March 29, 2024
proudly words always expensive in Life article by sunetra joshi
Home » महागातले कौतुक…
मुक्त संवाद

महागातले कौतुक…

आईवडील किंवा घरातले तत्सम मोठे फुकट सल्ला देणार. मग त्यात काय कौतूक. आणि हो अजून एक राहीलच हल्ली कुणाला कुणाचे कौतूक कुठे असते. त्यात पण काहीतरी खोड काढतातच शोधून. तेव्हा ते देखील महागच. थोडक्यात काय तर कौतुक हा विषयच महागातला आहे हेच खरे..

– सौ सुनेत्रा विजय जोशी

रत्नागिरी

अगं आई, काल आम्ही त्या पंचशील हाॅटेलला गेलो होतो. काय छान जेवण होत म्हणून सांगू ? प्रिया आपल्या आईला सांगत होती. हो का.. अनुने इकडून म्हटले. हो, ना पंचतारांकित हॉटेल आहे ते. जरा महाग आहे पण छान आहे. आणि चांगले असले की महाग असणारच ना…असेही प्रिया बोलली. मग त्या कौतुकात आणि इकडचे तिकडचे बोलून फोन संपला. फोन संपला पण अनुचे विचारचक्र सुरू झाले.

खरेच महाग ते चांगले की चांगले ते महाग ? हे म्हणजे कोंबडी आधी की अंडे… या सारखा प्रश्न झाला. पण खरेच आजकाल साधे स्वस्त असे कुणाला आवडतच नाही का ? आणि त्याची किंमत करत नाहीत सर्वसाधारण लोक. हेच बघा जर आपल्या जवळपास कुणी घरगुती छान जेवणाचा डबा करून देत असेल. अगदी चवदार तरी आपण त्यांना पन्नास रुपये देताना काचकूच करतो. पण तेच हाॅटेलला खाताना दोनशे रुपये सहज टाकतो.. खरे तर त्या पेक्षा या डब्यात भाजी छान असते. पण ते महागातले म्हणून आपल्याला कौतुक. अगदी कपड्यांचे पण तेच.. महागातला ब्रँडेड ड्रेस असेल तर छान. आणि स्थानिक तसाच शिवलेला असला तरी त्याचे कौतुक नाही. खरे तर दोन्हीला कापड सारखेच लागते. शिलाई पण सारखीच तरी पण आपल्या डोक्यात महाग म्हणजे नक्कीच फरक असणार हे पक्के बसलेले असते..

अगदी डाॅक्टर्सकडे जाताना पण हेच समीकरण असते. मोठा दवाखाना म्हणजे चांगले डाॅक्टर्स आणि सोयी असणार. कधी एखाद्या जवळ असणाऱ्या छोट्या दवाखान्यात पण रोगाची चांगली परीक्षा असणारे डाॅक्टर असु शकतात हे कुणाच्या लक्षात पण येत नाही.

जसे की घर की मुर्गी दाल बराबर.. अशी एक म्हण आहे ती खरीच… बघा ना. खूप छोटी छोटी उदाहरणे बघितले तरी लक्षात येईल. घरातली कामे गृहिणी निगुतीने करते. तो तिचा संसार असतो त्यामुळे ती ते प्रेमाने करत असते. त्या बदल्यात तिची तशी काही अपेक्षा नसतेही.. पण.. काही कारणाने तेच काम करायला आपण जेव्हा कामवाली बाई ठेवतो तेव्हा त्या प्रत्येक कामाचे मुल्य होते. शिवाय ते तितक्या चांगल्या प्रकारे होईलच असेही नसते पण आपण प्रसंगी तिच्या दांड्या झाल्या तरी सांभाळून घेतो. पण असे कितीशा घरात आजही घरातले सगळे काम विनातक्रार करणार्‍या गृहिणीला घरातला कर्ता काही दोन पाच हजार तरी देतो का दर महिन्याला की बाई ग हे तुझ्यासाठी असे म्हणून. हे तुझ्या मनात येईल तसे खर्च कर. मी विचारणार नाही..

कुठेतरी बोटावर मोजता येतील अशी उदाहरणे असतीलही पण माझ्या बघण्यात तरी नाही. असो तो पुन्हा एक स्वतंत्र विषय होईल. शिवाय त्यात कौतुक नसतेच ते वेगळे. अजून एक हल्ली रोजच्या जगण्यात जरा काही झाले की समुपदेशन हवे. खरे तर तोच प्रश्न घरातल्या मोठ्या माणसाजवळ बोललात, तर काही तोडगा निघूपण शकतो. पण नाही. मग लगेच सल्ला घेण्यासाठी एखादा मानसोपचारतज्ज्ञ हवा. खरे तर घरातल्या जेष्ठ व्यक्तीला विचारले तर ते यात अनुभवाने प्राथमिक मदत नक्कीच करू शकतात. पण त्यांनी पदवी नसते ना घेतली.. मग तोच सल्ला मानसोपचारतज्ज्ञ देतात जो घरच्यांनी दिलेला असतो. फक्त तो मानसोपचार तज्ज्ञ दोनचार पाश्चात्य देशातले अजून दाखले देतो. आणि वर महागडी फी वसूल करतो. आईवडील किंवा घरातले तत्सम मोठे फुकट सल्ला देणार. मग त्यात काय कौतूक. आणि हो अजून एक राहीलच हल्ली कुणाला कुणाचे कौतूक कुठे असते. त्यात पण काहीतरी खोड काढतातच शोधून. तेव्हा ते देखील महागच. थोडक्यात काय तर कौतुक हा विषयच महागातला आहे हेच खरे..

Related posts

सेवा अन् व्यापार याचा अर्थ समजून हवा व्यवहार

पाटगावचे वैभव…

भारतातल्या ‘ऐतिहासिक वारसा’ पर्यटन स्थळांविषयी जगाला आकर्षण

Leave a Comment