“प्रत्येक मानवामध्ये एक कलाकार दडलेला असतो. मी त्यांना कधीही अभिनय करण्यासाठी सांगितले नाही. प्रत्येक दृश्यात, त्यांना जशी प्रीतिक्रिया द्यावीशी वाटली, तशी त्यांनी दिली. कारण, चित्रपटात दाखवलेली व्यवस्था, त्यांच्या खऱ्या आयुष्याचाच भाग आहे.”
प्रियनंदन, दिग्दर्शक
‘धाबरी कुरुवी’ हा चित्रपट एका आदिवासी मुलीच्या वादळी आणि प्रदीर्घ संघर्षाची कथा आहे, जी जुनाट परंपरा नाकारते, आणि तिच्यासारख्या अनेक मुलींना जखडून ठेवणाऱ्या, समाजाच्या, समुदायाच्या बंधनांतून मुक्त होण्यासाठी लढा देते. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतियहासातील हा पहिलाच चित्रपट आहे, ज्यात, सगळ्या आदिवासी व्यक्तींनीचभूमिका केल्या आहेत . गोव्यात सुरु असलेल्या 53 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव-इफ्फीमध्ये या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर शो झाला. चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, हा चित्रपट पूर्णपणे ‘इरूला’ या आदिवासी बोलीभाषेत तयार करण्यात आला आहे.
या महोत्सवादरम्यान पत्रसूचना कार्यालयाणे आयोजित केलेल्या ‘टेबल टॉक्स’ या संवादात्मक कार्यक्रमात चित्रपटाचे दिग्दर्शक, प्रियनंदन यांनी सांगीतले, की अनेक आदिवासी मुली, ज्या स्वतःसाठी उभे राहायला विसरून गेल्या आहेत, आणि त्यांच्या आयुष्यात त्यांच्या समुदायायाकडून जे जे काही लादलं जातं, ते ‘आपलं नशीब’ म्हणून मुकाट्याने सहन करत असतात, अशा आदिवासी मुलींच्या आयुष्यात काही चांगला बदल घडवण्याची आपली प्रामाणिक इच्छा होती. “चित्रपट हे माध्यम वापरुन, एका उद्दिष्टासाठी काम करण्याचा हा माझा प्रयत्न आहे,” असे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक प्रियनंदन यांनी सांगितले.
या चित्रपटाविषयी अधिक माहिती देतांना प्रियदर्शन म्हणाले, की हा चित्रपट, समाजाच्या प्रवाहाबाहेर राहिलेल्या लोकांच्या समकालीन प्रश्नांवर भाष्य करतो, केरळच्या आदिवासी समुदायातील अविवाहित मातांचा प्रश्न यात मांडला आहे. “ही व्यवस्था आपले नशीब आहे, अशाच मनोवृत्तीने हे लोक राहत आहेत, त्यामुळे ते अशा व्यवस्थेतून बाहेर येण्याचा काहीही प्रयत्न करत नाहीत” असेही त्यांनी सांगितले.
ही कथा, एका साध्या भोळ्या आदिवासी मुलीची कथा आहे, जी स्वत:च्या मानवी हक्कांसाठी, स्वतःच्या शरीरावर, स्वतःच्या आयुष्यातील निर्णयाबाबतच्या अधिकारांसाठी राखेतून पुन्हा एकदा जन्म घेते. एका दंतकथेनुसार, ‘धाबारी कुरुवी’ही लोककथेतील एक चिमणी असते, जिचे वडील अज्ञात असतात. एखादे ठिकाण, एखादा समुदाय, तिथेले लोक यांना समाजाच्या मुख्यप्रवाहाच्या बाहेर ठेवणे, त्यांची टिंगल करणे, अशा मानसिकतेवर बोट ठेवत, ही मानसिकता बदलण्याचा आपला प्रयत्न असल्याचे प्रियनंदन यांनी सांगितले.
हा सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी, चित्रपट या माध्यमाची निवड का केली यावर उत्तर देतांना प्रियनंदन म्हणाले, की माझ्या मते, चित्रपट हे केवळ मनोरंजनासाठी नसतात. “आपण आजवर ज्यांना कधी भेटलोही नाही, अशा व्यक्तींच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल घडवून आणण्याचे ते प्रभावी माध्यम ठरू शकते.”, असे ते म्हणाले.
हा चित्रपट तयार करतांना भाषेमुळे काही आव्हाने आलीत का याविषयी सांगतांना प्रियानंदन म्हणाले की, ही सगळी प्रक्रिया अगदी सहज झाली. “ आमच्या भावना सारख्या होत्या, त्या एकमेकांपर्यंत पोहोचत होत्या, त्यामुळे भाषेचा अडथळा कुठेच आला नाही”. या चित्रपटाची संहिता पहिल्यांदा मल्याळी भाषेत लिहिली गेली आणि नंतर तिचे इरूला भाषेत भाषांतर करण्यात आले. नाट्य अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या काही आदिवासी लोकांनी मला ही संहिता लिहिण्यात मदत केली, असे त्यांनी सांगितले.
आपण आदिवासी समुदायाशी संवाद कसा साधू शकलो, याबद्दल माहिती देतांना, प्रियनंदन म्हणाले, की, त्यांनी आणि त्यांच्या चमूने, अनेक दिवस आदिवासी समुदायासोबत घालवले, त्यांच्यासही मैत्री केली.” एकदा मैत्री झाल्यावर, पुढची प्रक्रिया खूपच सोपी झाली, कारण त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता.”
या चित्रपटातल्या भूमिकांसाठी, आदिवासी समुदायातल्या कलाकारांची अट्टापड़ी इथे एक अभिनय कार्यशाळा घेण्यात आली, ज्यात सुमारे दीडशे लोकांनी सहभाग घेतला होता. मात्र, अभिनयाचा कुठलाही अनुभव नसलेल्या, नव्याकोऱ्या लोकांसोबत काम करतांना काही अडचणी आल्यात का, हे विचारलं असता ते म्हणाले, “प्रत्येक मानवामध्ये एक कलाकार दडलेला असतो. मी त्यांना कधीही अभिनय करण्यासाठी सांगितले नाही. प्रत्येक दृश्यात, त्यांना जशी प्रीतिक्रिया द्यावीशी वाटली, तशी त्यांनी दिली. कारण, चित्रपटात दाखवलेली व्यवस्था, त्यांच्या खऱ्या आयुष्याचाच भाग आहे.”
ज्यांना अभिनयाची नैसर्गिक समज आहे, अशा लोकांपर्यंत पोहोचण्याचा आपला विचार अधोरेखित करत, प्रियनंदन म्हणाले. “आदिवासी कलाकार, माझ्या अपेक्षेपेक्षाही अधिक उत्तम, कसदार अभिनय करण्यास सक्षम होते. भावना व्यक्त करण्याची भाषा सगळीकडे सारखीच असते. प्रत्येक समुदायात अशी अनेक रत्ने असतात, जी हृदयाच्या तळापासून आपल्या भावना अभिव्यक्त करु शकतात, त्यांना कोणत्याही प्रशिक्षणाची गरज नसते. मात्र आपल्याला असे हीरे शोधण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.”
आदिवासी समुदायातील प्रश्नांविषयी बोलतांना, प्रियनंदन म्हणाले, की त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आजवर काहीही प्रयत्न झाले नाहीत. ‘आपल्याकडे निधीची काहीही कमतरता नाही, तरीही त्या लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.”. त्यांना त्यांच्या दृष्टिकोनातून समजून घेण्याची गरज आहे, आणि त्यानुसार त्यांच्यासाठी धोरणे राबवायला हवी आहेत, असे मत प्रियनंदन यांनी व्यक्त केले.
या चित्रपटात, केरळच्या अट्टापड़ी या आदिवासी खेड्यातील, इरूला, मुदुका, कुरुबा आणि वडुका अशा विविध समुदायांच्या, साठपेक्षा अधिक लोकांनी विविध भूमिका केल्या आहेत . “त्यापैकी अनेकांनी तर त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कधीही चित्रपट पाहिलेला नव्हता, असेही प्रियनंदन यांनी सांगितले.
या महोत्सवात, चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर करण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानत, प्रियनंदन यांनी सांगितले की, त्यांचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी, देशातल्या सर्व आदिवासी खेड्यांमध्ये हा चित्रपट दाखवण्याची त्यांची इच्छा आहे.
मीनाक्षी आणि श्यामिनी, या दोघी या चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री आणि चित्रपटाचे छायाचित्रकार, अश्वघोषण हे ही यावेळी उपस्थित होते. चित्रपटातील अभिनेत्यांमध्ये अनुप्रशोभिनी आणि मुरुकी यांच्यासह अट्टापडीच्या आदिवासी महिला, नान्जियम्मा यांचाही समावेश आहे. , नान्जियम्मा यांना गेल्यावर्षी, सर्वश्रेष्ठ गायिकेचा 68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.