February 15, 2025
Prakash Amte Book Ranmitra
Home » रानमित्र – माणूस आणि प्राणी यांच्यातल्या अनोख्या नात्याची अदभूत गोष्ट
मुक्त संवाद

रानमित्र – माणूस आणि प्राणी यांच्यातल्या अनोख्या नात्याची अदभूत गोष्ट

मी मात्र आमच्या या अनाथालयाला ‘प्राण्यांचं गोकुळ’ म्हणतो. खरं तर ‘गोकुळ’ म्हणजे मुलाबाळांनी भरलेलं घर. आमच्या ‘गोकुळात’ मात्र खारीपासून बिबट्यापर्यंत विविध जातींचे प्राणी सुखाने नांदताना दिसतात.

– डॉ. प्रकाश आमटे

सॅली वॉकर नावाच्या एक अमेरिकन बाई मागे एकदा हेमलकशाला आमचा ‘लोकबिरादरी प्रकल्प’ बघायला आल्या होत्या. भामरागड परिसरातल्या आदिवासींसाठी आम्ही चालवलेला दवाखाना आणि आश्रमशाळेबरोबरच प्रकल्पावरचा प्राण्यांचा गोतावळा बघून त्या भारावून गेल्या. त्यांनी आमच्या या अनाथालयाला नाव दिलं ‘आमटेज अॅनिमल आर्क’. कोणे एके काळी ‘नोहाज आर्क’ या जहाजावर सगळे पशुपक्षी एकत्र मजेत राहत होते, अशी एक गोष्ट बायबलमध्ये आहे. आमच्या प्राण्यांच्या अनाथालयातलं वातावरण पाहून वॉकरबाईंना त्या गोष्टीची आठवण झाली आणि त्यांना हे नाव सुचलं. मी मात्र आमच्या या अनाथालयाला ‘प्राण्यांचं गोकुळ’ म्हणतो. खरं तर ‘गोकुळ’ म्हणजे मुलाबाळांनी भरलेलं घर. आमच्या ‘गोकुळात’ मात्र खारीपासून बिबट्यापर्यंत विविध जातींचे प्राणी सुखाने नांदताना दिसतात. प्रकल्पावर उपचारांसाठी येणारे आदिवासी, इथल्या वसतिगृहात राहणारी मुलं आणि आम्ही सारे कार्यकर्ते या सर्वाप्रमाणे हे प्राणीही आमच्या प्रकल्पाचा अविभाज्य भाग आहेत. त्यात काही वेगळं, आश्चर्यकारक आहे असं आम्हाला आता वाटतच नाही; पण बिबटे, अस्वल, कोल्हे, मगरी अशा जंगली प्राण्यांसोबतचं आमचं सहज वावरण अनेकांना अचंबित करतं. पाळीव प्राण्यांशी माणसाचं नातं जुळतं हे त्यांना माहिती असतं, पण हिंस्र प्राण्यांसोबत कसा काय लळा लागू शकतो, असा प्रश्न त्यांना पडलेला असतो.

हेमलकशातील आमच्या कामाचा प्रवास कथन करणारं ‘प्रकाशवाटा’ हे पुस्तक चार वर्षांपूर्वी ‘समकालीन प्रकाशना’ तर्फे प्रकाशित झालं आणि त्याला समस्त मराठी वाचकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. आमच्या कामाबद्दल कुतूहल निर्माण झालं. मला अन् मंदाला राज्यात अनेक ठिकाणी मुलाखतीसाठी, कार्यक्रमांसाठी आमंत्रित करण्यात आलं. अजूनही येतं. अशा कार्यक्रमांमध्ये प्रेक्षक अनेकदा आम्हाला उत्स्फूर्त प्रश्न विचारतात. त्यामध्ये आमच्या कामाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता तर असतेच, पण तितकंच कुतूहल आमच्या प्राण्यांबद्दल असतं. माझ्या या प्राणिप्रेमाचं मूळ कशात आहे, असा प्रश्न मला हमखास विचारला जातो; पण या प्रश्नाचं नेमकं उत्तर देणं मला अजून जमलेलं नाही.

चाळीस वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा हेमलकशाला येऊन पोहोचलो तेव्हा तिथे होतं फक्त दुर्गम जंगल. आदिवासीही आमच्यापासून अंतर राखून होते. त्यामुळे आम्ही अगदी एकटे, एकाकी पडलो होतो. त्या एकटेपणातून आम्हाला बाहेर काढलं तिथे भेटलेल्या जंगली प्राण्यांनी. या प्राण्यांनी आम्हाला असा काही लळा लावला की ते आमचे मित्रच बनले. त्यांनी आमच्यावर जे निर्मळ, निरपेक्ष प्रेम केलं त्यामुळे आमचं आयुष्यच बदलून गेलं.

– डॉ. प्रकाश आमटे

प्राण्यांचं वेड लहानपणापासूनचं आहे म्हणावं तर मी काही लहानपणापासून प्राण्यांसोबत वाढलेलो नाही. माझ्या मुलाच्या अनिकेतच्या आणि नातू अर्णवच्या बाबतीत मात्र तसं घडलं. प्राण्यांशी खेळतच ते वाढले. माझं तसं नाही. आमच्या लहानपणी ‘आनंदवना’त आजूबाजूला प्राणी होते अशातला भाग नाही. त्यामुळे मला वाटतं, माझी ही आवड कदाचित उपजतच असावी आणि प्राण्यांवर प्रेम करण्याची संधी मिळताच ती उफाळून आली असावी. कदाचित सुरुवातीला प्राण्यांचे जीव वाचावेत म्हणून त्यांना घरात ठेवून घेतल्यामुळे सहवासाने प्रेम वाढलं असावं. कारणं काहीही असोत, पण फक्त मलाच नव्हे, तर प्रकल्पावरचे माझे सहकारी विलास मनोहर, दादा पांचाळ, मनोहर येम्पलवार अशा सर्वांना या प्राण्यांनी लळा लावला हे खरं. हे कसं झालं याची कारणं शोधण्यापेक्षा आपलं एकमेकांवर प्रेम आहे हे मान्य करून आनंदात राहणं महत्त्वाचं. गेली कित्येक वर्ष आम्ही तेच करत आलो आहोत.

आमच्याकडे प्राणी येत गेले ते काहीसे अपघातानेच प्राणी पाळावेत असं काही आमच्यापैकी कुणी ठरवलं नव्हतं. बहुतेक प्राणी जखमी किंवा अनाथ अवस्थेत आमच्याकडे आले. त्यांना वाऱ्यावर सोडणं आम्हाला शक्य नव्हतं. त्यांना सांभाळणं ही त्या वेळची गरज होती आणि नंतर त्यांचा इतका लळा लागला की प्रकल्पावर प्राणी असण ही जणू आमची गरजच बनून गेली.

पुस्तकाचे नाव – रानमित्र
लेखक – प्रकाश आमटे
प्रकाशक – समकालिन प्रकाशन
किंमत : 200 रु /-
पुस्तकासाठी संपर्क : स्वरा बुक्स ऑनलाईन स्टोअर, ९५७९८२४८१७.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading