March 29, 2024
Vasudev Vale Comment in Danapur Marathi Boli Bhasha Samhelan
Home » भाषेचे खरे सौंदर्य बोलीमध्ये दडलेले – डॉ. वले
काय चाललयं अवतीभवती

भाषेचे खरे सौंदर्य बोलीमध्ये दडलेले – डॉ. वले

कोणतीही भाषा वृद्धिंगत होण्यासाठी त्या भाषेतल्या बोलींचे संवर्धन होणे गरजेचे असते. कारण कोणत्याही प्रमाण भाषेचे खरे सौंदर्य तिच्या बोलींमध्ये दडलेले असते, असे प्रतिपादन खानदेशातील ज्येष्ठ बोलीभाषा अभ्यासक तथा पाचोरा महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वासुदेव वले यांनी केले.

दानापूर (जि. अकोला) येथे पार पडलेल्या आठव्या राज्यस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या परिसंवादात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. खानदेशातल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्याचा वारसा लाभलेल्या लेवा पाटीदार, पारपट्टी, तावडी बोली तसेच अहिराणी बोली या खानदेशाचे वैभव असून या बोलींचा वाचक वर्ग मोठा आहे. तसेच विविध प्रकारचे साहित्य या बोलींच्या माध्यमातून तयार होते आहे, असेही पुढे ते म्हणाले.

कै. शामराव बापू सार्वजनिक वाचनालय आणि मराठी बोली साहित्य संघ नागपूर यांच्यावतीने ८ व्या राज्यस्तरीय बोली साहित्य संमेलनाचे आयोजन दानापूर येथे खोडे प्रतिष्ठानमध्ये करण्यात आले होते. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र घोरपडे (कोल्हापूर) यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष आचार्य ना. गो. थुटे आणि मराठी बोली साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र बोरकर तसेच संयोजिका ज्येष्ठ कवयित्री डॉ. प्रतिमा इंगोले, स्वागताध्यक्ष अनिल गावंडे, अंजनाबाई खुणे, समन्वयक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , डॉ. बाळकृष्ण लळीत, डॉ. रावसाहेब काळे, यांची विशेष उपस्थिती होती.

माझ्या बोलीची वैशिष्ट्ये या परिसंवादात प्रा. डॉ. जतीन मेढे (भालोद महाविद्यालय) यांनी लेवा पाटीदार या बोलीभाषेतील सौंदर्यस्थळे उलगडून दाखविली तर प्रा. डॉ. संदीप माळी (मुक्ताईनगर महाविद्यालय) यांनी पारपट्टी बोलीतील लोकगीतांचे वैशिष्टे सांगून बोली अभ्यासाचे महत्व स्पष्ट केले. डॉ. देवेंद्र पुनसे यांनी वऱ्हाडी तसेच डॉ. राज मुसने (आष्टी) यांनी ढिवरी बोली भाषांचे वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला.

खानदेशातली तावडी बोली ही सुद्धा एक महत्त्वाची बोली असून या बोलीभाषेमध्ये आता मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती आणि संशोधन सुरू झालेले आहे. ही एक सकारात्मक बाब असून बोली संवर्धनाच्या दृष्टीने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल म्हणता येईल, असे प्रतिपादन सत्राध्यक्ष डॉ. वासुदेव वले यांनी माझ्या बोलीची वैशिष्ट्ये या परिसंवादात नोंदविले.

दानापूर येथे आयोजित या संमेलनास बोलीचे प्रमाण मराठीला योगदान तसेच मराठी मायबोलीचा जागर, बोली काव्यसंमेलन, विविध ठरावांचे वाचन इत्यादी कार्यक्रम संपन्न झाले. संमेलनाच्या समारोपप्रसंगी सुप्रसिद्ध सप्तखंजेरीवादक भाऊ थुटे (वर्धा) यांची विशेष उपस्थिती होती. ठरावाचे वाचन हिरामण लांजे यांनी केले. ते ठराव पुढीलप्रमाणे आहेत.

महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात बोली साहित्याचा समावेश करण्यात यावा , तसेच वऱ्हाड प्रांतातील सुप्रसिद्ध सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांना शासनाने त्यांच्या जनप्रबोधनपर कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे. यशस्वीतेसाठी मराठी बोली साहित्य संघाचे सर्व पदाधिकारी व आयोजन समितीच्या सर्व पदाधिकारी, गावातील सर्व कार्यकर्ता मंडळीनी विशेष परिश्रम घेतले.

Related posts

व्हिडिओ : जॉर्जियातील अधुरी प्रेमकथा…

श्रावणी काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन

गणेश विसर्जन २०२३ | गडहिंग्लज

Leave a Comment