March 29, 2024
Grape Crop protection from Cold and Cloudy weather
Home » थंड वातावरणाचा द्राक्षावर होणारा परिणाम
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

थंड वातावरणाचा द्राक्षावर होणारा परिणाम

वारंवार बदलते हवामान, अवेळी पडणारा पाऊस, ढगाळ वातावरण आणि थंडी या द्राक्ष पिकावर मोठा परिणाम होताना दिसून येत आहे. या कालावधीत पिकाची काळजी कशी घ्यायची याबाबत कृषीसमर्पन समुह आणि प्रयोग परिवारचे वासुदेव काटे यांचा मार्गदर्शन…

द्राक्ष हे पीक प्रामुख्याने थंड हवामानाच्या प्रदेशातील आहे. साधारणपणे 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान झाल्यास द्राक्षांच्या वाढीवर परिणाम होतो, तसेच द्राक्षाच्या घडांवर पाऊस पडल्यास जास्त रोग व किडी येतात. काढणीनंतरही फळकूज वाढते, त्यामुळे द्राक्षाचे पीक उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात घेणे आपल्याकडे सोयीचे नसते. आपण उष्ण कटिबंधामध्ये आहोत. येथील हिवाळा थंड हवामानाच्या प्रदेशातील उन्हाळ्याप्रमाणे असतो म्हणूनच आपण द्राक्षाचे पीक हिवाळ्यात घेतो.

नाशिक, सांगली, सोलापूर व पुणे या जिल्ह्यांमधील हिवाळ्यातील हवामान सर्वसाधारणपणे द्राक्षाच्या वाढीसाठी योग्य आहे. द्राक्षाच्या वाढीसाठी 15 ते 35 अंश तापमान योग्य मानले जाते; परंतु बऱ्याच वेळा आपण थंडीच्या लाटा अनुभवतो. तापमान 10 अंश से.पेक्षा कमी झाल्यास द्राक्षाच्या वाढीवर परिणाम होतो. बऱ्याच वेळा रात्रीचे तापमान 10 अंश से.पेक्षा कमी झाल्यानंतर दुपारचे तापमान 28 ते 30 अंश से.पर्यंत वाढते. रात्रीच्या व दिवसाच्या तापमानातील हा फरक बऱ्याच वेळा कमी तापमानाने होणाऱ्या नुकसानीपेक्षा जास्त घातक असतो. हवामानात जास्त आर्द्रता असताना थंडीची लाट आल्यास सकाळी बऱ्याच वेळा धुके राहते. पाने व घड त्यामुळे बहुतेकदा ओले राहतात. असे घड प्रथम थंडीमुळे व त्यानंतर दुपारच्या जास्त तापमानामुळे खराब होऊ शकतात.

सद्यःस्थितीत बहुतांश बागा या मण्यांची वाढ किंवा मण्यांत पाणी उतरण्याच्या अवस्थेत आहेत. सध्याच्या हवामानाचा विचार केल्यास किमान तापमान 10 ते 15 अंश से. याच दरम्यान आहे. साधारणपणे या थंडीचा परिणाम द्राक्षवेलीवर दृश्‍य किंवा अदृश्‍य स्वरूपात दिसून येतो.

प्रयोग परिवारचे वासुदेव काटे यांचे द्राक्ष बागांबद्दल मार्गदर्शन

🍇 थंड हवामानाचा द्राक्ष वेलींवरील परिणाम 🍇


1) मुळांची वाढ मर्यादित होते किंवा नवीन मुळांची निर्मिती होत नाही. यामुळे पाने लहान राहतात, त्यांची जाडी कमी होते व शेंड्यांची वाढ पूर्णपणे थांबते.
2) वेलीची वाढ खुंटते, खोडाची जाडी कमी होते, विस्तार मर्यादित राहतो, उन्हात आल्यामुळे द्राक्षमण्यांचा रंग (तपकिरी) बदलतो.
3) पर्णरंध्रे बराच काळ बंद राहतात, प्रकाश संश्‍लेषण कमी होते, अन्नद्रव्यांचे वहन कमी होते, वेलीची उपासमार होते, त्यामुळे मण्यांचा आकार वाढत नाही व वाढ थांबलेली दिसून येते. परिणामी, द्राक्षाची प्रत बिघडते.
4) पोटॅश, कॅल्शिअम, फॉस्फरस या अवस्थेमध्ये अत्यंत आवश्‍यक असते, ते मण्यांत शोषले जात नाही, त्यामुळे त्यांच्या कमतरतेच्या विकृती द्राक्षमण्यांवर दिसून येतात.
5) सायटोकायनीनची उपलब्धता कमी होते, हरितद्रव्य पानात कमी असते. फेनॉलची निर्मिती वाढते. इथिलीनचे प्रमाण वाढते, त्यामुळे ऍन्थोसायनीनची निर्मिती मण्यांत होते. त्यामुळे रंगीत जातींमध्ये मण्यांना रंग चांगला प्राप्त होतो, या उलट पांढऱ्या द्राक्षांत पिंक बेरीजसारखी विकृती दिसून येते.
6) मण्यांत पाणी उतरण्याच्या वेळी पाणी जास्त प्रमाणात व ड्रीप्सवर असतील, तर द्राक्षमण्यांना चिरा पडू शकतात.
7) जास्त थंडी झाल्यास रोग व किडींचा प्रादुर्भाव जास्त होऊ शकतो.

🍇 पिंक बेरीज आणि द्राक्षमण्यांना चिरा पडणे 🍇

थंड हवामान हे द्राक्षांसाठी बाधक आहे, यामुळे प्रामुख्याने पिंक बेरीज आणि द्राक्षमण्यांना चिरा पडणे यासारख्या शरीरशास्त्रीय विकृती आढळतात.

🍇 पिंक बेरीज 🍇

ही विकृती थॉमसन सीडलेस व त्याचे क्‍लोन्स जसे तास-ए-गणेश, माणिक चमन इ.मध्ये दिसून येते. पाणी उतरण्याच्या अवस्थेत जर कमाल तापमान हे 30 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त व किमान तापमान हे 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असेल, तर द्राक्षमणी गुलाबी रंगाचे होतात. हे तापमान जास्त काळ टिकल्यास सर्वच मणी गुलाबी होतात. यालाच पिंक बेरीज विकृती म्हणून संबोधले जाते. या विकृतीमुळे निर्यातीमध्ये बाधा येते. ही विकृती येऊ नये यासाठी परिणामकारक संशोधन सध्यातरी झालेले नाही, तरीपण काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करून काही अंशी ही विकृती येण्याचे टाळता येऊ शकते.

🍇 उपाययोजना- 🍇

1) ही विकृती सर्वसाधारणपणे पाणी उतरण्याची अवस्था असणाऱ्या बागेमध्ये दिसून येते. ती टाळण्यासाठी वेलीची ऑक्‍टोबर छाटणी ही ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात करावी.
2) वेलीला पोटॅश या अन्नद्रव्याचे पोषण योग्य प्रमाणात द्यावे.
3) सायटोकायनीन या संजीवकांची मात्रा पाणी उतरण्याच्या वेळी द्यावी, की ज्यामुळे मण्यांत हरितद्रव्ये टिकून राहतील.
4) पाण्याचा जास्त ताण देऊ नये. मण्यांत पाणी उतरण्यास सुरवात झाल्यानंतर वेलीवर प्लॅस्टिक शेडनेटचे आच्छादन करावे किंवा घड पेपरमध्ये झाकावेत.
5) सेंद्रिय, गांडूळ, कंपोस्ट व हिरवळीच्या खताचा वापर करावा. सेंद्रिय पदार्थाची स्लरी द्यावी.
6) मण्यांची विरळणी एक किंवा दोनदाच करावी. मण्यांना इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी.

🍇 द्राक्षमण्यांना चिरा पडणे 🍇

ही विकृती रंगीत जातींमध्ये जास्त प्रमाणात आढळते. ही विकृती मुख्यतः बागेत मण्यांत पाणी उतरण्याच्या अवस्थेत सापेक्ष आर्द्रता वाढल्यामुळे दिसून येते. मुळांद्वारे पाणी शोषले जाते; परंतु पानांतून ते बाहेर पडत नाही, कारण वातावरणातील तापमान कमी व आर्द्रता जास्त असते, यामुळे हे पाणी ज्यामध्ये 16 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त साखर आलेली असते, अशा मण्यांत शोषले जाते, त्यामुळे मण्यांत दाब वाढतो. हा दाब थांबवून ठेवण्यासाठी मण्यांचा आकार वाढत नाही. परिणामतः मण्याला भेगा पडतात व अशा मण्यातून साखर बाहेर पडते. यावर ऍस्परजिल्स, म्युकर, रायझोपर्स किंवा फेसोलियमसारख्या परोपजीवी बुरशी वाढतात व मणी सडून जातात.

🍇 उपाययोजना –

1) जास्त पाणी देण्याचे टाळावे.
2) ड्रीप्स वर न लावता जमिनीपासून एक फूट उंचीवर बांधाव्यात, जेणेकरून जास्त आर्द्रता तयार होणार नाही.
3) मण्यांची विरळणी योग्य प्रकारे करावी, जेणेकरून घड सुटसुटीत राहतील.
4) वेलीचा विस्तार मर्यादित ठेवावा, जास्त कॅनोपी ठेवू नये.
5) नो टिलेज पद्धतीचा वापर करावा, जेणेकरून पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होईल.

(सौजन्य – कृषिसमर्पण समूह, महाराष्ट्र राज्य)

Related posts

विचार सूत्र देणारे बालसाहित्य : ‘माझे गाणे आनंदाचे’ आणि ‘जाणिवांची फुले.’

प्रभानवल्ली ते धूतपापेश्र्वर साहित्य संस्कृती जागर परिक्रमा

संसाराचा गाडा…

Leave a Comment