March 29, 2024
Home » आई आपली म्हणायची…पण आता त्याचा अर्थ कळतो…
मुक्त संवाद

आई आपली म्हणायची…पण आता त्याचा अर्थ कळतो…

आई म्हणायची…. आई म्हणायची.. अग असे तिन्हीसांजेला केर काढू नये लक्ष्मी घरातून जाते. पण मी म्हणायची त्याचा काय संबंध. मला ते पटायचेच नाही. मी उडवून लावायचे. आता कळतो त्यातला अर्थ. 

लेखन – सौ. सुनेत्रा विजय जोशी, रत्नागिरी

अनु पेपर वाचत होती. तिचा नातु शेजारीच बसला होता. आजी रामाने रावणाला मारले. तो तर देव होता ना? मग त्याला एका बाणात मारून टाकायचे ना? एवढे युध्द कशाला करायचे? त्याच्या शंकांना उत्तरे देतांना माझी दमछाक झाली. तो इतका लहान होता की त्याला सगळे पटवून सांगणे शक्य नव्हते तरी त्याच्या बालबुद्धीला पटतील असे सांगून गप्प केले. थोड्याच वेळात तो झोपलाही. पण मला माझे लहानपण आठवले. 

आई म्हणायची.. अग असे तिन्हीसांजेला केर काढू नये लक्ष्मी घरातून जाते. पण मी म्हणायची त्याचा काय संबंध. मला ते पटायचेच नाही. मी उडवून लावायचे. आता कळतो त्यातला अर्थ. तेव्हा लाईट नव्हती. मग अंधारात झाडतांना घरात चुकून खाली पडलेली बारकी पण अनमोल वस्तू केरासोबत बाहेर फेकल्या गेली तर लक्ष्मी गेल्यासारखे होतेच ना. पण तेव्हा कुठे इतका विचार करण्याचे वय होते? आई आपली म्हणायची. 

तसेच मग कितीतरी गोष्टी आठवत राहिल्या. अंधार पडायच्या आत घरी यायचे. आता मोबाईलचा जमाना असल्याने उशीर झाला तरी कुठे आहे कोणासोबत आहे वगैरे अपडेट कळते त्यामुळे उशीर झाला तरी तेवढी काळजी वाटत नाही. पण तेव्हा उशीर झाला तर काहीच कळायला मार्ग नसायचा. पण तेव्हा ते कळायचे नाही. आई आपली म्हणायची. 

तसेच पटकन काहीतरी बोलले की ती म्हणायची नेहमी चांगलेच बोलावे ग. वास्तु तथास्तू म्हणत असते. आज कळते की आपण जे चांगले बोलतो त्याने चांगली उर्जा निर्माण होते मनात पण सकारात्मक विचार येतात. मग मार्ग पण सापडतो. अशा रितीने चांगले बोलणे खरे होते. पण छे. तेव्हा उडवून लावायची अन तिला अजूनच चिडवायची. त्यातच मजा वाटायची. ते वयच तसे असते. पण आई मात्र म्हणायची. 

अशा अगणित गोष्टी असतात प्रत्येकाच्या जीवनात पण तेव्हा ऐकण्याची मनस्थिती नसते आणि मोठी मंडळी ते पटवून देऊ शकत नसायचे. आणि माणूस हा प्राणी त्याला पटले नाही तर कुणाचे ऐकत नाहीच. पण आई मात्र म्हणायची. 
आणि हो. झोपतांना दक्षिणेकडे पाय करू नये असे म्हणायची. त्यात काय ग होते. अग ती यमाची दिशा आहे असे म्हणायची. पण ते काही पटायचे नाही. आज त्यातील शास्त्र कळल्यावर ते पटते. तेव्हा मात्र आई म्हणायची. तेवढ्यात नातवाची चाळवाचाळव जाणवली. आणि अनू विचारातून बाहेर आली. सहा वाजून गेले होते. तशी ती उठलीच. 
तिला पुन्हा आठवले. आई म्हणायची असे तिन्ही सांजेला झोपू नये ग. आठवून तिला हसूच आले. नातू विचारत होता. आजी काय झाले ग हसायला? ती म्हणाली आई म्हणायची…. 


Related posts

मानो या न मानो…

लाईक अन् कमेंट्स…

ती वेळ…

Leave a Comment