गप्पा-टप्पा

दुर्गांच्या प्रदक्षिणेतून उलगडणार सह्याद्रीचे इतिहासवैभव; भटकंतीचा अनोखा शब्दानुभव!

  • महाराष्ट्रातील ट्रेकिंगवरील पहिला दिवाळी अंक;
  • २५ दर्जेदार लेखांनी सजलेला ‘दुर्गांच्या देशातून…’चा प्रदक्षिणा विशेषांक

सह्याद्रीच्या डोंगररांगा, त्यातील ऐतिहासिक गडकोट, दुर्गांची भौगोलिक वैशिष्ट्ये, निसर्गवैभव आणि प्रदक्षिणेच्या वाटांवर अनुभवायला मिळणारा रोमांच… या साऱ्या विश्वाची शब्दचित्रे उलगडणारा ‘दुर्गांच्या देशातून…’ हा दिवाळी अंक यंदा ‘प्रदक्षिणा विशेषांक’ म्हणून वाचकांच्या भेटीला आला आहे. महाराष्ट्रातील ट्रेकिंगवरील पहिला दिवाळी अंक म्हणून ओळख असलेल्या या अंकाचे हे पंधरावे वर्ष असून, तब्बल २५ दर्जेदार लेखांनी तो समृद्ध झाला आहे. दुर्गप्रेमी, इतिहास अभ्यासक आणि भटकंतीची आवड असणाऱ्यांसाठी हा विशेषांक म्हणजे सह्याद्रीच्या दुर्गविश्वाची अनोखी साहित्यिक सफरच आहे.

राजगडाच्या प्रदक्षिणेवर तीन, रायगडाच्या प्रदक्षिणेवर चार आणि हरिश्चंद्रगडाच्या प्रदक्षिणेवर तीन लेख या अंकात समाविष्ट आहेत. विषय एकच असला, तरी प्रत्येक लेखकाचा दृष्टिकोन, अनुभव आणि मांडणी वेगळी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या इतिहासाशी अतूट नाते सांगणाऱ्या राजगड आणि रायगडापासून शिवनेरी, सिंहगड, प्रतापगड, माहुली, मनोहर-मनोसंतोषगड, साल्हेर, अलंग-मदन-कुरंग, सुधागड, अवचितगड, घोसाळगड, गाविलगड, माणिकगड, बाळापूरचा किल्ला, चंद्रपूरचा किल्ला आणि अहिल्यानगरच्या भुईकोटापर्यंत अनेक दुर्गांच्या प्रदक्षिणांचा अनुभव या विशेषांकातून वाचायला मिळतो.

अनुभवांच्या वाटेवर इतिहासाचे दर्शन

या विशेषांकाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ किल्ल्यांच्या प्रदक्षिणांचे वर्णन नाही, तर त्या वाटांवर अनुभवलेला इतिहास, निसर्ग, जैवविविधता, दुर्गसंस्कृती आणि दुर्गप्रेमींच्या आठवणींचाही समृद्ध पट येथे उलगडतो.

साहित्यिक प्रकाश कामत यांनी आपल्या खुमासदार शैलीत सुमारे ४० वर्षांपूर्वी ‘नेचर लव्हर्स’ संस्थेने केलेल्या रायगड प्रदक्षिणेच्या आठवणी जागवल्या आहेत. तर याच संस्थेच्या अनेक मोहिमांचे नेतृत्व करणारे आणि लांब पल्ल्याच्या सायकल मोहिमा यशस्वीपणे पूर्ण करणारे प्रकाश म्हापणकर यांनी ३७ वर्षांपूर्वी मोजक्या सहकाऱ्यांसह केलेल्या हरिश्चंद्रगड प्रदक्षिणेचा अनुभव आपल्या खास शैलीत मांडला आहे.

सलग दहा वर्षे रायगडाला तीर्थक्षेत्राप्रमाणे भेट देणारे मोहन फराडे यांनी रायगड प्रदक्षिणेचा ओघवता अनुभव शब्दबद्ध केला आहे. सिंहगडाचे अभ्यासक आणि पुरातत्त्वशास्त्रात एम.ए.व पीएच.डी.प्राप्त केलेले डॉ. नंदकिशोर मते यांनी आपल्या श्रद्धास्थान असलेल्या सिंहगडाच्या प्रदक्षिणेतून त्याच्या ऐतिहासिक पाऊलखुणांचा वेध घेतला आहे.

जुन्नर तालुक्यात वैद्यकीय सेवा देतानाच परिसराचा सखोल अभ्यास करणारे डॉ.अमोल पुंडे यांनी शिवजन्मभूमी शिवनेरीच्या सभोवतालच्या निसर्गवैभवाचा आणि जैवविविधतेचा अभ्यासपूर्ण परिचय करून दिला आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून गडकोट आणि निसर्गाचे सौंदर्य तरुण पिढीसमोर मांडणारे अमोल तळेकर यांनी जावळी खोऱ्यातील इतिहासप्रसिद्ध प्रतापगडाच्या प्रदक्षिणेचा अनुभव उलगडला आहे.

आयडॉल शिक्षक पुरस्काराने सन्मानित आणि विद्यार्थ्यांमध्ये इतिहासप्रेम रुजवण्यासाठी प्रयत्नशील असलेले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या मनोहर-मनोसंतोषगडाच्या प्रदक्षिणेचा इतिहासासह वेध घेतला आहे.

दुर्गभटकंतीसोबत निसर्ग आणि इतिहासाचा अभ्यास

‘जल्लोश ग्रुप’च्या माध्यमातून गेली चौदा वर्षे भटकंती करणारे नाशिकचे रत्नाकर भामरे यांनी अलंग, मदन आणि कुरंग या दुर्गत्रिकुटाच्या प्रदक्षिणेचा थरारक अनुभव मांडला आहे. बागलाण परिसरात गडसेवक म्हणून किल्ले, जंगल आणि जलसंवर्धनासाठी कार्य करणारे उद्योजक व रत्नविशारद रोहित जाधव यांनी साल्हेर परिसरातील दुर्गवैभवाचा विस्तृत परिचय करून दिला आहे.

‘स्वराज्य सेवा प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष आणि गाविलगड व मेळघाट परिसरातील ऐतिहासिक वारशाचे अभ्यासक शिवा काळे यांनी गाविलगडाच्या प्रदक्षिणेतून या ऐतिहासिक दुर्गाचा वेगळा पैलू उलगडला आहे. बारव, मंदिरे, किल्ले, वाडे आणि स्थापत्यशास्त्राचे अभ्यासक खामगावचे डॉ. किशोर वानखडे यांनी मन आणि मस नद्यांच्या संगम परिसरातील बाळापूर किल्ल्याविषयी नवी माहिती दिली आहे.

मोडी लिपी तसेच प्राचीन व आधुनिक इतिहासाचे अभ्यासक स्वप्निल जिरगे यांनी सह्याद्रीच्या मुख्य रांगेत पसरलेल्या सुधागडाच्या प्रदक्षिणेचा अनुभव मांडला आहे. इतिहासाचा अभ्यास आणि प्रत्यक्ष भटकंती यांचा सुंदर संगम त्यांच्या लेखातून अनुभवायला मिळतो. चित्रकलेची जाण आणि ब्राह्मी लिपीचा अभ्यास असलेले शिक्षक संजीव देशपांडे यांनी नवव्या शतकातील निर्मिती मानल्या जाणाऱ्या माणिकगडाची शब्दसफर घडवली आहे.

४८ हजार किलोमीटरपेक्षा अधिक सायकल भ्रमंती केलेले निसर्गप्रेमी, इतिहासप्रेमी आणि सेवानिवृत्त शिक्षक वसंत सुरवसे यांनी अहिल्यानगरचा भुईकोट आणि सभोवतालच्या परिसराचा वेध घेतला आहे. शिवकालीन युद्धकलांमध्ये पारंगत असलेले दुर्गभटके सौरभ घरट यांनी अवचितगड आणि परिसरातील ऐतिहासिक पैलूंची नोंद केली आहे.

‘इको-प्रो’ संस्थेचे कार्यकर्ते बंडू धोतरे यांनी चंद्रपूर किल्ल्याच्या स्वच्छतेसाठी राबवलेल्या प्रेरणादायी मोहिमेचा अनुभव मांडला आहे. सलग १,०२० दिवस दररोज सकाळी ६ ते १० या वेळेत किल्ल्याच्या परकोटाची स्वच्छता करण्याचे कार्य त्यांनी केले. गोंडकालीन इतिहासाचा साक्षीदार असलेल्या या किल्ल्याच्या संवर्धनाची ही कहाणी विशेषांकातील महत्त्वाचा लेख ठरतो.

रायगड, राजगड आणि हरिश्चंद्रगडाच्या प्रदक्षिणांचे वेगळे पैलू

‘चंद्रकोर ट्रेकर्स’च्या माध्यमातून १६ वर्षे अनेकांना दुर्गदर्शन घडवणारे प्रसाद कुलकर्णी यांनी रायगडाच्या माळरानावरील वैशिष्ट्यपूर्ण प्रदक्षिणेचा अनुभव शब्दबद्ध केला आहे. ‘गडवाट’ संस्थेचे सदस्य सुहास पवार यांनी रायगड प्रदक्षिणेचा अभ्यासपूर्ण वेध घेत दुर्गसंस्कृतीची ओळख पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

दुर्गसाहित्य, वास्तुकला आणि मराठ्यांचा इतिहास या विषयांवरील विविध पॉडकास्टमध्ये सहभागी होणारे इतिहास अभ्यासक चिन्मय कीर्तने यांनी राजगडाच्या प्रदक्षिणेच्या माध्यमातून स्वराज्याच्या पहिल्या राजधानीकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मांडला आहे.भारतीय प्राचीन युद्धकलेचे प्रशिक्षण देणारे आणि शिवशक्ती अकादमीचे संस्थापक वस्ताद हितेश डफ यांनी रायगडाभोवतीच्या प्रदक्षिणेचा अनुभव गुंफला आहे. त्यांच्याकडे असलेला पाच हजारांहून अधिक शस्त्रांचा संग्रह हेही विशेष आकर्षण आहे.

अजिंठा डोंगररांगेतील लोंझा किल्ल्याच्या शोधकार्यात मोलाचे योगदान असलेले हेमंत पोखरणकर यांनी पावसाळ्यात केलेल्या हरिश्चंद्रगड प्रदक्षिणेचा रोमांचकारी अनुभव मांडला आहे. स्वराज्याच्या इतिहासाचा आणि सह्याद्रीच्या भटकंतीचा मनमुराद आस्वाद घेणारे लेखक व शिक्षक सचिन पवार यांनी तब्बल ३२ वेळा रायगडाला भेट दिल्यानंतर केलेल्या प्रदक्षिणेचा अनुभव आणि ऐतिहासिक वारसा उलगडला आहे.

‘जल्लोश ग्रुप’सोबत भटकंती करणारे सुदाम धोंगडे दरवर्षी ४०० ते ४५० किलोमीटरच्या सायकल मोहिमा पूर्ण करतात. श्रावण महिन्यात हरिश्चंद्रगडाच्या प्रदक्षिणेदरम्यान आलेले रोमांचकारी अनुभव त्यांनी शब्दबद्ध केले आहेत.शिल्पकार, चित्रकार आणि गिर्यारोहक मनीष व्यापारी यांनी माहुलीच्या त्रिकूट दुर्गांच्या प्रदक्षिणेतील अनुभव, निसर्गवैभव आणि भटकंतीचा आविष्कार मांडला आहे. तर ‘बा रायगड’ परिवाराचे रायगड जिल्हा प्रमुख मनोज थिटे यांनी घोसाळगडाच्या प्रदक्षिणेदरम्यान लागलेल्या गुहेच्या शोधाची रंजक कथा वाचकांसमोर आणली आहे.

दुर्गप्रेमींसाठी अनमोल साहित्यिक पर्वणी

प्रत्येक लेखकाचा वेगळा दृष्टिकोन, प्रत्येक दुर्गाची स्वतंत्र कहाणी आणि प्रत्येक प्रदक्षिणेतून उलगडणारा सह्याद्रीचा नवा पैलू हे या विशेषांकाचे खरे सामर्थ्य आहे. इतिहास, भूगोल, निसर्ग, जैवविविधता, दुर्गसंवर्धन आणि प्रत्यक्ष भटकंती यांचा सुंदर मिलाफ या लेखांमधून साधला आहे.

दुर्गांच्या वाटा केवळ पायांनी तुडवायच्या नसतात, तर त्या वाटांमागचा इतिहास, निसर्गाचे वैभव आणि आपल्या सांस्कृतिक वारशाचे महत्त्वही समजून घ्यायचे असते. ‘दुर्गांच्या देशातून…’चा हा प्रदक्षिणा विशेषांक वाचकांना नेमकी हीच अनुभूती देतो. दुर्गप्रेमी, ट्रेकर्स, इतिहास अभ्यासक आणि सह्याद्रीची ओढ असणाऱ्या प्रत्येकाने संग्रही ठेवावा असा हा विशेषांक आहे.

दिपावली अंक : दुर्गांच्या देशातून…प्रदक्षिणा विशेषांक
संपादक : संदीप भानुदास तापकीर
प्रकाशक : दुर्गभान प्रकाशन, पुणे
मूल्य : ४०० रुपये
संपर्क : ९८५०१७९४२१ / ९९२१९४८५४१

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

रामलीला मैदानावर इंडिया आघाडीचे शक्तिप्रदर्शन; एकजूट टिकणार किती काळ?

रामलीला मैदानावर विरोधकांनी पुन्हा एकदा एकजुटीचे शक्तिप्रदर्शन केले. ‘व्होट चोरी’ आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह…

2 hours ago

बार्शीत २० वे महात्मा फुले प्रबोधन साहित्य संमेलन

फुलचंद नागटिळक संमेलनाध्यक्ष तर डॉ. बी. वाय. यादव स्वागताध्यक्ष बार्शी - अखिल भारतीय मराठी साहित्य…

14 hours ago

बँक खाती, ठेवी, शेअर्स अन् कर्जे… आर्थिक माहिती आता एकाच छताखाली!

विशेष आर्थिक लेख:आर्थिक माहितीची नवी वाट ! बँक खाती, मुदतठेवी, म्युच्युअल फंड, शेअर्स आणि कर्जे…

1 day ago

खिशात पैसा नाही, पण श्रीमंतीचा थाट भारी! असे आहेत फुकटचंद बापू…

आर्थिक सुबत्ता नसतानाही श्रीमंतीचा आव आणत, खिशातली एकच नोट वर्षानुवर्षे मिरवत आणि दुसऱ्याच्या पैशावर ऐटीत…

2 days ago

टोरेंट पंप स्टोरेज प्रकल्प नियमबाह्य; तातडीने बंद करा !

पश्चिम घाटातील पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात प्रकल्प उभारणीला डॉ. मधुकर बाचूळकर यांचा विरोध कोल्हापूर : पश्चिम…

2 days ago

“कोण पाहिजे तुम्हाला? ते आता “तुम्हीच पाहिजे मला….” पर्यंतचा प्रवास

डॉ. भरत पाडेकर यांच्या 'साठी' निमित्त सिंहावलोकन सात रुपये रोजाने काम करणारा एक तरुण, परिस्थितीशी…

2 days ago