April 19, 2024
Soubhagya article by Sunetra Joshi
Home » सौभाग्य व ती….
मुक्त संवाद

सौभाग्य व ती….

आजकाल तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. मग तिला काय म्हणायचे ? तेव्हा मला वाटते बाईला तुम्ही कुमारीका, सवाष्ण, विधवा वगैरे न मानता एक बाई किंवा एक माणूस म्हणून बघा. दोघांमधले कुणी आधी जायचे हे कुणाच्या हातात नसते.

सुनेत्रा विजय जोशी

रत्नागिरी

नवरात्र संपले. या सणात सवाष्ण जेवायला बोलावणे आणि तिची ओटी भरणे वगैरेला खूप महत्त्व असते. असते असे नाही आपण ते प्रस्थ माजवतो. खरे तर ही एका स्त्री शक्तीची पुजा आहे. मग एकीला पुजतांना दुसरीला डावलून कसे चालेल. आणि स्वतः एक स्त्री असून स्त्रिच्या मनातल्या भावना कशा समजून घेता येत नाही. आज हे आठवले कारण कालपर्यंत जिला सगळे विधवा समजून टाळत होत्या त्याच बायका आता तिने पुन्हा लग्न केले म्हणून तिला लगेच ओटी भरायला बोलवतात. खरे तर ती एकदा विधवा झाली होती ना ? तर काही जण विचारात पण पडले की आता नक्की तिला काय समजायचे खरेच जर लग्न झाल्यावर बाई सवाष्ण होते म्हणजे सौभाग्यवती होते असे आपण मानतो तर मग तिचा नवरा जरी गेला तरी ती तर लग्न झालेलीच असते ना. पुन्हा कुमारीका तर होत नाही ना ?

बरे मग जर एखादीचा घटस्फोट झाला असेल तर काय करणार ? तिचे सुध्दा लग्न झालेलेच आहे. शिवाय नवरा पण जिवंत आहे. म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे ती विधवा पण नाही. मग तिला सवाष्ण म्हणून बोलवाल का ? तर नाही. तुमच्या नियमात तर ती बसते आहे ना…एकूण काय तर सगळे तुमच्या मानण्यावर हे अवलंबून आहे.

आजकाल तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. मग तिला काय म्हणायचे ? तेव्हा मला वाटते बाईला तुम्ही कुमारीका, सवाष्ण, विधवा वगैरे न मानता एक बाई किंवा एक माणूस म्हणून बघा. दोघांमधले कुणी आधी जायचे हे कुणाच्या हातात नसते. कुणीतरी एक जण आधी आणि एक नंतर जाणार असतो. खरे तर कुठल्याही बाईला आपण नवर्‍याच्या आधीच जाण्याची इच्छा असते. कारण जो मागे उरतो त्याला एकटे राहून आयुष्य काढणे खूप अवघड असते. एकमेकांची सवय झालेली असते.

खरे तर नवरा गेल्यावर सुध्दा ती समर्थपणे रडत न बसता मुलांना वाढवते. बाई गेली तरी त्या पुरुषाला जर सगळे पुजा विधी सण समारंभात कुणी अरे त्याच्या हातून चालणार नाही असे म्हणत नाही. उलट कमरेला सुपारी खोचून तो सर्व धार्मिक विधी करू शकतो. तर मग स्त्रिला असे वेगळे नियम असण्याची काय गरज आहे ? नवर्‍याच्या मागे ती सासु सासरे मुल बाळे सगळे समर्थपणे सांभाळते. तेव्हा तिचे विधवा असणे कुणाला जाचत नाही. मग सणासमारंभात तिने पुढाकार घेऊन केलेले का चालू नये ? ते पण चालायला हवेच.

कर्तव्य करतांना ती मुलासारखी मानता मग मान देतांना का नाही ? तर असे हे आपले असते. आपण नियम आपल्याला हवे तसे कायद्यातल्या पळवाटे प्रमाणे वापरतो. खरे तर सौभाग्य व ती यांची नेहमीच चुकामूक होते आहे आजही. तिचे असणे हेच सौभाग्याचे नाही का ? आपण सुधारक असल्याचा नुसता आव आणतो आणि आपल्या सोयीनुसार ते पाळतो. पण खरे तर ती नेहमीच सौभाग्यवती आहे अगदी जन्मल्यापासून मरेपर्यंत..

Related posts

कै विठ्ठलराव केदार प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर

दिवाळी हरवत चालली आहे !

वेळीच ओळखा निसर्गाचा धोक्याचा इशारा

Leave a Comment