April 18, 2024
Competitive Exam attraction reality and solution
Home » स्पर्धा परीक्षा – आकर्षण अन् वास्तव
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

स्पर्धा परीक्षा – आकर्षण अन् वास्तव

स्पर्धा परीक्षेतील यश – अपयश यात दोष कुणाला द्यायचा, अधिकारी होण्याचे स्वप्न पहाणारे युवक – युवती, शासन, परीक्षा घेणारा आयोग, अवाजवी अपेक्षा ठेवणारे आई – वडील की समाज. हा प्रश्न महत्वाचा आहे.

डॉ. प्रकाश पाटील

प्राचार्य,
कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे डॉ. अरविंद ब. तेलंग वरिष्ठ महाविद्यालय,
निगडी, पुणे-411044
मोबाईल – 9422027714

स्पर्धा परीक्षा खरतर युवा पिढीचं सर्वात मोठ स्वप्न. भारतात क्रिकेट सोडलं तर दुसऱ्या खेळाला खेळ म्हणतात यावर अधिकतर तरुण विश्वास ठेवत नाहीत. तसचं काहीसं स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळवून अधिकारी होणं म्हणजेच करिअर, नाही तर दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवलं तरी त्याला “करिअर’ म्हणणे याबाबत युवा पिढी साशंकच आहे, असे दिसून येते.

संघर्षाची उर्मी हवी, माघार घेणे अयोग्य

काही दिवसापूर्वी पुण्यात एक दु:खद घटना घडली. स्वप्नील लोणकर या अवघ्या 24 वर्षाच्या तरूणानं आत्महत्या केली. कारण मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखत लवकर न झाल्याने ताणतणाव निर्माण झाला. एका तरूणाची आत्महत्या ही अतिशय दुर्देवी व मनाला वेदना लावणारी घटना आहे. त्याच्या कुटुंबावर काय बेतलं असेल याची कल्पना करणेही अशक्य. पण या आत्महत्येचे समर्थनही करता येणार नाही. किंबहूना ज्या वयात संघर्ष करावयाची उर्मी हवी त्याचवेळीस माघार घेणे कितीस योग्य आहे ? येणाऱ्या पिढीने यातून काय बोध घ्यायचा हा प्रश्नच निर्माण होतो. त्याच्या जाण्याने जेवढे दु:ख त्याच्या कुटुंबीयाना झाले त्यापेक्षा जास्त दु:ख त्यांना इथून पुढे सहन करावे लागेल. कारण तोच तर त्याच्या कुटुंबाचा आधार होता.

…तोच खरा जीवनाचा शिल्पकार

तेव्हा मित्रांनो मनाशी एक ठाम गाठ बांधून ठेवा की रस्त्यावर, उन्हातान्हात, शेतात कुठेही काम करीन पण आत्महत्येचा मार्ग कधीही स्वीकारणार नाही. या जगात अडचणी कुणाला येत नाहीत फक्त अडचणी वेगवेगळ्या स्वरुपाच्या असतात. मग तो शेतात राबणारा शेतकरी असो अथवा उच्चपदस्थ अधिकारी किंवा राजकारणी, रस्त्यावर उभा राहून चणे – फुटाणे विकणारा फेरीवाला असो अथवा मोठा उद्योगपती असो. पण या चक्रीवादळात ठामपणे जो उभा राहातो, तोच खरा त्याच्या जीवनाचा शिल्पकार ठरतो.

अपेक्षांचे ओझे !

स्पर्धा परीक्षेतील यश – अपयश यात दोष कुणाला द्यायचा, अधिकारी होण्याचे स्वप्न पहाणारे युवक – युवती, शासन, परीक्षा घेणारा आयोग, अवाजवी अपेक्षा ठेवणारे आई – वडील की समाज. हा प्रश्न महत्वाचा आहे. माझ्या मते सध्याच्या काळात याची सुरूवात बालवयापासूनच होते. छोटं व विभक्त कुटुंब यापासूनच याची सुरूवात होते. आजी – आजोबा बरोबर राहणे म्हणजे एकत्र कुटुंब अशी कल्पना असणारी नवीन पिढी अनुभवानं खूपच मागे पडत आहे असे दिसून येते. घरात तीन किंवा चारच जण, पती-पत्नी, एक किंवा दोन मुलं. संपुर्ण लक्ष त्याच्या किंवा तिच्यावरच केंद्रीत झालेलं असते. आवश्यकतेपेक्षा जास्तच लाड व गरजेपेक्षा जास्त सुखसोयी यातून नकार हा या पिढीला माहीतच नाही. अपयश पचवणे तर दूरच. त्यामुळे मुलं पदवीधर झाली की त्यांच्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवायचे व लहानपणापासून तुला काहीही कमी पडू दिले नाही, कोणतीही गोष्ट नाही म्हटलो नाही, मग तु आता आमच्या अपेक्षा पूर्ण करायला पाहिजेत. अशा अपेक्षांचे ओझे त्याच्या डोक्यावर लादले जाते त्यातूनच त्याच्या मनावर ताण तणाव निर्माण होण्यास सुरुवात होते व त्याचे परिणाम शेवटी व्हायचे तेच होतात.

आठवीपर्यंत पास निर्णयाच्या फेरविचाराची गरज

गेली 31 वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत आहे म्हणून एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते की, इयत्ता पहिली पासून इयत्ता 8 वी पर्यन्त परीक्षा रद्द झाल्या आहेत. मुलानां वयाप्रमाणे वर्गात प्रवेश मिळतो. खरंतर मोठ-मोठया शिक्षण तज्ज्ञांनी व शासनाने यावर पूर्ण विचार केला असेल म्हणूनच हा निर्णय झाला असेल, पण मला वाटते की याचा थोडा फेरविचार व्हायला हवा. अगदी लहान वयात ज्या सवयी लागतात, जे संस्कार होतात तेच मोठेपणी त्यांच्या कामी येतात. मग लहाणपणीच परीक्षांची सवय नाही, नापास होण्याची भिती नाही. अगदी 15 ते 16 वर्षाचे होईपर्यंत अभ्यास करावा असे काहीच नाही. मग अचानक ज्या वयात अनेक गोष्टी कळायला लागतात, ज्याचे आकर्षण वाटते. ज्या कराव्याशा वाटतात. त्या वयात अभ्यासासारखी नावडती गोष्ट करणं विद्यार्थी कितीसं लक्ष देऊन करणार हा प्रश्नच आहे. त्यात भर म्हणून शाळेत शिक्षकांनी रागावयाचे नाही, मारायचे नाही. अपमान करायचा नाही हे शासनाचे कायदे आहेत. अगोदरच्या काळात म्हणजे 25 ते 30 वर्षापूर्वी घरात आगाऊपणा केला तर शिक्षकाची भिती घालायचे. याउलट आता मुलेच शिक्षकांना आई-वडीलांची भिती घालतात. तेच आई-वडील आज आपल्या मुलाला का रागावला, का अपमान केला म्हणून शाळेत जाऊन कायदेशीर कारवाईची भाषा करू लागलेत. याचे परिणाम फारसे चांगले होताना दिसत नाहीत.

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज

15 ते 16 वर्षाच्या मुलानां जर शिक्षकाने रागावणे किवा प्रसंगी एखादा धपाटा देणे हा जर त्यांना अपमान वाटत असेल तर पुढील जीवनात, नोकरीत, व्यवसायात पावलोपावली अपमान सहन करावा लागतो त्याचे काय ? हे ही आत्महत्येचे विचार येण्याचे एक कारण असू शकते. पूर्वी 10 वी 12 वीला बोर्डात नंबर आला तर त्या विद्यार्थ्यांची यादी वृत्तपत्रात प्रसिध्द होत असे. आता तेही बंद झाले. कारण असे असावे की जे विद्यार्थी यादीमध्ये येत नाहीत ते नाराज होतात. खरंतरं ज्या विद्यार्थ्यांनी कष्ट करुन महाराष्ट्रात नंबर काढला त्याचे कौतूक नको का व्हायला ? त्याचा उत्साह वाढवणे ही आपली जबाबदारी आहे. तोच उद्या भारत घडविणारा आहे. त्याला प्रोत्साहीत करायला हवं, पण इतर विद्यार्थ्याचा विचार करून अप्रत्यक्षपणे हुशार विद्यार्थ्यांचे खच्चीकरण होतंय असच दिसतंय.

स्पर्धेत टिकायचं असतं…

प्रत्येक विद्यार्थ्याला वाटू देत की, माझाही बोर्डात नंबर आला पाहिजे, माझेही कौतूक झाले पाहिजे. जे विद्यार्थी कमी पडतायत त्यांची जास्त काळजी घेत आहोत व पुढे जाणाऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहोत असच काहीस वाटतयं. आमच्या वेळी हा एक उत्सवच असायचा. बोर्डात आलेले विद्यार्थी व त्यांच्या घरच्यांचा अभिमान वाटायचा. त्याच्या घरी मोठमोठी माणसं भेट द्यायची व त्या विद्यार्थ्यांची मुलाखत वृत्तपत्रात छापून यायची याचं सर्वांना कौतूक असायचं व ते विद्यार्थी पुन्हा जोमानं पुढ शिक्षण घेऊन आपल्या बरोबर देशाचेही भविष्य उज्ज्वल करायचे. स्पर्धेत टिकायचं असतं याची जाणीव व्हायची. दुबळ्या मनाच्या मुलांचा विचार करून कणखर मनं आपण दुबळी करत नाही ना याचा विचार व्हायला हवा.

मनाची कणखरता टिकवायला हवी

इयत्ता चौथीची स्कॉलरशिप सातवीची स्कॉलरशिप या स्पर्धा परीक्षा, वर्गात पहिला येणे हे सर्व हवंच तरच पुढच्या स्पर्धा परीक्षा यामधले यश अपयश पचवता येऊ शकेल. परीक्षा म्हटलं की ताणतणाव आलाच, जो यायलाच हवा. आपलं शरीर पीळदार, निरोगी, सदृढ हवं असेल, तर व्यायाम आवश्यकच आहे. व्यायामाने शरीरावर ताण येतो व शरीर सदृढ बनते त्याच प्रमाणे मेदुंचा सुध्दा व्यायाम होणे आवश्यक आहे आणि जोपर्यंंत लहान वयातच थोडा मेंदूला ताण देण्याची व यश-अपयश पचविण्याची सवय लागत नाही तोपर्यंंत आयुष्यात मोठे-मोठे ताण-तणाव सहन करण्याची क्षमता निर्माण होणार नाही नाहीतर जीवनाच्या प्रवासात एखादे वादळ निर्माण झाले तर हताश होण्यापलिकडे काहीच उरणार नाही.

सर्व गोष्टींचा सारासार विचार करण्याची गरज

स्पर्धा परीक्षेसंदर्भात बोलायचंच झालं तर विद्यार्थी हा मुख्य घटक आहे. आपण उच्चपदस्थ अधिकारी होणार याच विश्वात फक्त राहून चालणार नाही. ब­ऱ्याचदा आपल्या जवळचं कोणीतरी या परीक्षेत यशस्वी होतं मग स्वत:बरोबर, घरातील व नातेवाईकानाही वाटतं म्हणून स्पर्धा परीक्षेच्या मागे धावण्यास सुरवात होते. तरुण पिढीने अगोदरच स्वत:चे आत्मपरिक्षण करावयास हवे. माझी बौध्दीक क्षमता काय आहे.? कष्ट घेण्याची किती तयारी आहे.? किती वर्षापर्यंत कमवायला सुरू करणे आवश्यक आहे.? आणि अपयश आले तर पुढे काय ? थोडक्यात, दुसरा पर्याय काय ? या सर्व गोष्टीचा पूर्ण विचार करुन अपयश आलेच तर न डगमगता दुसरा पर्याय आनंदाने स्वीकारणे जमले पाहिजे. स्पर्धा परीक्षमुळे एक नोकरी मिळणार होती त्याऐवजी दुसरी मिळेल किंवा व्यवसाय पण पर्याय आहे, हे मनोमनी पूर्ण रुजवणे गरजेचे आहे. कित्येक युवक अगदी डॉक्टर, इंजिनिअर ते व्यवसाय, राजकारण यामध्ये यशस्वी झाले आहेत. किंबहुना स्पर्धा परीक्षेच्या नोकरीपेक्षा जास्त यशस्वी वाटण्याइतपत यश मिळविले आहे. एक सुरक्षित नोकरीपेक्षा जास्त महत्व न देता या परीक्षेचा अभ्यास करावा व योग्यवेळी बाहेर पडण्याचाही निर्णय घेता यावा हेच योग्य ठरेल. या परीक्षेचा एक फायदा नक्कीच करुन घ्यायचा की चौफेर मिळविलेले ज्ञान व मोठे होण्याचे पाहिलेले स्वप्न दोन्ही सदैव जिवंत ठेऊ न दुसरा पर्याय निवडलेल्या क्षेत्रात उत्तम यश मिळवणे होय. किंबहूना दुसऱ्या पर्यायाने यशस्वी झाल्यावर अस वाटलं पाहिजे की, स्पर्धा परीक्षेत अपयश आलं ते बरच झालं. नाहीतर सरकारी गाडीतून फिरण्याऐवजी स्वत:च्या आधुनिक मोटारीतून फिरायला मिळाले नसते. याचे समाधान व्हावयास हवे.

स्पर्धा परीक्षेच्या गोंधळावर पर्याय

स्पर्धा परीक्षा देण्याऱ्या विद्यार्थ्यांचा गोंंधळ होण्यास अनेक कारणे आहेत. एका गोष्टीची खासकरुन आवश्यकता वाटते ती की, यामध्ये शासन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग व ज्या शासकीय विभागतील जागा भरावयाच्या आहेत, तो विभाग याचा योग्य तो समन्वय असणे अतिशय आवश्यक आहे. याचा क्रम असा असावा असं मला वाटतय की, ज्या विभागाच्या जागा निघतील त्या विभागाने लोकसेवा आयोगाकडे जागांची आवश्यकता असलेली माहिती देण्यापुर्वी संपूर्ण शासकीय कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. (उदा. वित्त विभागाची परवानगी, बिंदूनामवली तपासून घेणे ) तसेच आयोगाने एक दरवर्षीचे कायमस्वरुपी वेळापत्रक बनवणेही आवश्यक आहे. उदाहरणार्थ जूनचा पहिला रविवारी – पूर्व परीक्षा, दोन महिन्यानी पहिला आठवडा मुख्य परीक्षा, दोन महिन्यांनी दुसरा आठवडा मुलाखती व दोन महिन्यानी पहिला आठवडा निकाल इत्यादी अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर ज्या विभागाची मागणी होती. त्या विभागाला अंतिम यादी देणे व त्या विभागाने तीन महिन्याच्या आत उमदेवाराची सर्व चौकशी पूर्ण करुन कामावर रुजू करुन घेणे. या सर्व घटकांनी जर एकत्रीतपणे संघटीतपणे व समन्वयाने काम केले तर विद्यार्थ्यांना मानसिक त्रास कमी होईल. दोन-दोन वर्षे प्रतिक्षा करावी लागणार नाही व ज्या विद्यार्थ्यांना या मायाजालातून बाहेर पडायचे आहे तेही आपल्या दुस­ऱ्या पर्यायाकडे वेळेतच आकर्षित होतील व दुसरे स्वप्नील लोणकर होण्यापासून वाचतील. इतकं या निमित्ताने सांगावेसे वाटते.

Related posts

मसाले उत्पादनातील यशस्वी उद्योजिका सुरेखा वाकुरे

अब की बार…देशावर जादू

प्रेम उठाव परिवर्तन चळवळीच्या अंगाने जाणारा काव्यसंग्रह…..

1 comment

Adv. Sarita Patil July 14, 2021 at 6:22 PM

लेखक शिक्षणक्षेत्रातील असल्यामुळे त्यांचे अनुभव खूप बोलके आहेत. खरेतर स्पर्धापरीक्षा देणारे कींबहुना पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण होणारे विद्यार्थी तावून सुलाखून तिथपर्यंत पोहोचलेले असतात. पण या संयमाचा कङेलोट व्हायला नाही पाहीजे. याची काळजी विद्यार्थ्यांनी त्याबरोबरच आयोगाने व राज्य शासनाने घेतली पाहिजे. मुलाखतीचे व नियुक्तीचे निदान वेळापत्रक जाहीर झाले असते तरी मुलांना थोङे हायसे वाटले असते. लेखकांनी मुले, शिक्षक आणि आईवडील सर्वानाच खूप छान सल्ला दिला आहे.

Reply

Leave a Comment