March 29, 2024
Need of Courage To See God article by Rajendra Ghorpade
Home » देव दर्शनासाठीही हवं अंगी धैर्य
विश्वाचे आर्त

देव दर्शनासाठीही हवं अंगी धैर्य

मनात भीती उत्पन्न होते. पण देवाचे दर्शन होताना, आत्मज्ञानाची प्राप्ती होताना हे भय कसले. दर्शनाचे, आत्मज्ञानाचा ठेवा जपण्याचे सामर्थ्य सद्गुरूंकडून घ्यावे लागते. भक्तीची सुरवात होण्याआधी मन सद्गुरूंच्याचरणी दृढ व्हावे. मनामध्ये सामर्थ्य, धैर्य उत्पन्न व्हावे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

देवा तुझां ये दर्शनी । जें वैकल्य उपजलें आहे अंतःकरणीं ।
तें सांवरावयालागीं गंवसणी । धैर्याची करितसें ।। 371 ।। ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा

ओवीचा अर्थ – देवा, तुझ्या या दर्शनाने अंतःकरणामध्ये जो विस्कळीतपणा उत्पन्न झाला आहे. तो विस्कळीतपणा सांवरण्याकरिता मी धैर्याची गवसणी करीत आहे.

देवाच्या दर्शनासाठी आजकाल लांबच्या लांब रांगा असतात. तिरुपती येथे तर दर्शनासाठी आगाऊ नोंदणी करावी लागते. पंढरपुरातही विठ्ठलाच्या दर्शनासाठी सहा-सहा तास रांगेत उभे राहावे लागते. शिर्डीमध्ये साई मंदिरात, कोल्हापुरात महालक्ष्मी मंदिरातही दर्शनासाठी अशाच रांगा लागतात. देवाकडे दर्शनासाठी अंगात धैर्य दे अशी याचना करावी लागते. देवाला पाहण्याचेही सामर्थ्य आपणाकडे नाही. ते सामर्थ्यही त्याच्याकडून मागून घ्यावे लागते. या शरीरामध्ये शिरलेला मीपणा, अहंकार प्रथम घालवावा लागतो, तरच दर्शन भेटते.

साधनेमध्येही देवाचे दर्शन घडावे. तो भेटावा असे वाटत असेल तर प्रथम देवाला पाहण्याचे सामर्थ्य आपणास मागावे लागते. साधना करताना कुंडलिनी जागृतीच्या प्रक्रियेवेळी अंगात हे सामर्थ असावे लागते. साधनेत अंग गरम होते. पाठ शेकली जाते. शरीर दगडासारखे कठीण होते. अंग ताठ होते. पाय जड होतात. हात उचलण्याचा प्रयत्न करूनही हात उचलला जात नाही. पायात मुंग्या येतात. कपाळावर चक्रे फिरू लागतात. मस्तकातही हीच अवस्था होते. अशा अवस्थेत श्वास कोंडतो की काय असे वाटू लागते. पण श्वासावर नियंत्रण ठेवून, त्याच्यावरच मन, दृष्टी केंद्रित करायची असते.

मनात भीती उत्पन्न होते. पण देवाचे दर्शन होताना, आत्मज्ञानाची प्राप्ती होताना हे भय कसले. दर्शनाचे, आत्मज्ञानाचा ठेवा जपण्याचे सामर्थ्य सद्गुरूंकडून घ्यावे लागते. भक्तीची सुरवात होण्याआधी मन सद्गुरूंच्याचरणी दृढ व्हावे. मनामध्ये सामर्थ्य, धैर्य उत्पन्न व्हावे. मनाची पूर्ण तयारी व्हावी. यासाठीच दर्शन हे कठीण व भीतीदायक केले आहे. भक्तांमध्ये सामर्थ्य नसेल तर ते ज्ञान, दर्शन देऊन काय उपयोग? असे भगवंताला वाटते. भक्ताला त्या पातळीवर, स्थितीत आणणे गरजेचे आहे. तरच भक्त त्याचा योग्य वापर करू शकेल. यासाठी भक्तात ते धैर्य उत्पन्न करावे लागते. सद्गुरूंच्याकडे यासाठीच धैर्याची याचना करावी.

Related posts

Navratri Theme : जैवविविधतेची गुलाबी छटा…

आत्मज्ञानामुळेच जनतेला योग्य न्याय

विकारांच्या विषाणूला मारणारी औषधी विषाणूपासूनच…

Leave a Comment