रंगातच
उरला नाही रंग
सारेच बेरंग
बेढंग
रंगणार कशात
नेमके कोण
आपलीच नशा
आपलाच दृष्टिकोण
फेकली जातेय
ती तर नुसतीच घाण आहे
बघणारे तरीही म्हणतात,
छान आहे
त्यातच लोळणे,
त्यातच घोळणे
तोच सूड,तोच द्वेष
पिऊन तर्र,तोच त्वेष
रंग निव्वळ
मस्तीचा
नुसता
सुंदोपसुंदीचा
लावावा थोडा तरी
कुणी कुणाच्या अंगाला
असा तर तो
उरलाच नाही
अंगाला म्हणूनच
अंग लागत नाही
एकमेकात दंग तर
होतच नाही
जळते खरे तर
सुष्टच आहे
दुष्ट काहीच
जळत नाही
कथाही
म्हणून त्याच्या
कोणी आता
सांगत नाही
सारेच कसे
रंगहीन
आत बाहेर
सारखेच
जीवनच
झाले आहे
रंगांना
पारखे
श्रीपाद भालचंद्र जोशी
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.