April 19, 2024
remove honey hives in an eco-friendly manner
Home » पर्यावरणपूरक पद्धतीने मधाचे पोळे काढण्यासाठी मधमाशी मित्रांची तुकडी तयार – राहुल रेखावार
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पर्यावरणपूरक पद्धतीने मधाचे पोळे काढण्यासाठी मधमाशी मित्रांची तुकडी तयार – राहुल रेखावार

पर्यावरणपूरक पद्धतीने मधाचे पोळे काढण्यासाठी जिल्ह्यात मधमाशी मित्रांची तुकडी तयार
-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

मध, रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात ‘मधाचे गाव’ आणि ‘रेशमाचे गाव’ उपक्रम

कोल्हापूर – मधमाशांना हानी न पोहोचवता पर्यावरणपूरक पद्धतीने मधाचे पोळे काढण्यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात 25 मधमाशी मित्रांची तुकडी तयार झाली आहे, ही अभिमानास्पद बाब असल्याचे गौरवोद्गार काढून मधमाशी मित्र तयार करण्यासाठीची ही कार्यशाळा देशातील अभिनव उपक्रम असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय, नाबार्ड व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने मधमाशी मित्र प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी प्रशिक्षणार्थीना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते मधमाशी मित्र प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी दत्तात्रय कुरुंदवाडे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे पुणे विभागीय संचालक अधिकराव जाधव, केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण अनुसंधान विभागाचे सहायक संचालक सुनील पोखरे, महात्मा गांधी नॅशनल फेलो संदेश जोशी आदी उपस्थित होते.

मध आणि रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात मधाचे गाव आणि रेशमाचे गाव उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, नाबार्ड, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि कृषी विभागाच्या सहकार्याने आयोजित ही प्रशिक्षण कार्यशाळा मधमाशा जतन व संवर्धन करण्यासाठी उपयुक्त ठरेल. मधमाशांना हानी न पोहोचवता, मधमाशांचे संवर्धन करत पर्यावरणपूरक पद्धतीने मध संकलन करण्याची माहिती देण्यासाठी आयोजित या कार्यशाळेतील महिलांचा सहभाग कौतुकास्पद बाब आहे. यातून शेतकऱ्यांचा मध उद्योगाच्या जोडधंद्यातून विकास साधण्यास मदत होईल.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. श्री. पोखरे यांनी हा उपक्रम देशातील अभिनव उपक्रम असून कोल्हापूरकरांसाठी ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. दरम्यान शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागातील आग्या मधमाशांचे पोळे पर्यावरण पूरक पद्धतीने काढून मधमाशी मित्र कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे संचालक डॉ. एस.एन.सपली, संगणकशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. कविता ओझा व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मधमाशी मित्र मोहन कदम, ज्ञानेश्वर पाटील व संजय घोरपडे यांनी हे प्रात्यक्षिक करुन दाखवले.

Related posts

बांधकामविश्वाची समृद्ध भ्रमंती

ऑनलाईन सेवा घेत आहात, तर मग हे आवश्यकच…

पर्यावरण, निसर्ग प्रेमींना उपयुक्त असे पुस्तक

Leave a Comment