March 19, 2024
meaning-of-adhyatm article by Rajendra Ghorpade
Home » अध्यात्म म्हणजे काय ?
विश्वाचे आर्त

अध्यात्म म्हणजे काय ?

देह आणि आत्मा वेगळा आहे. या देहात हा आत्मा अडकला आहे. मी म्हणजे आत्मा आहे. तो सर्वांमध्ये आहे, याची अनुभूती येते. हेच तर अध्यात्म आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

ऐशिया आपुलियाची सहजस्थिती । जया ब्रह्माची नित्यता असती ।
तया नाम सुभद्रापती । अध्यात्म गा ।। १९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा

ओवीचा अर्थ – अर्जुना, याप्रमाणे आपल्या स्थितीने असणाऱ्या ब्रह्माचे जे अखंडत्व त्या अखंडत्वास अध्यात्म हे नाव आहे.

भगवंतास धनुर्धर अर्जुनाने प्रश्न केला, ब्रह्म म्हणजे काय ? कर्म कशाला म्हणतात ? अध्यात्म म्हणजे काय ? तसे पाहता हे प्रश्न सर्वच भक्तांना पडतात. प्रत्येक भक्ताला या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची उत्सुकता असते. हे प्रश्न प्रत्येकाला पडायलाच हवेत. त्याच्या उत्तराच्या शोधात तरी आध्यात्मिक ग्रंथांचे पारायण होईल. उत्तरे शोधण्यासाठी आपोआपच वाचन वाढेल, नंतर त्याची सवय लागेल. हळूहळू या प्रश्नांची उकल होते. अनुभूतीतून प्रश्नांची उत्तरे मिळत राहतात. यातून मनाला वाफसा येतो. अशा वेळी सद्गुरू गुरुमंत्राची पेरणी करतात.

सद्गुरूंचा नित्य सहवास आपल्या अंतःकरणात असतो. अगदी सहजपणे आपणाकडून साधना घडत असते. कष्टही पडत नाहीत. त्रास होत नाही. सतत नामस्मरणात आपण गढून जातो. दैनंदिन घडामोडीतही नित्य सद्गुरूंच्या सहवासाची जाणीव होते. त्याची अनुभूती येते. मनाला स्थिरता येते. यालाच अध्यात्म असे म्हणतात. यासाठी अवधान असावे लागते. तरच आध्यात्मिक प्रगती होत राहते. साधनेच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतात. हळूहळू प्रगती होत राहते. अनुभूती येत राहते.

देह आणि आत्मा वेगळा आहे. या देहात हा आत्मा अडकला आहे. मी म्हणजे आत्मा आहे. तो सर्वांमध्ये आहे, याची अनुभूती येते. हेच तर अध्यात्म आहे. हा सर्व मनाचा व्यवहार आहे. सर्व काही मनात असते. मनाची स्थिरता यासाठी महत्त्वाची आहे. मन स्थिर राहण्यासाठी विविध उपाय योजले जातात. कोण यासाठी ब्रह्मचर्य स्वीकारतो. लग्न न करण्याचा निर्णय घेतो. कोण संसारापासून अलिप्त राहून जंगलात, वनात तपश्चर्येचा मार्ग स्वीकारतो. यातूनच मनात त्यागी वृत्ती उत्पन्न होते. मनाला वैराग्य येते.

संसाराचा त्याग करायलाच हवा, अशी काही सक्ती नाही. संसारात राहूनही मनाची स्थिरता साधता येते. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणता मार्ग अवलंबायचा, हा व्यक्तिगत प्रश्न आहे. यामध्ये बदलही करण्याचा त्याला अधिकार आहे. मनाच्या स्थिरतेसाठीचे हे मार्ग तयार केले आहेत. मन स्थिर असेल तरच अनुभूती येईल. संसारात राहूनही सद्गुरूंचा नित्य सहवास अनुभवता येतो. साधनेने हे सर्व साध्य होते. मनामध्ये फक्त सोहमचा विचार अन् नित्य त्याचे स्मरण हेच तर अध्यात्म आहे. अगदी सहजस्थितीतही सोहमची अनुभुती येते यालाच अध्यात्म म्हणतात.

Related posts

तुकोबांशी जोडून घेताना…

‘लिव्ह इन’सारख्या ‘अनोख्या रेशीमगाठी’

चिमणी नक्की काय बोलत असावी बरं….

Leave a Comment