July 22, 2024
miracle-garden-in-deseret-dubai artcle by Prakash Medhekar
Home » वाळवंटात बहरलेले फुलांचे उद्यान
पर्यटन

वाळवंटात बहरलेले फुलांचे उद्यान

दहा वर्षापूर्वीच दुबईच्या राज्यकर्त्यांना जाणवले की, तेलाचे साठे भविष्यात कधीनाकधी संपणार आहेत. तेंव्हापासून त्यांनी देश पर्यटनासाठी सक्षम करण्यासाठी योग्य पाऊले उचलण्यास सुरवात केली. काही कालावधीत देशाच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण केले. अथक परिश्रमाने दुबईला पर्यटनासाठी साऱ्या जगाचे केन्द्रबिंदू बनवले. 

प्रकाश मेढेकर

प्रकाश मेढेकर

स्थापत्य सल्लागार , वास्तू मूल्यकर्ता, इराक, ओमान, मलेशिया आणि भारतातील बांधकाम प्रकल्पाअंतर्गत 35 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, व्यवस्थापन विषयांसाठी अभ्यागत व्याख्याता, मानव अधिकार आणि आदर्श स्थापत्य शास्त्रज्ञ पुरस्कार विजेते 2014, लेखक – दिशा बांधकाम नवनिर्मितीची (सकाळ प्रकाशन, पुणे )
ई -मेल –prakash.5956@gmail.com
मोबाईल – 9146133793

स्मार्ट सिटीच्या निमीत्ताने शहरातील  उद्यानांचे नूतनीकरण आणि नवनिर्मीती करण्याची मोठी संधी शहर प्रशासनाला उपलब्ध होत असते. स्थानिक नागरीक आणि  पर्यटकांना आकृष्ट करणारे वेगळे स्वरूप उद्यानांना त्यासाठी आपणास द्यावे लागते. गेल्या काही वर्षात मलेशिया, सिंगापूर, कंबोडिया, थायलंड, युरोपीय देशांनी आपल्याला शहरातील एतिहासिक वास्तूंचे संवर्धन आणि जतन करून पर्यटनक्षेत्रातील आपले स्थान बळकट केले .परंतु देशात अशा कोणत्याही गोष्टी नसताना पर्यटनक्षेत्रातील दुबई देशाने केलेली आजची प्रगती आश्चर्यकारक आहे.    

नेत्रदीपक मिरॅकल गार्डन

दहा वर्षापूर्वीच दुबईच्या राज्यकर्त्यांना जाणवले की, आपल्याकडील तेलाचे साठे भविष्यात कधी-ना-कधी संपणार आहेत. तेंव्हापासून देश पर्यटनासाठी सक्षम करण्यासाठी योग्य पाऊले उचलण्यास त्यांनी सुरवात केली. काही कालावधीत देशाच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण केले. अथक परिश्रमाने दुबईला पर्यटनासाठी साऱ्या जगाचे केन्द्रबिंदू बनवले. देशात स्थानिक आणि पर्यटकांसाठी येथे अनेक शॉपिंग मॉल आणि पर्यटनस्थळे विकसित केली. कमतरता होती फक्त एका आगळ्यावेगळ्या भव्य उद्यानाची. खरे तर दुबई हा आखाती प्रदेशातील रखरखीत उष्ण हवामानाचा वाळवंटी प्रदेश. वर्षाकाठी पावसाचे प्रमाण अगदीच नगण्य. परंतु अशा प्रतिकूल वातावरणातही येथे साकार झाले आहे नेत्रदीपक मिरॅकल गार्डन. पर्यटकांना हे गार्डन पाहिल्यावर वाळवंटात ओअॅसीस सापडावे तसा आनंद अनुभववण्यास येत आहे.

उद्यानासाठी ६० कोटी रुपये खर्च

२०१३ साली फेब्रुवारीत व्हॅलेंटाइन डे च्या मुहूर्तावर मिरॅकल गार्डनच्या कामाचा प्रारंभ झाला. त्यासाठी मध्यवर्ती भागात दुबईलॅन्ड येथे अंदाजे ७ लक्ष २१ हजार स्केअर फूट जागा विकसित करण्यात आली. फक्त दोन महिन्याच्या कालावधीत ४०० मजुरांच्या अथक परिश्रमातून मिरॅकल गार्डनची  निर्मिती झाली. उद्यानासाठी ४०  मिलीयन दिर्रम म्हणजे अंदाजे ६० कोटी रुपये खर्च आला. उद्यानाची निर्मिती दोन टप्प्यात केली गेली. पहिल्या टप्प्यात मुख्य उद्यान तर दुसऱ्या टप्प्यात पहिल्या भागाचे विस्तारीकरण म्हणजेच  बटरफ्लाय गार्डन, रिटेल फ्लोअर, आणि बहुमजली कारपार्किंग अशा सुविधा करण्यात आल्या. २०१३ च्या ऑक्टोबरमध्ये सर्व काम पूर्ण झाले.

चार कोटी फुलझाडांचे सुशोभीकरण

या गार्डनची रचना गोलाकार असून परीघ जवळजवळ एक किलोमीटर लांबीचा आहे. अंर्तभागात चार किलोमीटर लांबीचा  पदपथ असून विविध प्रकारची एकुण ४ कोटी फुलझाडांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. फुलझाडांच्या असंख्य विविध रचना येथे पहायला मिळतात. दर्शनी भागात स्वागतासाठी विविधरंगी फुलांनी सजवलेल्या अनेक भव्य कमानी उभारण्यात आल्या आहेत. त्या पाहताना त्रिमितीय पद्धतीचा भास होतो. संपूर्ण उद्यानातील लॅन्डस्केपचे आकर्षक डिझाईन केले आहे. रंगीबेरंगी ताज्या टवटवीत फुलांपासून बनवलेले  हार्ट, स्टार, इग्लू, अम्ब्रेला, पिरॅमिड, बुर्ज खलिफा, मोर, फ्लॉवर टनेल, डोम असे अनेक आकर्षक आकार येथे  पहायला मिळतात.

फुलांचा सर्वात मोठा पिरॅमिड

फुलांनी सजवलेले येथील घड्याळ १३ मीटर व्यासाचे असून जगातील सर्वात मोठे समजले जाते. गार्डन मधील फुलांची भिंत सर्वात जास्त लांबीची गणली जाते. फुलांनी बनवलेला सर्वात मोठा पिरॅमिड येथे आहे. या सर्व आश्चर्यकारक गोष्टींची गिनीज बुकमध्ये लवकरच नोंद होणार आहे. उद्यानाचा  एका भाग विंटेज कार्स फुलांनी सजवला आहे. दुसऱ्या भागात भव्य कृत्रिम तळे आणि त्यात अनेक कारंजी आहेत. सायकांळी या उद्यानाचे रूप बदलते. त्यावेळी असणारी विद्युत रोषणाई अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटणारी असते. उद्यानात उपहार, स्वच्छता, स्नान आणि प्रार्थना गृहांची सुविधा आहे.

पाण्याच्या योग्य नियोजनातून फुलवले उद्यान

दरवर्षी ऑक्टोबर ते एप्रिलपर्यंत गार्डन सर्वांसाठी  खुले असते. त्यानंतर दुबईतील तीव्र उष्ण तापमानामुळे मेपासून सप्टेंबर पर्यंत पाच महिने बंद असते. परंतु याच कालावधीत आगामी वर्षीच्या नवीन रचनांची तयारी केली जाते. उद्यानात दरवर्षी फुलांच्या रचना केल्या जातात. फुले टवटवीत ठेवण्यासाठी आणि देखभालीसाठी प्रतिदिन अंदाजे ७ लाख लिटर्स पाण्याची आवश्यकता असते. यासाठी इकोफ्रेंडली इरिगेशन सिस्टीम अवलंबण्यात आली आहे. पाण्याचा पुनर्वापर करून ठिबक सिंचन पद्धतीचा वापर याठिकाणी केला जातो. दिवस आणि रात्रीच्या तापमानातील बदलामुळे फुलझाडांना जास्त पाणी लागत नाही. गार्डन तयार करतानाच सूक्ष्म छिद्रे असणारी जाळी आणि पॉलीमर्सचा वापर केल्याने जमिनीत पाणी मुरते.

सकारात्मक इच्छाशक्तीची गरज

दुबईत अनेक  पर्यटनस्थळे आहेत परंतु मिरॅकल गार्डनने यामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे उद्यानाच्या निर्मितीपासून दरवर्षी अंदाजे १० लाख पर्यटक याठिकाणी भेट देत आहेत. जे दुबईत घडले ते आपल्याकडे का होऊ शकत नाही ?  आपल्याकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत . कमतरता आहे ती सकारात्मक इच्छाशक्तीची. आपण विकासकामे करताना नवनिर्मिती करत असतो परंतु वास्तूंची नियमितपणे देखभाल करण्याबाबत उदासीन असतो . आपल्याला स्मार्ट जीवनशैली हवी असेल तर विचारात बदल करावाच लागेल . 


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

बेहड्याची खरी ओळख ही भेळा म्हणूनच…

हिमनगांची जागतिक राजधानी ग्रीनलँड…(व्हिडिओ)

Photos : सह्याद्री भूषण धनेशासाठी महावृक्ष संवर्धनाची गरज

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading