September 4, 2025
महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांना इंग्लंडमधील ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ तर्फे ऊर्जा क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल ‘एनर्जी लीडरशिप अॅवॉर्ड २०२५’ प्रदान.
Home » महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांना ‘एनर्जी लीडरशिप पुरस्कार
काय चाललयं अवतीभवती

महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांना ‘एनर्जी लीडरशिप पुरस्कार

मुंबई – महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना इंग्लंडच्या ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’तर्फे ऊर्जा क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल ‘एनर्जी लीडरशिप अॅवॉर्ड २०२५’ प्रदान करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात परिवर्तन चालू असून त्यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कामामुळे हा सन्मान झाला आहे. महावितरणच्या कामगिरीत राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर व अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. या पुरस्काराचे श्रेय महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आहे, असे लोकेश चंद्र यांनी सांगितले.

वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्सचे प्रमुख पाब्लो स्टॅन्ले व अध्यक्ष हेन्री आर. यांच्या स्वाक्षरीने लोकेश चंद्र यांना पुरस्कारस्वरूप प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ ही इंग्लंडमधील जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त संस्था आहे.

प्रशस्तीपत्रात म्हटले आहे की, ऊर्जा क्षेत्रातील असामान्य नेतृत्व, प्रशासनातील दूरदृष्टी आणि महाराष्ट्राच्या वीजवितरण क्षेत्रातील असामान्य योगदानाबद्दल मा. लोकेश चंद्र यांना एनर्जी लीडरशीप अॅवॉर्ड २०२५ प्रदान करण्यात येत आहे. कार्यक्षमता, कल्पकता आणि सेवेबद्दलच्या समर्पित वृत्तीमुळे मा. लोकेश चंद्र यांनी अक्षय्य ऊर्जेच्या वापराला चालना देण्यासोबतच लाखो नागरिकांना भरवाशाचा वीज पुरवठा करण्यात प्रमुख भूमिका बजावली आहे.

अक्षय्य ऊर्जेचा वापर करून वीजखरेदी खर्चात मोठी बचत करून वीजदरात कपात करण्याची ऐतिहासिक कामगिरी महावितरणने केली आहे. अशा प्रकारे वीजदरात कपात करणारी महावितरण ही देशातील पहिलीच सार्वजनिक वीज वितरण कंपनी आहे. पुढील पाच वर्षात वीज खरेदीमध्ये अक्षय्य ऊर्जेवर भर दिल्यामुळे महावितरणची सुमारे ६६ हजार कोटी रुपयांची बचत होणार असल्याने पाच वर्षे वीजदरात कपात शक्य झाली आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठीच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या अंमलबजावणीत मा. लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वात महावितरणने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. राज्यात ठिकठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारून त्यावर ४५ लाख कृषी पंप चालविण्याची ही १६,००० मेगावॅट क्षमतेची गेम चेंजर योजना आहे.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळवून देणाऱ्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती योजनेमध्ये राज्यातील ग्राहकांनी एक हजार मेगावॅटचा टप्पा ओलांडला. महाराष्ट्रात या योजनेची अंमलबजावणी महावितरण करत आहे.

शेतकऱ्यांना हक्काची सिंचन व्यवस्था मिळण्यासाठी शेतात सौर कृषी पंप बसविण्यामध्ये महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणने देशात सर्वाधिक पंप बसविले आहेत.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading