मुक्त संवाद

खिशात पैसा नाही, पण श्रीमंतीचा थाट भारी! असे आहेत फुकटचंद बापू…

आर्थिक सुबत्ता नसतानाही श्रीमंतीचा आव आणत, खिशातली एकच नोट वर्षानुवर्षे मिरवत आणि दुसऱ्याच्या पैशावर ऐटीत पाहुणचार झोडत जगणारी काही अवलिया माणसं समाजात असतात. स्वतःच्या खिशाला कधी चाट न लावता फुकट मिळेल तिथे हक्काने हात मारणं, वर त्यालाच आपला पराक्रम समजून गावभर त्याच्या शौर्यकथा सांगणं, हा त्यांचा जीवनमंत्रच! अशाच एका नमुनेदार व्यक्तिमत्त्वाची ही मिश्किल, खुमासदार आणि हास्याची खसखस पिकवणारी गोष्ट… ‘फुकटचंद बापू…?!’

निवृत्ती मथुराबाई सयाजी जोरी , मंडळ कृषी अधिकारी, लासूर स्टेशन,
गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर
9423180393,8668779597

कोणालाही स्वतःकडे आर्थिक सुबत्ता काही ओढून ताडून आणता येत नसते. एकतर ती ‘सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेला’अशा पद्धतीची जन्मजात असावी लागते किंवा स्वतः मनगटाच्या जोरावर कमावलेल्या संपत्तीतून आलेली असावी. यापेक्षा एक वेगळा तिसरा वर्ग जो की काही नसलं तरी दाखवणारा अन् आयुष्यभर पुढारपण करत‘ घरात नाही आणा अन् मला बाबुराव म्हणा’अशातला म्हणजेच चमकोगिरी करणारा.

आमच्या ओळखीतला ‘फुकटचंद बापू ’तशातलाच. त्याचं टोपणनाव लहानपणापासून बापू. आमच्या गावात बापू या टोपणनावाचे जवळपास अर्धा डझन माणसं सहज भरतील. मग त्याच्या विशेष कर्तुत्वांनी प्रत्येक बापूला आणखी सखोलपणे वेगळं टोपणनाव प्राप्त झालेलं …. भामटा बापू, चोर गल्लीतला बापू, काळा बापू, फर्तळया दाताचा बापू असं प्रत्येकाला डबल विशेषण लागलेलं. तसंच एक म्हणजे फुकटचंद बापू! हे महान व्यक्तिमत्व सुद्धा या वेगळ्या अतिविशेष प्रकारातलं. लहानपणापासून फुकट जिथं असेल किंवा मिळेल तिथं अगदी तनमन लावून तिथला पूर्णपणे आस्वाद घेतल्याशिवाय ह्या बापूला अजिबातच चैन पडायची नाही. स्वतःची सतत व्यस्तता आणि धावपळ इतरांना दाखवणारा हा बापू मात्र सतत कडक पांढऱ्या कपड्यांमध्ये वावरत असायचा. त्यातल्या त्यात आणखी त्याच्याबद्दल आर्थिक बाबतीत सांगायचं म्हणजे फुकटचंद बापूच्या शर्टचा कपडा नेहमी पारदर्शक आणि पांढरा असणारा.जेणेकरून वरच्या खिशात कित्येक सालोसाल पाचशेची सही सलामत ठेवलेली नोट इतरांना २४ तास दर्शनी भागात सर्रास दिसावी म्हणजे‘खिशात नाही आणा अन् मला बाबुराव म्हणा’असा फुकटचंद बापूंबद्दलचा सर्वांनी समजून घ्यावा असा अलिखित नियम!

कित्येक वेळा चौकातल्या चहाच्या टपरीवर मित्रांसोबत चहा घ्यायला बसलेला बापू नुसता वरच्या खिशात ठेवलेल्या त्या नोटेला“ मी बील देतो ……तुम्ही राहू द्या.” असं म्हणत स्पर्श करणार ! मात्र तोपर्यंत इकडं कुणीतरी ते देऊन मोकळा होणार. अशी बापूची नुसती ही एक्टिंगबाजी जवळपास पंचक्रोशीतल्या सर्वांनाच माहित म्हणून कुणी त्याच्याशी आर्थिक बाबतीत जास्ती पंगा घेत नव्हतं. ते का? तर….. बापूचा तालुक्यातल्या जवळपास सगळ्याच सरकारी ऑफिसांमध्ये चांगला वट! साहेब लोकांशी दररोजची उठबस म्हणून गावातल्या कित्येकांची कामं फुकटचंद बाप्पूने नाममात्र आर्थिक करारावर मार्गी लावलेली म्हणून ह्याला बऱ्यापैकी मान मिळायचा.

एकदा फुकटचंद बापू शहरात एका कामानिमित्ताने गेला. तिथं त्याला अन्नछत्र सुरू असलेलं दिसलं. पण रांग लांबलचक होती. फुकट म्हणल्यावर मनाशी हट्ट करून तो रांगेत उभा राहिला. पण त्याचा नंबर येईपर्यंत जेवण संपलं! तेव्हा मात्र त्यानं थेट यजमानांशी पंगा घेतला!… “इतका वेळ थांबल्यासरशी काहीतरी द्या.” म्हणून न मिळालेल्यांचा मोरक्या झाला. शेवटी त्यांनी “मठ्ठा देतो.” अशी कबुली दिली तेव्हा कुठे वातावरण शांत झालं. तो किस्सा फुकटचंद बापू गावच्या पारावर बसला म्हणजे शौर्य कथा म्हणून जवळपास पंधरा मिनिटे अभिमानाने सांगतो. ‘आपले हक्क आपण अबाधित ठेवले पाहिजे.’असा फुकटचंद बापूंचा यातून इतरांना सल्ला आहे असं समजलं तरी काही वावगं नाही!

गावातलं देखील कोणतही सुखदुःखातलं कार्य असू द्या, फुकटचंद बाप्पू पहिल्या एक-दोन पंगतीला फूशारकी मारत दोन्ही हात टांगून पुढारी स्टाईल फिरणार अन् शेवटच्या पंगतीला पूर्ण वचपा काढत यथेच्छ पेटपूजा करून घेणार हा बापूंचा मूळ छंद.

एक दिवस असंच फुकटचंद बापूला वरच्या खिशातल्या पाचशे रुपयांच्या नोटेचं विचारलं तेव्हा तो प्रामाणिकपणे बरेच दिवसांपासून तीच एक नोट असल्याचं त्यानं कबूल केलं. अन् थोडं थांबून आणखी एक भानगड सांगितली. म्हणाला, “एक खरं सांगू का?” समोरचा म्हणाला “सांगा.” फुकटचंद बाप्पू हळूच म्हणाला, “ती बी खरी न्हाय….!” समोरचा अगदी गलितगात्र चेहरा करून खिन्न होऊन बसला…….

असे बापू नावाचे कलंदर मी खूप बघितले पण ‘या सम हेच!’…….. नम्र बचतीच्या नवनवीन टोलेजंग कल्पना फुकटचंद बाप्पू कोणत्या शाळेत शिकले असतील हा एक महत्त्वपूर्ण संशोधनाचा विषय……, अन् त्यांच्या ह्या अभूतपूर्व क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल नक्कीच त्यांच्या मार्गदर्शकांना बघण्याचा किंवा भेटण्याचा आज मला तरी मोह आवरत नाही आणि उत्कंठा सुद्धा वाढली आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

टोरेंट पंप स्टोरेज प्रकल्प नियमबाह्य; तातडीने बंद करा !

पश्चिम घाटातील पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात प्रकल्प उभारणीला डॉ. मधुकर बाचूळकर यांचा विरोध कोल्हापूर : पश्चिम…

50 minutes ago

“कोण पाहिजे तुम्हाला? ते आता “तुम्हीच पाहिजे मला….” पर्यंतचा प्रवास

डॉ. भरत पाडेकर यांच्या 'साठी' निमित्त सिंहावलोकन सात रुपये रोजाने काम करणारा एक तरुण, परिस्थितीशी…

14 hours ago

सत्ता, पैसा असूनही मतदारांचा नकार; विधान परिषद निकालाने भाजपला दिला धक्का !

चार राज्यांतील विधान परिषदेच्या २८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीने देशातील राजकीय पक्षांच्या सत्ताकारणाला अनपेक्षित धक्के दिले…

15 hours ago

इस्त्रायलमधील सत्तासंघर्ष : नेतान्याहूंची सत्ता टिकणार की नव्या नेतृत्वाचा उदय होणार?

इस्रायलमधील त्रिशंकू जनादेशामुळे सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. बेंजामिन नेतान्याहू सत्ता टिकवणार की गादी आयझेनकोट…

1 day ago

महात्मा फुले दीर्घ काव्य स्पर्धेत कवी महावीर कांबळे प्रथम

अश्विनी दीक्षित,राजेंद्र मुंढे,राजेंद्र पारे,योगिता शेटकर,सायली नारकर यांचाही सन्मान राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र, समाज साहित्य प्रतिष्ठान…

1 day ago

कवितेतून उमटले सामाजिक वास्तवाचे प्रतिबिंब; कुठे हास्याची पखरण, तर कुठे अंतर्मुख करणारे विचार!

वडोदरा : कविता म्हणजे केवळ शब्दांची जुळवाजुळव नव्हे, तर ती मनातील भावनांना वाट करून देणारी…

1 day ago