March 29, 2024
Zholi Kalidas Shinde Book review
Home » रिकाम्या झोळीतील सकारात्मकता
मुक्त संवाद

रिकाम्या झोळीतील सकारात्मकता

रिकाम्या झोळीतील सकारात्मकता महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतभर भटक्या जमातींचे राहणीमान आणि जीवनमान अजूनही सुधारलेले नाही. अजूनही त्यांची जगण्यासाठीची धडपड पूर्वीसारखीच सुरू आहे. काही समाज वेगाने प्रगत होत असताना अनेक समाजबांधव पूर्वीचेच जगणे जगत आहेत.

असाच एक समाज म्हणजे ‘नाथ पंथी डवरी’ समाज. खरं तर हा समाजसुद्धा अतिशय मोठी विचारसरणी धारण करणाऱ्या नाथांचा. सध्या एका वाहिनीवर दाखवल्या जाणाऱ्या ‘गाथा नवनाथांची’ मालिकेतून हा समाज ज्या नाथांचा वारसा सांगतो, त्यांची वैचारिक बैठकीची तोंडओळख निश्चितच होते. अत्यंत उच्च विचारसरणी बाळगणाऱ्या, जप-तप आणि त्यातून ज्ञानप्राप्ती, सिद्धी आणि त्याचा समाजाच्या भल्यासाठी विनियोग करणारा असा हा नाथपंथ. असा समृद्ध वारसा सांगणारा समाज, इतर भटक्या समाजाप्रमाणेच आज मात्र विपन्नावस्थतेत आहे. या समाजातील एक बालक शिक्षणाची कास पकडतो. पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. एक टप्पा पार करताच, दुसऱ्या टप्प्यामागे आणि तो पूर्ण होताच तिसऱ्यामागे, असा चालत राहतो…धावत राहतो… तो पीएच. डी. पदवी प्राप्त होईपर्यंत. त्याचे हे पळणे सुरूच असते.

यातील महत्त्वाचा भाग म्हणजे दारू पिणारा अडाणी दादाच कालिदासला या शिक्षणाच्या प्रवाहात ढकलतो. स्वत:च्या पोटाला चिमटा देत शक्य असेल तसे शिक्षणासाठी सहाय्य करत राहतो. आईचे आपल्या मुलांवरील प्रेम तर ‘झोळी’ भरून सर्वत्र दिसतेच. मात्र बापाने करून दिलेली ही शिक्षणाची सुरूवात ही महत्त्वाची आहे. पालावर जगणारा, राहणारा कालिदास – टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या आंतरराष्ट्रीय संस्थेतून डॉक्टरेट पदवी प्राप्त करतो. हा शिक्षण घेतानाचा प्रवास डॉ. कालिदास शिंदे यांनी आपल्या ‘झोळी’ या आत्मकथनाद्वारे मांडला आहे.

ही एक वेगळी आत्मकथा आहे. पालावरचे जगणे काय असते हे ‘झोळी’ वाचताना समजते. गावोगावी भटकताना लोकांचा होणारा त्रास, लोकांची या समाजाकडे बघण्याचे विविध दृष्टिकोन याची मांडणी या पुस्तकात चांगल्या पद्धतीने करण्यात आली आहे. आई-वडील असे भटकत असताना कालिदास आणि त्याच्या भावंडानी पेठवडगावला शिकण्यासाठी येणे, त्यांनंतर फलटणचे वास्तव्य, सायबरमधून घेतलेले शिक्षण आणि नंतर टिसमधील दिवस… सुखवस्तू घरातील मुलांसाठीचा आनंदाचा असणारा हा प्रवास कालिदाससाठी किती यातनादायक होता, हे झोळी वाचताना लक्षात येते. समाजातील विविध कुटुंबाना आळीपाळीने कसायला येणारी जमीन हडप करणाऱ्यांच्या कचाट्यातून तो सोडवतो. हा प्रवासही झोळीतील महत्त्वाचा भाग आहे. अर्थात हे शिक्षणामुळे शक्य होते.

नाथपंथी डवरी समाजातील चालिरिती, बोलीभाषेतील शब्द, जातपंचायत, त्यात होणारे निवाडे, त्यासाठी लिखित नसलेला ‘बा’चा कायदा आदि अनेक गोष्टी या आत्मकथनात येतात. नवनाथ ग्रंथ वाचन ज्याने केले आहे त्याला त्यांचा वारसा सांगणारा हा समाज असा देशोधडीला का लागला याचे उत्तर मात्र या पुस्तकामध्ये मिळत नाही. अर्थात हे आत्मकथन असल्याने या पुस्तकात ते अपेक्षितही करता येणार नाही. डॉक्टरेट पदवी प्राप्त केली, तरी कालिदास शिंदे यांना नोकरी नाही. मात्र आजही शिक्षणामुळेच समाज सुधारू शकतो. समाजाच्या आजच्या परिस्थितीत बदल होऊ शकतो, ही लेखकाची भावना जागोजागी वाचावयास मिळते. ही या पुस्तकामध्ये आढळून येणारी सकारात्मकता मनाला भावते.

या पुस्तकाला अखिल भारतिय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांनी प्रस्तावना लाभली आहे. प्रस्तावनेमध्ये त्यांनी ‘झोळी’वर नितांत सुंदर असे भाष्य केले आहे. राष्ट्रीय आयोग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, बाळकृष्ण रेणके यांनीही झोळी या आत्मकथनावर केलेले भाष्य पुस्तकाच्या सुरुवातीस समाविष्ट केले आहे. याव्यतिरिक्त लक्ष्मण गायकवाड, भिकू रामजी इदाते तसेच डॉ. सुदाम राठोड यांनीही ‘झोळीबद्दल सविस्तर भाष्य केले आहे. या सर्वांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्रा. शामल राठोड यांनी ‘झोळी’ची पाठराखण केली आहे. खरं तर एवढे उच्च शिक्षण घेतल्यानंतरही आईने परंपरेनुसार मागून आणलेल्या अन्नावर भूक भागवणाऱ्या कालिदासची ही कहाणी वाचताना मन विषण्ण होते. एकविसाव्या शतकात असाही एक समाज आहे, हे वास्तव पचवणे जड जाते. चोरी न करता, मागून जगणारा हा पंथ! एरवी कधीही चर्चेत नसणारा. महाराष्ट्रात या समाजाचे नाव, सर्वत्र २०१८ साली पोहोचले. धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे अशीच भिक्षा मागण्यासाठी गेलेल्या पाच नाथपंथी डवरी गोसावी समाजातील माणसांची हत्या झाली. कोणताही गुन्हा न करणाऱ्यांना केवळ अफवेमुळे त्यांना मरणाला सामोरे जावे लागले. त्याच समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे डॉ. कालिदास शिंदे. शिक्षण घेऊन, सर्वोच्च पदवी प्राप्त करूनही बेरोजगार असणाऱ्या लेखकाचा शिक्षणावर असणारा विश्वास ही मला भावलेली सर्वात महत्त्वाची बाब आहे. या पुस्तकाचे प्रकाशन पंढरपूर येथील समिक्षा प्रकाशनाने केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत आकर्षक आणि विषयानुरूप आहे.

नाथपंथी डवरी गोसावी समाजातील हे आत्मकथन भाषा, बोलिभाषा, एका समाजातील रूढी, प्रथा, परंपरा समजून घेण्याच्यादृष्टिने अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या समाजाचा एक भाग असणाऱ्या या समाजाला समजून घेण्यासाठी हे आत्मचरित्र जरूर वाचावे.

पुस्तकाचे नाव – झोळी
लेखक – कालिदास शिंदे (९८२३९८५३५१)
प्रकाशक – समिक्षा पब्लिेकेशन, पंढरपूर (प्रविण भाकरे – ९६८९१४१२०१)
पृष्ठे – ३५२ मूल्य – रू. ५००/-

Related posts

गढुळ जीवन सद्गुरुंच्या सहवासाने निर्मळ

शेतकरी उत्पादक कंपन्यांना सिलिंगमधून वगळण्याची गरज

बीज संवर्धन, संरक्षणाचे महत्त्व

Leave a Comment