April 19, 2024
Ego but which one article by rajendra ghorpade
Home » अहंकार असावा, पण कशाचा ?
विश्वाचे आर्त

अहंकार असावा, पण कशाचा ?

अहंकार असावा, पण कशाचा ? स्वतःलाच स्वतःमध्ये पाहण्याचा अहंकार असावा. मी कोण आहे हे जाणून घेण्याचा अहंकार असावा. मी आत्मा आहे. ठराविक नावाच्या देहात हा आत्मा आहे. नावे देहाला आहेत. आत्म्याला नाव नाही. सद्गुरूंच्यामध्ये असणारा आत्मा व माझ्यामधील आत्मा हा एकच आहे. सद्गुरू हेच ज्ञान देतात आणि आत्मज्ञानी करतात.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

पैं परमाणु भूतळीं । हिमकणु हिंमाचळीं ।
मजमाजीं न्याहाळीं । अहं तैसें ।। ३८५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा

ओवीचा अर्थ – पृथ्वीवर असलेला अल्प परमाणू जसा पृथ्वीरूप आहे. अथवा बर्फाच्या पर्वतावरील बर्फाचा कण जसा बर्फाच्या पर्वतरूपच आहे. त्याप्रमाणें तू आपला मीपणा माझ्या ठिकाणी पाहा.

हिमालयात सर्वत्र बर्फच बर्फ आहे. तेथे बर्फाचे पर्वत आहेत. बर्फाचा पर्वत काय आणि एखादा बर्फाचा कण काय हे दोन्हीही एकच आहेत. दोन्हीमध्ये पाणीच आहे. सांगण्याचे तात्पर्य इतकेच की एखादा गर्भश्रीमंत आणि रस्त्यावरचा भिकारी दोघेही माणूसच आहेत. दोघांमध्ये असणारा आत्मा हा एकच आहे. श्रीमंत झाला म्हणजे आत्मा काही वेगळा होत नाही. गरीब असला म्हणून काय त्याचा आत्मा छोटा असत नाही. आत्मा हा सारखाच आहे. लहान-मोठा असा भेद तेथे नाही.

अहंपणा म्हणजे मीपणा, अहंकार. मी कोण आहे? मी श्रीमंत आहे. मी गरीब आहे. मी पंडित आहे. मी ज्ञानी आहे. मी अडाणी आहे. मी खेडवळ आहे. मी सुधारलेला आहे. हा मी नेमका कोण आहे ? मी गरीबही असू शकतो मी श्रीमंतही असू शकतो. गरिबाची दुःखे वेगळी. श्रीमंताची दुःखे वेगळी. अति श्रीमंत झाला म्हणून काही त्याला दुःखे नसतात असे होत नाही. चोराच्या भीतीने अनेक श्रीमंताना झोप येत नाही. गरीब मात्र कष्टाची भाकरी खाऊन निवांत, गाढ झोपी जातो. त्याला चोरीची भीतीच नसते. प्रत्येकाची सुख-दुःखे वेगळी आहेत. पण श्रीमंत आहे म्हणून श्रीमंतीचा अहंकार नसावा. गरीब आहे म्हणून गरिबीचे दुःख नसावे.

सदैव समाधानी राहण्याचा प्रयत्न करायला हवा. अहंकारी माणसाला त्याचा अहंकारच मारतो. मी मोठा, मी मोठा, माझ्यासारखा कोणीच नाही. असे म्हणत तो केव्हा छोटा होतो याचे भानही त्याला राहत नाही. हे माझे, हे मी कमविले, हे माझ्यामुळे झाले. असे म्हणत मेल्यानंतर ते काही आपल्याबरोबर येत नाही. चांगले काम केले तर पुढच्या पिढीत त्याची स्तुती होत राहते. पण वाईट काम केले तर कोणी नावही काढत नाही. शेवटी काय उरते. नावच ना? पण चांगले काम केले तरच तेच राहते. वाईट काम केले तर सदैव त्याच्या नावाने शंख फोडला जातो. चार कामे करा. पण ती चांगली करा. त्याचा सदैव चांगला बोलबाला होत राहावा. असे ते काम असावे.

थोर व्यक्तींची नावे पिढ्यान्पिढ्या काढली जातात. त्यांनी केलेल्या कामाचा आदर्श नेहमीच पुढच्या पिढीला प्रेरणादायी ठरतो. सद्गुरू परंपराही पिढ्यान्पिढ्या चालत आली आहे. संतांची नावे आजही अमर आहेत. आदिनाथांपासूनची ही परंपरा आजही आहे. अहंकार असावा, पण कशाचा ? स्वतःलाच स्वतःमध्ये पाहण्याचा अहंकार असावा. मी कोण आहे हे जाणून घेण्याचा अहंकार असावा. मी आत्मा आहे. ठराविक नावाच्या देहात हा आत्मा आहे. नावे देहाला आहेत. आत्म्याला नाव नाही. सद्गुरूंच्यामध्ये असणारा आत्मा व माझ्यामधील आत्मा हा एकच आहे. सद्गुरू हेच ज्ञान देतात आणि आत्मज्ञानी करतात.

Related posts

Photos : माघी यात्रा जया एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीची पुजा

आयुर्वेदातील वैद्यांना वनसंवर्धनाची सक्ती करण्याची गरज

भाषेचा सन्मान केलात तर ती तुम्हाला प्रतिष्ठा देईल: आशुतोष राणा

Leave a Comment