Brihadeeswara Temple: Chola Architecture and Maratha Heritage of Thanjavur
दगडांमध्ये कोरलेला इतिहास, स्थापत्यकलेचा अद्भुत आविष्कार आणि चोल व मराठा संस्कृतीचा अनोखा संगम म्हणजे तंजावरचे बृहदेश्वर मंदिर !
दक्षिण भारतातील मराठा साम्राज्याच्या ऐतिहासिक वारशाची ओळख जपणारे तंजावर हे शहर म्हणजे इतिहास, कला, साहित्य आणि संस्कृतीचा समृद्ध ठेवा. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित महाराजा सरफोजीराजे द्वितीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तंजावरला जाण्याचा योग आला. या दौऱ्यात जगप्रसिद्ध बृहदेश्वर मंदिराला भेट देण्याची संधी मिळाली. मंदिराचे भव्य स्थापत्य, त्यामागचा इतिहास आणि चोल व मराठा राजवटींच्या खुणा प्रत्यक्ष पाहताना मन थक्क झाले. सोबत असलेले मार्गदर्शक आणि स्थानिक नागरिक यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या ऐतिहासिक वास्तूचा घेतलेला हा वेध…
आरती झोटिंग, नागपूर
9420087986
बृहदेश्वर मंदिर हे केवळ प्राचीन शिवमंदिर नाही, तर चोल साम्राज्याचे सामर्थ्य, कला, स्थापत्यशास्त्र, प्रशासन, संस्कृती आणि आध्यात्मिक परंपरा यांचे दगडात कोरलेले भव्य प्रतीक आहे. इसवी सन १०१० मध्ये चोल सम्राट राजराज चोल प्रथम यांनी या मंदिराची उभारणी केली. त्या काळात दक्षिण भारतात चोल साम्राज्याचा मोठा प्रभाव होता. भारतातील शक्तिशाली आणि वैभवशाली साम्राज्यांपैकी एक म्हणून चोल साम्राज्याची ओळख होती. या साम्राज्याच्या वैभवाची साक्ष आजही बृहदेश्वर मंदिर देत आहे.
द्रविड स्थापत्यशैलीत उभारलेले हे मंदिर म्हणजे प्राचीन भारतीय स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना आहे. मंदिरात प्रवेश करतानाच त्याच्या भव्यतेची आणि दिव्यत्वाची प्रचिती येते. मंदिराच्या गर्भगृहावर उभारलेले प्रचंड उंचीचे शिखर, ज्याला स्थापत्यशास्त्रात ‘विमान’ असे संबोधले जाते, हे मंदिराचे प्रमुख आकर्षण आहे. युनेस्कोच्या नोंदींनुसार या मंदिराची उंची सुमारे ६० मीटर आहे. तेरा स्तरांमध्ये उभारलेली ही भव्य रचना पाहताना त्या काळातील स्थापत्यकारांच्या कल्पकतेचा आणि अभियांत्रिकी कौशल्याचा प्रत्यय येतो.
आजच्या काळात बांधकामासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री, क्रेन आणि वाहतुकीची अनेक साधने उपलब्ध आहेत. मात्र, सुमारे हजार वर्षांपूर्वी एवढ्या प्रचंड आकाराचे मंदिर उभारणे हे मोठे आव्हान असणार. मंदिराच्या बांधकामासाठी वापरलेले विशाल दगड दूरवरून आणले गेले असावेत, अशी माहिती स्थानिक मार्गदर्शकांकडून मिळाली. एवढे जड दगड त्या काळात कसे वाहून आणले असतील आणि इतक्या उंचीवर कसे चढवले असतील, हा प्रश्न मनात निर्माण होतो. विशेषतः मंदिराच्या शिखरावरील प्रचंड वजनाचा दगड उंचावर नेण्यामागील अभियांत्रिकी कौशल्य आजही अभ्यासाचा विषय आहे. या निर्मितीमागे असलेले नियोजन, श्रम आणि स्थापत्यज्ञान खरोखरच अचंबित करणारे आहे.
मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत जाताना एकापाठोपाठ एक भव्य द्वारे नजरेस पडतात. पहिल्या मोठ्या प्रवेशद्वाराला चोलद्वार म्हणून ओळखले जाते. ते चोल साम्राज्याच्या वैभवाची साक्ष देते. त्यानंतरचे गणेशद्वार मराठा भोसले राजवटीच्या योगदानाची आठवण करून देते. या प्रवेशद्वारांतून पुढे जाताना मंदिराच्या इतिहासात चोल आणि मराठा या दोन्ही राजघराण्यांचे योगदान कसे एकत्र आले आहे, याची जाणीव होते.
मंदिरातील नंदीची भव्य मूर्ती हे आणखी एक आकर्षण आहे. एकाच अखंड दगडातून कोरलेली ही नंदीमूर्ती आकाराने अत्यंत विशाल आहे. सुमारे १३ बाय १६ फूट आकाराची ही मूर्ती शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. नंदी, गर्भगृह आणि तेथील शिवलिंग यांची रचना एका सरळ रेषेत असल्याचे पाहायला मिळते. मंदिराचा मुख्य केंद्रबिंदू म्हणजे गर्भगृहातील भव्य शिवलिंग. त्याच्या दर्शनाने मंदिराच्या आध्यात्मिक वातावरणाची अनुभूती येते.
मंदिर परिसरात माता पार्वती, गणेश आणि कार्तिकेय यांची मंदिरे तसेच इतर धार्मिक रचना आहेत. परिसरातील शिवलिंगे आणि नंदीच्या मूर्ती यांमुळे संपूर्ण मंदिरक्षेत्राला एक वेगळे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक वास्तू, प्रत्येक शिल्प आणि प्रत्येक दगड जणू काही हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासाची गोष्ट सांगत असल्याचा भास होतो.
बृहदेश्वर मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील भित्तिचित्रे आणि शिल्पकला. मंदिराच्या भिंतींवर चोलकालीन धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे दर्शन घडविणारी चित्रे रेखाटलेली आहेत. तत्कालीन समाजजीवन, देवदेवता, धार्मिक परंपरा आणि कलाविष्कार यांचे दर्शन या चित्रांतून घडते. काही ठिकाणी प्राचीन चित्रांवर नंतरच्या काळातही चित्रांकन झालेले दिसते. त्यामुळे वेगवेगळ्या राजवटींनी या मंदिराच्या सांस्कृतिक वारशात भर घातल्याचे लक्षात येते.
मंदिराच्या भिंतींवर भरतनाट्यममधील नृत्याच्या विविध मुद्रांचे शिल्पांकन करण्यात आले आहे. नृत्यशास्त्रातील १०८ करणांपैकी अनेक मुद्रांचे दर्शन येथे घडते. नृत्याच्या या मुद्रा पाहताना दगडातही हालचाल निर्माण करता येते, याचा प्रत्यय येतो. त्या शिल्पांमधील देहबोली, भावमुद्रा आणि कलात्मकता पाहताना नर्तकी प्रत्यक्ष नृत्य करत असल्याचा भास होतो. प्राचीन भारतीय नृत्यपरंपरेचा हा अनमोल ठेवा आहे.
बृहदेश्वर मंदिराला १९८७ मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळाला. आजही मंदिरात पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा आणि धार्मिक विधी केले जातात. हजार वर्षांचा प्रदीर्घ इतिहास अनुभवत असतानाही येथील धार्मिक परंपरा जिवंत असल्याचे पाहून समाधान वाटते. काळ बदलला, राजवटी बदलल्या, सत्ताधीश बदलले; मात्र मंदिराचे पावित्र्य आणि सांस्कृतिक परंपरा आजही जपल्या जात आहेत.
या मंदिराचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मराठा भोसले राजघराण्याच्या इतिहासाची साक्ष देणारा शिलालेख. मंदिराच्या दक्षिणेकडील भिंतीवर तंजावरच्या भोसले राजघराण्याचा इतिहास सांगणारा विस्तृत लेख कोरलेला आहे. तंजावरचे महाराज सरफोजीराजे भोसले द्वितीय यांनी १८०३ मध्ये भोसले वंशाचा इतिहास जतन करण्याच्या उद्देशाने हा लेख कोरून घेतल्याचे सांगितले जाते. या लेखामध्ये भोसले घराण्याची उत्पत्ती, पूर्वज, राजकीय घडामोडी आणि सांस्कृतिक परंपरा यांची माहिती नोंदविण्यात आली आहे.
अनेक स्वतंत्र भागांमध्ये कोरलेला हा ऐतिहासिक लेख आकाराने अत्यंत मोठा आहे. त्यातील मजकूर ए-फोर आकाराच्या १३६ पानांमध्ये मावेल एवढा विस्तृत असल्याची माहिती स्थानिक मार्गदर्शकांनी दिली. या शिलालेखामुळे तंजावरच्या मराठा राजघराण्याचा इतिहास समजून घेण्यासाठी महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध झाला आहे. दक्षिण भारतात राज्य करणाऱ्या मराठा भोसले घराण्याने आपली भाषा, साहित्य आणि सांस्कृतिक ओळख कशी जपली, याचीही ही वास्तू साक्ष देते.
तंजावर हे महाराष्ट्रापासून भौगोलिकदृष्ट्या दूर असले, तरी येथील मराठी भाषा, साहित्य, संगीत आणि सांस्कृतिक परंपरा पिढ्यान्पिढ्या जतन केल्या गेल्या आहेत. महाराजा सरफोजीराजे भोसले द्वितीय यांच्यासारख्या विद्वान आणि कलाप्रेमी राजांनी या सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनात मोलाचे योगदान दिले. त्यामुळे तंजावरला भेट देताना केवळ दक्षिण भारतीय इतिहासच नव्हे, तर महाराष्ट्राच्या इतिहासाशी जोडलेली एक महत्त्वाची सांस्कृतिक नाळही अनुभवता येते.
बृहदेश्वर मंदिर पाहताना चोल आणि मराठा या दोन्ही संस्कृतींचे ठसे या वास्तूमध्ये उमटलेले दिसतात. एका बाजूला चोल सम्राट राजराज प्रथम यांच्या दूरदृष्टीतून साकारलेले स्थापत्यवैभव, तर दुसऱ्या बाजूला भोसले राजघराण्याने जतन केलेला मराठी भाषेचा आणि इतिहासाचा वारसा! या दोन्हींचा संगम तंजावरच्या सांस्कृतिक समृद्धीची ओळख करून देतो.
बृहदेश्वर मंदिर म्हणजे केवळ दगडांची भव्य रचना नाही, तर हजार वर्षांच्या भारतीय इतिहासाचा जिवंत दस्तऐवज आहे. श्रद्धा, सामर्थ्य, सौंदर्य, कलात्मकता आणि स्थापत्यकौशल्य यांचा अद्भुत संगम असलेले हे शिवालय पाहताना भारतीय संस्कृतीच्या वैभवाची नव्याने जाणीव होते. राजराज चोल प्रथम यांच्या स्वप्नातून साकारलेली ही वास्तू आजही काळाच्या कसोटीवर तितक्याच दिमाखात उभी आहे. चोल साम्राज्याचे सामर्थ्य आणि मराठ्यांच्या इतिहासाचा अमिट ठसा जपणारे बृहदेश्वर मंदिर म्हणजे भारतीय संस्कृतीच्या भव्य पटावर कोरलेले एक अजरामर शिल्प होय!
महाराष्ट्रातील ट्रेकिंगवरील पहिला दिवाळी अंक; २५ दर्जेदार लेखांनी सजलेला ‘दुर्गांच्या देशातून…’चा प्रदक्षिणा विशेषांक सह्याद्रीच्या डोंगररांगा,…
रामलीला मैदानावर विरोधकांनी पुन्हा एकदा एकजुटीचे शक्तिप्रदर्शन केले. ‘व्होट चोरी’ आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह…
फुलचंद नागटिळक संमेलनाध्यक्ष तर डॉ. बी. वाय. यादव स्वागताध्यक्ष बार्शी - अखिल भारतीय मराठी साहित्य…
विशेष आर्थिक लेख:आर्थिक माहितीची नवी वाट ! बँक खाती, मुदतठेवी, म्युच्युअल फंड, शेअर्स आणि कर्जे…
आर्थिक सुबत्ता नसतानाही श्रीमंतीचा आव आणत, खिशातली एकच नोट वर्षानुवर्षे मिरवत आणि दुसऱ्याच्या पैशावर ऐटीत…
पश्चिम घाटातील पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात प्रकल्प उभारणीला डॉ. मधुकर बाचूळकर यांचा विरोध कोल्हापूर : पश्चिम…