February 6, 2023
Know the bramh from all living things in nature
Home » सृष्टीतील सर्व जीवातील ब्रह्म जाणून व्हावे सर्वज्ञ
विश्वाचे आर्त

सृष्टीतील सर्व जीवातील ब्रह्म जाणून व्हावे सर्वज्ञ

भारतीय संस्कृतीमधील ऋषीमुनींनी अनेक प्रयोग केले. अनेक गोष्टींचा बारकाईने विचार केला. त्यामुळेच भारतीय संस्कृती ही बुद्धिप्रधान संस्कृती म्हटली जाते. विश्वाचा विचार करताना त्यांनी स्वतःपासून विचार करायला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी आपण कोण आहोत याचा विचार केला.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

म्हणौनि ब्रह्मेशानापरौतें । वाढणें नाही जीवातें ।
तेथूनि मग वरौतें । ब्रह्मचि की ।। 203 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा

ओवीचा अर्थ – म्हणून ब्रह्मदेव आणि शंकर यांच्या पलीकडे जीवांना वाढणें नाही मग तेथून तर केवळ ब्रह्मच आहे.

पृथ्वी सोडून इतरत्र जीवसृष्टी आहे का याचा शोध अद्याप घेतला जात आहे. चंद्रासह मंगळ वा अन्य ग्रहावर पाणी आहे का याचा अभ्यास कित्येक वर्षापासून सुरु आहे. पण अद्याप ठोस कोणतेही उत्तर मिळालेले नाही. कारण पाणी असेल तरच तेथे जीवसृष्टी असू शकते. मुळात या विश्वाच्या पोकळीत काय काय दडले आहे हे शोधणे एक मोठे आव्हानच आहे. आत्तातरी असेच म्हणता येईल की पृथ्वी व्यतिरिक्त अन्यत्र जीवसृष्टी नाही. विश्वातील हा चमत्कार केवळ या भुतलावरच पाहायला मिळतो.

भारतीय संस्कृतीमधील ऋषीमुनींनी अनेक प्रयोग केले. अनेक गोष्टींचा बारकाईने विचार केला. त्यामुळेच भारतीय संस्कृती ही बुद्धिप्रधान संस्कृती म्हटली जाते. विश्वाचा विचार करताना त्यांनी स्वतःपासून विचार करायला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी आपण कोण आहोत याचा विचार केला. स्वतःची ओळख झाली तरच या विश्वाची ओळख आपण करू शकू असे समजून त्यांनी काम केले म्हणूनच विश्वाचे आर्त या संस्कृतीत प्रकटले.

सूर्यापासूनच विश्वाची उत्पत्ती झाली आणि सूर्यातच ती सामावणार आहे. सूर्य म्हणजे उर्जा आहे. गुरुत्वीय शक्ती आहे. सूर्याचा प्रकाश पडताच फुले उमलतात. म्हणजे त्यातून मिळणाऱ्या उर्जेतून चैतन्य निर्माण होते. सर्व सजिवातील शक्ती सूर्यापासून उत्पन्न झालेली आहे. देह हा कार्बनचा बनलेला आहे. अनेक मुलद्रव्ये त्यामध्ये सामावलेली आहेत. वृक्ष सुद्धा कार्बनपासूनच तयार होतो. त्यातच अनेक मुलद्रव्ये सामावलेली आहेत. पण या देहात किंवा वृक्षात जीव असतो तोपर्यत त्याची हालचाल सुरु असते. अशा या सृष्टीत अनेक सजिव वस्तू आहेत. पण त्यांच्यात जीव आहे तोपर्यंत त्यांची हालचाल होत असते. त्यांच्यातील ते चैतन्य, जीव गेला की मग त्या निर्जीव होतात. त्यांची हालचाल थांबते. तो केवळ एक विविध मुलद्रव्यांचा सांगाडाच असतो.

म्हणजेच जीवाच्या वाढीला मर्यादा आहे. प्राणाच्या पलिकडे तो नाही. निर्जीव वस्तूत तो आहे तोपर्यंत ती वस्तू सजिव असते. हे सजिवत्व जाणणे म्हणजेच ब्रह्माची ओळख करून घेणे आहे. प्रत्येक जीवाची वाढ ही या ब्रह्मापर्यंतच असते. यासाठी देहातील ब्रह्म जाणून घेऊन या सृष्टीतील सर्वजीवातील ब्रह्माची ओळख करून घ्यायला हवी. त्याला जाणायला हवे. त्या सर्व सजीवातील ब्रह्म हे एकच आहे. हे जाणून व्यवहार करायला हवा. मानवाने जर केवळ मानवाचाच विचार केला तर ते योग्य ठरणार नाही. सृष्टीतील श्रेष्ठत्व जाणून घेऊन सर्वातील ब्रह्म, चैतन्य जाणून घेऊन व्यवहार करायला हवा.

सृष्टीतील प्रत्येक जीवावर प्रेम करायला हवे. पशू, पक्षी, वनस्पती सर्व सजीवावर प्रेम करायला हवे. त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्तापित करायला हवेत. जगा व जगू द्या ही शिकवण ही यासाठीच आहे. या जीवातील एकत्व जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी एकरूप व्हायला हवे. या जीवातच सर्व विश्व सामावलेले आहे. ही ओळख ठेवून सर्वावर आपण प्रेम करायला शिकावे. या प्रेमातूनच, एकरुपतेतूनच आपणास आत्मज्ञानी व्हायचे आहे. सर्व जीवातील ज्ञान समजून घेऊन सर्वज्ञ व्हायचे आहे. यापलिकडे जीवाची वाढ नाही हे जाणून घ्यायचे आहे. यासाठीच या जीवाचा जन्म झाला आहे. हा जन्म सार्थकी लावण्यासाठी आपण कर्म करायचे आहे.

Related posts

स्वधर्माचे आचरण

सूर्यासारखे स्वतःचे जीवनही करा प्रकाशमान  

ज्ञानी होण्यासाठी अज्ञानाची ओळख असणे गरजेचे

Leave a Comment