December 5, 2024
Ammas Pride and Onko Ki Kothin, which take note of the marginalized sections of society at IFFI
Home » इफ्फीमध्ये समाजातील दुर्लक्षित घटकांची दखल घेणारे अम्माज प्राइड आणि ओनको की कोठीन
मनोरंजन

इफ्फीमध्ये समाजातील दुर्लक्षित घटकांची दखल घेणारे अम्माज प्राइड आणि ओनको की कोठीन

5 व्या इफ्फी (IFFI) मध्ये समाजातील दुर्लक्षित घटकांची दखल घेणारे ‘अम्माज प्राइड’ आणि ‘ओनको की कोठीन’ हे चित्रपट प्रदर्शित

#IFFIWood गोवा – 55 व्या इफ्फी (IFFI), अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘अम्माज प्राईड’ आणि ‘ओनको की कोठीन’, या दोन उल्लेखनीय चित्रपटांना देशभरातील सिने रसिकांची पसंती मिळाली.

पणजी, गोवा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दोन्ही चित्रपटांचे निर्माते आणि कलाकारांनी आज पत्रकारांशी संवाद साधला.

‘अम्माज प्राईड’: चिवटपणा आणि अभिमानाचा प्रवास

यंदाच्या इफ्फी (IFFI) मधील एकमेव LGBTQ+ चित्रपट, ‘अम्माज प्राईड’, हे एका ट्रान्स-वुमनच्या पारलिंगी संघर्षाचे वास्तववादी आणि प्रामाणिक चित्रण आहे. यातील  अम्मा  तिच्या प्रतिष्ठेसाठी आणि अभिमानासाठी आयुष्यभर लढा देते.

इंडियन पॅनोरमामधील नॉन-फीचर फिल्म विभागासाठी निवड झालेला हा लघुपट, श्रीजा या दक्षिण भारतातील तरुण पारलिंगी स्त्रीच्या जीवनातील संघर्ष आणि अडचणींचे चित्रण आहे. आपल्या वैवाहिक जीवनातील गुंतागुंत सोडवण्यासाठी ती कसा मार्ग शोधते, आणि आपल्या विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी लढा देते, तिची आई, वल्ली, तिला मनापासून पाठींबा देते आणि मार्गदर्शन करते, या कथानकाभोवती हा चित्रपट फिरतो.  

आपल्या चित्रपटाबद्दल माध्यमांशी बोलताना, दिग्दर्शक शिवा क्रिश यांनी अधोरेखित केले की, ट्रान्सजेंडर – पारलिंगी –  व्यक्तींच्या समस्यांचे चित्रण करणारे चित्रपट फारच कमी आहेत. “ते अनेकदा पारलिंगी व्यक्तींना ठराविक नकारात्मक छटेत चित्रित करतात आणि त्यांना निराश करतात. चित्रपटाचा कणा, वल्ली ही आई आहे, जी स्वतः एकटी आई असूनही आपल्या मुलीला तिचे आयुष्य तिच्या मनाप्रमाणे जगण्यासाठी सक्षम बनवते”, ते म्हणाले.

पारलिंगी लोकांबद्दलची समाजाची धारणा बदलेल, अशी आशा बाळगून, हा नवोदित दिग्दर्शक म्हणाला, “आम्ही हा चित्रपट ज्येष्ठ LGBTQ कार्यकर्त्यांना आणि अनेक पारलिंगी लोकांना, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी दाखवला. चित्रपटातील सकारात्मकतेने ते थक्क झाले. ही गोष्ट आमचे मनोबल वाढवणारी होती. या चित्रपटाचा सामाजिक प्रभाव पडावा, अशीही त्यांची इच्छा आहे. यासाठी, आम्ही भारतामध्ये तसेच युनायटेड स्टेट्समध्ये या चित्रपटावर केंद्रित एक प्रभाव मोहीम राबवण्याची योजना आखत आहोत, ज्यामुळे मला आशा आहे की पारलिंगी लोकांसाठी मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये सकारात्मक लाट निर्माण होईल.”

विविध चित्रपट महोत्सवांमध्ये सन्मान प्राप्त करत अम्माज प्राईड या माहितीपटाने या वर्षी कॅनडा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट एलजीबीटीक्यू प्लस चित्रपटासाठीचे शेर व्हँकुव्हर पारितोषिक जिंकले आहे. तसेच 64 वा क्रॅकोव्ह चित्रपट महोत्सव, वुडस्टॉक चित्रपट महोत्सव 2024, आंतरराष्ट्रीय दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सव, कॅनडा 2024 यांसारख्या विविध चित्रपट महोत्सवांमध्ये देखील हा चित्रपट सादर झाला असून तेथील प्रेक्षकांकडून चित्रपटाला दाद मिळाली आहे.

ऑनको की कोठीन – प्रतिकूल परिस्थितीतील स्वप्ने

55 व्या इफ्फीमध्ये ‘ऑनको की कोठीन’ या बंगाली चित्रपटाचा जागतिक प्रीमियर सादर झाला. भारतीय पॅनोरमा विभागासाठी देखील या चित्रपटाची निवड झाली आहे. वंचित पार्श्वभूमीतील तीन लहान मुले तात्पुरत्या स्वरूपाचे रुग्णालय उभारतात आणि ते टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नांत ती मुले अनंत आव्हानांना कशी सामोरी जातात याची कथा या चित्रपटात पाहायला मिळते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ही तीन मुले त्यांची स्वप्ने पूर्ण करू शकतील का हा प्रश्न उभा करत ही कथा संपते.

“ही कथा बाबीन,डॉली आणि टायर या तीन लहान मुलांच्या आशेची आणि निर्धाराची कहाणी आहे,”चित्रपटाचे दिग्दर्शक सौरव पलोधी म्हणाले. “कोविडच्या जागतिक महामारीदरम्यान अनेक सरकारी शाळा बंद करण्यात आल्या आणि त्यामुळे वंचित घटकांतील अनेक मुलांचे शिक्षण थांबले. स्वप्नांचे कारखाने म्हणवणाऱ्या शाळाच जर बंद पडल्या तर मुले स्वप्ने बघायला कुठून शिकणार? म्हणून, हीच मुख्य संकल्पना माझ्या मनाला भावली आणि मी त्यावर चित्रपट तयार करायचा विचार केला,”ते म्हणाले.

या चित्रपटात भूमिका निभावणारी अभिनेत्री उषा चक्रवर्ती देखील या पत्रकार परिषदेत उपस्थित होती. चित्रपटाच्या कथेने यामध्ये भूमिका करण्याचा निर्णय घेण्यासाठी कसे प्रेरित केले यावर प्रकाश टाकताना ती म्हणाली, “भारतीय चित्रपटात वंचित पार्श्वभूमीतील मुलांचे प्रतिनिधित्व करणारे चित्रपट संख्येने खूप कमी आहेत. मी जेव्हा या चित्रपटाची कथा वाचली तेव्हा मला असे वाटले की ही कथा अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला हवी. अनेक अडथळे येऊन देखील स्वतःचे ध्येय न सोडणाऱ्या 3 मुलांची ही कथा येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरक कहाणी आहे.”

“आपल्या देशात, वंचित घटकांतील पालक मुलांना केवळ माध्यान्ह भोजनासाठी शाळेत पाठवतात, शिक्षण ही बाब त्यांच्यासाठी दुय्यम असते. पालकांच्या मर्यादा आणि आर्थिक अडचणींमुळे अशा मुलांची स्वप्ने कशी भंग पावतात हे मी अगदी जवळून पाहिले आहे. म्हणूनच, या मुलांची जिद्द आणि प्रामाणिकपणा यांचे दर्शन घडवून त्यांच्या आजूबाजूच्या परिस्थितीचे कटू वास्तव सर्वांसमोर आणण्यासाठी हा चित्रपट निर्माण करणे हा मी निवडलेला मार्ग होता,” पलोधी यांनी सांगितले.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading