सत्य स्वयंप्रकाशी असते. ते दाखवावे लागत नाही. तुकारामांची वाणी, त्यांचा भाव, त्यांचे आचरण खरे होते म्हणून तर. जगापासून लपले नाही. त्यांचा स्वतःवर विश्वास होता आणि आत्मविश्वास तर होताच होता.
डॉ. लीला पाटील. कोल्हापूर
न लगे चंदना पुसावा परिमळा। वनस्पती मेळ हाकारूंनी ।।१ ।।
अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी। धरितां ही परी आवरेना ।।२।।
सूर्य नाही जागें करीत या जना। प्रकाश किरणाकर म्हणून ।।३ ।।
तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे। लपवितां खरे येत नाही ।।४।। तुकाराम गाथा १५०
एक मोठा सिद्धांत, एक मोठे सत्य तुकाराम महाराज या अभंगात सांगतात की, ‘अंतरिचे धावे स्वभावे बाहेरी।’ ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. सत्य स्वयंप्रकाशी असते. ते दाखवावे लागत नाही. तुकारामांची वाणी, त्यांचा भाव, त्यांचे आचरण खरे होते म्हणून तर. जगापासून लपले नाही. त्यांचा स्वतःवर विश्वास होता आणि आत्मविश्वास तर होताच होता. समाजाने उशिरा का होईना ते मान्य केले. टीका, निंदा, उपहास, उपेक्षा व छळही सोसावा लागला. पण सोने जसे अग्नीतून तावून सुलाखून आपला चोखपणा सिद्ध करतेच. (चौदा कॅरेट, बेन्टेक्सबाबत नव्हे) त्याप्रमाणे तुकारामांची समाजाला निखळ व शुद्धाचरणाची शिकवण, रंजल्या गांजल्यांना आपलेपण देण्याची वृत्ती, मानवता धर्माचे पालन, नीतीची वागणूक, आत्मोन्नती व समाजोन्नती यांचे सांगड घालण्याचे तत्त्वज्ञान, निष्काम कर्मयोगाचे आणि निष्काम भक्ती व्यवहारी ज्ञान लोकांपर्यंत पोहोचविण्याची तळमळ ही मान्यता पावली आणि आजच्या युगातही तुकाराम संतश्रेष्ठ म्हणून ओळखले जात आहेत. म्हणूनच तुकारामांची वाणी ही आजतागायत मोलाचा ठेवा व अभंग आहे.
या अभंगात तुकारामांनी उपमा व उदाहरणांचा इतका अचूक, सुयोग्य व तितकाच मार्मिक आणि तार्किकतेने वापर केला आहे की ते वाचून त्यांच्यापुढे लोटांगण घ्यावेसे वाटते. मन भरून येते. भावना उचंबळून येतात. तुकारामांचे कवित्व किती उच्च दर्जाचे आणि त्यातील भावभावनांना जणू समुद्राची भरतीच आलेली आहे अशी अनुभती येते की खरेच तर शब्दच अपुरे, या अभंगात तुकाराम सांगतात,
चंदनाचा सुवास दरवळतो. आपणाजवळ सुवास आहे हे सांगण्याची गरज लागत नाही. आपोआपच ते सर्वांना कळते. नको नको म्हणताना गंध गेला राना। अशीच काहीशी स्थिती असते. जे अंतःकरणात आहे, अंतरंगात आहे ते नैसर्गिकरीत्या बाहेर येणारच, अडवल्याने ते थोडेच अडणार आहे. फुलांचा सुगंध दरवळला की त्याकडे भ्रमर, मधुमक्षिका आकृष्ट होतात. गुणी माणसाचे गुण प्रयत्नपूर्वक लपवू म्हटले तरी लपवू शकत नाही. ते लोकांना आकृष्ट करतात.
सूर्य उगवला की किरणांची उधळण होते. सूर्याचा आकाशात प्रवेश हाच मुळी लोकांना आपोआप जागे करतो. सूर्याला प्रत्येकाला उठविण्याची गरज पडत नाही. किंबहुना लोकांना जागे करा असे किरणांना सांगत नाही. स्वतः सूर्य स्वयंप्रकाशी आहेच. पण सर्वांना प्रकाश देणारा आहे. तोच त्याचा महिमा। लपून दडून राहणार कसा? मेघ मोराला नाचण्याचे आव्हान करीत नाही. नभ दाटून येतात. बिजलीचे कथ्थक नृत्य सुरू होते. ढगांची चाहूल, विजा चमकू लागण्याची चिन्हे दिसू लागताच मोराचा पिसारा आपोआप उमलायला लागतो. पावले थिरकू लागतात. ही नैसर्गिक वृत्ती व प्राकृतिक अशी प्रतिसादाची स्थिती असते. या सर्व जेवढ्या स्वाभाविक तेवढ्याच सत्याच्या वृत्ती व कृतीचा पुरावा व परिणाम म्हणावा लागेल. सत्य लपविता येत नाही आणि लपवितो म्हटले तरी लपत नाही. अंगभूत गुण अगदी जाहीरपणे लोक गोळा करून वा सभोवतालच्यांना सूचना देऊन सांगण्याची आवश्यकता नसते. गुणांची प्रचिती येतेच ना !
तुकारामांच्या या अभंगात निसर्गातील घटनांच्या उदाहरणांच्या सहाय्याने गुणांची दखल घेऊन त्या गुणांच्या परिणामांचा ऊहापोह केला. एवढेच नव्हे त्या घटनांच्या अनुषंगाने मानवाला सूचना केली आहे ती अशी की भक्तीचे ढोंग करू नका. केवळ तशा तऱ्हेची वस्त्रे परिधान करणे व हावभाव करणे यातून खरी भक्ती सिद्ध होत नाही. मनातील विकृती, वृत्तीतील अवगुण प्रकट होतातच. माणसांची भाषा उत्तम असली व विचार श्रेष्ठ असले तर ते झाकून राहात नाही. जसे फुलाचे दरवळणे, चंदनाचा सुवास, सूर्याचे प्रकाश किरण यासारखी प्रचिती येतेच.
भक्तिमार्गात अवलंब केलेले संत जगन्मान्यता मिळवतात. लोकांच्या गळ्यातले ताईत बनतात. तेच संत आपल्या उक्ती व कृतीने श्रेष्ठत्व प्राप्त करतात. हेच तुकाराम आपल्या अभंगात सूचित करीत आहेत. निष्काम भावनाच फक्त निष्काम कर्म करण्याचे प्रेरकत्व असते. मनाची शद्धता आणि चित्ताची एकाग्रता ध्यानाचे मुख्य साधन आहे. या अभंगाच्या माध्यमाने भक्तीचा सुगंध झाकता येत नाही असेच तुकारामांनी सांगितले. शिवाय कर्माच्या श्रेष्ठत्वाप्रमाणेच व्यक्तीच्या श्रेष्ठतेलाही महत्त्व दिले.
तुकारामांच्या अभंगात सुभाषिते, दृष्टांत, उपमा, प्रतिमा, रूपके आदी भाषा व्यवहारांचा खचाखच भरणा आहे. लौकिक अर्थाने त्याचा वापर केला आहे. तरीही त्यातून अलौकिक, आध्यात्मिक आणि ईश्वर भक्ती अशा व्यापक पातळीवर नेण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे हे नक्कीच. म्हणून तुकारामांची कविता ही युगकविता आहे. युगाचे स्पंदन आहे. समतेचा उच्चार आहे व शिकवण आहे. म्हणूनच ‘सात्विक प्रेमळ दृष्टांताचा मते। बोलिले बहुत कळावया? असे तुकारामांच्या अभंगाबद्दल म्हणता येईल.
डॉ. लीला पाटील. कोल्हापूर

Leave a Reply