March 28, 2024
Cow Dung will get Golden Price article by rajendra ghorpade
Home » शेणाला सुद्धा आता सोन्याचा भाव
विश्वाचे आर्त

शेणाला सुद्धा आता सोन्याचा भाव

रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी, जमिनीचा ढासळलेला पोत सुधारण्यासाठी, सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्याची गरज आहे. पण शेणखताशिवाय सेंद्रिय शेती होणार कशी ? शेणास वाढते महत्त्व विचारात घेता शेणाला सोन्याचा भाव आहे. हे शेतकऱ्यांनी विचारात घ्यायला हवे. यासाठी ही सोन्याची खाण आत्तापासूनच जपून ठेवायला हवी.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

म्हणोनि तयाचां ठायीं । शेणा सोनया विशेषु नाहीं ।
रत्ना गुंडेया कांहीं । नेंणिजे भेदु ।। 357 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 14 वा

ओवीचा अर्थ – म्हणून त्यांच्या ठिकाणी शेण व सोने यांत कमीअधिकपणा नाही व रत्न आणि दगड यांमध्ये त्यांस काही फरक वाटत नाही.

काही वर्षात भारतात शेण हे इतर देशातून आयात होणार इतकी गंभीर परिस्थिती ओढवणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. यावर काहींना आश्चर्यही वाटले होते. तर काहींना हा विनोदाचा भाग वाटला होता. झपाट्याने घटणारे पशुधन विचारात घेता भारतात ही परिस्थिती निश्चितच ओढवेल यात शंकाच नाही. शेणाला सोन्याचा भाव येणार यात शंकाच नाही. शेतीमध्ये सेंद्रिय खतासाठी शेणाचे महत्त्व आहे. गेल्या काही वर्षात शेतामध्ये वापरण्यात येणाऱ्या सेंद्रिय खतात झपाट्याने घट झाली आहे. दहा ते पंधरा गाड्या शेणखत टाकणारे शेतकरी आजकाल एक-दोन गाड्याही शेणखत मिसळत नसल्याचे चित्र आहे. अशा या परिस्थितीमुळे जमिनीची प्रत खालावत चालली आहे. पिकांच्या उत्पादनावर याचा परिणाम दिसून येत आहे. रासायनिक खतांचा अधिक मारा होत असल्याने याचे दुष्परिणामही दिसून येत आहेत.

सेंद्रिय खत मिसळले नाही तर रासायनिक खतांची कार्यक्षमता घटते. याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. शेणखत घटण्याचे प्रमुख कारण म्हणजे घरटी आजकाल जनावरेच पाळली जात नाहीत. पूर्वी गोठ्यात दहा दहा जनावरे असायची एक बैलजोडी, दोन म्हशी, दोन गायी, तीन चार वासरे सहज एका शेतकऱ्याकडे असायची. पूर्वीच्या काळीतर देशी गायींवरून श्रीमंती ठरवली जात होती. ज्याच्याकडे सर्वांत जास्त गायी तो सर्वांत श्रीमंत समजला जात असे. लग्नामध्ये याचा विचार जरूर केला जात होता. अशा घरात मुली नांदायला दिल्या जात होत्या. आता परिस्थिती उलटी आहे. गाई, म्हशी असणाऱ्यांच्या घरात मुलींना देण्यात कमीपणा समजला जात आहे. कारण घरकामाबरोबर गोठ्यातील शेणही काढायला लागते. अशा घरात नांदायलाही मुली तयार नसतात. अशा या परिस्थितीमुळेच पशुधन घटत आहे. कष्ट करण्यात कमीपणा वाटू लागला आहे.

1997 नंतर राज्यात पशुधनात घट होताना दिसते. बैलांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. दुभत्या जनावरांच्या संख्येत तसे घटीचे प्रमाण तुलनेत कमी असले तरी प्रमाण घटत आहे ही बाब गंभीर आहे. याचा विचार व्हायला हवा. पशुधनात घट म्हणजेच शेणात घट. शेणखतात घट. हे समीकरण आहे. भावी काळात जमिनीचा पोत टिकवायचा असेल तर शेणखताचे प्रमाण हे वाढवायला हवे. यासाठी पशुधनही वाढवायला हवे. शेते टिकविण्यासाठी शेणाची गरज भासणार आहे. सध्या मिसळण्यात येणारे शेणखताचे प्रमाण विचारात घेता भावी काळात रासायनिक खताबरोबरच शेणखतही आयात करण्याची वेळ येईल. शेणाचे उपयोग विचारात घेता सोन्यापेक्षाही शेणाला महत्त्व आहे. शेणापासून पूर्वी शेणी, शेणकुटे तयार केली जायची. पूर्वी स्वयंपाक हा चुलीवर केला जायचा. आता चुलींची जागा गॅसने घेतली आहे. शेणकुटे दिसेनाशी झाली आहेत. ती थापायची. वाळवायची रचून ठेवायची. पावसाळ्यात भिजू नये यासाठी योग्य जागी ठेवायची. ही कामे आता गॅसमुळे कमी झाली आहेत.

कोकणात किंवा अतिदुर्गम खेडेगावात आजही चुलीवर स्वयंपाक केला जातो. अशा ठिकाणी या शेणी पाहायला मिळतात. शेणीमुळे प्रदूषण वाढते. धूर होतो हे खरे आहे. पण हा धूर शरीराला फारसा अपायकारक नसतो. देशी गायींच्या शेणी जाळल्यास घरात स्वच्छता होते. घरातील किडे, विषाणू नाहीसे होतात. आजही अनेक ठिकाणी शेणकुटावर धूप जाळून घरातील डास घालवतात. देशी गायीच्या शेणाने सारवलेली घरे ही स्वच्छ असतात. तेथे किडे होत नाहीत. परिसरातील वातावरण प्रसन्न व स्वच्छ राहते. उष्णही राहते. याला एक वेगळा उबदारपणा असतो. शरीरासाठी या उबदारपणाची गरज असते. लहान बाळाला धुपाची धुरीही यासाठीच दिली जाते. पण हल्ली यासाठी शेणकुटच मिळत नाही.

चुली गेल्या आता गोबर गॅस घरोघरी झाले आहेत. हा गॅस शेणापासूनच तयार केला जातो. शेणखतही तयार होते. पण ग्रामीण भागात किती घरांमध्ये आता गोबर गॅस आहेत. वाढत्या नागरीकरणामुळे गोबर गॅस अपुरा पडत आहे. जनावरे पाळली जात नसल्याने गोबर गॅसला शेण कोठून आणणार हीसुद्धा मोठी समस्या निर्माण झाली आहे. जनावरे पाळायची तर त्याला चारा आला. चाऱ्यासाठी आता कुरणेही नाहीत. गवतही नाही. पडीक जमिनीवर आता वसाहती वाढल्या आहेत. जनावरे चरायला सोडणे आता बंदच झाले आहे. कारण मोकाट जनावरे शेतीचे नुकसान करतात. वाढत्या नागरिकीकरणामुळे अनेक समस्या भेडसावत आहेत. शेतीचे तुकडे झाल्याने वाट्याला आलेल्या शेतीत चाèयासाठी पिके घेणेही शक्य नाही. घरापासून शेत लांब असल्याने दररोज चारा उपलब्ध करणेही कठीण आहे. अशा एकावर एक वाढत्या समस्यांमुळे पशुधन घटते आहे.

उपलब्ध शेतीमध्ये जनावरांच्या चाऱ्यासाठी पिके घेऊन दुग्ध व्यवसायास चालना देणे गरजेचे आहे. दुधामुळे उत्पन्नातही वाढ होईल. घरात पौष्टिक दूध उपलब्ध होईल. मुलांना पोषक आहार मिळेल. देशी गायी पाळल्यास त्यापासून अनेक औषधी पदार्थ उपलब्ध होतील. देशी गायीचे तूप हे औषधी असते. देशी गायीचे मूत्रही औषधी असते. याचा विचार करता प्रत्येक घरात एक देशी गाय ही असायलाच हवी. शेती आणि दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा शेतकऱ्यांनी करायलाच हवा. जनावरांच्या संगोपनातून मिळणाऱ्या शेणापासून सेंद्रिय खताची निर्मिती करता येणे शक्य आहे.

रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी, जमिनीचा ढासळलेला पोत सुधारण्यासाठी, सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्याची गरज आहे. पण शेणखताशिवाय सेंद्रिय शेती होणार कशीŸ? शेणास वाढते महत्त्व विचारात घेता शेणाला सोन्याचा भाव आहे. हे शेतकऱ्यांनी विचारात घ्यायला हवे. यासाठी ही सोन्याची खाण आत्तापासूनच जपून ठेवायला हवी. तसे नियोजनच शेतकऱ्यांनी करायला हवे. पूर्वी मुबलकतेमुळे शेणाचे महत्त्व लक्षात येत नव्हते. पण आता परिस्थिती बदलली आहे. शेणाला सोन्याचा भाव आला आहे. हे ओळखून शेतीमध्ये याच्यासाठी प्रयोजन करायला हवे.

Related posts

आत्मज्ञानाची लढाई हा योगायोगच

एक शिष्य एक गुरू परंपरेचे कार्य

गुंफण अकादमीतर्फे विनोदी कथा स्पर्धेचे आयोजन

Leave a Comment