February 6, 2023
Why expect respect in love
Home » प्रेमात सन्मानाची अपेक्षा कशाला ?
विश्वाचे आर्त

प्रेमात सन्मानाची अपेक्षा कशाला ?

एखाद्याला प्रेमाने मदत करायची इच्छा आहे. मग त्यात अपेक्षा कसली ठेवायची. पण मदत मिळाल्यानंतर खरे प्रेम असणारी व्यक्ती निश्चितच मदतीला धावून जाते. कारण ते प्रेम, ती ओढ त्याला तेथे नेत असते. प्रेमाने माणसाच्या अंतःकरणातील गोष्टीही समजू शकतात. अंर्तमनातील विचार एकमेकांना समजू शकतो. पण त्यासाठी खरे प्रेम असायला हवे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

प्रियाचां ठायीं सन्मान । प्रिय न पाहे समर्था जाण ।
तेवीं उच्छिष्ट काढिलें आपण । ते क्षमा कीजो ।। 575 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 11 वा

ओवीचा अर्थ – असें पाहा कीं, स्नेह्याच्या ठिकाणी स्नेही सन्मानाची मुळीच इच्छा करीत नाही त्याप्रमाणें आपण आमच्या घरी उच्छिष्ट काढलें त्याची आपण क्षमा करावी.

आपल्या प्रिय व्यक्तीजवळ आपण कधी सन्मानाची अपेक्षा ठेवू नये. कारण त्या नात्यात मग प्रेम हे राहात नाही. तेथे मानापमानाचे नाट्य रंगत राहाते. प्रेमात अपेक्षा ठेवून कधी प्रेम करू नये. प्रेम आहे ना ? मग ते एकतर्फी का असेना. त्यात अपेक्षा नसेल तरच ते खरे प्रेम असते. अन्यथा त्याचा परिणाम हा वाईट झालेला पाहायला मिळतो. अपेक्षाभंगामुळे एकतर्फी प्रेमात मुडदे पाडण्यापर्यंतही मजल जाते. ते प्रेम कसले ? ते प्रेम नसते तर ती वासना असते. वासना आणि प्रेमातील फरक हा समजून घ्यायला हवा. अन्यथा पदरी निराशा पडू शकते.

एखाद्याला प्रेमाने मदत करायची इच्छा आहे. मग त्यात अपेक्षा कसली ठेवायची. पण मदत मिळाल्यानंतर खरे प्रेम असणारी व्यक्ती निश्चितच मदतीला धावून जाते. कारण ते प्रेम, ती ओढ त्याला तेथे नेत असते. प्रेमाने माणसाच्या अंतःकरणातील गोष्टीही समजू शकतात. अंर्तमनातील विचार एकमेकांना समजू शकतो. पण त्यासाठी खरे प्रेम असायला हवे. तेथे वासना, हाव असता कामा नये. तरच हे घडू शकते. सद्गुरुंच्या ठिकाणी शिष्याने अशी एकरूपता साधायला हवी. तरच अंर्तमनाचे मिलन होऊ शकते. यातूनच सद्गुरुंच्या आशिर्वादाने आत्मज्ञानाची अनुभुती होऊ शकते. शिष्याच्या अडचणी सद्गुरुंना समजू शकतात. यावर तोडगाही त्यांच्या लक्षात येऊ शकतो. एकंदरीत असलेल्या समस्या, प्रश्न हे अगदी सहजरित्या सुटु शकतात. पण यासाठी प्रेम, भक्ती, श्रद्धा, विश्वास असायला हवा.

गुरु-शिष्य संबंधामध्येही असाच स्नेह पाहायला मिळतो. म्हणूनच गोरा कुंभाराची मडक्याची माती मळायला देव मदतीला गेले. कोठे देव कोणाचे पाणी भरण्यासाठी गेले, तर कधी देव कोणाचे दळण-कांडप करायला गेले. तेथे देवाने हे काम माझे नाही. असे म्हटले नाही. शिष्याच्या स्नेहापोटी पडेल ते काम करण्याची गुरुंची तयारी असते. यातच खरे प्रेम, स्नेह असतो. देवाला हे काम करताना कधीही लाज वाटत नाही. शिष्याच्या प्रेमापोटी तो हे काम करतो. सद्गुरुही अनेकांच्या घरी जाऊन अशी कामे करतात. फक्त आणि फक्त प्रेमासाठी हे काम ते करत असतात. कोणतीही अपेक्षा त्यात नसते. अशा या प्रेमाने शिष्य सुद्धा कधीकधी लाजतो. देवापुढे क्षमा मागतो. गुरु-शिष्यातील ही भक्ती, हा स्नेह, हे प्रेम हे अनुभवायला हवे. या अनुभवातूनच आत्मज्ञानाची अनुभुती येते.

अध्यात्मातील प्रेम हे देहावर नाही. त्यामुळे येथे वासना नाही. हे विचारात घ्यायला हवे. हे ज्याला समजले त्याला मोक्ष प्राप्त होतो. तो या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटतो. देह आणि आत्म्या यातील फरकाची अनुभुती त्याला येते. एकदा का हा फरक समजला की पुन्हा वासनेचा स्पर्श या नात्याला होत नाही. वासना, मोह, माया विकारांपासून तो अलिप्त असल्याची अनुभुती येते. ही अनुभुती देण्यासाठीच सद्गुरु शिष्याला सदैव मदत करत राहातात. वेगवेगळ्या प्रकारे ते सदैव शिष्याला जागरूक करण्याचा प्रयत्न करत राहातात. सद्गुरुंच्या या मदतीमुळेच शिष्य सदैव जागरुक होऊन अध्यात्मिक प्रगती करत राहातो. यासाठीच शिष्याच्या घरात तो सदैव विविध रुपातून कामे करत राहातो.

इतकेच काय या प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी गुरु योग्य शिष्याचा शोधही घेत राहातात. तो मज भेटावा…तो मज भेटावा हे फक्त गुरुंसाठी नसते तर शिष्यासाठीही असते. म्हणूनच येथे प्रेम हे एकतर्फी नसते. दोन्हीबाजूंनी प्रेम असते. गुरु शिष्याला शोधत असतात व शिष्यही अशाच गुरुच्या शोधात असतो. या त्यांच्या नात्यात मानसन्मानची अपेक्षा नसते. शिष्य मला भेटला नाही म्हणून गुरु कधी त्याच्यावर नाराज होत नाहीत. किंवा गुरु मला भेटले नाहीत म्हणून शिष्यही कधी नाराज होत नाही. चुकुन नाराज झाले तरी त्यात प्रेम असते. त्या प्रेमामुळे हे नाते इतके दृढ असते की एकमेकांना अंतःकरणातून समजण्याचे सामर्थ्य त्यांच्याच प्राप्त झालेले असते. त्यामुळे येथे मान-सन्मानाची अपेक्षाच नसते. जीवा-शिवाच्या भेटीतील हा आत्मज्ञानाचा झरा नित्य वाहात राहावा यासाठी सदैव प्रेमाने जगायचा प्रयत्न करायला हवा.

Related posts

रागद्वेष घालवण्यासाठी विषयांचा त्याग

अध्यात्मातून मिळते दूरदृष्टीचा विचार करण्याची प्रेरणा 

विचाराने विषयांना मारण्यासाठीच शास्त्रीय नियम

Leave a Comment