September 9, 2024
Six feet was allowed, so how can a 35 feet tall statue be erected
Home » सहा फुटांची परवानगी होती, मग ३५ फुट उंचीचा पुतळा उभारलाच कसा ?
सत्ता संघर्ष

सहा फुटांची परवानगी होती, मग ३५ फुट उंचीचा पुतळा उभारलाच कसा ?

राज्याच्या कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी आपल्या विभागाने राजकोट किल्ल्यावर केवळ ६ फुटांचा पुतळा उभारायला परवानगी दिली होती. मग त्या जागेवर ३५ फूट उंचीचा पुतळा उभा कसा राहिला ?

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत, महाराष्ट्राची अस्मिता आहेत, मराठी माणसाच्या मनात आणि रोमारोमांत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, त्यांचे विचार आणि आचार भिनलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि जय भवानी – जय शिवाजी या घोषणा म्हणजे मराठी माणसांचा ऊर्जा स्त्रोत आहेत, अशा महापुरुषाचा पुतळा कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणला राजकोट किल्ल्यावर कोसळून पडतो या घटनेने तमाम मराठी माणसाला वेदना झाल्या आहेत. पण या घटनेला जबाबदार कोण, दोषी कोण याचा वेगाने शोध घेण्याऐवजी राज्यातील राजकीय पक्ष व त्यांचे नेते एकमेकांवर सुसाट चिखलफेक करीत सुटले आहेत.

राज्यातील विधानसभा निवडणूक दिवाळीच्या सणानंतर अपेक्षित आहे, म्हणूनच राजकीय लाभ पदरात पाडून घेण्यासाठी राजकीय पक्षात स्पर्धा सुरू झाली आहे. महायुती सरकारला कोंडीत पकडण्यासाठी, महायुती सरकारची बदनामी करण्यासाठी, शिंदे-फडणवीस नि अजितदादांना धारेवर धरण्यासाठी महाराजांचा पुतळा हा मुद्दा विरोधी पक्षांकडून तेवत ठेवला जातो आहे. छत्रपतींचा पुतळा कोस‌ळला याला सर्वस्वी महायुतीचे सरकार जबाबदार आहे, असे गृहीत धरून महाआघाडीने एकनाथ शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

गेल्या वर्षी ४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने राजकोट किल्ल्यावर छत्रपती महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण केले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन केंद्रीयमंत्री नारायण राणे अशा दिग्गजांच्या उपस्थितीत हा शानदार सोहळा झाला. पण आठ महिन्यांत ३५ फूट उंचीचा हा पुतळा कोसळला. महाराष्ट्रात यापूर्वी असे कधी घडले नव्हते.

महाराजांचा पुतळा कोसळल्यावर संपूर्ण राज्यात जनतेला संताप आला. जे दोषी आहेत, त्यांना भर चौकात चाबकाने फोडले पाहिजे अशी प्रतिक्रिया प्रकट झाली. पण जनतेने मनावर संयम राखला. कुठेही संताप व्यक्त करण्यासाठी तोडफोड झाली नाही. हिंसाचार झाला नाही. पोलिसांना कुठेही बळाचा वापर करावा लागला नाही. पण राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मात्र ताळतंत्र सोडल्यासारखे वर्तन केले. आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले. शिल्पकार म्हणून जयदीप आपटे व स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून चेतन पाटील यांची निवड कोणी व कशाच्या आधारावर केली ? शिल्पकाराचा अनुभव काय? पस्तीस वर्षांच्या तरुणाला एवढे मोठे काम कसे दिले गेले ? मालवणला महाराजांचा पुतळा उभारण्याच्या कामात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाला, असेही महायुती सरकारवर विरोधकांनी आरोप केले. विरोधी पक्षाने थेट सार्वजनिक बांधकाम खात्यावर खापर फोडले व मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी केली. महाराजांचा पुतळा शासनाने नव्हे तर नौदलाने बसवला असे स्वत: मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यामुळे या दुर्घटनेला नेमके कोण दोषी आहेत याचे गूढ वाढले. ताशी ४५ किमी वेगाने वारे वाहत असताना हा पुतळा कोसळून पडला अशी माहिती राज्य सरकारने दिली पण त्यावर विश्वास कसा ठेवायचा ?

शिवरायांचा पुतळा कोसळल्यावर विरोधी पक्षांनी भाजप व महायुती सरकारवर निशाणा साधला. हे तर मोदी-शहांचे दलाल आहेत, असे आरोप झाले. राज्यात शाळेत जाणाऱ्या मुलीही सुरक्षित नाहीत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचेही महायुती सरकारला संरक्षण करता येत नाही, अशी आगपाखड विरोधी पक्षांनी केली. महाराजांनी उभे केलेले गडकिल्ले साडेतीनशे वर्षे भक्कमपणे उभे आहेत. त्यांचीही देखभाल उत्तम प्रकारे सरकार करीत नाही.

विशाल गडावर अतिक्रमणांचा विळखा पडल्यावर आंदोलन झाले तेव्हा सरकारला जाग आली. राजकारणी नेते ऊठ सूठ छत्रपतींचे नाव घेतात मग त्यांचे पुतळे व गड किल्ल्यांची देखभाल उत्तम का ठेऊ शकत नाहीत? मालवणच्या पुतळ्याचे खापर नौदलावर फोडले गेले, खरोखरंच आपले नौदल इतके लेचेपेचे आहे का? लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईने पुतळा उभारला गेला व शिल्पकाराला पुतळा लवकर देण्याची घाई करण्यात आली हे खरे का ?

तीन महिन्यांवर विधानसभा निवडणूक आली आहे म्हणून महायुती सरकारच्या विरोधात रान उठविण्यासाठी महाआघाडीचे नेते संधी शोधत आहेत, पण छत्रपतींच्या पुतळ्यावरून राजकारण पेटत ठेवणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला मानवणारे नाही. मुंबईजवळील बदलापूरमध्ये चार वर्षांच्या चिमुरड्यांवर शाळेत अत्याचार झाला, या घटनेने महाराष्ट्र हादरला होता. पण त्याच घटनेचे निमित्त करून महाआघाडीने महाराष्ट्र बंद पुकारण्याची घाई केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर महाआघाडीने बंद मागे घेतला. आता मालवणच्या घटनेवरून मुंबईत महायुती सरकारला जोडे मारो आंदोलन जाहीर केले आहे. अशा आंदोलनातून सर्वसामान्य जनतेला वेठीला धरून महाआघाडीला काय मिळवायचे आहे ?

शिल्पकार जयदीप आपटेच्या मुसक्या बांधा अशी मागणी करायची व दुसरीकडे नारायण राणेंना अटक करा असा घोशा लावायचा. विरोधी पक्षांना पुतळ्यावरून राजकारण तेवत ठेवायचे आहे का? जेथे पुतळा कोसळला तेथे मालवणला राजकोट किल्ल्यावर महाघाडीच्या नेत्यांना एकत्रितपणे जाण्याची कल्पना सुचली कशी ? नारायण राणे रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघांतून लोकसभेवर ४० हजार मतांनी खासदार म्हणून निवडून आले हेच मुळात उबाठा सेनेच्या पचनी पडलेले नाही. मालवणची घटना घडली ही जागा त्यांच्या मतदारसंघात व जिल्ह्यातच येते. महाआघाडीचे नेते व उबाठाचे कार्यकर्ते हे राजकोट किल्ल्यावर नेमके काय बघायला गेले होते?

तिथे राणे परिवारांपैकी कोणीही असले तरी वादावादी होणार हे सर्वश्रूत होते. मग उबाठा सेनेचे लोक मुद्दाम तिथे गेले काय ? पोलिसांनीसुद्धा राणे व ठाकरे यांच्या समर्थकांना आमने-सामने एकाच वेळी कसे येऊ दिले? राणे विरुद्ध ठाकरे हा संघर्ष गेली अनेक वर्षे चालू आहे व तो न संपणारा आहे, याची पोलिसांना माहिती नव्हती का? नारायण राणे यांनी काय भाषा वापरली याच्या क्लिप्स विरोधकांनी व्हायरल केल्या आहेत, पण राजकोट किल्ल्यावर महाआघाडीच्या नेत्यांनी काय भाषणे केली व काय घोषणा दिल्या, तेही वृत्तवाहिनींच्या पडद्यावरून लक्षावधी लोकांनी घराघरात बघितले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यापासून महायुतीचे सरकार बचावात्मक आहे. दोषींवर कारवाई करू किंवा नवीन पुतळा लवकरच उभारू असे सरकार सांगत आहे. गुन्हेगार कोण आहेत, दोषी कोण आहेत, हे जनतेपुढे आलेले नाही. महाराजांचा पुतळा कोसळला याला जबाबदार कोण, याचे उत्तर सरकार देत नाही. म्हणून लोकांमध्ये संभ्रम आहे.

पुत‌ळा उभारण्याचे काम नौदलाने केले असले तरी तो पुतळा महाराष्ट्रात होता, याचे भान राज्यकर्त्यांनी ठेवले पाहिजे. पुतळा कोसळल्या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यातील तेरा कोटी जनतेची जाहीरपणे माफी मागितली व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे वचन दिले आहे. पंतप्रधानांनी अनावरण केलेल्या छत्रपतींचा ३५ फूट उंचीचा पुतळा कोसळल्यावर विरोधकांनी रान पेटविण्याचा प्रयत्न चालवला आहे पण सरकारने या मुद्द्यावर गुळमुळीत भूमिका न घेता ठोस निर्णय घेणे गरजेचेच आहे.

राज्याच्या कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी आपल्या विभागाने राजकोट किल्ल्यावर केवळ ६ फुटांचा पुतळा उभारायला परवानगी दिली होती. मग त्या जागेवर ३५ फूट उंचीचा पुतळा उभा कसा राहिला ?

जयदीप आपटे यांचे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट आणि एल. एस. रहेजा स्कूल ऑफ आर्ट येथे कला शिक्षण झाले. कल्याणमध्ये त्यांचा स्टुडिओ आहे, त्यांनी बनवलेले पुतळे सिडनी या ग्रीनवुड पार्क (२०२३) व इंग्लंडमध्ये यॉर्कशीर (२०१९) येथे आहेत. कोकण गांधी म्हणून ओळखले जाणारे अप्पासाहेब पटवर्धन यांचा पुतळा त्यांनी बनवला होता, (२०१९). गेल्या वर्षी सनातन प्रभातमध्ये जयदीप आपटे यांची मुलाखत प्रसिद्ध झाली आहे, त्यात ते म्हणतात, मला वाटतं की, संधी मोठी आहे, मनात विचार आला की, सगळं नीट पार पडलं तर आपलं नाव होईल. पण एक जरी चूक झाली तर सगळं संपेल…

नवी दिल्लीच्या नवीन महाराष्ट्र सदनात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत‌ळे महाराष्ट्राचा अभिमान वाटावा, अशा दिमाखाने विकासक चमणकर बंधूंनी परिश्रमपूर्वक उभे केले आहेत. प्रताप गडावर महाराजांचा भव्य पुतळा उभा आहे. पंडित जवाहर नेहरूंनी त्याचे अनावरण केले होते. त्या घटनेला ६७ वर्षे झाली. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया समोर शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा गेली ६३ वर्षे दिमाखात उभा आहे, तेव्हा फार मोठे इव्हेंट साजरे केले गेले नव्हते. गेट वे ऑफ इंडियावरही समुद्रावरून वेगवान वारे आदळत असतात, मग मालवणलाच का दुर्घटना घडावी ? मालवणचा पुतळा खाऱ्या वाऱ्यामुळे कोसळला की मतलबी वाऱ्यामुळे ? मालवणचा पुतळा उभारताना निष्काळजीपणा झाला, सर्व महाराष्ट्राची मान खाली गेली. बदलापूर व मालवण या घटनांची नुकसानभरपाई कशी करणार हे महायुतीपुढे मोठे आव्हान आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

नेहमी तरूण असावे असे वाटते, मग हे वाचा…

शब्दगंधचे साहित्य पुरस्कार जाहीर

वाचनकट्टा साहित्य पुरस्कार २०२२ जाहीर

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading