Prajakta Khairnar: The Woman Officer Uncovering Truth Through Forensic Science
गुन्ह्याच्या घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांना विज्ञानाची जोड देत सत्याचा शोध घेणे आणि निर्दोष व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणे, हे काम अत्यंत कौशल्याचे आणि जबाबदारीचे आहे. फॉरेन्सिक विज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या चिकित्सक बुद्धीने, वैज्ञानिक दृष्टिकोनाने आणि कर्तव्यनिष्ठेने ठसा उमटवणाऱ्या सहायक संचालक प्राजक्ता खैरनार यांनी या आव्हानात्मक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शासकीय सेवेत प्रामाणिकपणाचा आदर्श जपत सामाजिक न्यायासाठी कार्यरत असलेल्या प्राजक्ता यांचा प्रवास म्हणजे विज्ञानाच्या बळावर सत्याचा शोध घेणाऱ्या दुर्गेची प्रेरणादायी कहाणी आहे.
स्नेहल भुजाडी
प्राजक्ता खैरनार या अहिल्यानगर जिल्ह्याच्या भूमीत जन्मलेल्या ‘अतिशय चिकित्सक आणि कर्तव्यनिष्ठ शासकीय अधिकारी’ आहेत. सध्या त्या महाराष्ट्र शासनाच्या ‘न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालया’त ‘सहायक संचालक’ पदावर कार्यरत आहेत. प्राजक्ता यांनी जैवतंत्रज्ञान विषयात पदवी, तर जीवरसायनशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेद्वारे २०११ साली त्यांची ‘असिस्टंट केमिकल अॅनालायझर’ म्हणून गृहखात्याच्या फॉरेन्सिक विभागात नियुक्ती झाली.
फॉरेन्सिक सायन्ससारख्या आव्हानात्मक क्षेत्रात काम करत त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्यानंतर २०२५ साली पुन्हा एकदा MPSC परीक्षेद्वारे ‘असिस्टंट डायरेक्टर’ या पदासाठी त्यांची निवड झाली, ही अभिमानाची बाब आहे. बायोकेमिस्ट्री या विषयात असलेली आवड आणि त्याद्वारे समाजासाठी काहीतरी योगदान देण्याच्या ध्येयाने त्या याक्षेत्रात बहुमूल्य कामगिरी करत आहेत. त्यांनी आजवर नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई येथील प्रयोगशाळांमध्ये उत्कृष्ट सेवा बजावली आहे. डीएनए, टॉक्सिकोलॉजी, नार्कोटिक्स यांसारख्या विविध विभागांमध्ये काम करताना त्यांनी अनेक संवेदनशील प्रकरणांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे.
प्राजक्ताजी यांनी खून, दरोडे, बलात्कार आणि पॉक्सो अंतर्गत येणाऱ्या अनेक संवेदनशील प्रकरणांच्या शोधकार्यात मोलाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्रातील पहिलं POCSO-AB प्रकरण त्यांनीच हाताळलं आहे. न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेत योगदान देताना, ‘निर्दोष व्यक्तीवर अन्याय होऊ नये आणि दोषींना कायद्यानुसार शिक्षा मिळावी’ यासाठी त्या प्रामाणिकपणे कार्यरत असतात. ‘संवेदनशील प्रकरणांच्या संबंधित काम करताना, स्वतःच्या भावनांचं भान राखून कर्तव्याला प्राधान्य देणं’ हे त्यांच्या कामाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे.
प्राजक्ताजी म्हणतात, “क्षमतेनुसार कामात संपूर्ण आणि प्रामाणिकपणे योगदान देत राहणे, हेच माझ्यासाठी माझं यश आहे.” ‘सरकारी खात्यात केवळ भ्रष्टाचारी वृत्तीचे लोक नसून, प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणारे अधिकारी आणि कर्मचारीही आहेत,’ हा दृष्टिकोन सर्वांनी ठेवायला हवा, असं त्यांना मनापासून वाटतं.
आपल्या शासकीय जबाबदाऱ्या सांभाळत, प्राजक्ताजी पर्यावरण संवर्धन व प्लॅस्टिकमुक्तीसाठी देखील प्रयत्नशील आहेत. रोजच्या जीवनात ‘केमिकल फ्री’ आणि पर्यावरणपूरक वस्तू वापरण्यासाठी त्या जागरूकता निर्माण करतात. प्राजक्ताजी यांना छायाचित्रण, वाचन, चित्र रेखाटन, प्रवास आणि शाश्वत जीवनशैलीचा वापर यांसारख्या गोष्टींची विशेष आवड आहे. आपल्या चिकित्सक बुद्धीने आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने सामाजिक न्यायासाठी कणखरपणे भूमिका बजावणाऱ्या मा. प्राजक्ता यांचे कार्य अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे.
ओळख: वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!..१० अन्यायाची झळ स्वतः सोसली, पोलिस कोठडीचा धाक अनुभवला; पण त्या…
संपत्ती मिळवणे हे एक यश असू शकते; परंतु त्या संपत्तीचा उपयोग इतरांच्या जीवनात आशेचा प्रकाश…
ओळख: वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!..९ संघर्ष माणसाला खचवतोच असे नाही, तर त्याच संघर्षातून स्वतःची ओळख…
‘सिंहावलोकन…!’ यशाच्या दिशेने वाटचाल करताना केवळ पुढे जाणे महत्त्वाचे नसते, तर आपण आजवर कोणता प्रवास…
भारतीय चित्रपटसृष्टीत आपल्या सात्त्विक सौंदर्याने, शालीन अदाकारीने आणि कसदार अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री…
बुलढाण्याच्या मातीतून सुरू झालेला प्रवास; पुण्यात स्वतःची कायदेविषयक संस्था उभी करत सामाजिक न्यायासाठी लढा ओळख:…