच्या तरुण पोरांनी वाड्यावर एकदा हल्ला केला. त्यावेळीही तात्यासाहेब आले आणि गावकऱ्यांना शांत केले. जालिंदरचा धाकटा भाऊ हैबतीचा खून होऊन निवडणुकीला हिंसक वळण लागू पाहत होते, तर राजारामला जंगलातून येताना मारहाण करण्यात आली आणि त्यावरून नांगरेवाडीतील मारुतीला काहींनी मारहाण केली. भडकलेल्या मारुतीने नांगरेवाडी आणि आसपासच्या लोकांचा मोठा जमाव गावात आणला आणि त्यांना हुसेनच्या घराच्या दिशेने वळवले. मुसलमानांच्या घरांवर जमावाने दगडफेक केली. हुसेनचे टोळके आले आणि त्यांनी धमकावून दगडफेक बंद करण्यास भाग पाडले. इथेही तात्यासाहेबांनी येऊन जमावाला शांत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अशाप्रकारे गावात तात्यासाहेबांचे वजन वाढत होते.

दरम्यान, तात्यासाहेब हुसेनला पंचायतीच्या राजकारणात आणण्याचा प्रयत्न करतात. त्याला हे राजकारणाचे लचांड नको होते आणि एक दिवस अचानक गाव सोडून तो मुंबईला जातो. हुसेन गेल्यामुळे तात्यासाहेब अनंतरराव कुलकर्णीचा मुलगा जनार्दन याला निवडणुकीला उभा करतात. जनार्दनच्या घरूनही त्याचे स्वागत केले जाते. तात्यासाहेब राजकारणात यशस्वी ठरले होते. हुसेन मुंबईला येऊन सादिकच्या मदतीने शिलाई काम करू लागला. लवकरच शिलाईत कौशल्य प्राप्त करून तो चांगला दर्जी बनला. हुसेनची बहीण बबडीसुद्धा मुंबईला आली होती. उपवर मुलींना धार्मिक शिक्षण आवश्यक होते म्हणून तिला कुराणाचे पाठ देण्यात येतात आणि ती ते आत्मसातही करते. इकडे गावी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तात्यासाहेबांनी हुशारीने बाजी मारली. हुसेनही गावी बबडीसह परत आला. त्याची आणि सोनीची भेट होते. आणाभाका झाल्या आणि त्यांच्या नियमितपणे भेटीगाठी होऊ लागल्या. चाँदभाईने हे प्रेमप्रकरण तात्यासाहेबांच्या कानावर घातले. ते त्याला मदत करण्याची तयारी दाखवतात. ते पुढाकार घेऊन गाववाल्यांची ग्रामसभा घेतात आणि जमावाला दोघे एकमेकांच्या प्रेमात आहोत तर त्यांना विरोध करणे चुकीचे आहे हे पटवून देतात. हुसेनने सोनीसह मुंबईला जाऊन नोंदणी पद्धतीने लग्न करण्याचे सुचवतात आणि या प्रकरणावर अशाप्रकारे चाणाक्षपणे पडदा टाकतात. या आशावादी नोटवर कादंबरी संपते.

केवळ पाच मुस्लीम कुटुंब बहुसंख्याक हिंदू असलेल्या गावात ज्या पद्धतीने मिळून मिसळून राहतात. त्यांची भाषा, राहणीमान, आचारविचार घेतात, त्याचे चांगले दर्शन कादंबरीत घडते. चाँदभाईचे पंजाब नावाच्या घोड्याशी जुळलेले नाते किंवा वाघाची हुसेनने केलेली शिकार आणि एकदा बेभान झालेली वाघीण, नदीवरील वाव माशाची शिकार, अशा काही प्रसंगांनी कादंबरीला ग्रामीण फिल देण्यात लेखक यशस्वी झाला आहे. त्याचबरोबर काही त्रुटी जाणवतात. या कादंबरीला प्रकरणे नाहीत. दगडूभाई-अमिताचे भांडण किंवा रसूलच्या बाळीचं लग्नसोहळा अशा अनेक प्रसंगाचे कथानक पुढे नेण्यात काही स्थान नाही. त्यामुळे नकळत कथानकाची वीण ढिली होते आणि कादंबरीचा एकूण परिणाम कमी होतो.

मुसलमान मंडळी घरात व एकमेकांशी बोलताना मराठीमिश्रित हिंदी बोलतात ते ऐकायला गोड वाटते. तसेच, च्यामपालकी, हुबउदंग, पातळाई, लोकशाहीचं येडताक, न्हावंडगिरी हे नवे शब्दही साहित्यात भर टाकणारे आहेत. नव्या वातावरणात नेणाऱ्या या कादंबरीचे स्वागत करायला हवे!

पुस्तकाचे नाव – हुसेन भाईचा कुणी नाद नाय करायचा !
लेखक – युसुफ शेख
प्रकाशक – अक्षर प्रकाशन, मुंबई
मुखपृष्ठ – सतीश भावसार
पृष्ठे – १४६, मूल्य – १७५
पुस्तकासाठी संपर्क – 9322391720

Related posts

Neettu Talks : तरुण दिसण्यासाठी हे करा बदल…

मराठी साहित्य संमेलनासाठी कवींना आवाहन

“शेवटची लाओग्राफिया” पुस्तकास केशवसूत साहित्य पुरस्कार जाहीर

Leave a Comment