March 29, 2024
Tips for Mind concentration article by Rajendra Ghorpade
Home » मन साधनेत रमण्यासाठी हे करा
विश्वाचे आर्त

मन साधनेत रमण्यासाठी हे करा

सद्गुरु यासाठीच आपले कान मागतात. कारण कानाने तो गुरुमंत्र ऐकायचा असतो. जपाचा, मंत्राचा तो स्वर स्वतःच्याच कानाने ऐकण्याचा प्रयत्न केल्यास साधना निश्चितच फलद्रुप होते. साधनेत आपोआपच मन गुंतून राहाते. कानाला मंत्राचा स्वर ऐकण्याची सवय लावायला हवी.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

परि तुवा येतुले करावे । मागौनि ते आम्हां देयावे ।
जे कानचि नांव ठेवावें । आपण पैं गा ।। 954 ।। ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा

ओवीचा अर्थ – परंतु तूं मात्र येवढें कर कीं, आम्ही तुझ्याजवळ जे मागू. तें तूं आम्हांला दिले पाहिजेस. तें मागणें हें की तूं आपल्या स्वतःस कानाचें नाव ठेव. इतर सर्व इंद्रियांचे व्यापार बंद ठेवुन फक्त ऐकण्याचें काम चालूं दे.

गुरुमंत्र कानात सांगितला जातो. म्हणजे तो निट लक्ष देऊन कानांनी ऐकायचा असतो. साधना आपण करतो पण साधनेत आपले लक्ष असतेच असे नाही. साधनेत लक्ष लागत नाही हा सर्वांचाच प्रश्न असतो. साधनेला आपण व्यवस्थित आसन करून बसलेले असतो खरे पण लक्ष मात्र दुसरीकडे असते. जपाची माळ पुढे पुढे सरकत असते. जप सुरु असतो पण लक्ष मात्र इतरत्र भटकत असते. आजच्या घडामोडींचा परिणाम त्यावर झालेला असतो. एखादी वाईट घटना घडली असेल तर तिच डोळ्या समोर उभी राहाते. त्याने काय केले. आपण काय केले. असे घडलेल्या घडणांचे विचारचक्र सुरु असते. अशाने साधनेचे उद्दिष्ट कसे साध्य होईल.

याचाच अर्थ मनात येणारे विचार हे थांबायला हवेत. ते थांबवण्याचा प्रयत्न करायला हवा. पण त्या पयत्नाना यश येतेच असे नाही. कारण कोणतीही गोष्ट मारून मुरकुटून होत नाही. अशावेळी उलटी क्रिया करून पाहायला हवी. मन इतरत्र दुसऱ्या गोष्टीत गुंतवायला हवे. म्हणजेच साधनेत मन गुंतवण्याचा प्रयत्न करायला हवा. मनात सातत्याने साधनेचा विचार घोळावा असा प्रयत्न करायला हवा. म्हणजेच विषय विचारापासून मन दूर न्यायला हवे. असे करता आले तर मन निश्चितच साधनेत एकाग्र होऊ शकते.

सद्गुरु यासाठीच आपले कान मागतात. कारण कानाने तो गुरुमंत्र ऐकायचा असतो. जपाचा, मंत्राचा तो स्वर स्वतःच्याच कानाने ऐकण्याचा प्रयत्न केल्यास साधना निश्चितच फलद्रुप होते. साधनेत आपोआपच मन गुंतून राहाते. कानाला मंत्राचा स्वर ऐकण्याची सवय लावायला हवी. असे झाल्यास मन आपोआपच साधनेत रममान होईल. स्वर ऐकण्याची सवय झाल्यास एकाग्रता वाढून आत्मज्ञानाची अनुभूती येते. आत्म्याचे ज्ञान होते. मी कोण आहे याचा बोध होतो. यासाठी इतर सर्व इंद्रियांचे व्यवहार बंद करून मन कानावर ठेवायला हवे. मनाने व कानाने साधनेचा स्वर ऐकण्याची सवय लावायला हवी. हे एकदम शक्य होणार नाही. पण अभ्यासाने या गोष्टी साध्य करता येऊ शकतात. प्रयत्न करत राहील्यास यश निश्चितच येते. हळूहळू साधनेची आपणास सवय जडते. मग मन साधनेत रमावावे लागत नाही तर मन आपोआपच साधनेत रमते.

Related posts

नाही हरायचे…

श्रीधररेषामध्ये अंभोरे यांच्या चित्रशैलीचे वाचन

शेपटी…

Leave a Comment